29.2 C
Latur
Sunday, May 29, 2022
Homeविशेषपुन्हा नुकसानीची भीती

पुन्हा नुकसानीची भीती

एकमत ऑनलाईन

मायानगरीला पुन्हा कोरोनाचा झटका बसला आहे. वर्ष-दीड वर्षापासून कोरोनाशी मुकाबला करताना बॉलिवूडने उत्पन्न सुरू ठेवण्यासाठी ओटीटीचा आधार घेतला. पण टॉकिजच्या तुलनेत ओटीटीवर मिळणारे उत्पन्न हे घसघशीत नसल्याने कोरोना संपण्याची वाट पाहण्याशिवाय दुसरे काहीच हाती नव्हते. डिसेंबरपर्यंत कोरोनाचे सावट कमी झाल्याने बॉलिवूड कलाकारांच्या आनंदाला उधाण आले. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. ओमिक्रॉनने शिरकाव केल्याने कलाकारांना आता पुन्हा रेसिपी व्हीडीओत मन गुंतवावे लागेल, असे दिसते. गेल्या एक-दीड वर्षात बॉलिवूडने कशीबशी तग धरली होती. पण पुन्हा लॉकडाऊन झाल्यास होणारे नुकसान हे आकलनापलीकडचे राहू शकते.

बॉलिवूडनगरीवर पुन्हा एकदा कोरोनाचे आभाळ कोसळले आहे. राजधानी नवी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक शहरांत टॉकिज बंद करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातही कोविड रुग्णांची संख्या वाढल्याने मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. सिनेमागृहातील प्रेक्षकसंख्येवर मर्यादा आणण्यात आली आहे. कोरोनाच्या तिस-या लाटेने बहुतांश राज्यात एन्ट्री केली आहे. तब्बल दोन वर्षांपासून कोरोनामुळे टॉकिज बंद राहिल्या. दुसरी लाट ओसरल्यानंतर आणि रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर दिवाळीला ५ नोव्हेंबरला अक्षयकुमारचा ‘सूर्यवंशी’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या यशावर बॉलिवूडची पुढची वाटचाल अवलंबून होती. निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी हा चित्रपट बराच काळ मेहनत घेऊन तयार केला होता. हा चित्रपट कोणत्याही स्थितीत ओटीटीवर प्रदर्शित होणार नाही, याबाबत खबरदारी घेतली गेली.

२०२१ च्या दिवाळीची सर्वजण वाट पाहत होते. अखेर ‘सूर्यवंशी’ देशभरातील सुमारे ३५०० टॉकिजमध्ये झळकला. पहिल्याच दिवशी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली. एका आठवड्यात या चित्रपटाने भारतात सुमारे १७५ कोटींचा व्यवसाय केला. हा आकडा काही अंशी कोरोनाकाळापूर्वीसारखा होता. या रीतीने टॉकिजवर प्रेक्षकांच्या पुन्हा रांगा लागतील आणि ते चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करतील, अशी अपेक्षा बाळगली जाऊ लागली. ‘सूर्यवंशी’ने ओटीटी प्लॅटफॉर्मवर तब्बल शंभर कोटी कमावले. या चित्रपटाचे यश पाहता एक-दीड वर्षापासून नुकसान सहन करणा-या बॉलिवूडला ‘अच्छे दिन’ येतील, असे वाटू लागले. तसेच स्पायडर मॅन, पुष्पा आणि ‘नो वे होम’ यासारख्या चित्रपटांनी तिकिटबारीवर जोरदार यश मिळवले. परंतु डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाचा नवीन विषाणू ओमिक्रॉनने सर्वांच्या आशेवर पाणी फेरले. नव्या वर्षाचे स्वागतही सावधगिरी बाळगत झाले आणि त्यातही जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात ओमिक्रॉनने उसळी घेतली. परिणामी लॉकडाऊनची चर्चा पुन्हा होऊ लागली.

यादरम्यान दोन मोठ्या गोष्टी झाल्या. ‘सूर्यवंशी’प्रमाणेच कबीर खानचा बहुचर्चित चित्रपट ‘८३’ हा डब्यातून बाहेर येऊन २४ डिसेंबरला पडद्यावर आला. त्यानंतर ३१ डिसेंबरला शाहिद कपूरचा ‘जर्सी’ आणि ७ जानेवारीला ‘बाहुबली’फेम राजामौली यांचा ‘आरआरआर’ येणार होता. परंतु ओमिक्रॉनमुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलले. १९८३ च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने अद्वितीय यश मिळवले आणि त्यावर कबीर खान यांनी ‘८३’ नावाचा चित्रपट तयार केला. यासाठी अडीचशे कोटी खर्च झाले. एवढेच नाही तर कोरोनामुळे चित्रपट प्रदर्शनाला विलंब झाल्याने खर्चात आणखी ३० कोटींची भर पडली. चार वर्षांपासून या चित्रपटावर प्रचंड मेहनत घेण्यात आली.

चित्रपटाची कास्टिंगही मोठी होती. १९८३ मध्ये भारताला विश्वचषक जिंकून देणारे कपिल देव देखील या चित्रपटाचा घटक होते. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांची प्रमुख भूमिका होती. या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख १० एप्रिल २०२० होती. पण कोरोना लाटेमुळे हा चित्रपट पुढे ढकलला. जवळपास दीड वर्षाच्या काळानंतर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्याचे पोस्टर्स लागले. हा चित्रपट देशभरात ५ हजार टॉकिजमध्ये प्रदर्शित करण्यात आला. ‘सूर्यवंशी’पेक्षा अधिक नाही, परंतु तेवढा तरी व्यवसाय करेल, अशी अपेक्षा होती. मनोरंजन क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी देखील हा चित्रपट पहिल्या दिवशी ५० कोटींचा व्यवसाय करेल, असे आडाखे बांधत होती. समीक्षक आणि चाहत्यांनी चित्रपटाचे कौतुक केले. तरीही पहिल्या दिवशी नाही तर आठवडा होऊनही या चित्रपटाने समाधानकारक व्यवसाय केला नाही. ख्रिसमसच्या सुट्या असतानाही प्रेक्षक चित्रपटगृहांकडे फिरकले नाहीत. यामागचे सर्वांत मोठे कारण म्हणजे कोरोना. या चित्रपटाने टॉकिजवर केलेली कमाई आणि ओटीटीवरची कमाई अशी एकत्र केली तरी कबीर खानला नुकसानच सहन करावे लागले. ही बातमी बॉलिवूड उद्योगासाठी वाईटच म्हणावी लागेल.

भारतातील यशस्वी दिग्दर्शक आणि निर्माते एस.एस. राजामौली यांनी ‘बाहुबली’नंतर आरआरआर चित्रपट आणण्यासाठी कंबर कसली. या चित्रपटात बॉलिवूड आणि दक्षिणेतील नामांकित कलाकारांचा समावेश आहे. ज्युनिअर एनटीआर, रामचरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण काम करत आहेत. हा चित्रपट हिंदीसह दक्षिणेतील सर्व भाषांत ७ जानेवारीला प्रदर्शित होणार होता. या चित्रपटाच्या प्रचारावर आतापर्यंत १८ कोटी रुपये खर्च झाले होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या या चित्रपटावरून संपूर्ण बॉलिवूडनगरी उत्साही होती. परंतु हा चित्रपट पुढे ढकलल्याने बॉलिवूडबरोबरच दक्षिणेतील चित्रपट उद्योगाला बरेच नुकसान सहन करावे लागत आहे. कोरोना काळात ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे लोकांची घरबसल्या मनोरंजनाची सोय झाली. या आधारे अनेक निर्माते टॉकिजऐवजी ओटीटीचा आधार घेत चित्रपट बाजारात आणत आहेत. पण टॉकिजवरची गर्दी ही बॉलिवूडउद्योगाला बळ देणारी असते. कोरोना काळामुळे सर्वच क्षेत्रांवर व्यापक परिणाम झालेले असताना मनोरंजन क्षेत्रही त्यास अपवाद ठरत नाही. तरण आदर्शच्या मते, आगामी काळात बॉलिवूड उद्योगात बरेच बदल होण्याची शक्यता आहे.

-सोनम परब

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या