अण्णाद्रमुक पक्षातील एक गट विरोधात असतानाही शशिकला या नाराज नाहीत आणि त्यांनी २८ जून रोजी चेन्नईसह अन्य ठिकाणी मोठा रोड शो केला. यावेळी त्यांनी पक्षाची बांधणी ही एका नेतृत्वाखाली केली जाईल, असा दावा केला. ओ. पनीरसेल्वम यांचा गट हा शशिकला यांना अण्णाद्रमुक पक्षात सक्रिय करण्याच्या बाजूने आहे. शशिकला यांच्याबद्दल आदर असल्याचेही पनीरसेल्वम यांनी म्हटले आहे. पण पलानीस्वामी यांचा शशिकला यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध आहे. या मुद्यावरून दोघांत कमालीचा ताण वाढलेला दिसत आहे.
राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांचे सरकार भक्कमपणे काम करत असल्याचे वाटत असले तरी पक्षांतर्गत असंतोष धुमसत आहे. महाराष्ट्रात देखील एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणले आहे. दक्षिण भारतातील महत्त्वाचे राज्य तामिळनाडूत द्रमुकचे सरकार काम करत असले तरी विरोधक अण्णाद्रमुकमध्ये धुसफूस सुरूच आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे जयललिता यांची मैत्रीण व्ही.के. शशिकला यांचे वापसीवरून सुरू असलेले प्रयत्न. शशिकला यांच्यामुळे अण्णाद्रमुकमधील दोन गटांतील मतभेद आता उघडपणे व्यक्त होऊ लागले आहेत.
५ डिसेंबर २०१६ रोजी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन झाले. त्यानंतर दोन महिन्यांनी पक्षाच्या बैठकीत ओ. पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि शशिकला यांचे नाव पुढे केले. त्यांना विधिमंडळ नेतेपदी निवडण्यात आले. परंतु कायदेशीर अडचणीमुळे ही निवड स्थगित करावी लागली. त्यानंतर १४ फेब्रुवारी २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ६६.६५ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी शशिकला यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर सत्तेवर असलेले अण्णाद्रमुकचे वरिष्ठ नेते पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी यांनी तामिळनाडूचा कारभार पाहिला. २७ जानेवारी २०२१ रोजी बंगळुरूच्या तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शशिकला या पक्षात पुन्हा सक्रिय होणार अशी अटकळ बांधली जाऊ लागली. पण त्यांना होणारा विरोध पाहता विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी शांत राहणेच पसंत केले.
शशिकला नटराजन यांनी तीस वर्षे जयललिता यांची सावली बनून राहण्यात घालवली. ही तीस वर्षे त्यांनी नुसतीच सावली बनून घालवली नाहीत, याचे प्रत्यंतर जयललितांच्या अखेरच्या दिवसांत तामिळनाडूच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या नजरेत भरेल अशी कामगिरी त्यांनी केली होती. जयललिता यांच्या आजाराबाबत कमालीची गुप्तता पाळत त्यांच्या जवळपास कुणी फिरकू शकणार नाही याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली होती. अगदी जयललितांच्या अन्त्यसंस्कारावेळीही त्यांनी परिस्थितीवरची आपली पकड जराही ढिली करू दिली नव्हती. त्यानंतरच्या राजकीय घडामोडींतही स्वत:चे वर्चस्व राखत त्यांनी राज्याची घडी बसवली. कोणत्याही प्रकारच्या फाटाफुटीला किंवा नेतृत्वाबाबतच्या शंका-कुशंका उपस्थित करायला त्यांनी वावच दिला नाही. कमालीच्या वेगाने आणि तितक्याच थंडपणाने कोणताही गवगवा न करता त्या निर्णय घेत गेल्या आणि अण्णाद्रमुकचे सगळेच नेते त्यांच्या हो ला हो करत गेले. आता पुन्हा त्या पक्षाशी वाटाघाटी करत असल्याचे दिसून येत आहे. पक्षातील एक गट त्यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
परिणामी पक्षांतर्गत तणाव पुन्हा निर्माण झाला आहे. ५ मार्च २०२२ रोजी शशिकला यांनी दोन दिवसांच्या धेनी, मदुराई, डिंडिगुळ, तिरुनेलवेली जिल्ह्यातील दौ-यात समर्थकांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांच्या समर्थकांनी त्यांना पक्षाची कमान हाती घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सांगितले. यादरम्यान माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांचे बंधू ओ. राजा यांच्यासह पक्षाच्या धेनी जिल्ह्यातील ३० हून अधिक पदाधिका-यांनी चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये शशिकला यांची भेट घेतली. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेते संतापले. पक्षशिस्तभंगाच्या नावाखाली या तीस पदाधिका-यांची हकालपट्टी करण्यात आली. या कारवाईनंतर पलानीस्वामी यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. ते म्हणाले, की पक्षात शशिकला यांना कोणतेही स्थान नाही. पक्षाने अगोदरच निर्णय घेतलेला असल्याने ते मुद्दे परत उकरून काढण्याची गरज नाही, असे त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर ओ. पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी यांच्यात वितुष्ट येण्यामागे आणखी एक कारण म्हणजे पलानीस्वामी यांनी २३ जून रोजी पक्षाची महापरिषद बोलावली होती. या परिषदेला सुरक्षेच्या कारणावरून परवानगी देऊ नये, अशी मागणी पनीरसेल्वम यांनी पोलिसांकडे केली आणि तेथून वाद पुन्हा पेटला.
ओ. पनीरसेल्वम यांचा गट हा शशिकला यांना अण्णाद्रमुक पक्षात सक्रिय करण्याच्या बाजूने आहे. शशिकला यांच्याबद्दल आदर असल्याचेही पनीरसेल्वम यांनी म्हटले आहे. पण पलानीस्वामी यांचा शशिकला यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध आहे. या मुद्यावरून दोघांत एवढा ताण वाढला आहे की, तो आता सार्वजनिक रूपातून व्यक्त होत आहे. पूर्वी दबक्या आवाजात विरोध व्हायचा. विशेष म्हणजे दोघांनी गेल्या आठवडाभरापासून एकमेकांशी संवाद देखील साधलेला नसल्याचे सांगितले जात आहे. काही काळापूर्वी धेनी जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकारिणीने पलानीस्वामीविरोधी भूमिका घेत एक प्रस्ताव मंजूर केला. जे पक्षातून सोडून गेले आहेत, त्यांना परत आणणारा हा प्रस्ताव होता. या ठरावावर पलानीस्वामी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षात अशी स्थिती निर्माण होईल की पनीरसेल्वम हे एकाकी पडू शकतात, असा इशारा पलानीस्वामी यांनी दिला.
गेल्या विधानसभा निवडणुकीत द्रमुक-काँग्रेसकडून अण्णाद्रमुकचा पराभव झाला. परंतु पलानीस्वामी यांचा प्रभाव असलेल्या पश्चिम तामिळनाडूत पक्षाने ५० पैकी ३३ जागा जिंकल्या. त्याचवेळी पनीरसेल्वम यांचा प्रभाव असलेल्या दक्षिण तामिळनाडूत अण्णाद्रमुकने ५८ पैकी केवळ १८ जागा जिंकल्या. या निकालानंतर पलानीस्वामी हे पक्षाचे नेतृत्व करतील अणि पनीरसेल्वम हे विरोधी पक्षाची भूमिका वठवतील, हे सिद्ध झाले. अण्णाद्रमुक पक्षातील एक गट विरोधात असतानाही शशिकला या नाराज नाहीत आणि त्यांनी २८ जून रोजी चेन्नईसह अन्य ठिकाणी मोठा रोड शो केला. यावेळी त्यांनी पक्षाची बांधणी ही एका नेतृत्वाखाली केली जाईल, असा दावा केला. सध्याची राजकीय स्थिती पाहता ओ. पनीरसेल्वम आणि ई. पलानीस्वामी हे दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे भविष्यात तामिळनाडूच्या राजकारणात काय उलथापालथ होईल, हे आताच सांगणे कठीण आहे.
– के. श्रीनिवासन