23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeविशेषमहती पितृपक्षाची

महती पितृपक्षाची

एकमत ऑनलाईन

पितृपक्षात जर पितरांना तर्पण केले तर आपले पूर्वज जे देव होते तेही आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी यावेळी पृथ्वीवर येतात असे मानले जाते. या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचे ंश्राद्ध केले तर त्यानंतर वर्षभर त्यांना शांतता मिळू शकते. आपल्यावर देवाचे, पालकांचे, समाजाचे ऋण असते, तसेच पितरांचेही अनंत उपकार असतात. त्या ऋणाची परतफेड काही प्रमाणात करण्याच्यादृष्टीने पितृपक्षपंधरवडा महत्त्वाचा मानला जातो. यातील ख-या-खोट्याबाबत, कर्मकांडाच्या स्तोमाबाबत चर्चा करण्यापेक्षा आपल्या पूर्वजांचे, ज्यांनी आपल्यासाठी खूप मोलाचा वारसा ठेवला आहे त्यांचे ऋण फेडण्याची भावना, कृतज्ञता जपणे हे महत्त्वाचे आहे.

भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेनंतर म्हणजेच भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून ते सर्वपित्री अमावास्येपर्यंत महालय किंवा पितृपक्ष किंवा श्राद्धपक्ष असे म्हणतात. पितृ म्हणजे पीतर किंवा पूर्वज. हिंदू पुराणांप्रमाणे आपण रोज पितरांना तर्पण केले पाहिजे, पण ते शक्य नसेल तर आपण या महालय पक्षामध्ये पितरांना तर्पण करू शकतो. या पितृपक्षात जर पितरांना तर्पण केले तर आपले पूर्वज जे देव होते तेही आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी यावेळी पृथ्वीवर येतात असे मानले जाते. या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचे श्राद्ध केले तर त्यानंतर वर्षभर त्यांना शांतता मिळू शकते. श्राद्ध करताना ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्यांची तिथी माहीत असणे गरजेचे असते. यामध्ये शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्ष याची गरज नसते पण तिथी माहिती असावी. उदा. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू हा शुक्ल पक्ष सप्तमीला झाला आहे; तर पक्ष गृहीत न धरता सप्तमी ही तिथी धरून पितृपक्षामध्ये सप्तमीला श्राद्ध करावे. परंतु जेव्हा वार्षिक श्राद्ध केले जाते तेव्हा मात्र त्याच तिथीला करणे महत्त्वाचे आहे.

पितृपक्षामध्ये श्राद्ध केलेले पितरांना किंवा पूर्वजांना प्रिय असते. कारण या पितृपक्षामध्ये केलेले श्राद्ध, तर्पण त्यांना लगेच पोहोचते. यावेळी खास पितरांना आवडणारे खाद्यपदार्थ बनविले जातात. यातला काही भाग हा कावळ्यांना खाऊ घातला जातो. कावळा हा पक्षी पितरांमधला आणि जिवंत माणसातला दुवा आहे असे समजले जाते. श्राद्ध हा शब्द संस्कृतमधील श्रद्धा या शब्दापासून तयार झाला आहे. श्रद्धा म्हणजेच आदर आणि अतूट विश्वास. श्राद्ध हा हिंदू धर्मातील एक धार्मिक विधी आहे. सनातन धर्मामध्ये त्याला अत्यंत महत्त्व आहे. अग्निपुराण, गरुड पुराण, मत्स्यपुराण आणि वायुपुराण या ग्रंथांमध्ये श्राद्धाचे महत्त्व वर्णन केले आहे. या पुराणांमध्येही श्राद्धकर्म कुणाची, कधी आणि केव्हा करावीत याची माहिती दिली आहे. यापैकी गरुड पुराण हा ग्रंथ सर्वांत महत्त्वाचा असून गरुडदेव जो विष्णूंचे वाहन आहे तो प्रेतात्म्याच्या प्रवासाचे विस्तृत वर्णन करतो. हिंदू धर्मामध्ये मृत्यूनंतरच्या तिस-या दिवसापासून गरुड पुराण वाचण्याची पद्धत आहे. मृत्युदेव यमानेही या श्राद्धाला खूप महत्त्व दिले आहे.

श्राद्ध हे तीन पिढ्यांपर्यंत केले जाते. म्हणजे वडील, आजोबा, पणजोबांपर्यंत किंवा सगळ्याच पितरांचे श्राद्ध पितृपक्षामध्ये केले जाते. या दरम्यान बरेच नियम पाळावे लागतात. पितृपक्षात श्राद्धकर्म ही १६ दिवस केली जातात. श्राद्धकर्म केल्यामुळे किंवा तर्पण (पितरांना पाणी पाजणे) केल्यामुळे पितृलोकातील प्रवास करणा-या आपल्या पितरांची तहान आणि भूक भागते असे मानले जाते. जसे आपल्यावर देवाचे, पालकांचे, समाजाचे ऋण असते, तसेच पितरांचेही आपल्यावर ऋण असते. त्याची परतफेड काही प्रमाणात करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा असे धर्मशास्त्र सांगते. श्राद्ध आणि तर्पणाबरोबरच आपल्या पितरांच्या नावे काही दानधर्म करण्यालाही महत्त्व आहे. वास्तविक दानधर्म हा आपल्या धार्मिक परंपरेचा पाया आहे. हिंदू संस्कृतीतील सर्व सण-वार, परंपरा उत्सव, व्रतवैकल्ये यांमध्ये दानधर्म करण्यास सांगितले आहे. दान हे सत्पात्री असावे असे म्हटले जाते. दानधर्मामागील सामाजिक उद्देश म्हणजे आहे रे वर्गाकडून नाही रे वर्गाची ओंजळ भरणे. दानधर्मामध्ये अन्नदानाचे पुण्य मोठे आहे. त्याबरोबरीने वस्रदानालाही महत्त्व आहे.

श्राद्धकर्म ही अनेक वेळा नदीच्या किनारी घाटावर केली जातात. उज्जैन शहरात, क्षिप्रा नदीकाठी श्रीरामाने आपल्या वडिलांचे म्हणजे राजा दशरथाचे श्राद्ध केले होते. म्हणून या घाटाला रामघाट असे नाव पडले. जर लोक या ठिकाणी जाऊ शकले नाहीत तर गया येथेही श्राद्ध करण्याचे विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात नाशिकला गोदावरीतीरी किंवा कृष्णातीरावर अनेक ठिकाणी श्राद्धकर्म केली जातात. पितृपक्षामध्ये बहुतांश लोक कोणतीही गुंतवणूक करीत नाहीत. घर, वाहन खरेदी करत नाहीत किंवा लग्नही करीत नाहीत. कोणत्याही शुभ कार्याला वेळ न देता हा वेळ फक्त पितरांसाठी दिला जातो. त्यांच्या स्मृतीमध्ये हा सर्व काळ व्यतित केला जातो. काही लोकांचा असा विश्वास आहे की या पितृपक्षात मृतात्मे हे आकाशात वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात. काही अभ्यासकांच्या मते या पितृपक्षामध्ये देव झोपलेला असतो आणि या मृतात्म्यांना काहीही पुरवू शकत नाही. त्यामुळे हे मृतात्मे आपली तहान आणि भूक भागविण्यासाठी अन्न आणि पाण्याच्या शोधात आपल्या कुटुंबियांकडे आशेने येतात. ज्यांच्याकडून त्यांना अन्न, पाणी मिळण्याची अपेक्षा असते.

काही कुटुंबांचा तर इतका विश्वास असतो की ते श्राद्धादरम्यान मृत व्यक्तींना जे पदार्थ आवडायचे ते पदार्थ, गोड पदार्थ करून या मृतात्म्यांना अर्पण करतात. जरी हे मृतात्मे किंवा पितर प्रत्यक्षात येऊन अन्न खात नसले तरी या अन्नाच्या वासाने आणि दर्शनाने ते तृप्त होतात. या मृतात्म्यांना आपली माणसं आपली आठवण काढतात, आपल्या आवडीचे अन्नपदार्थ करतात याचे खूप समाधान वाटते आणि त्यामुळेच ते आपल्याला आशीर्वाद देतात. या आशीर्वादाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या आशीर्वादामुळे येणारी नवीन पिढी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ बनते. अशा प्रकारे पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी जर वर्षात कोणतेही श्राद्धकर्म केले नसेल तर पितृपक्षामध्ये श्राद्धकर्म करून आपल्या पितरांना अन्नपाणी देऊन त्यांचे आशीर्वाद मिळवणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. यातील ख-या-खोट्याबाबत, कर्मकांडाच्या स्तोमाबाबत चर्चा करण्यापेक्षा आपल्या पूर्वजांचे, ज्यांनी आपल्यासाठी खूप मोलाचा वारसा ठेवला आहे त्यांचे ऋण फेडण्याची भावना, कृतज्ञता जपणे हे महत्त्वाचे आहे.

-सुनील हिंगणे,
अध्यात्मशास्त्र अभ्यासक

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या