18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeविशेषमेटावर्सच्या आभासी दुनियेत...

मेटावर्सच्या आभासी दुनियेत…

एकमत ऑनलाईन

आजमितीस इंटरनेट तंत्रज्ञान जाणणा-या जवळजवळ प्रत्येकाला फेसबुक माहीत आहे. हेच फेसबुक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे ंटाकून मेटावर्सच्या माध्यमातून एक नवी दुनिया आपल्यासमोर आणणार आहे. यात विशेष असे काय-काय असेल आणि याद्वारे आपल्याला घेता येऊ शकणारे नवनवीन टेक्नो-एक्सपीरिअन्स काय असतील, हे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसेल.

मेटावर्स तंत्रज्ञानाचा जेव्हा आपल्या आयुष्यात प्रवेश होईल, तेव्हा तो एक अत्यंत नवा आणि अनोखा अनुभव असेल. केवळ वीस ते चाळीस वर्षांनी आपण नव्या डिजिटल अवतारात आणि ओळखीसह एका नव्या जगात प्रवेश करणार आहोत. याची जवळजवळ सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जे काम बाकी आहे, तेही प्रगतिपथावर आहे. ही दुनिया आपल्याला नक्कीच भुरळ घालेल आणि अतिशय आवडेल. फेसबुकने आपल्या मूळ कंपनीचे नाव बदलून ‘मेटा’ असे नामकरण केले हे तर सर्वांना ठाऊकच आहे. आता त्याचे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘मेटावर्स’ कंपनीत विलीन होतील. इंटरनेटच्या भविष्याकडे वाटचाल करून कंपनी अशा एका ऑनलाईन दुनियेची निर्मिती करेल, जी खरी भासू लागेल आणि तिचा अनुभव अगदी ख-या दुनियेप्रमाणे लोक घेऊ शकतील, असा कंपनीचा दावा आहे. ही दुनिया साकार करण्यासाठी कंपनी पाच कोटी डॉलरची प्रारंभिक गुंतवणूक करीत आहे. दहा हजार लोकांना कंपनी रोजगार देणार आहे. फेसबुकने आपली प्रतिमा सुधारण्यासाठी आणि व्यावसायिक अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी एक खास व्यावसायिक रणनीती म्हणून नावात बदल केला, असा अनेकांचा दावा आहे.

जगातील तीनपैकी एकजण फेसबुकचा यूजर आहे, असे आकडेवारी सांगते. अशा स्थितीत कंपनीच्या या घोषणेनंतर संपूर्ण जगभरात अचानक अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित झाले गेले. काही साधे-सरळ असून, काही जटिल आणि दूरगामी आहेत. सर्वांत महत्त्वाचा प्रश्न असा की, फेसबुकसारख्या कंपनीने नावात बदल करण्यामागे नेमकी रणनीती कोणती? मेटा हेच नाव का निवडले गेले. हा ब्रँड म्हणजे इंटरनेट दुनियेचे भविष्य असे सांगितले गेले असले तरी ते कसे घडणार? या तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे आपला इंटरनेट वापरण्याचा मार्ग बदलणार आहे का? मुळात हे सर्व व्यवहारात उतरायला किती वर्षे लागणार आहेत? ते व्यवहारात आल्यानंतरचा अनुभव कसा असेल? असे अनेक प्रश्न आहेत.

मेटावर्स हे वस्तुत: ऑग्युमेन्टेड रिअ‍ॅलिटी किंवा संवर्धित वास्तव, व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी, मशिन लर्निंग, ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानाचे मिश्रण असणार आहे. हे सर्व प्रकारचे तंत्रज्ञान एकत्र आणून तयार केलेले हे आभासी विश्व असेल. हे जग भले आभासी असले तरी त्याचा अनुभव वास्तवासारखाच असेल. परंतु हे सर्व वास्तवात आणण्यासाठी काही वेळ लागणार आहे. गूगल, अ‍ॅपल, स्नॅपचॅट यांसारख्या कंपन्यांना असा विश्वास आहे की, २०३५ पर्यंत मेटावर्स ही ७५ लाख कोटींची बाजारपेठ असेल. म्हणूनच अशा प्रकारच्या तंत्रज्ञानावर वर्षानुवर्षे काम केले जात आहे. मेटावर्सच्या दुनियेत आपल्या खास आयडीच्या माध्यमातून आपल्या डिजिटल अवतारात प्रवेश करता येईल आणि त्या जगात फिरण्याची सुविधा उपलब्ध होईल. या दुनियेचे व्हर्च्युअल चलन असेल आणि ते वापरून शॉपिंग करता येईल, जमीनजुमला विकत घेता येईल. एवढेच नव्हे तर आपण त्या दुनियेत नोकरीही शोधू शकू.

व्हर्च्युअल जग व्हर्च्युअल राहणार नाही, तर ते अगदी वास्तवासारखेच भासेल. म्हणजेच व्हर्च्युअल आणि वास्तव यामधील फरक खूपच कमी असेल. भविष्यात याच तंत्रज्ञानाच्या अ‍ॅडव्हान्स्ड व्हर्जनमुळे आभासी वस्तूंना स्पर्श करण्याचा, त्यांचा गंध घेण्याचा आभास आपल्याला होऊ शकतो. या व्हर्च्युअल जगात टेलीपोर्टेशन असेल. म्हणजेच प्रवासी असतील; पण डोळ्यांची पापणी लवण्याच्या आतच आपण कोणत्याही वाहनाशिवाय हजारो मैल दूरच्या प्रदेशात पोहोचू शकू. म्हणजेच मेटावर्स आल्यानंतर आभासी जग आणि वास्तव जग यांच्यातील अंतर कमी होईल. मेटावर्सच्या या अकल्पनीय अनुभवांमधून जाण्यासाठी हाय क्वालिटी तंत्रज्ञानाची गरज भासेल. सध्याचे तंत्रज्ञान अद्याप या लक्ष्यापासून खूपच दूर आहे. मेटावर्ससाठी आवश्यक असणारी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अ‍ॅम्बिएन्ट कम्प्युटिंग आणि इमर्सिव्ह तंत्रज्ञान. अ‍ॅम्बिएन्ट कम्प्युटिंग म्हणजे अशी संगणक प्रणाली, जिचा स्क्रीन आपल्या चहूबाजूंना असेल. जीवनाशी संबंधित सर्व गोष्टी त्यात समाविष्ट होऊ शकल्या पाहिजेत. त्यामुळे यूजर याच्या मदतीने आपले हावभाव आणि त्यानंतर केवळ आपल्या विचारांच्या माध्यमातूनही आपल्यापासून दूर असलेल्या व्यक्तीला भेटू शकेल.

-गणेश काळे
संगणकतज्ज्ञ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या