सिंगापूर खुल्या अजिंक्यपद स्पर्धेत पी. व्ही. सिंधूने विजय मिळवत भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासाला नवे पान जोडले आहे. यावर्षीचा हा तिचा सलग तिसरा विजय आहे. या महिन्याच्या शेवटी राष्ट्रकुल स्पर्धेतही ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. सिंधूच्या विजयाने अनेक गोष्टी समोर येत आहेत. ऑलिम्पिक असो किंवा जागतिक पातळीवरची कोणतीही नामांकित स्पर्धा असो, भारतीय खेळाडू बॅडमिंटन प्रकारात दमदार कामगिरी करत असल्याचे प्रकर्षाने दिसत आहे.
सायना नेहवालपासून सुरू झालेला भारतीय बॅडमिंटनचा प्रवास अत्यंत दमदारपणाने पुढे जात आहे. नेहवालनंतर अशी कोणतीच स्पर्धा किंवा ऑलिम्पिक स्पर्धा नसेल, की तेथे भारताने बॅडमिंटनमध्ये पदक जिंकले नसेल. दोन पदके तर सिंधूने खिशात घातली आहेत. नेहवालने एक पदक लंडन ऑलिम्पिकमध्ये पटकावले होते. दुसरे म्हणजे ज्या खेळाडूंना पदकापर्यंत मजल मारता आली नाही, त्यांनंी देखील आपल्या दमदार खेळीने उपस्थितांचे मन जिंकले. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना झुंज दिली. आपण दोन वर्षांनंतर होणा-या ऑलिम्पिककडे पाहत असू तर सिंधूनंतर अनेक बॅडमिंटनपटू पदक जिंकण्याच्या शर्यतीत दिसतील.
अलीकडेच भारताने बॅडमिंटनमध्ये प्रतिष्ठेचा थॉमस कप जिंकला आहे. हा विजय भारताच्या सांघिक खेळाच्या इतिहासात मोठी कामगिरी मानली जाईल. १९८३ मध्ये भारताने जिंकलेल्या विश्वचषकापेक्षा थॉमस कपचा विजय मोठा आहे. त्या जोडीला आपण ऑलिम्पिकमध्येही सुवर्णपदक जिंकत आहोत, परंतु त्यापेक्षाही थॉमस चषक जिंकणे मोलाचे आहे. कारण जागतिक पातळीवर सर्वाधिक स्पर्धेचा खेळ म्हणून बॅडमिंटनकडे पाहिले जाते. शंभरपेक्षा अधिक देश गांभीर्याने बॅडमिंटन खेळतात. आपण ऑलिम्पिकचा इतिहास पाहिल्यास केवळ सहाच देशांचे नाव पदकांवर कोरलेले दिसते. क्रिकेटला देखील अन्य खेळांपेक्षा कमी लेखता येणार नाही, परंतु जगभरातील डझनभर देशच क्रिकेटच्या मैदानात दिसतात. पी. व्ही. सिंधूचा प्रवास पाहिल्यास तिच्याप्रमाणे देदीप्यमान यश मिळवणारा दुसरा खेळाडू आपल्याला अन्य खेळात दिसत नाही.
पी. व्ही. सिंधूच्या कामगिरीची दखल घेण्यामागे प्रमुख कारण म्हणजे तिच्याकडे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद आहे. ऑलिम्पिकचे पदक आहे आणि तिने अन्य काही नामांकित स्पर्धा देखील जिंकल्या आहेत. बॅडमिंटनमध्ये आपण प्रकाश पदुकोणचे नाव घेतले, पी. गोपीचंदचे नाव घेतले, सायना नेहवालचे नाव घेतले तरी सर्वाधिक उठावदार कामगिरी पी. व्ही. सिंधूनेच केली आहे. तिने ऑल इंग्लंड चॅम्पियन्स स्पर्धा देखील जिंकावी, असे आपल्याला मनोमन वाटते. कारण भारतात या स्पर्धेला विशेष स्थान दिले गेले आहे. ही स्पर्धा सोडली तर सिंधूने जगभरातील सर्वच मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. अर्थात पी. व्ही. सिंधूची पुढची वाटचाल कशी असेल, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. गेल्या काही वर्षांतील तिच्या कारकीर्दीचा आढावा घेतल्यास तिने करिअरमध्ये अनेक चढ-उतार अनुभवले आहेत आणि त्यात ती पुढे जात आहे. टोकिओ ऑलिम्पिकच्या काळात ती फॉर्ममध्ये नसल्याचे बोलले जात होते, परंतु ऑलिम्पिकच्या काही काळ अगोदर तिने झेप घेतली आणि पदक जिंकून परतली.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या काळात सिंधू रौप्य पदकच का जिंकते असे बोलले जात होते. पण तिने सुवर्ण पटकावले. असाच अनुभव इंडोनेशिया खुली स्पर्धा आणि सिंगापूर खुली स्पर्धेत आला. याचा सरळसरळ अर्थ म्हणजे जो खेळाडू प्रतिस्पर्ध्याचे आडाखे आणि डावपेच चुकीचे ठरवतो, तो खेळाडू दीर्घकाळापर्यंत कोर्टवर दबदबा कसा निर्माण करायचा, हे देखील जाणून असतो. या सर्व गोष्टी पाहता आगामी काळात ऑलिम्पिक स्पर्धेसह अन्य जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पी. व्ही. सिंधू आपले आव्हान कायम ठेवेल, असे दिसते आणि यात तिळमात्र शंका नाही. ती सातत्याने चांगली कामगिरी करत असल्याने चाहत्यांच्या आशा बळावल्या आहेत. भारतीय बॅडमिंटन (महिला आणि पुरुष) मध्ये चांगले खेळाडू आता समोर आले आहेत. लक्ष्य सेन याच्याकडून देखील खूप अपेक्षा आहेत.
हा खेळाडू भारताचा ध्वज आणखी उंचावत नेण्यास सक्षम आहे. भारतीय बॅडमिंटनच्या यशाचा आलेख हा पुलेला गोपीचंदच्या अकादमीजवळ येऊन थांबतो. परंतु देशात आणखी बरीच प्रशिक्षण केंद्रं उभारली असून तेथे खेळाडूंची जडणघडण होत आहे. हे कोचिंग सेंटर प्रकाश पदुकोण, नेहवाल, गोपीचंद, सिंधूसारख्या खेळाडूंना आदर्श मानून खेळाडू तयार करत आहेत. या खेळाडूंत आत्मविश्वास निर्माण केला जात आहे. आपणही भारतासाठी पदक आणू, अशी इच्छाशक्ती त्यांच्या मनात तयार केली जात आहे. याप्रमाणे देशाच्या विविध केंद्रांत प्रशिक्षण घेणारे खेळाडू आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये नाव कमवू शकतात. यापूर्वी केवळ क्रिकेट खेळाला आणि क्रिकेटपटूंना आयकॉन मानले जात होते. कपिल देव, सचिन तेंडुलकर, एम. एस. धोनी, विराट कोहली यासारखे सुपरस्टार खेळाडू तरुणांचे आदर्श ठरले. परंतु आता हे चित्र बदलले आहे. पी. व्ही. सिंधूसारखे खेळाडू आदर्श म्हणून नावारूपास येत असल्याने तरुणांना ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळत आहे. सिंधूचे कुटुंबीय मध्यमवर्गीय आहेत. तिचे पालक व्हॉलिबॉलचे खेळाडू होते. तिची बहीण डॉक्टर आहे. अशा कुटुंबातील एखादा सदस्य बॅडमिंटन खेळाशी जोडला जातो तेव्हा सर्वस्व पणाला लावले जाते. या उदाहरणापासून प्रेरणा घेत आगामी काळात बॅडमिंटनच नाही तर अन्य प्रकारच्या खेळातही सिंधूसारखे खेळाडू दिसतील, अशी अपेक्षा आहे.
-नितीन कुलकर्णी,
क्रीडा अभ्यासक