35.2 C
Latur
Monday, May 29, 2023
Homeविशेषविधायक मार्गदर्शन करणारी ‘जीवनदृष्टी’

विधायक मार्गदर्शन करणारी ‘जीवनदृष्टी’

एकमत ऑनलाईन

कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातल्या निपाणीचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.अच्युत माने लिखित ‘जीवनदृष्टी’ हा लेखसंग्रह नुकताच कोल्हापूर येथील तेजश्री प्रकाशनाने प्रकाशित केला असून या संग्रहात सहृदयी व संवेदनशील मनाच्या डॉ.अच्युत माने यांच्या जीवनातील निवडक नि समृद्ध अशा ४१ आठवणींचे स्फुट लेख आहेत. मात्र या स्फूटलेखांचे स्व ‘रुप’ केवळ स्वत: च्या आयुष्यातील घटना वा प्रसंग कथन करणे एवढेच नसून त्यामागचा उद्देश वाचकमनावर सकारात्मक विचारांचे बीजारोपण घडवून आणण्याचा आहे. म्हणूनच जरी हे स्फुट लेख आकाराने छोटे असले तरी त्यातून अगदी सहजसुंदरतेने पेरलेला विचार अधिक मोलाचा आहे, याची प्रचिती येते. वैयक्तिक अनुभूतीपर आणि सामाजिक चळवळीत कार्य करताना आलेल्या अनुभवांवर आधारीत असे या स्फुट लेखांचे ढोबळ मानाने आपणास वर्गीकरण करता येत असून या दोन्ही प्रकारच्या स्फुट लेखनातून फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारधारेने विकसित झालेली लेखकाची सम्यक दृष्टी प्रत्ययास येते. पहिल्याच लेखात थोर समाज सेवक अण्णा हजारे यांच्या देशव्यापी आंदोलनाचे समीक्षण केले आहे,तर दुस-या एका लेखात मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या चळवळीतल्या लेखकाच्या सक्रिय सहभागाची आठवण आहे.

तसेच निपाणी येथील विडी कामगार महिलांच्या आंदोलनात सहभाग घेऊन मिळविलेले यशही एका लेखात नोंदवले आहे. सार्वजनिक विहिरीवर सर्वांनी मिळून पाणी भरण्याच्या हक्कासाठी केलेल्या आंदोलनाची दखलही घेतली आहे. याशिवाय महात्मा फुले,महात्मा गांधी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,आचार्य विनोबा भावे, स्व.यशवंतराव चव्हाण, कै.बाबा आमटे इत्यादिंचे तत्त्वनिष्ठ आचार आणि विचार काही लेखांतून उमटले आहेत.निपाणीचे ज्येष्ठ लेखक महादेव मोरे यांच्या लेखकीय कर्तृत्वाचा आणि बेरड रामोशी समाजाच्या उत्थानासाठी हयातभर संघर्ष केलेल्या ‘बेरड’ कार डॉ.भीमराव गस्ती यांच्या कार्याचा नेटका आढावा घेतला आहे. तसेच निपाणी परिसरात दलित शोषित, मजूर आणि विडी कामगारांच्या सर्वतोपरी उत्थानासाठी अविरतपणे संघर्षरत राहणा-या कार्यकर्त्यांच्या संघर्षाची नोंदही अगदी उत्कटतेने घेतली आहे. तसेच लेखक स्वत: दलित असल्यामुळे त्यांना बालपणी खूप यातना नि दाहक अनुभव सोसावे लागले ; पण त्यांनी मनात कोणाविषयी कसलाच कडवटपणा न ठेवता घटनेचे शिल्पकार डॉ.आंबेडकर यांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी परिश्रमपूर्वक उच्च शिक्षण घेतले आणि ते प्राचार्यपदी पोहोचले, हा सारा त्यांचा ‘प्रेरणादायी’ जीवन प्रवासही इथे शब्दबद्ध झाला आहे.असो.

थोडक्यात प्रा.डॉ.अच्युत माने लिखित ‘जीवनदृष्टी’ या स्फुट लेखसंग्रहातून लेखकाने स्वत:च्या आयुष्यातील समृद्ध अशा आठवणींचे व अनुभवांचे समृद्ध भांडार येथे अगदी सोप्या शब्दात नि अकृत्रिमतेने शब्दबद्ध केले असून ते भांडार वाचकाला उपयुक्त असे मार्गदर्शन करणारे आहेच ; पण त्यासोबतच सुख-दु:खाने व्यापलेल्या माणसाच्या खडतर आयुष्यात जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोनही निर्देशित करणारे आहे. मनोगतामधे स्वत:ची भूमिका मांडताना लेखक म्हणतात त्याप्रमाणे ‘मनातलं प्रकट करावं नि ते आपल्या सुहृदांना प्रांजळपणे सांगावं या तळमळीतून हे सारं प्रकटीकरण झालेलं आहे’ आणि म्हणूनच हे सकारात्मक ‘दृष्टी’ देणारे हृदयस्पर्शी स्फुट लेखन वाचकांच्या पसंतीस पडेल,यात शंका नाही.या लेखसंग्रहाची पाठराखण करताना ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ. ह. सांळुखे म्हणतात त्याप्रमाणे ‘ हे सारे लेखन विधायक स्वरूपाचे मार्गदर्शन करणारेही आहे’, हे नक्की ! लेखक प्रा.डॉ.अच्युत माने यांना पुढील लेखनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
जीवनदृष्टी : ( लेखसंग्रह )
लेखक : प्रा.डॉ.अच्युत माने
प्रकाशक : तेजश्री प्रकाशन,इचलकरंजी,जि.कोल्हापूर
पृष्ठे : १५२ मूल्य : २५० रु .

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या