22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeविशेषमोदी है तो मुमकीन है

मोदी है तो मुमकीन है

एकमत ऑनलाईन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जागतिक दर्जाचे स्मारक मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर उभारले जात आहे. केंद्र सरकारने या स्मारकासाठी १६०० कोटी रुपयांची जमीन विनामूल्य दिली आहे. या जागतिक दर्जाच्या स्मारकाचा भूमिपूजन समारंभ मुंबईत पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते मुंबईतील बी. के. सी. ग्राऊंडवर संपन्न झाला. या वेळी मोदीजींनी केलेल्या भाषणात देशातील दलित, आदिवासी व ओबीसी समाजामुळे मी या देशाचा पंतप्रधान आहे असे म्हटले होते. परिणामाची पर्वा न करता असे धाडसी विधान प्रामाणिकपणे केवळ नरेंद्र मोदीच करू शकतात. तसेच समाजातल्या मागास वर्गात, गरीब माता-पित्याच्या पोटी जन्माला आलेला माझ्यासारखा माणूस केवळ डॉ. बाबासाहेबांमुळेच या देशाचा पंतप्रधान बनू शकला, अशी कृतज्ञता मोदीजी अनेकदा जाहीरपणे व्यक्त करतात. हे शब्द समाजातील दलित, शोषित, पीडित व आदिवासी यांच्याप्रति असलेली त्यांची आस्था, तळमळ, बांधीलकी सिद्ध करतात.

पंडित दीनदयाळजींचा अंत्योदयचा, मा. गांधीजींचा रामराज्याचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक व आर्थिक समतेचा विचार या विचारमूल्यांवरच मोदी यांची जीवन परिक्रमा सुरू आहे. कोणी काहीही म्हणोत त्याची पर्व न करता ‘चरैवती’चा संदेश सा-या जगाला देत अटल आणि अढळ असा त्यांचा प्रवास सुरू आहे. अनेक वर्षे संपूर्ण देशाचा प्रवास करून, अनेक घटना अनुभवून आणि अनेक अपमान सहन करून त्यांची वैचारिक बैठक भक्कम झाली आहे. या वैचारिक बैठकीमुळेच त्यांच्या अंगी योग्याची योग्यता, संताची सहनशीलता आणि राष्ट्रभक्ताची राष्ट्रीयता पुरेपूर भिनली आहे. म्हणूनच आपल्याला अत्यंत नि:स्पृह, नि:स्वार्थी, द्रष्टा आणि खंबीर पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींच्या रूपाने लाभला आहे.

नुकताच भारताने आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. गेल्या ७५ वर्षांतील विकासाचा मागोवा घेताना आपल्याला काय दिसते? मा. नरेंद्र मोदी पंतप्रधान होईपर्यंत देशातील स्थिती काय होती? देशातील १८ हजार गावांत वीज नव्हती, १३० कोटी लोकसंख्येपैकी १०० कोटी लोकांना बँक माहीत नव्हती. ७० कोटी लोकांकडे शौचालये नव्हती. स्वातंत्र्यानंतरही ६७ वर्षे आपल्या देशातल्या अर्ध्यापेक्षा अधिक आया-बहिणींना आपला नैसर्गिक विधी उघड्यावर पार पाडावा लागत होता. ६७ हजार गावांना रस्ताच नव्हता. आणि एक लाखापेक्षा अधिक गावांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नव्हते. सरकार कोणाचे का असेना ज्यांचे सरकार होते त्यांनी नेमका कोणता विकास केला, हा प्रश्न आज प्रत्येक भारतीयाच्या मनात पडतो आहे. म्हणूनच देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदींना देशातील सर्वाधिक लोकांनी पसंती दिली आहे. आणि ते जगातील सर्वांत लोकप्रिय नेते ठरले आहेत.

प्रेरणादायी जीवन
एका अत्यंत गरीब मागासवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या नरेंद्र भाईंना सर्वसामान्यांच्या व्यथा, वेदना, सामाजिक दु:ख व परिस्थितीची पुरेपूर जाणीव असल्याने व्यक्तिगत विचार न करता त्यांनी देशासाठी जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला. ज्या विचारधारेत ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा मूलमंत्र आहे, त्या विचारधारेची कास धरूनच आपल्याला गरीब शोषित, पीडित व शेवटच्या माणसासाठी काम करता येईल अशी धारणा झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या राष्ट्रवादी विचाराच्या स्वयंसेवी संस्थेस आपले आयुष्य देण्याचे ठरवून प्रवासाला सुरुवात केली. त्याच प्रवासाने त्यांना २०१४ साली देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचविले.

देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले होते, ‘मी देशाचा पंतप्रधान नाही प्रधानसेवक आहे.’ त्यांच्या या शब्दांमुळे आज देशातील अनेक लोक स्वत:ला सेवक समजून देशासाठी काम करीत आहेत, मोदीजींचे आदर्शवत जीवन आज अनेकांना प्रेरणादायी ठरले आहे. मोदी नावाचे गारूड सा-या जगभर गुंजारव करत आहे. कारण त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण देशासाठी अर्पिला आहे. आजही रोज १८-१८ तास देशासाठी ते काम करतात. सहका-यांना, अधिका-यांना काम करायला लावतात. योग्य दिशा-सुस्पष्ट नीती राष्ट्रसमृद्धीचा विचार यापूर्वी अनेकांनी मांडला परंतु राष्ट्रसमृद्धीसाठी योग्य दिशा व मार्ग अवलंबिल्यामुळे राष्ट्राची गेल्या आठ वर्षांत जी प्रगती झाली ती त्यापूर्वी ७० वर्षांत होऊ शकली नाही. योग्य दिशा आणि सुस्पष्ट नीती अंगीकारल्यामुळे ७० वर्षांत जे झाले नाही ते आठ वर्षांत मोदीजींनी करून दाखविले.

आपण जेव्हा जेव्हा विकासावर बोलतो तेव्हा सार्वजनिक, भौतिक सोयी-सुविधांवर आपला भर असतो. परंतु नरेंद्रभाईंनी भौतिक सोयी-सुविधांचा विचार तर केलाच परंतु भौतिक सुविधांसोबत सामाजिक विकासासाठी व्यक्तिगत विकासावरही भर दिला. व्यक्तिगत विकासासाठी मोदी सरकारने सुकन्या समृद्धी, मातृत्व वंदना, मिशन इंद्रधनुष्य, उज्ज्वला, शेतकरी सन्मान निधी, पीक विमा, गोकूळ मिशन, सौर ऊर्जा, स्फूर्ती, मत्स्य संपदा, किसान क्रेडिट कार्ड, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, दीनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास योजना, स्वनिधी, ई-स्कील इंडिया, स्वयंप्रभा, मेक इन इंडिया, जनधन, सुरक्षा विमा, अटल पेन्शन, जीवन ज्योती विमा, पंतप्रधान आवास, शौचालय बांधणी, ई-श्रमकार्ड, श्रमेय जयते, आयुष्मान भारत, टीबी मिशन, सौभाग्य, उजाला, अन्न सुरक्षा, स्वामित्व, ग्राम ज्योती, जनऔषधी, श्रमयोगी, मुद्रा, कौशल्य विकास, दक्ष योजना यासारख्या व्यक्तिगत लाभांच्या योजनांमुळे सर्व समाजातील अनेक गरीब गरजूंना आर्थिक फायदा झाला व त्यांची आर्थिक उन्नतीही झाली.

सामाजिक लोकशाहीचे प्रणेते
नरेंद्रभाई डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाईक असल्याने त्यांनी राजकीय लोकशाही प्रगल्भ करत असतानाच सामाजिक लोकशाही प्रगल्भ करण्याचा प्रयत्न केला. भारतीय घटना हाच माझा धर्मग्रंथ आहे असे सांगून त्यांनी घटनेबद्दल आदर तर व्यक्त केलाच परंतु माझे राज्य हे घटनेचे असेल, असे ठासून सांगितले. बाबासाहेबांचे व्हिजन हेच आमचे मिशन आहे, हे वारंवार नुसते सांगितलेच नाही तर बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित सामाजिक लोकशाही भक्कम केली.
या देशात सर्व समान आहेत, सर्वांना सारखाच कायदा आहे आणि सर्वांना सारख्याच सोयी-सुविधा असायला हव्यात. यासाठी घटनेतील ३७० कलम हटविले.

महिलांच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारी तीन तलाक पद्धत बंद केली. सामाजिक समानतेबरोबर आर्थिक समानता आणण्यासाठी महिलांच्या आर्थिक उन्नतीच्या अनेक योजना आखून त्यांची अंमलबजावणी केली. सामाजिक समतेचे प्रणेते डॉ. बाबासाहेबांच्या आयुष्याशी संबंधित पाच ठिकाणे जन्मगाव महू, लंडनमधील त्यांचे घर, जिथे बाबासाहेबांनी दीक्षा घेतली ती दीक्षाभूमी, महापरिनिर्वाण स्थळ दिल्ली व चैत्यभूमी-दादर ही पंचतीर्थ म्हणून घोषित करून त्यांच्या विकासासाठी शेकडो कोटींची तरतूद केली. या देशातील व्यक्ती केंद्रबिंदू मानून त्यांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी विविध योजना आखून त्यांची अंमलबजावणी केली. देशाचा केवळ आर्थिक विकासच केला नाही तर, देशाची प्रतिमा बदलण्याचे व जगात भारताला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे काम पंतप्रधान म्हणून मा. नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मोदीजींच्या कार्यकर्तृत्वामुळे देशाचे चरित्र आणि चारित्र्य उजळले आहे. म्हणून देश म्हणतो आहे, ‘मोदी है तो मुमकीन है.’ (लेखक भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रवक्ते व ‘मनोगत’ पाक्षिकाचे संपादक आहेत.)

-गणेश हाके

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या