22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeविशेषशांततेच्या पुरस्कर्त्याचा अलविदा

शांततेच्या पुरस्कर्त्याचा अलविदा

एकमत ऑनलाईन

खालावलेली अर्थव्यवस्था, शेवटचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे न पेलवलेले ‘पेरेस्त्रोईका’ (आर्थिक पुनर्रचना) आणि ‘ग्लासनोस्त’ (अभिव्यक्तिस्वातंत्र्य) प्रयोग आणि इतर काही कारणांनी लेनिन-स्टॅलिन यांचा सोव्हिएत युनियन हा महाकाय देश आणि जगातील एक महासत्ता १९९१ मध्ये विघटीत झाल्यानंतर जगातील एकमेव महासत्ता म्हणून अमेरिकेवर शिक्तामोर्तब झाले. सोव्हिएत युनियनच्या विसर्जनातून जवळ जवळ दीड डझन नवीन राष्ट्रे निर्माण झाली. त्यामुळे जगाचे राजकारण बदलून गेले. युरोपमधील सोव्हिएत युनियनचा पाठिंबा असलेल्या अनेक देशांतून साम्यवादाचे उच्चाटन झाले. बर्लिनची भिंत कोसळल्यानंतर मिखाईल गोर्बाचेव्ह यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला, त्यानंतर एक वर्षातच २५ डिसेंबर १९९१ रोजी गोर्बाचेव्ह यांनी सोव्हिएत युनियनचे शेवटचे अध्यक्ष म्हणून राजीनामा दिला आणि ते जगाच्या राजकीय पटलावरून जवळ-जवळ विस्मरणात गेले.

सोव्हिएत युनियनच्या विसर्जनानंतर शीतयुद्धाची समाप्ती झाली असे म्हटले गेले. पण अमेरिका आणि पाश्चिमात्त्य देशांनी म्हणजेच ‘नाटो’ने सोव्हिएत युनियनमधून फुटलेल्या काही देशांमध्ये आपला विस्तार करण्यास सुरुवात केल्यानंतर रशियाने त्यांना प्रतिकार करण्यास प्रारंभ केला. बोरिस येलत्सिन यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या ब्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू केले आहे, त्याची पार्श्वभूमी ही थोडक्यात अशी आहे आणि त्याला गोर्बाचेव्ह कारणीभूत आहेत असे म्हटले जात आहे. एवढेच नव्हे तर गोर्बाचेव्ह यांनी केलेल्या चुका आता पुतिन दुरुस्त करीत आहेत असेही म्हटले जात आहे.

वास्तविक, या युद्धाच्या निमित्ताने मिखाईल गोर्बाचेव्ह हे पुन्हा एकदा चर्चेत आले. राजधानी मास्कोच्या डाशा उपनगरातील एका सरकारी बंगल्यामध्ये वृद्ध गोर्बाचेव्ह एकटेच राहात असत. सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर गोर्बाचेव्ह यांनी प्रिवोल्योन येथील आपल्या जन्मस्थानाला भेट दिली होती, पण ब-याच वर्षांच्या कालखंडानंतर त्यांचे मूळ घर आता दुस-याच कोणीतरी खरेदी केलेले आहे. आपल्या आजोबांना स्टॅलिनच्या छळछावणीत जावे लागले होते, याची गोर्बाचेव्ह यांना अगदी शेवटपर्यंत आठवण होती. विताली मेनस्क नावाच्या एका पत्रकाराने गोर्बाचेव्ह यांच्यावर २००१ साली एक लघुपट बनवला होता, त्यामध्ये त्यांच्या या जन्मस्थळ भेटीचे चित्रण आहे. गोर्बाचेव्ह यांचे माता-पिता मारिया आणि सर्जी यांच्यासाठी एक नवे घर बांधून देण्यात आले. गोर्बाचेव्ह यांचे माता-पिता वारल्यानंतर आता ते घर रिकामे आहे. गोर्बाचेव्ह यांच्या सन्मानार्थ तेथे संग्रहालय उभारण्याचा प्रयत्न स्थानिक नेत्यांनी केला, पण निधीअभावी तो अपुराच राहिला.

१९९९ मध्ये गोर्बाचेव्ह यांच्या पत्नी रैसा यांचा जर्मनीमध्ये कर्करोगाने मृत्यू झाला. त्यामुळे गोर्बाचेव्ह यांना खूप दु:ख झाले आणि त्यांना एकाकी वाटू लागले. कारण त्यांच्या संसारिक जीवनात आणि राजकीय वाटचालीत रैसा यांनी त्यांना खंबीर साथ दिली होती. मास्को विद्यापीठात शिकत असताना ‘लव स्टोरी’ मधून या दोघांचा विवाह झाला होता. १९९१ च्या ऑगस्टमध्ये झालेल्या एका बंडामध्ये गोर्बाचेव्ह यांना सपत्निक क्रिमियामधील एका रिसॉर्टवर स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यावेळच्या अतिताणामुळे रैसा यांना पक्षाघात झाला होता. आपल्या दिवंगत पत्नीच्या स्मरणार्थ गोर्बाचेव्ह यांनी रैसा गोर्बाचेव्ह चॅरिटेबल फाऊंडेशनची स्थापना केली. ही संस्था कॅन्सरग्रस्त मुलांच्या उपचारासाठी निधी उपलब्ध करून देते. सेंट पीटर्सबर्ग येथे या फाऊंडेशनने सर्वसोयींनी युुक्त असे एक हॉस्पिटलही उभारले आहे. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी राजकारणात सक्रिय राहण्याचा थोडाफार प्रयत्न केला होता. १९९६ साली गोर्बाचेव्ह यांनी रशियाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविली, पण त्यांना एक टक्काही मते पडली नव्हती. खरं म्हणजे प्रारंभी गोर्बाचेव्ह यांच्या धोरणांमुळे रशियन जनता खुश झाली होती, पण सोव्हिएत युनियनच्या विघटनामुळे रशियन जनतेला दु:खही झाले होते.

सोव्हिएत युनियनचे इतक्या सहजतेने विघटन झालेले पाहून त्यावेळी केजीबीमधून राजकारणात उतरलेले ब्लादिमीर पुतिन अत्यंत दु:खी आणि विस्मयचकित झाले होते. सोव्हिएत युनियनचे अनावश्यक विघटन रोखण्यासाठी गोर्बाचेव्ह यांनी गांभीर्याने आणि निकराने प्रयत्न केले नाहीत, त्याचप्रमाणे आपल्या धोरणांची अंमलबजावणी करताना त्यांनी देशाच्या सुरक्षेचा आणि अखंडतेचा गांभीर्याने विचार केला नाही, अशी टीका त्यांच्यावर नंतर झाली. गोर्बाचेव्ह हे सोव्हिएत युनियनचे अखेरचे अध्यक्ष झाले. त्यांचा जन्म २ मार्च १९३१ रोजी एका गरीब कुटुंबात झाला होता. ते स्टॅलिनच्या राजवटीत लहानाचे मोठे झाले. दुस-या महायुद्धानंतर त्यांनी मॉस्कोमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले. कम्युनिस्ट पक्षात त्यांनी आपली राजकीय कारकीर्द घडवली. साम्यवादात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ग्लासनोस्ट आणि पेरेस्ट्रोइका या संकल्पना मांडल्या होत्या. पण त्या अत्यंत वाईट गोष्टी गोर्बाचेव्ह यांच्या हातून घडल्या अशी टीका पुतिन यांनी केली होती. त्यावेळी रशियात ‘बनावट लोकशाही’ नांदते आहे, असे प्रत्युत्तर गोर्बाचेव्ह यांनी दिले होते. विशेष म्हणजे आपल्या विरोधकांचा काटा काढण्यात प्रवीण असलेल्या अध्यक्ष पुतिन यांनी कधीही गोर्बाचेव्ह यांना अटक अथवा शिक्षा केली नाही. उलट त्यांनी गोर्बाचेव्ह यांच्या बाबतीत सौम्य धोरण अवलंबले पण त्यांच्यावर नजर मात्र ठेवली.

मी सोव्हिएत युनियनचे विघटन थांबवण्याचा प्रयत्न केला असता तर प्रचंड रक्तपात झाला असता असे सांगताना मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी शीतयुद्ध आणि शस्त्रास्त्र स्पर्धा थांबवण्यासाठी आपण कसे प्रयत्न केले हे वारंवार विशद केले, पण कालांतराने त्यांना आपल्या धोरणांबाबत काहीसा भ्रमनिरास झाला असावा असे त्यांच्या अलीकडच्या प्रतिक्रियांवरून वाटते. मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना ब्लादिमीर पुतिन यांनी ‘असामान्य मुत्सद्दी’ अशा शब्दांत त्यांची प्रशंसा केली होती. कोरोना महामारीच्या काळात दक्षता म्हणून गोर्बाचेव्ह यांना अनेक महिने एका हॉस्पिटलमध्ये एकांतवासात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना घरी जाऊ देण्यात आले. वृद्धत्वामुळे गोर्बाचेव्ह घराबाहेर क्वचितच पडत आणि क्वचितच मुलाखत देत. क्रेमलीन सोडून गोर्बाचेव्ह यांना ३० वर्षे झाली तर पुतिन सत्तेवर येऊन २२ वर्षे झाली आहेत. तरीसुद्धा कमकुवत अर्थव्यवस्था, भ्रष्टाचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची दडपशाही, विरोधकांची हत्या, छळ, कारावास वगैरे रशियात सुरूच आहे आणि हुकूमशहा ब्लादिमीर पुतिन पुन्हा अखंड सोव्हिएत युनियन उभारण्याचे अवघड स्वप्न पाहत आहेत!

-प्रसाद वि. प्रभू,
ज्येष्ठ पत्रकार

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या