24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeविशेषस्पिरुलिनाचे फायदे

स्पिरुलिनाचे फायदे

एकमत ऑनलाईन

स्पिरुलिना हे नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेले खाद्य असून यामध्ये उपलब्ध स्रोतापैकी सर्वांत जास्त (६० ते ७० टक्के) प्रथिने असतात. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे मांसाहार न करणा-या किंवा पूर्णपणे मांसाहार वर्ज्य असणा-या शाकाहारी शैलीच्या व्यक्तीसाठी प्रथिने मिळवण्याचा एक सर्वोत्तम पर्याय आहे. तसेच यामध्ये १८ पेक्षा जास्त जीवनसत्वांचा आणि खनिजांचा समावेश आहे. प्रामुख्याने आयुर्वेदिक औषधीमध्ये याचा वापर जास्त प्रमाणात असल्याने आयुर्वेदामध्ये याला फार महत्त्व आहे. स्पिरुलिना शेवाळ क्लोरोफील (हरित द्रव्य) ने समृध्द असून यामध्ये अत्यावश्यक असलेले सर्व प्रकारचे अ‍ॅमिनो अ‍ॅसिड्स असतात. महत्त्वाचे म्हणजे स्पिरुलिनापासून गाजरापेक्षा १०० पट जास्त जीवनसत्व-अ, पालकापेक्षा ५० पट जास्त लोह, गाजरापेक्षा १० पट जास्त कॅरोटिन, दुधापेक्षा ७ पट जास्त कॅल्शियम आणि अंड्यापेक्षा ६ पट जास्त प्रथिने मिळतात.
उपयोग : ४ ऊर्जावर्धक : स्पिरुलिनाच्या एक चमचा (सरासरी ७ ग्रॅम) पावडरमध्ये २० कॅलरी इतकी ऊर्जा असते. म्हणजेच १०० ग्रॅम चुर्णापासून २९० कॅलरी ऊर्जा मिळते. त्यासाठी एक चमचा स्पिरुलिना पावडर ३५० मिली लिंबाच्या रसात मिसळून फ्रिजमध्ये ठेवून थंड करावे. नंतर पाच तासांनी एक ग्लास पाण्यात मिसळून सेवन करावे. त्यामुळे आपले स्वास्थ्य चांगले राहून ऊर्जा वाढण्यास मदत होते. ४ अशक्तपणा : सध्याच्या धावपळीच्या युगात कामाच्या अतिव्यापामुळे आणि आहारावरील दुर्लक्षामुळे अशक्तपणा येऊन थकवा जाणवतो. तथापि अ‍ॅनिमियासारखा आजार होतो. या आजारामध्ये रक्तातील लाल पेशी किंवा हिमोग्लोबीन कमी होते. स्पिरुलिनामध्ये लोह आणि फोलेटचे प्रमाण चांगले असते ज्यामुळे हिमोग्लोबीन आणि लाल रक्तपेशींचे प्रमाण वाढू शकते व रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्यासाठी नियमितपणे २ ग्रॅम स्पिरुलिना चूर्ण दुधात घेतल्यास फायदा होतो. ४ पचनशक्ती : स्पिरुलिना शैवालामध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे आपण सेवन केलेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होते व त्याचबरोबर बध्दकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. पचनतंत्रामध्ये उपयुक्त असणा-या लॅक्टोबॅसिलससारख्या प्रोबायोटिक जीवाणूसाठी स्पिरुलिना अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी रोज दोन ग्रॅम स्पिरुलिना पावडर पाणी/ दुधाबरोबर घेतल्यास फायदा होतो. ४ प्रथिने स्रोत : स्पिरुलिनामध्ये सरासरी ६० टक्के इतके प्रथिने असतात. जे शेंगदाणे, धान्य किंवा मांसाच्या तुलनेत जास्त असतात. स्पिरुलिना प्रथिने आणि इतर पौष्टिक घटकांनी समृध्द असल्यामुळे स्पिरुलिना पौष्टिक अन्न म्हणून वापरले जाते.

त्यामुळे स्पिरुलिना चूर्ण सेवन केल्याने आपल्याला भरपूर प्रथिने मिळतात व शरीराची वाढ चांगल्या प्रकारे होते. ४ प्रतिजैविकाचे कार्य : स्पिरुलिनाच्या सेवनाने आपल्या शरीरात चांगल्या जीवाणूची वाढ होते व हानिकारक जीवाणू नष्ट होतात ज्यामुळे विविध रोगांना प्रतिबंध होण्यास फायदा होतो. त्यासाठी नियमितपणे स्पिरुलिना पावडरचे सेवन फायदेशीर असते. ४ आतड्याचे आरोग्य : स्पिरुलिनामध्ये अतिशय महत्त्वाचा असणारा रोगप्रतिकारक प्रभाव आहे. ज्यामुळे आतड्यामधील हानिकारक जीवाणू नष्ट होतात. व चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीस उत्तेजना मिळते. त्यामुळे आतड्याचे आरोग्य चांगले राहण्यास फायदा होतो. तसेच बुरशीजन्य संक्रमण नियंत्रित राहते. स्पिरुलिनाच्या पेशी कठोर तंतुमय नसल्यामुळे अगदी सहजपणे पचतात. त्यासाठी आहारात स्पिरुलिना असणे गरजेचे आहे. ४हृदयविकार : बहुतेक वेळा लठ्ठपणा, मधुमेह, कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाब या समस्या हृदयविकारास कारणीभूत ठरू शकतात. म्हणून हृदयविकार टाळण्यासाठी त्याची कारणे दूर करणे आवश्यक असते. स्पिरुलिनामध्ये लठ्ठपणा व मधुमेह नियंत्रित ठेवण्याचे व लिपिड कमी करण्याचे आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे गुणधर्म आहेत तसेच त्यातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट आपल्या शरीराला मुक्त रॅडिकल्सच्या प्रभावापासून वाचवतात ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

४ डोळ्यांचे आरोग्य : स्पिरुलिनामध्ये जीवनसत्व-अ विपुल प्रमाणात असते ज्यामुळे डोळ्यांना होणारे विविध आजार दूर होण्यास मदत होते. गाजरापेक्षा १० पट जीवनसत्वे स्पिरुलिनामध्ये असतात. ज्यावेळी जास्त प्रकाश किरणे डोळ्यावर पडतात तेव्हा डोळ्यावर ऑक्सिडेटिव्ह तणावाचा परिणाम होऊन अंधत्व येण्याची शक्यता असते. स्पिरुलिनामधील अ‍ॅन्टीऑक्सिडंट गुणधर्म डोळ्याची दृष्टी कमी होण्यापासून वाचवू शकतात. ४ यकृताचे आरोग्य : यकृत मानवाच्या शरीरातील दुस-या क्रमांकाची आणि सर्वांत मोठी ग्रंथी आहे जी अविरतपणे कार्य करीत राहते. स्पिरुलिनामध्ये भरपूर प्रथिने आणि तंतुमय पदार्थ असतात. ज्यामुळे यकृत मजबूत आणि निरोगी राहण्यास फायदा होतो. तसेच स्पिरुलिनाच्या सेवनाने सिरॉसिस ज्यामध्ये यकृताचा -हास होतो आणि सांसर्गिक हिपॅटायटीस ज्यामध्ये विषाणूची बाधा होते अशा आजाराचा धोका कमी होतो. ४ श्वासाचे विकार : स्पिरुलिनाच्या सेवनाने श्वासाचे विविध आजार कमी होण्यास फायदा होतो. स्पिरुलिना शैवालामध्ये ओमेगा-३ ईएफए, मॅग्नेशियम आणि जीवनसत्व-ब उच्च प्रमाणात असतात ज्यामुळे श्वासनलिकेतील अडथळा कमी होऊन श्वास घ्यायला सोपे होते तसेच दमा आणि श्वासाचे विकार असलेल्या व्यक्तींना आधार मिळतो.

त्यासाठी दररोज २ ग्रॅम स्पिरुलिना चूर्ण दुधाबरोबर घ्यावे.४ केसांची वाढ : स्पिरुलिना पोषक तत्त्वाचा खजिना आहे. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी अत्यंत फायदेशीर आहे. प्रथिने, फॅटी अ‍ॅसिड आणि लोहाची कमतरता आपल्या शरीरात झाल्याने केसांची वाढ थांबते. स्पिरुलिनामध्ये या तीनही घटकांचा समावेश असतो. त्यामुळे केसांची वाढ चांगली होते त्यासाठी स्पिरुलिनाचे सेवन नियमितपणे करावे. त्यामुळेच केसांची लांबी वाढविण्यासाठी शाम्पूमध्ये स्पिरुलिना शैवालाचा वापर केला जातो. ४केस गळती : सध्याच्या धावपळीच्या युगात खाण्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पोषक घटकांची कमतरता आपल्या शरीराला भासते व त्यामुळे अकाली केस गळणे किंवा टक्कल पडणे या समस्यांना सामोरे जावे लागते. स्पिरुलिनामध्ये अमिनो अ‍ॅसिड, फॅटी अ‍ॅसिड आणि जीवनसत्व -अ विपुल प्रमाणात असतात. ज्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते व केस गळतीची समस्या कमी होण्यास लाभदायक होते. ४ डोक्यातील कोंडा : कोंडा ही टाळूची सामान्य समस्या असून आपल्या डोक्यावरील मृत त्वचा पापुद्र्याच्या स्वरूपात पडते व त्यामुळे डोक्याला खाज सुटते त्यासाठी स्पिरुलिना अत्यंत गुणकारी औषध आहे. यात अ‍ॅन्टीऑक्सिडंट संयुगे असतात. ज्यामुळे कोंडा कमी होण्यास फायदा होतो. त्यासाठी २ ग्रॅम स्पिरुलिना चूर्ण घेतल्याने केस मजबूत, चमकदार होता.

-प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या