आपल्याच शिष्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूला गुजरातच्या गांधीनगर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे लोकांना मोक्षप्राप्ती देतो असे सांगणा-या आसाराम बापूला आपले उरलेसुरले आयुष्यही तुरुंगाच्या भिंतींमध्येच व्यतीत करावे लागणार आहे. आसुमल ते आसाराम बापू अशी त्याची कहाणी मोठी सुरस आहे. २०१६ साली आसाराम बापूच्या संपत्तीची चौकशी झाली होती, त्यावेळी त्याच्याकडे २३०० करोड रुपयांची संपत्ती होती. भक्तांच्या आंधळेपणामुळेच हे शक्य झाले. मुटेरा आश्रमातील दोन मुलांची हत्या उघडकीस आल्यापासून आसारामच्या साम्राज्याचे पतन सुरू झाले. परंतु या प्रकरणातून अद्यापही समाजाने बोध घेतलेला नाही.
अलीकडील काळात बाबा-बुवांचे प्रस्थ कमालीचे वाढले आहे. सोशल मीडियाच्या जगातही त्यांचा प्रभाव मोठा असल्याचे दिसून येते. जगात असे लाखो बाबा आहेत जे स्वत:ला धर्मगुरू म्हणवतात. असे लोक पवित्र धर्मग्रंथ वाचून ज्ञानी बनतात आणि ते परमात्म्याशी परिचित, ईश्वराच्या सर्वांत जवळ असल्याचे दाखवू लागतात. कधी कधी ते स्वत:ला देवाचा दूत म्हणवून घेतात आणि कालांतराने स्वत:ला देव म्हणून सादर करतात. आपल्या ज्ञानाने आणि बनावट युक्तिवादाने शिष्यांना अडकवून ठेवतात. भारतातील भाबडे भक्तगण त्यांना खरा संत म्हणून सहज स्वीकारतात. वास्तविक, खरा सद्गुरू कसा असावा याविषयी आपल्याकडील संतांनी, समाजसुधारकांनी यथोचित प्रबोधन केले आहे. धर्मशास्त्रांमध्ये, धार्मिक ग्रंथांमध्ये ख-या सद्गुरूंची लक्षणे सांगितली आहेत. भक्तांच्या जीवनात सद्गुरूची भूमिका महत्त्वाची असते. पण म्हणून ऊठसूठ सर्वत्रच सद्गुरू उदयाला येत असतील तर ते निश्चितच योग्य नाही.
अशा सद्गुरू म्हणवणा-यांपैकी भोंदूंचे पितळ कालोघात उघड पडते. त्यामुळेच भारतातील अनेक भोंदू बाबा आज तुरुंगात बंदिवान आहेत. त्यात आसाराम बापूंचाही समावेश आहे. अलीकडेच त्याला गांधीनगर न्यायालयाने महिला शिष्यावर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आसाराम आधीच २० वर्षांची शिक्षा भोगत आहे. त्यामुळे एकंदरीत त्याचे आयुष्य आता तुरुंगातच संपणार हे निश्चित आहे. एकेकाळी पोलिस अधिकारी आणि नेत्यांना अत्यंत उद्धटपणे, उद्दामपणाने धमक्या देणा-या आसाराम बापूवर आलेली ही वेळ त्याच्या कर्माची फळे आहेत. लोकांना मोक्ष देतो, त्यांना स्वर्गात घेऊन जातो असे सांगणारा हा भोंदू मोक्ष तर दूरच पण तुरुंगातच खितपत पडणार आहे. याबाबत भारतीय न्याययंत्रणेने घेतलेला पवित्रा हा निश्चितच महत्त्वाचा आहे. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या उक्तीनुसार देशभरातील बनावट बाबांना यामुळे जरब बसण्यास मदत होणार आहे. न्यायालयाच्या ताज्या निकालामुळे लोकांच्या श्रद्धा आणि भक्तीचा गैरफायदा घेऊन त्यांचे शोषण करण्याची हिंमत करणा-या भोंदूच्या मनात दहशत निर्माण होण्यास मदत होईल. आसाराम बापूने वयाचे कारण पुढे करून शिक्षेतून सवलतीची मागणी केली होती; परंतु कोर्टाने त्याच्यावर कोणतीही दया दाखवण्यास नकार दिला. आसाराम बापूचा मुलगा साई याच्यावरही बलात्कार आणि खुनाचा प्रयत्न असे गंभीर आरोप आहेत. तोही तुरुंगात आहे. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमही तुरुंगवास भोगत आहे.
जगद्गुरू तुकाराम महाराजांनी संतांची व्याख्या करताना फार मौलिक शब्दांत उपदेश केला आहे. ‘जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा’ असे सांगून तुकोबांनी मार्मिकरीत्या साधूपणाची लक्षणे सांगितली आहेत. शेकडो वर्षांपासून ती आपण ऐकत-वाचत आलो आहोत; मात्र तरीही आज एकविसाव्या शतकात समाज भोंदूपणाने वागणा-या बाबा-बुवांना सहज शरण जाताना दिसतो. खरा संत हा उत्स्फूर्तपणे विचार आणि कृती करणारा असतो. तो स्थितप्रज्ञ असतो. सुख-दु:ख, मान-अपमान यांच्या पाशात तो अडकून पडत नाही. त्याच्या वाणीत सच्चेपणा असतो. त्याचे चारित्र्य स्वच्छ असते. खरा संत प्रत्येक माणसामध्ये फक्त ईश्वर पाहतो. त्यामुळे त्याच्यावर भवतालातील प्रतिकूल-अनुकूल परिस्थितीचा, लोकांच्या भल्या-बु-या वागण्याचा परिणाम होत नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संतपदी पोहोचणा-या व्यक्तीचे इंद्रियांवर नियंत्रण असते. तो सर्व वासनांपासून मुक्त असतो. पण आज बाबा-बुवांच्या वासनांधतेची उदाहरणे समोर येताना दिसतात.
महिलांचे-मुलींचे शोषण करण्यात मग्न असणारे, पैशांची भूक असणारे, कोट्यवधींची मालमत्ता निर्माण करून ते चैनीत आयुष्य घालवणारे हे भोंदू संत-सद्गुरू म्हणवण्याच्या लायकीचे कसे असू शकतात? पण लोकांची आंधळी भक्ती त्यांना या पदापर्यंत पोहोचवते. आसारामचा उदयही लोकांच्या आंधळ्या भक्तीमुळेच झाला. अहमदाबादपासून सुमारे १० कि.मी. अंतरावर असलेल्या मुटेरा शहरात साबरमती नदीच्या काठावर आसुमल याने १९७२ मध्ये त्याची पहिली झोपडी बांधली. आसुमल ते आसाराम बाबा यांचा आध्यात्मिक प्रवास गुजरातच्या इतर शहरांमधून हळूहळू देशातील विविध राज्यांमध्ये पसरला. सुरुवातीला गुजरातच्या ग्रामीण भागातील गरीब, मागासलेले आणि आदिवासी गटांना आपल्या प्रवचन, देशी औषधे आणि भजन-कीर्तन या त्रिकुटाने आकर्षित करून आसारामचा प्रभाव हळूहळू मध्यमवर्गीय भागात पसरला. आपल्या अनुयायांच्या बळावर आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साई यांनी देशभरात आणि परदेशात ४०० आश्रमांचे साम्राज्य स्थापन केले. राजकारण्यांनीही आसारामच्या माध्यमातून मोठ्या मतदार गटात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. आसारामपुढे नतमस्तक झालेल्या प्रमुख नेत्यांमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचा समावेश होता. आसारामचे शिक्षण चौथीपर्यंत झाले आहे. धर्मगुरू असल्याचे भासवून आसारामने एवढी संपत्ती कमवली की प्राप्तिकर विभागालाही घाम फुटला होता. ज्यावेळी २०१६ साली आसाराम बापूच्या संपत्तीची चौकशी झाली होती, त्यावेळी त्याच्याकडे २३०० करोड रुपयांची संपत्ती होती.
२००८ मध्ये मुटेरा आश्रमातील दोन मुलांची हत्या उघडकीस आल्यापासून आसारामच्या साम्राज्याचे पतन सुरू झाले. हळूहळू साम्राज्याचे खरे वास्तव समोर आले. आसारामसारख्या बनावट बाबांना शिक्षा होऊनही त्यांच्या अनुयायांच्या अंधश्रद्धेत फारसा फरक पडला नाही, याचे आश्चर्य वाटते. भारत हा अध्यात्माचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण इतिहास, संस्कृती, परंपरा असलेला प्राचीन देश आहे. देवाची भक्ती किंवा देवत्व हे केवळ सत्कर्म आणि विचारांनीच प्राप्त होऊ शकते. त्यांच्या महानतेचा दावा करणा-यांच्या आंधळ्या भक्तीतून नाही, हे लोकांना कळत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे आसारामला न्यायालयाने शिक्षा ठोठावूनही त्याची भक्ती करणारे समर्थक आज देशात दिसतात. जोपर्यंत भारतीयांना धार्मिक तत्त्वज्ञानाचे मर्म उमगत नाही तोपर्यंत आसारामसारखे ढोंगी बाबा त्यांच्या अनुयायांचे शोषण करतच राहतील. कुणालाही संत म्हणून स्वीकारण्याआधी आजूबाजूला काय घडतंय, हे लोकांनी पाहण्याची गरज आहे. यासाठी जागरूकता आणि ज्ञान आवश्यक आहे.
–कमलेश गिरी