लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील मुरहारी कराड यांचा ‘नव्या जगाची मुले’ हा बालकवितासंग्रह म्हणजे देखण्या आणि लयबध्द अशा एकूण ३७ बालकवितांची फुलबाग असून या बालकविता बाल-कुमारांच्या अनोख्या नि संवेदनशील भावविश्वाचा सहजसुंदरतेने पुन:प्रत्यय देतात. कवी स्वत: प्राथमिक शिक्षक असल्याने त्यांना मुलांच्या भावविश्वाची सखोल जाण असल्याची प्रचीती या कवितांमधून येते. मुलांच्या भावविश्वाच्या अविभाज्य घटक असलेल्या परी, घर, मित्र, चांदोबा अशा विविध घटकांवर आधारित या बालकविता असून त्या मुलांना निखळ आनंद देऊन त्यांच्या ओठांवर हसू फुलवणा-या आहेत. उदा.
‘चांदोबाच्या गावी’ कवितेत कवी म्हणतो:
गो-या, गो-या चांदोबाचा,
फोन मला आला
चांदोबाच्या गावी जाऊ,
चला आता चला..
तसेच आजच्या बुद्धिमान आणि तंत्रस्नेही मुलांच्या भावविश्वाचे प्रतिनिधित्व करणा-याही कविता इथे आहेत. मुलांच्या स्वप्नातील उद्याचे स्वप्नमय जग अनोखे, भन्नाट नि आनंददायी असणार आहे, त्याची नोंद करताना कवी म्हणतो :
उद्याच्या जगात, ढगांत भरेल शाळा
नसेल पाटी-दप्तर,नसेल बोर्ड काळा..
अशा कवितांशिवाय मुलांच्या ज्ञानात आणि माहितीत मौलिक भर घालून त्यांच्या कोवळ्या मनावर चांगल्या संस्कारांची शिंपण करणा-या कविताही या संग्रहात आहेत. उदा. ‘आपण सारे भाऊ भाऊ’ कवितेतून आजच्या काळात अत्यावश्यक असलेल्या राष्ट्रीय एकात्मतेची शिकवण बिंबवताना कवी म्हणतो,
हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आपण सारे भाऊ,भाऊ
एकमताने नि एकदिलाने, आपण सारे इथे राहू !
थोडक्यात कवी मुरहारी कराड यांच्या ‘नव्या जगाची मुले’ मधील बालकविता मुलांच्या परिचयाच्या अगदी साध्या-सोप्या शब्दकळेत व्यक्त झाली असून ही कविता तिच्या आंतरिक लय, नाद नि तालामुळे मुलांना गुणगुणावीशी वाटेल, अशी सहजसुंदर झाली आहे. पाठराखण करताना ज्येष्ठ बालसाहित्यिक एकनाथ आवाड म्हणतात त्याप्रमाणे ‘ही कविता मुलांसाठी नव्या युगाचे गाणे गाणारी आहे’, हे नक्की! शिवाय देखणे मुखपृष्ठ पुस्तकाच्या सौंदर्यात भर घालणारे आहे. एकुणात निखळ आनंद व मनोरंजनातून शिक्षण देणारी ही कविता मुलांच्या पसंतीस नक्कीच उतरेल, असा विश्वास वाटतो. हेच कवी मुरहारी कराड यांचे यश आहे…
बालकविता – नव्या जगाची मुले
कवी – मुरहारी कराड
प्रकाशक – गुरुमाऊली प्रकाशन,
उदगीर, जि. लातूर
पृष्ठे – ६४, मूल्य – ६० रु.
-उमेश मोहिते,
मोबा. : ९४०५० ७२१५४