24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeविशेषयुक्रेन युद्धातील नवा पैलू

युक्रेन युद्धातील नवा पैलू

एकमत ऑनलाईन

युक्रेन युद्धात गुप्त किंवा सांकेतिक भाषेत न बोलता खुल्या भाषेत झालेली अनेक संभाषणे, स्माटफोन व्हिडिओ क्लिप्स, सोशल मिडिया पोस्ट्स आणि फोटोंचे पृथ:करण अमेरिका व नाटो राष्ट्रे आर्टिफिशियल इंटलिजन्सद्वारे सतत करतातच आहेत. पण यात नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून रशियन लष्करी संभाषणांचे झालेले पृथकरण सर्वात नाविन्यपूर्ण आणि महत्त्वाचे आहे. ज्या पद्धतीने आणि वेगाने युक्रेन युद्धातील रशियन रेडियो संभाषण पकडून कारवाया करताहेत त्यावरून, सांप्रत युद्धपद्धतीतील आर्टिफिशियल इंटलिजन्सचे महत्त्व अधोरेखित होते.

आजमितीला प्रचलित असलेल्या संगणकीय स्फोटाच्या काळात, गोळा केलेल्या माहितीच्या पृथ:करणासाठी विलेषकांना अनेक नवीन प्रणाल्या उपलब्ध होत आहेत. मात्र त्यामधील धोकेही त्याच प्रमाणात वाढत आहेत. गेल्या दीड महिन्यापासून सुरु असलेल्या रशिया- युक्रेन युद्धात ‘प्राइमर’ या अमेरिकन कंपनीने युक्रेनच्या आर्टिलरी फायरखाली आलेल्या काही रशियन सैनिकांचे, सोशल मिडीयावर प्रचंड गाजलेले उघड वेव्हलेन्थमधील रेडियो संभाषण पकडले होते. प्राइमर कंपनी माहिती पृथकरणासाठी आपल्या ग्राहकांना सर्वंकष सेवा पुरवते. त्यांनी टिपलेले सर्व संभाषण आर्टिफिशियल इंटलिजन्स प्रणालीद्वारे पकडले गेले आणि आपोआप रशियन भाषेत छापले जाऊन लागलीच त्याचे इंग्रजीत भाषांतर होऊन सत्वर पृथकरणही झाले. हे संभाषण युक्रेन सेनेने ऐकले की नाही हे स्पष्ट नसले तरी अमेरिका व नाटो राष्ट्रे ज्या पद्धतीने आणि वेगाने युक्रेन युद्धातील रशियन रेडियो संभाषण पकडून कारवाया करताहेत त्यावरून, सांप्रत युद्धपद्धतीतील आर्टिफिशियल इंटलिजन्सचे महत्त्व अधोरेखित होते.

युक्रेन युद्धात गुप्त किंवा सांकेतिक भाषेत न बोलता खुल्या भाषेत झालेली अनेक संभाषणे, स्मार्टफोन व्हिडिओ क्लिप्स, सोशल मिडिया पोस्टस आणि फोटोंचे पृथकरण अमेरिका व नाटो राष्ट्रे आर्टिफिशियल इंटलिजन्सद्वारे सतत करतातच आहेत. पण यात नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून रशियन लष्करी संभाषणांचे झालेले पृथकरण सर्वात नाविन्यपूर्ण आणि महत्त्वाचे आहे. आजमितीला कुठेतरी दूरवर खोलीत बसलेले युक्रेनी सेनाधिकारी आणि तंत्रज्ञ खुल्या भाषेत झालेली लष्करी संभाषणे, स्मार्टफोन व्हिडिओ क्लिप्स, सोशल मीडिया पोस्ट्स आणि फोटोंचे पृथकरण करताहेत. पण अमेरिका आणि नाटो राष्ट्रे प्राइमर कंपनीने शिकवलेल्या संगणकीय ज्ञान प्रणालीच्या (मशीन लर्निंग) माध्यमातून माहिती हेरगिरीत प्रवीण झाली आहेत.

गेल्या दशकात मिळालेल्या प्रशिक्षण विदेच्या पृथकरणातून प्रतिमा संशोधन (इमेज रिकग्निशन), बोल उतारा (स्पीच टान्सक्रिप्शन), अनुवाद (ट्रान्सलेशन) आणि भाषा प्रक्रिया (लँग्वेज प्रोसेसिंग) या संकल्पनांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. या प्रगतीमागे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या न्यूरल नेटवर्क अल्गोरिदम प्रणालीची भूमिका अतिशय महत्वाची आहे. शत्रूपाशी असलेल्या सांख्यिक आणि दूरवर, जबरदस्त मारा करणा-या हत्यारांचा सामना करण्यासाठी तसेच त्याला तोंड देण्यासाठी लढणा-या लष्करासाठी संभाषण, स्मार्टफोन व्हिडिओ क्लिप्स, सोशल मीडिया पोस्टस आणि फोटोंचे त्वरित पृथ:करण सामना पलटवणारे (गेम चेन्जर) ठरेल यात शंकाच नाही.

अमेरिकेची प्राइमर कंपनी आर्टिफिशियल इंटलिजन्सच्या माध्यमातून सांकेतिक नावे, शब्द, सामान्य म्हणी आणि बोलीचे भाषांतर करणारे न्यूरल नेटवर्क अल्गोरिदम ग्राहकांना विकते आहे. या कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर आर्टिफिशियल इंटलिजन्स मशीन लर्निंग मॉडेलमध्ये, लांबलचक व गुप्त शब्दमाळेला वाक्यात बदलून, त्याला भाषांतरीत करून प्रिंट करण्याची क्षमता आहे. मात्र कंपनी मुख्य व्यवस्थापक शॉन गौरले यांच्या म्हणण्यानुसार युक्रेन युद्धासाठी या कंपनीच्या तंत्रज्ञांना, रेडिओ संभाषणातील ध्वनीफितींमधील ध्वनी लहरींना पकडून त्यांना वृत्तलहरींमध्ये परिवर्तीत करणे, त्या संभाषणातील इतर आवाज, संगीत, बडबडीचा वायफळ गोंधळ कमी करणे, रशियन बोलीचे भाषांतर आणि वृत्तछपाई तसेच त्या भाषेतील युद्धभूमी संबंधित शब्दे, वाक्ये, वाक्प्रचारांना अधोरेखित करणारी सॉफ्टवेअर्स मुद्दाम बनवावी लागली होती. त्यात आजही संशोधनात्मक बदल सुरूच आहेत. हे करण्यासाठी त्या तंत्रज्ञांना, कंपनीच्या मशीन लर्निंग मॉडेल्सना पुर्नप्रशिक्षण द्यावे लागले.

या मॉडेलमध्ये व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क प्रणालीचा (व्हीपीएन सिस्टीम) वापर केला जातो. यामध्ये वापरणा-या किंवा बोलणा-याचा इंटरनेट ट्रॅफिक गुप्त (एन्क्रिप्टेड) असतो. बोलणारा कोण हे इतरांना कळत नसल्यामुळे तुमचे संभाषण किंवा जागेचा पत्ता शत्रूला लागू शकत नाही. सामान्य इंटरनेट ट्रॅफिकला दूर असलेल्या होस्ट सर्व्हरकडे पाठवले जाते आणि तेथून इतरांकडे जात असल्यामुळे बोलणे आपोआप गुप्त होते. शॉन गौरले यांच्या म्हणण्यानुसार, युक्रेन युद्धानंतर या क्षेत्रात अनेक स्टार्टअप्स प्रवेश करतील. प्राइमर कंपनीने ही प्रणाली इतर काही राष्ट्रांनाही दिली आहे. पण कोणाला, कशासाठी आणि केव्हा हे सांगण्यास गौरलेंनी नकार दिला. इतर अमेरिकन कंपन्यांनी रशियाशी लढणा-या युक्रेनला आर्टिफिशियल इंटलिजन्स संबंधींचे तंत्रज्ञान, माहिती आणि सेवा दिल्या असल्या तरी प्राइमरच्या या सॉफ्टवेअरची बरोबरी आजमितीला तरी कोणीही करू शकलेले नाही.

काही वर्षांपूर्वीच झालेल्या चेचेन युद्धात त्या बंडखोरांच्या उघड संभाषणातूनच रशियन सेना त्यांचा ठावठिकाणा व कारवाईसंबंधी माहिती मिळवून त्यांचा सफाया करत असे. असे असतांनाही, युक्रेन युद्धात रशियन लष्कराच्या खुल्या रेडियो चॅनेल्सच्या वापरामुळे रशियन लष्कर या आक्रमणात कमी तयारीनिशी आणि कमी संसाधनांसह (अंडररिसोर्स्ड) उतरले आहे हे उजागर होते. युक्रेनी सेनेनी देखील रशियन भाषेतील अशी अनेक उघड संभाषणे पकडली असतील. पण त्याच्या मानवी पृथकरणाला बराच वेळ लागत असल्यामुळे त्यांना या इंटेलिजन्सचा त्वरित फायदा मिळू शकला नाही. रशियन सेनेने हे पाऊल उद्दाम मानसिकता किंवा वरिष्ठ सेनाधिका-यांच्या नैराश्येमुळे उचलले असावे असा संरक्षणतज्ञांचा कयास आहे.
आर्टिफिशियल इंटलिजन्सचा वापर करून हाती आलेले खुले संभाषण, स्मार्टफोन व्हिडिओ क्लिप्स, सोशल मिडिया पोस्ट्स आणि फोटों यांच्या मदतीने माहिती कशी गोळा केली जाऊ शकते,

या माहितीचा योग्य वापर केल्यास काय होऊ शकते हे युक्रेन युद्धाने दाखवून दिले आहे, असे ‘१०० ईअर्स ऑफ रशियन इंटेलिजन्स वॉर विथ वेस्ट’ या प्रख्यात पुस्तकाचे लेखक आणि हार्वर्ड विद्यापीठातील संरक्षणतज्ज्ञ काल्डर वॉल्टन म्हणतात. उपग्रह प्रणाली, ड्रोन, इतर इमेजरी सोर्सेसच्या मदतीने मिळालेल्या माहितीवरून युक्रेनने काही रशियन जनरल्सचा खातमा केला. पण रशियन सेना मात्र स्वत:चे सेलफोन्स वापरत असल्यामुळे त्यांचा ठावठिकाणा, संभाव्य कारवाईचा आयाम आणि सांप्रत मन:स्थितीची माहिती युक्रेन सेनेला सहजगत्या मिळत गेली. ओपन सोर्स इंटेलिजन्स मिळवणे, त्याची योग्य वर्गवारी करणे आणि त्यांचे पृथकरण करून कमीत कमी वेळेत योग्य त्या सैनिकांपर्यंत पोचवणे हे महत्वाचे पण कठीण काम आहे. मशिन लर्निंग टूल्समुळे इमेजरी अ‍ॅनालिसिस सोपे झाले आहे. त्याचप्रमाणे आर्टिफिशियल इंटलिजन्सद्वारे मिळालेल्या चित्रांची व त्यातील माहितीची वर्गवारी करणेही आता सोपे झाले आहे. प्राइमरने बोली आणि भाषांतराचे सॉफ्टवेअर विकसित करून आजतरी इतर सर्वांवर कुरघोडी केली आहे. युक्रेन युद्धामुळे एक अजून बाब समोर आली आहे.

आजतायगत, युद्धभूमीवरील सिग्नल कम्युनिकेशन प्रत्येक राष्ट्रांच्या स्वत:च्या सिग्नल युनिट्सकडे असायचे. भारतात आजही हीच परिस्थिती आहे. या सर्व राष्ट्रीय सिग्नल युनिट्सकडे विविध संगणकीय कलाबाजीची शस्त्रे असतात. पण युक्रेन युद्धासाठी अमेरीका आणि नाटो राष्ट्रांनी सिग्नल कम्युनिकेशन टॅप करण्याची जबाबदारी प्राइमर नावाच्या खाजगी अमेरिकन कंपनीला दिली. सॅटेलाईट कम्युनिकेशन आणि इमेजरीसाठी उपग्रहांचे संचलन करणा-या इतरही काही कंपन्या अमेरिका, नाटो, युक्रेनला त्या सेवा पुरवताहेत. उद्या या कंपन्या हे तंत्रज्ञान या राष्ट्रांच्या शत्रूंना विकणार नाहीत याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. कारण काहीही करुन नफ.ा मिळवणे हेच अशा कंपन्यांचे ध्येय असते. नफ्यासाठी या कंपन्या कुठल्याही आंतरराष्ट्रीय युद्धात सर्वात जास्त मोबदला देणा-याला आपली सेवा देऊ शकतात.

अतिशय वेगवान अस्त्रांनी लढल्या जाणा-या भावी युद्धांमध्ये तात्काळ चोख माहिती मिळवून कमीत कमी वेळात पृथकरण करून सैनिकांना देणे अतिशय महत्वाचे असणार आहे. शत्रू दमनासाठी रशियाने युक्रेनमध्ये रणगाडे, क्षेपणास्रे आदींचा वापर केला. पण अमेरिका आणि नाटो राष्ट्रांनी आर्टिफिशियल इंटलिजन्सची कास धरली. त्यांनी पोलँडमध्ये टॅक्टिकल इंटेलिजन्स टारगेटिंग अ‍ॅॅक्सेस नोड अंतर्गत एक ग्राउंड स्टेशन स्थापन केले आहे. त्या स्टेशनला विविध युद्धस्थळांवरील सेन्सर्स आणि डेटा सोर्सेसमधून मिळणा-या माहितीच्या आधारे हे लोक युक्रेन सेनेला वार-प्रतिवाराचे युद्ध करण्याचे इशारे देताहेत.या माहितीद्वारे तुम्ही शत्रूवर सामरिक कुरघोडी करू शकता.

-कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या