24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeविशेषविजय श्रद्धेचा व्हावा!

विजय श्रद्धेचा व्हावा!

एकमत ऑनलाईन

रामजन्मभूमीचा वाद पाच दशकांनंतर मिटला; परंतु त्या तुलनेत काशीच्या ज्ञानवापी मशिदीच्या वादावरील तोडगा कमी वेळात निघत असताना दिसत आहे. अयोध्या, मथुरा, काशीमध्ये संघ आणि भाजपची मोहीम थांबलेली नाही, हेही दिसून येते. ती सुरू असल्याची जाणीव सातत्याने होत आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र हे सौहार्द, सहिष्णुता आणि सौम्यतेचे प्रतीक आहेत. भोळे शंकर तर प्रगल्भ आणि प्रचंड आहेत. त्रिनेत्रधारी, त्रिशूलधारी, अनादी-अनंत आहेत. त्यामुळे कदाचित रामजन्मभूमीचा वाद सुरू असताना कोर्टामागून कोर्ट, घटनांमागून घटना अशा पद्धतीने घडत गेल्या की, न्यायव्यवस्था, विधिमंडळ आणि कार्यपालिका यांच्या प्रतिष्ठेला तडा गेला नाही. हा वाद रामजन्मभूमीवरील मालकी हक्काचा होता. निर्णय पंचायतीसारखाच झाला, तरीही सार्वजनिक प्रतिष्ठा कायम राहिली.

आज ज्ञानवापी मशिदीच्या इतिहासावरून हिंदू-मुस्लिम आमने-सामने आहेत. परंतु आजच्या पुराव्यांपासून ते अनेक इतिहासकारांच्या वर्णनापर्यंत आणि प्राचीन खटल्यांच्या निकालांपर्यंत सर्वकाही एकच गोष्ट सांगतात की, ज्ञानवापी मशीद मंदिरावर बांधण्यात आलेली आहे. ही वस्तुस्थिती कोणत्याही सामान्य माणसाला उघड्या डोळ्यांनी पाहिल्यावर स्पष्टपणे दिसून येते. त्यात कोणतीही गुंतागुंत किंवा अवघड बाबी नाहीत. सर्वकाही समोर आहे, नोंदवलेले आहे, दस्तावेजीकरण केलेले आहे. माता शृंगार गौरीची आरती, पूजा आणि दैनंदिन दर्शनासाठी न्यायालयाच्या मागणीनुसार सुरू झालेल्या तीन दिवसीय सर्वेक्षणाच्या पहिल्या रात्री संबंधित विभागाने वजूखान्यातील पाणी आणि मासे बाहेर काढून पुरावे गोळा करण्याचा मार्ग मोकळा केला. सुमारे १५०० छायाचित्रे काढण्यात आली. व्हीडीओ बनविले गेले. बारा पानी अहवाल तयार करण्यात आला. वजूखान्याच्या खाली १२ फूट लांब आणि ८ फूट रुंद शिवलिंग सापडल्याचे हिंदू पक्षाकडून सांगण्यात आले तर ज्याला शिवलिंग म्हटले जात आहे ते कारंजे असल्याचे मुस्लिम पक्षाचे म्हणणे आहे. मात्र न्यायालयाने समीक्षा केल्यानंतरच याबाबत कोणताही खुलासा करणे शक्य होईल, असे कोर्ट कमिशनर विशाल सिंह यांनी सांगितले.

सर्वप्रथम ऐतिहासिक पुराव्यांचा आढावा घेऊ. सामान्यत: लोकांना असे माहीत आहे की, मुघल शासक औरंगजेबाने १६६९ मध्ये बनारसमधील विश्वेश्वर मंदिर पाडून ज्ञानवापी मशीद बांधली होती. परंतु वास्तव असे आहे की, मूळ विश्वेश्वर मंदिर सोळाव्या शतकात बनारसच्या प्रतिष्ठित ब्राह्मण घराण्यातील राजा तोरडमल याने नारायण भट्ट यांच्या सहकार्याने बांधले होते. त्यानंतर जहांगीरचे जवळचे सहकारी वीरसिंग देव बुंदेला यांनी सतराव्या शतकाच्या सुरुवातीला विश्वेश्वर मंदिराचा काही प्रमाणात जीर्णोद्धार केला. मात्र, हे मंदिर अनेकदा उद्ध्वस्त केले गेले आणि पुन्हा बांधले गेले. इतिहासकार माधुरी देसाई यांच्या ‘बनारस रिकन्स्ट्रक्टेड : आर्किटेक्चर अँड सेक्रेड स्पेस इन अ हिंदू होली सिटी’ या पुस्तकात मूळ मंदिराचा इतिहास आणि ज्ञानवापीच्या स्थानावरून निर्माण झालेल्या तणावाचा उल्लेख केला आहे. कनौजचा राजा जयचंद्र याच्या पराभवानंतर कुतुबुद्दीन ऐबक याने ११९३-९४ मध्ये विश्वेश्वर मंदिरातील शिवलिंग पहिल्यांदा उखडून टाकल्याचे सांगितले जाते.
नंतर राजा मानसिंग यांनी मुघल सम्राट अकबराच्या काळात ज्ञानवापी संकुलात मंदिर पुन्हा बांधले. परंतु सनातनी ब्राह्मणांनी मंदिरावर बहिष्कार टाकणे पसंत केले, कारण त्यांच्या मुलीचे इस्लामिक शासकाशी लग्न झाले होते. १५८५ मध्ये राजा तोडरमल यांनी मंदिरात आणखी सुधारणा केल्या.

१६६९ मध्ये औरंगजेबाच्या तीव्र धार्मिक उन्मादाला मंदिर बळी पडेपर्यंत येथे विश्वेश्वर लिंगम जवळजवळ एक शतक ठेवण्यात आले होते. औरंगजेबाने ते पाडून त्याचे मशिदीत रूपांतर केले. एवढेच नव्हे तर २० डिसेंबर १८१० रोजी बनारसचे तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी व्हिटसन यांनी व्हाईस प्रेसिडेन्ट इन कॉन्सिल यांना पत्र लिहून ज्ञानवापी संकुल कायमचे हिंदूंच्या ताब्यात देण्याची विनंती केली. परंतु हे आजतागायत शक्य झाले नाही. मुहम्मद तुघलकाचे समकालीन लेखक जिन प्रभू सुरी यांनी विविध कल्प तीर्थ या पुस्तकात लिहिले आहे की, बाबा विश्वनाथ यांना देव क्षेत्र म्हटले जात असे. फ्युहरर या लेखकाने लिहिले आहे की, फिरोजशाह तुघलकाच्या काळात काही मंदिरांचे मशिदीत रूपांतर झाले. अयोध्या प्रकरणात पुरावा म्हणून फ्युहररची कागदपत्रे न्यायालयाने स्वीकारली आहेत. १४६० मध्ये वाचस्पतीने आपल्या तीर्थ चिंतामणी या ग्रंथात अविमुक्तेश्वर आणि विश्वेश्वर हे एकच लिंग असल्याचे लिहिले आहे. इतिहासकार डॉ. एस. एन. भट्ट यांनी त्यांच्या ‘दान हरावली’ या पुस्तकात लिहिले आहे की, महाराजा तोरडमल यांनी १५८५ मध्ये मंदिराची पुनर्बांधणी केली. यानंतर १८ एप्रिल १६६९ रोजी औरंगजेबाने काशी विश्वेश्वर मंदिर नष्ट करण्याचा आदेश जारी केला. हा हुकूम कोलकात्याच्या एशियाटिक लायब्ररीत ठेवण्यात आला आहे. या विनाशाचे वर्णन साकी मुस्ताईक खान यांच्या मसीदे आलमगिरी या पुस्तकातही आढळते.

सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून विश्वेश्वराने शहराचे मुख्य मंदिर म्हणून स्थान मिळवले. या प्रकरणी १९३७ ते १९९१ पर्यंत ज्ञानवापी संकुलाबाबत कोणताही वाद झाला नाही. १५ ऑक्टोबर १९९१ रोजी वाराणसी न्यायालयात नवीन मंदिर बांधण्यासाठी आणि ज्ञानवापी संकुलात पूजेला परवानगी मिळावी म्हणून याचिका दाखल करण्यात आली होती. पंडित सोमनाथ व्यास, संस्कृतचे प्राध्यापक डॉ. रमाकांत शर्मा आणि सामाजिक कार्यकर्ते हरिहर पांडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. विजय शंकर रस्तोगी हे त्यांचे वकील होते. याचिकेत म्हटले आहे की, काशी विश्वनाथाचे मूळ मंदिर २०५० वर्षांपूर्वी राजा विक्रमादित्याने बांधले होते आणि १६६९ मध्ये औरंगजेबाने ते पाडून तेथे मशीद बांधली. या याचिकेवर दिवाणी न्यायाधीशांनी दाव्याचा पाठपुरावा करण्याचे आदेश दिले. त्याला दोन्ही पक्षांनी दिवाणी पुनर्निरीक्षण जिल्हा न्यायाधीशांसमोर आव्हान दिले होते. न्यायालयाने दिवाणी न्यायाधीशांचा निर्णय बाजूला ठेवत संपूर्ण संकुलाचे पुरावे गोळा करण्याचे आदेश दिले.

१९३७ मध्ये उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात मशिदीची संरचना वगळता इतर सर्व जमिनींवर व्यास कुटुंबाचा हक्क जाहीर केला आणि त्यांच्या बाजूने निकाल दिला. याच निर्णयात बनारसच्या तत्कालीन जिल्हाधिका-यांचा नकाशाही निकालाचा एक भाग बनविण्यात आला असून, त्यात ज्ञानवापी मशिदीच्या तळघराची मालकी व्यास कुटुंबाला देण्यात आली आहे. तेव्हापासून आजतागायत व्यास कुटुंब ज्ञानवापी मशिदीखालील तळघराची काळजी घेतात, तिथे पूजा करतात आणि प्रशासनाच्या परवानगीने तळघर उघडू शकतात. आजही मंदिरातील अनेक वास्तू त्यात ठेवल्याचा दावा केला जातो. १९३७ च्या निकालात अलाहाबाद उच्च न्यायालयात एक नकाशाही ठेवण्यात आला होता. त्या नकाशात मशिदीची सीमारेषाही निश्चित करण्यात आली होती. व्यास कुटुंब आणि त्यांच्या वकिलांकडे गेल्या अडीचशे वर्षांपासून लढविलेल्या खटल्यांची यादी आणि फायलींचा गठ्ठा आहे. १९३७ च्या प्रकरणात उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की, मशिदीची संरचना वगळता सर्व जमीन व्यास कुटुंबाची आणि बाबा विश्वनाथ मंदिराची असेल.

मशिदीव्यतिरिक्त जवळपासच्या कोणत्याही जमिनीवर नमाज किंवा उरूस किंवा अन्त्यसंस्कार होणार नाहीत. १९३७ मध्ये ब्रिटिश सरकारने हे संकुल वक्फची मालमत्ता नसल्याचे लेखी प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केले होते, हेही जाणून घेतले पाहिजे. येथील मूर्ती मुघल काळापूर्वीच्या आहेत. औरंगजेब या मालमत्तेचा मालक नव्हता. इस्लामिक कायद्यानुसार ते अल्लाहला समर्पित केले जाऊ शकत नाही. दावेदारांच्या वतीने सात आणि ब्रिटिश सरकारच्या वतीने १५ साक्षीदार हजर झाले. १५ ऑगस्ट १९३७ रोजी बनारसच्या सब जजनी मशिदीव्यतिरिक्त ज्ञानवापी संकुलात नमाज अदा करण्याचा अधिकार नाकारला होता. दीन मोहंमदचा खटला पुन्हा दाखल करताना न्यायालयाने सांगितले होते की, येथील मंदिर पाडण्यात आले आहे. ही वक्फ मालमत्ता नाही. नमाजपठण केल्याने तुम्हाला एखाद्या ठिकाणाची मालकी मिळू शकत नाही. मुस्लिमांच्या बाजूने मात्र सुरुवातीपासून आजतागायत कोणताही दस्तावेज किंवा ऐतिहासिक पुरावा सादर करण्यात आलेला नाही. तरीही मूळ वास्तू कधीच मंदिर नव्हती असा त्यांचा दावा आहे.

-योगेश मिश्र,
ज्येष्ठ पत्रकार-विश्लेषक

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या