24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeविशेषमनोरंजनासोबत संस्कार चंद्रावरची सहल

मनोरंजनासोबत संस्कार चंद्रावरची सहल

एकमत ऑनलाईन

\जालना जिल्ह्यातील अंबड येथील कवी श्री. नारायण खरात यांचा एकूण ३० बालकवितांचा ‘चंद्रावरची सहल’ हा पहिलाच बालकवितासंग्रह ज्येष्ठ बालसाहित्यिक श्री.दत्ता डांगे यांच्या इसाप प्रकाशनाने प्रसिध्द केला असून यातील कविता साने गुरुजी म्हणतात त्याप्रमाणे मुलांचे निखळ मनोरंजन करणा-या आहेत. अर्थात कवी स्वत: शिक्षक असल्यामुळे त्यांना बालविश्वाची छानशी ‘जाण’ असल्याची प्रचीती या कविता वाचताना येते. ही कविता मनोरंजनासोबतच छानशी सकारात्मक शिकवण देऊन मुलांचे मन संस्कारित करते. उदा. कावळा हा पक्षी लिंबोळ्या खाऊन झाडे वाढण्यास कशी मदत करतो, ते सांगून निसर्गाचे मानवाने संवर्धन करावे, असा बोध देताना कवी म्हणतो :
निसर्गाचे जतन माणसा
आता तरी करशील
नसता तुझे अस्तित्व
तूच नष्ट करशील ..
तर ‘वृक्षदूत’ या सुंदर कवितेत आपण सर्वांनी वृक्षारोपण करून वृक्षदूत व्हावे आणि पर्यावरण संवर्धन करावे, असा बहुमोल संदेश देताना कवी म्हणतो :
ठिकठिकाणी झाडे लावू
त्यांची काळजी मस्त घेऊ..
.. तसेच या संग्रहात मुलांना मौज वाटून त्यांच्या ओठांवर नकळतपणे हसू फुलवणा-याही काही रचना आहेत. उदा. अप्पलपोट्याचे वर्णन करताना कवी लिहितो :
अप्पलपोट्याचे अप्पलपोट
घालून फिरतो बाबांचा कोट
खायला लागते ताट भरून
घेतच राहतो पुन्हा वरून !
याशिवाय मुलांच्या भावविश्वाचा अविभाज्य घटक असलेल्या आकाश, चंद्र, सूर्य, ग्रह-तारे, परी इत्यादी विषयांवरील छान कल्पक रचना मुलांना रंजक विश्वाची सफर घडवतात.उदा. ‘चंद्रावरची सहल’ मध्ये कवी म्हणतो :
आकाशामध्ये आला चंदामामा
फिरायला चला म्हणाला आम्हा..
सुट्टी तर आहे येऊ जरा फिरून
आम्ही कळवले हात वर करून ..
..थोडक्यात नारायण खरात यांच्या ‘चंद्रावरची सहल’ या देखण्या संग्रहातील बालकविता मुलांचे मनोरंजन करून मुलांच्या संवेदनशील मनावर संस्कारांची पेरणी करणारी असून त्यासोबतच ही कविता मुलांना हव्याहव्याशा वाटणा-या अनोख्या जादूई विश्वाची सफरही लीलया घडवणारी आहे आणि मुलांच्या परिचित अशा साध्या नि सोप्या शब्दकळेत ती व्यक्त झाली असल्यामुळे मुलांना ती नक्कीच गुणागुणावीशी वाटेल, असा विश्वास वाटतो.हेच या बालकवितेचे यश आहे…
चंद्रावरची सहल – (बालकविता)
कवी – नारायण खरात
प्रकाशक. – इसाप प्रकाशन,
नांदेड
पृष्ठे – ३२
मूल्य – ४० रु.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या