18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeविशेषममतांची मुंबई वारी व काँग्रेसविरहित आघाडीचे दिवास्वप्न !

ममतांची मुंबई वारी व काँग्रेसविरहित आघाडीचे दिवास्वप्न !

एकमत ऑनलाईन

मागच्या आठवड्यात मुंबई दौ-यावर आलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘यूपीए शिल्लक आहेच कुठे?’ असा सवाल करून काँग्रेसवर टीकेचे बाण सोडले. केंद्रात भाजपविरुद्ध सक्षम आघाडी उभारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असला तरी काँग्रेसबद्दल त्यांना फारसे ममत्व नाही. राष्ट्रवादी व शिवसेनेशी चर्चा करण्यासाठी त्या मुंबईत आल्या होत्या. परंतु या दोन्ही पक्षांनी काँग्रेसला वगळून आघाडी करणे म्हणजे भाजपाला मदत केल्यासारखे होईल असे स्पष्ट केले. निवडणुकीला तीन वर्षे असताना असल्या प्रयत्नांना पाठबळ देणे महाराष्ट्रात अडचणीचे ठरेल हे उघड आहे. त्यामुळे ममतांची मुंबई वारी निष्फळ ठरली.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या फायरब्रँड मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मागच्या आठवड्यात मुंबई दौरा केला. संपूर्ण शक्तीनिशी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या सर्वशक्तिमान भाजपाचा ममता बॅनर्जी यांनी दारुण पराभव केला. भाजपाचा अश्वमेध बंगालच्या सीमेवर रोखला. स्वाभाविकच तेव्हापासून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाचे वलय वाढले आहे. राष्ट्रीय राजकारणात त्यांचा दबदबा वाढला आहे.

काँग्रेसबद्दल भाजपाएवढीच किंवा त्यापेक्षा थोडी अधिक अढी असलेल्या लोकांना, पक्षांना तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात नरेंद्र मोदी यांचा पर्याय दिसायला लागला आहे. यापूर्वी अरविंद केजरीवाल यांच्यातही काहींना हा पर्याय दिसला होता. ममता यांनाही राष्ट्रीय राजकारणात आपण महत्त्वाची भूमिका बजावू शकतो असे वाटायला लागले आहे. त्यामुळे त्यांनी प्रबळ प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हाच उद्देश ठेवून मागच्या आठवड्यात त्या मुंबईत आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांनी प्रदीर्घ चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही त्यांना भेटायचे होते. परंतु मणक्याच्या शस्त्रक्रियेमुळे ते रुग्णालयात असल्याने त्यांना भेटता आले नाही. शिवसेना नेते व खा. संजय राऊत व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी त्यांना चर्चा करावी लागली. काही उद्योगपती व मान्यवरांशीही त्यांच्या भेटीगाठी झाल्या.

देशातील एका प्रबळ प्रादेशिक पक्षाच्या नेत्या व एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो तसाच हा दौरा होता. पण ममता बॅनर्जी यांचे व्यक्तिमत्त्व, बंगालच्या विजयानंतर त्याला आलेली झळाळी, राष्ट्रीय राजकारणात पर्यायी आघाडी उभारण्यासाठी त्यांनी सुरू केलेले प्रयत्न व त्यांनी काँग्रेसवर सोडलेले टीकास्त्र यामुळे हा दौरा गाजला. यूपीए सध्या अस्तित्वातच नाही, जे भाजपविरुद्ध लढायला तयार आहेत अशा पक्षांची आघाडी उभी करावी लागेल. कोणी लढायलाच तयार नसेल तर आम्ही काय करणार ? असे एकेक बाण त्यांनी शरद पवार यांच्या भेटीनंतर काँग्रेसवर सोडले. यावेळी शेजारीच उभ्या असलेल्या पवार यांना या वक्तव्याची काय प्रतिक्रिया येऊ शकते याचा लगेच अंदाज आला. त्यामुळे त्यांनी लगेच सावरून घेतले. नंतर शिवसेना नेते व खा. संजय राऊत यांनीही काँग्रेसला वगळून समर्थ आघाडी उभी राहू शकत नाही व कोणी तसा प्रयम्त केला तर ते भाजपाला मदत केल्यासारखे होईल असे स्पष्ट केले. ममता यांच्या वक्तव्याबाबत त्या ज्यांना मुंबईत भेटल्या त्या दोन्ही पक्षांनी हात झटकले. त्यामुळे काँग्रेसनेही फार त्रागा केला नाही. पण यानिमित्ताने पर्यायी आघाडीतील अडथळे, प्रादेशिक पक्षातला गैरकाँग्रेसवाद ठळकपणे पुढे आला.

काँग्रेसमुक्त भारत हे एकट्या भाजपचे नव्हे तर काँग्रेसबरोबर सत्तेची फळं भोगलेल्या अनेकांचे स्वप्न आहे. २०१४ नंतर देशाच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाली आहे. १९७७ नंतर १९८५ पासून पुन्हा देशात आघाडीच्या राजकारणाचे प्रयोग सुरू झाले होते. पण १९८९ साली सत्तेवर आलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारपर्यंतची सगळी सरकारं अल्पायुषी ठरली. त्यानंतर मात्र वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ आणि नंतर पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने आपल्या दोन टर्म पूर्ण केल्या. २०१४ ला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआ म्हणून सर्व पक्ष एकत्रपणे लढले. परंतु भाजपाने स्वबळावर बहुमताचा आकडा गाठल्याने स्वाभाविकच मित्रपक्षांचे महत्त्व कमी झाले. त्यांची अवस्था आश्रितासारखी झाली होती. भाजपाने मग अधिक आक्रमकपणे विस्तारवादाची सुरुवात केली व मित्रपक्षांना अस्तित्वाची भीती वाटायला लागली. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने सव्वातीनशेचाही आकडा पार केला व मित्रपक्षांचे ओझे होऊ लागले. शिवसेना व अकाली दलासारख्या जुन्या मित्रांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन वेगळी वाट धरली आहे. शिवसेनेने महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आघाडी करून भाजपाला सक्षम पर्याय दिला. प्रादेशिक व राष्ट्रीय पातळीवर असे पर्याय उभे राहू शकतात.

त्यांना लोकांचा पाठिंबा मिळणार की नाही हा नंतरचा प्रश्न आहे. पण असा पर्याय उभा करण्यातच भरपूर अडचणी आहेत व त्यातील सर्वांत मोठी अडचण आहे ती या पक्षांचा गैरकाँग्रेसवाद. ममता बॅनर्जी, मायावती, अखिलेश यादव आदी नेत्यांचा व डाव्यांचा काँग्रेसविरोध भाजपाएवढाच प्रखर आहे. २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत लालूप्रसाद व नितीशकुमार यांनी काँग्रेसला सोबत घेऊन विजयाचे गणित मांडले होते. यानंतर उत्तर प्रदेशात भाजपविरोधात सपा-बसपा हे कट्टर हाडवैरी मागच्या विधानसभेत एकत्र आले. पण त्यांनी काँग्रेसला मात्र दूर ठेवले. ज्या पक्षांची वाढच त्या राज्यात काँग्रेस कमजोर झाल्यामुळे झाली आहे त्यांना काँग्रेसला शक्ती द्यायची नाही. आज काँग्रेससोबत असलेले काही नेते त्यांच्या राज्यात काँग्रेसबरोबर राहण्याशिवाय पर्याय नसल्याने सोबत आहेत. पण अनेकदा त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे काँग्रेसविरोधात भाजपाला मदत केली आहे. काँग्रेसशिवाय पर्यायी आघाडी उभी करण्याच्या प्रयत्नामागेही हीच मंडळी आहे. काँग्रेसमुक्त भारत हे काही एकट्या भाजपचे स्वप्न नाही.

काँग्रेसशिवाय तरणोपाय नाही!
कोणाची काहीही इच्छा असली तरी भाजपाविरोधात काँग्रेसशिवाय सक्षम आघाडी उभी राहू शकत नाही हे वास्तव आहे. देशाने १८ व २३ पक्षांच्या आघाड्यांची सरकारं पाहिली आहेत. आघाडी हीच मुळात राजकीय अपरिहार्यतेतून जन्माला येते. स्वबळावर सत्ता काबीज करणे शक्य नसते तेव्हा गोविंदा करून सत्तेची हंडी फोडावी लागते. खालची फळी मजबूत असेल तरच गोविंदांचे वरचे थर लागतात. आघाडीच्या राजकारणात एक सक्षम पक्ष केंद्रस्थानी असावा लागतो. खूप पूर्वी जनता पक्षाने, नंतर भाजपाने व काँग्रेसने ही भूमिका बजावली. आज काँग्रेस पक्ष तेवढा मजबूत राहिलेला नाही, लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी लागणा-या आवश्यक संख्याबळापर्यंतही जाता आले नाही हे वास्तव आहे. तरीही संपूर्ण देशात कमी-अधिक शक्ती व अस्तित्व राखून असलेला काँग्रेस हाच एकमेव पक्ष आहे. प्रादेशिक पक्षांचे नेते त्यांच्या राज्यात कितीही प्रबळ असले तरी राज्याबाहेर त्यांना फारसे पाठबळ मिळणार नाही. या स्थितीत मध्यवर्ती भूमिका काँग्रेसकडे सोपवण्याशिवाय पर्याय नाही. हे वास्तव भाजपाविरोधात मोट उभारण्याची भाषा करणा-या सर्वच पक्षांना स्वीकारावे लागेल. कोणालाही मदत झाली तरी चालेल पण काँग्रेस नको अशीच भूमिका असेल तर मात्र पर्याय नाही.

-अभय देशपांडे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या