23.6 C
Latur
Saturday, January 28, 2023
Homeविशेषसुवर्णकन्येची भरारी!

सुवर्णकन्येची भरारी!

एकमत ऑनलाईन

भारताची गोल्डनगर्ल, महान धावपटू पी. टी. उषा यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. आशियाई खेळांमध्ये एकूण ११ पदके आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये २३ पदके पटकावणा-या पी. टी. उषा यांची कारकीर्द ही भारतातील तमाम महिला खेळाडूंसाठी दीपस्तंभासारखी राहिली आहे. १९८० च्या दशकामध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणा-या पी. टी. उषा या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ट्रँकसूटमध्ये धावणा-या पहिल्या महिला होत्या. ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाने त्यांच्या आजवरच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यात आला आहे.

भारतरत्न माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी एकदा म्हटले होते, की स्वप्ने ती नाहीत जी झोपेत येतात, स्वप्ने ती असतात जी झोपू देत नाहीत. ही गोष्ट भारताची नामांकित धावपटू पी. टी. उषा यांना तंतोतंत लागू पडते. १९८० च्या दशकात भारतीय अ‍ॅथलिट विश्वात पी. टी. उषा यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला. भारतातच नाही तर आशिया खंडात आणि जगभरात पी. टी. उषा यांचा बोलबाला झाला. त्यांनी धावणे या क्रीडाप्रकारात भारताला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवले की त्याचा विचारही कोणी केला नव्हता. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोचणा-या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक प्रकारचे मान-सन्मान मिळवले. देदीप्यमान कारकीर्द असलेल्या आणि सुवर्णकन्या म्हणून ओळखल्या जाणा-या पी.टी. उषा यांची आता भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली आहे. धावपटू ते अध्यक्षपद अशी धाव घेणा-या पी. टी. उषा यांची कारकीर्द प्रेरणादायी आहे.

पी. टी. उषा ऊर्फ पिलाउल्लाकांडी थेक्केपरांबिल उषा यांचा जन्म २७ जून १९६४ मध्ये झाला. केरळच्या कुट्टाली गावात जन्मलेल्या पी. टी. उषा यांना लहानपणापासूनच अ‍ॅथलेटिक्सची आवड होती. या कारणामुळेच त्यांनी हेच क्षेत्र निवडले. क्वीन ऑफ ट्रॅक अँड फील्ड असे म्हटले जाऊ लागले. पी. टी. उषा यांची सुरुवात ओम नांबियार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यांनी दीर्घकालपर्यंत प्रशिक्षण घेतले आणि भारतातील अनेक स्पर्धांत जेतेपद पटकावले. त्यांना ‘द पय्योली एक्स्प्रेस’असेही म्हटले जाऊ लागले. १९७८ मध्ये त्यांनी कोल्लम येथे ज्युनिअर्ससाठीच्या ‘आंतरराज्यीय मीट’मध्ये सहा पदके जिंकली. ‘केरळ स्टेट कॉलेज मीट’मध्ये त्यांनी १४ पदकं जिंकली. पी.टी. उषा यांनी १९८० साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा पाऊल टाकले.

१९८४ मध्ये त्यांनी लॉस एंजिलिसच्या ऑलिम्पिक स्पर्धेत ४०० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत अंतिम फेरीत धडक मारली. दुर्दैवाने पी. टी. उषा यांचे कांस्यपदक अगदी थोडक्यात हुकले. मात्र चौथ्या क्रमांकावर राहणा-या पी. टी. उषा यांच्या कामगिरीने देशभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. आजच्याप्रमाणे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधा नसतानाही पी. टी. उषा यांनी क्रीडाक्षेत्रात घेतलेली भरारी गौरवास्पद होती. १९९१ मध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) मध्ये निरीक्षक असणारे व्ही. श्रीनिवासन यांच्याशी त्यांनी विवाह केला. त्यांना दोन मुले आहेत. आपल्या कारकीर्दीत पी. टी. उषा यांनी एकामागून एक स्पर्धा जिंकल्या आणि देशातच नाही तर देशाबाहेरही नावलौकिक झाला. १९८० च्या दशकात त्यांनी २३ पदकांची लयलूट केली आणि त्यापैकी १४ सुवर्णपदक होते. म्हणून त्यांना ‘सुवर्णकन्या’ म्हटले जाऊ लागले. १९८५ मध्ये जाकार्ता आशियायी चॅम्पियनशिपमध्ये सहा पदके जिंकली. त्यात पाच सुवर्ण आणि एका कांस्यपदकाचा समावेश होता.

सोल आशियायी १९८६ मध्ये त्यांनी चार सुवर्णपदके जिंकली. १९८३ मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार आणि १९८५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. क्रीडा क्षेत्रातून निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्या अ‍ॅथलिट संघाशी निगडीत राहिल्या. त्या ऑलिम्पियाड परीक्षेचे आयोजन करतात. या परीक्षेच्या माध्यमातून ऑलिम्पिक स्पर्धेसाठी नवीन प्रतिभा शोधण्याचे काम केले जाते. गेल्या काही ऑलिम्पिक स्पर्धांत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आणि पदक मिळविण्याचा ग्राफ वाढत चालला आहे. आता त्या ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष होत असल्याने त्यांच्याकडून ब-याच अपेक्षा आहेत. पी. टी. उषा या १६व्या अध्यक्षा म्हणून आदिल सुमारीवाला यांची जागा घेतील. सुमारीवाला यांच्यापूर्वी अनिल खन्ना यांनी हे पद सांभाळले होते. अर्थात पी. टी. उषा यांच्यासमोर आव्हाने कमी नाहीत. विशेषत: खेळाडू निवडीवरून वाद निर्माण होतात. गेल्या ऑलिम्पिकच्या वेळी एका खेळाडूने निवडकर्त्यांवर पक्षपाताचा आरोप केला. यासाठी त्याने कोर्टाचा दरवाजाही ठोठावला. खेळाडूंचे प्रशिक्षण, आवश्यक क्रीडा साहित्य, प्रशिक्षण, वातावरण यासंदर्भात खेळाडूंच्या तक्रारी राहतात. यासाठी राजकीय संघर्ष करावा लागतो. अर्थात पी. टी. उषा सत्ताधारी पक्षाकडून राज्यसभेच्या खासदार आहेत. त्यामुळे त्यांंच्यावरचा राजकीय प्रभाव नाकारता येणार नाही. मात्र त्यांची खेळाबाबत निष्ठा पाहता अन्य राजकीय नेत्यांप्रमाणे त्यांंचा व्यवहार असणार नाही, हे देखील तितकेच खरे.

गेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी झाल्यानंतर केंद्र सरकारने पुढील ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी विशेष भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदक जिंकणा-या खेळाडूंशी संवाद साधला आणि त्यांचे मनोधैर्य वाढविले. चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याची हमी दिली. अशावेळी पी. टी. उषा यांच्याकडून सरकारच्या धोरणानुसार ऑलिम्पिक संघटनेची वाटचाल करण्याची अपेक्षा बाळगली जात आहे. त्यांना निधी अणि स्रोतांची कमतरता भासणार नाही. भविष्यात ऑलिम्पिक संघटनेकडून प्रतिभावान लोकांची निवड आणि तयारी हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आपल्याकडे असंख्य क्रीडा संघटना असून जिल्हा पातळीपर्यंत त्या सक्रिय आहेत.

-नितीन कुलकर्णी,
क्रीडा क्षेत्राचे अभ्यासक

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या