प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे नुकतेच दु:खद निधन झाले. समुद्रकिनारी उभे राहून तुम्ही समोर पाहिलेत तर तुम्हाला पलीकडील किनारा दिसतो. पण तो खरंच किनारा असतो का? तिथे पोहोचले की तो किनारा आणखी पुढे सरकतो. त्याचप्रमाणे कला इतकी खोल आणि विस्तृत आहे की, त्या सागरात आकंठ बुडाले तरी त्याचा अंत दिसत नाही, असे विचार असणा-या आपल्या गुरूविषयी आणि वडिलांविषयी जयकिशन महाराज आणि दीपक महाराज या त्यांच्या शिष्य असलेल्या पुत्रांच्या भावना…
बिरजू महाराज हे माझे वडील. परंतु लहानपणापासून आम्ही गुरू म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले. कथ्थकचे जे आजचे स्वरूप आहे, त्यात जे सौंदर्य आहे, त्यात जी वैशिष्ट्ये कोरली गेली आहेत, ती सर्व महाराजजी यांचीच देणगी आहे. हातांची बोटे कशी असावीत, अंगठा कुठे असावा, अशा अनेक बारकाव्यांची महाराजजींची स्वत:ची शैली होती. हस्तकामध्ये आधी एकच गती होती. म्हणजे जितके बोल तितके हाताचे निकास. महाराजांनी त्यांच्या दिशा बदलून टाकल्या. त्यात सौंदर्य निर्माण केले. वडिलांचे काका शंभू महाराज हे ताकदीनिशी नृत्य करीत असत. त्याच्या अगदी विरुद्ध बिरजू महाराज यांचे दुसरे काका लच्छू महाराज यांच्या नृत्यात नजाकत होती. आमचे आजोबा अच्छन महाराज यांच्या नृत्यात लयकारी आणि संचालन वगैरे म्हणजेच तिसरे अंग होते. या तीनही बंधूंचे नृत्य आमच्या वडिलांनी खूप बारकाईने पाहिले आणि मग नंतर या तीनही शैलींचा मिलाफ करून एक चौथी वस्तू तयार केली. त्यामुळेच आज कथ्थकचे स्वरूप इतके सुंदर होऊ शकले. एका कलाकारामध्ये जे पूर्णत्व असायला हवे ते बिरजू महाराजांच्या आत होते. श्रीकृष्ण हे आमचे आराध्य दैवत. महाराजांनी श्रीकृष्णावर दादरा, ठुमरी, भजन, वंदना, कवित्त आदी अगणित रचना लिहिल्या. उदाहरणार्थ, श्रीकृष्णावर ‘वरण छवि श्याम सुंदर’ आणि शंकरावर ‘अर्धांग भस्म भभूत सोहे’ अशा रचना त्यांनी लिहिल्या.
जेव्हा मी शिक्षण घेत होतो तेव्हा माझा कल क्रिकेटकडे अधिक होता. मला क्रिकेटपटू बनायचे होते. परंतु वडिलांनी एकदा हसून म्हटले, ‘‘किती दिवस पँट-शर्ट घालशील? पायजमा-कुर्त्याचाही थोडा विचार कर.’’ त्यांच्या एवढ्या एका इशा-यामुळे घराण्याची परंपरा कायम राखत मी नर्तक झालो. महाराज नेहमी म्हणत असत की, समुद्रकिनारी उभे राहून तुम्ही समोर पाहिलेत तर तुम्हाला पलीकडील किनारा दिसतो. पण तो खरंच किनारा असतो का? तिथे पोहोचले की तो किनारा आणखी पुढे सरकतो. त्याचप्रमाणे कला इतकी खोल आणि विस्तृत आहे की, त्या सागरात आकंठ बुडाले तरी त्याचा अंत दिसत नाही. महाराजांसारखा कोमल हृदयाचा माणूस आणि गुरू क्वचितच पाहायला मिळेल. एखाद्याने चुकीचे नृत्य केले तरी त्याला केलेली दटावणीही समजुतीच्या सुरात असे. त्यांचा पदन्यास आम्हाला कायम ऐकू येत राहील.
-जयकिशन महाराज