29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeविशेषस्वतंत्र शैलीचा स्वरसम्राट

स्वतंत्र शैलीचा स्वरसम्राट

एकमत ऑनलाईन

रामदास कामत यांचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही पूर्वीच्या नटाची किंवा गायकाची नक्कल न करता त्यांनी स्वत:ची शैली दोन्ही कलांच्या बाबतीत निर्माण केली. संवाद आणि संगीत यासाठी वापरावयाच्या स्वरामध्ये त्यांनी कधीही फरक केला नाही. त्यामुळेच त्यांचा अभिनय आणि संगीत वेगवेगळे न वाटता ते एकजिनसी झाले आणि म्हणूनच त्यांना नाट्यरसिकांचे उदंड प्रेम मिळाले. कोणत्याही भूमिकेचा पूर्ण अभ्यास झाल्याखेरीज रंगमंचावर पाऊल टाकायचे नाही, हा त्यांचा शिरस्ता होता.

नाटकाच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार आणि उत्तम गायक, अभिनेते पंडित रामदास कामत यांनी वयाच्या नव्वदाव्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. ही बातमी ऐकल्याबरोबर अनेकांच्या कानात ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ ही त्यांची प्रार्थना घोळू लागली असेल. ‘ययाती देवयानी’ नाटकातील ही प्रार्थना. परंतु त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले ते ‘मत्स्यगंधा’ या १९६४ मधील नाटकामुळे. तत्पूर्वी ते अधूनमधून रेडिओवर गात असत. गाण्याची इच्छा तृप्त करण्यासाठी त्यांच्याकडे त्यावेळी तेवढेच माध्यम होते, कारण घरच्या परिस्थितीमुळे त्यांना नोकरी सोडून संगीताची साधना करता येत नव्हती. अर्थशास्त्राची पदवी संपादन करून ते त्याकाळी नुकतेच मुंबईत आले होते. परंतु लहानपणापासून मिळालेले संगीताचे संस्कार घेऊनच ते आले होते.
रामदास कामत हे मूळचे गोव्याचे. म्हापसा येथे १९३१ मध्ये त्यांचा जन्म झाला. बालपणी संगीताचे प्राथमिक धडे त्यांनी त्यांचे थोरले बंधू उपेंद्र कामत यांच्याकडून घेतले. नंतर त्यांनी नाट्यसंगीताचेही शिक्षण घेतले. संगीत नाटक म्हणजे गायक आणि अभिनय या दोहोंची गरज जिथे भासते असे व्यासपीठ. त्यासाठी आवश्यक असण्याचे कसब त्यांनी अनेक दिग्गजांकडून कमावले. यात पंडित गोविंदबुवा अग्नी, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित भीमसेन जोशी, प्रभाकर पेंढारकर आणि भालचंद्र पेंढारकर यांचा समावेश आहे. भावगीत गायनाची शैली त्यांनी यशवंत देव यांच्याकडून आत्मसात केली. संगीताच्या सर्वच रूढ प्रकारांमध्ये शिक्षण घेण्याच्या त्यांच्या या ओढीमुळेच त्यांच्या गायकीला पैलू पडले.

दी गोवा हिंदू असोसिएशनच्या ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी संगीत रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर धन्य ते गायनी कळा, मीरा मधुरा, हे बंध रेशमाचे, एकच प्याला, कान्होपात्रा, मदनाची मंजिरी, मानापमान, मृच्छकटिक, शारदा, संन्याशाचा संसार, सौभद्र, स्वरसम्राज्ञी, होनाजी बाळा अशा अनेक नाटकांमधील त्यांचा अभिनय आणि नाट्यपदे प्रचंड गाजली. परंतु ‘मत्स्यगंधा’ आणि ‘ययाती देवयानी’ या दोन नाटकांमधील त्यांच्या भूमिका आणि पदे सर्वाधिक रसिकप्रिय ठरली. संगीत नाटकाचा हा वारसा रामदास कामत यांनी त्यांचे चुलत मामा श्रीपादराव नेवरेकर यांच्याकडून घेतला. त्या काळातील ते गाजलेले गायक-अभिनेते होते. मामांच्या भूमिका बघून रामदास कामत यांच्या अंगात लहानपणापासूनच संगीत नाटक भिनले. पणजी येथील शाळेत कवितांना चाली लावण्याचे काम त्यांच्याकडे येत असे. उत्सवातील नाटक ही गोव्यातील मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. रामदास कामत हेही उत्सवातील नाटकांमध्ये काम करीत असत. पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी एअर इंडियात नोकरी केली. वास्तविक, घर चालविण्यासाठी नोकरी करणे कितीही आवश्यक असले तरी अनेकदा आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झाल्यानंतर लोक आपला छंद एकतर विसरतात किंवा त्याचा त्याग करतात. परंतु रामदास कामत यांच्या बाबतीत तसे झाले नाही. गोपीनाथ सावकार हे त्यांना नाट्यगुरू म्हणून लाभले आणि ‘संशयकल्लोळ’पासून रामदास कामत यांचा संगीत नाटकाचा प्रवास सुरू झाला.

कोणत्याही भूमिकेत जीव ओतून काम करायचे आणि भूमिकेचा पूर्ण अभ्यास झाल्याखेरीज रंगमंचावर पाऊल टाकायचे नाही, हा त्यांचा शिरस्ता होता. दी गोवा हिंदू असोसिएशनने वसंत कानेटकर यांचे ‘मत्स्यगंधा’ हे नाटक रंगभूमीवर आणायचे ठरविले तेव्हा कंपनीला संगीत दिग्दर्शकही नवीन हवे होते. कंपनीने पंडित जितेंद्र अभिषेकी यांची निवड केली. गायक-कलावंत म्हणून रामदास कामतसुद्धा नवीनच होते. अभिषेकी आणि कामत दोघेही गोव्याचे असल्यामुळे त्यांच्या तारा लगेच जुळल्या. दोघांमध्ये भावबंध निर्माण झाले आणि त्यातूनच पुढे रसिकांना मोठमोठ्या मेजवान्या मिळाल्या. ‘मत्स्यगंधा’चे सुमारे सातशे प्रयोग ‘हाऊसफुल’ झाले. पदार्पणातच कामत यांना मोठे व्यावसायिक यश मिळाले.

रामदास कामत यांचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही पूर्वीच्या नटाची किंवा गायकाची नक्कल न करता त्यांनी स्वत:ची शैली दोन्ही कलांच्या बाबतीत निर्माण केली. संवाद आणि संगीत यासाठी वापरावयाच्या स्वरामध्ये त्यांनी कधीही फरक केला नाही. त्यामुळेच त्यांचा अभिनय आणि संगीत वेगवेगळे न वाटता ते एकजिनसी झाले आणि म्हणूनच त्यांना नाट्यरसिकांचे उदंड प्रेम मिळाले. वैशिष्ट्यपूर्ण आणि गतिमान ताना आणि आलाप हे त्यांच्या गायकीचे वैशिष्ट्य होते. अभिनयाच्या बाबतीतही त्यांची स्वतंत्र शैली असल्यामुळे ते रंगमंचावर येताच टाळ्यांचा कडकडाट होत असे.

१९६० नंतरचा काळ हा रंगभूमीच्या पुनरुज्जीवनाचा काळ मानला जातो. या काळाचे वैभव अनुभवण्याचे भाग्य कामत यांना लाभले. संगीत नाटकांच्या त्या जमान्याबद्दल उलटसुलट मते व्यक्त होताना दिसतात; परंतु अभिनय आणि गायकी दोन्ही जपणे सोपे नाही, यावर सर्वांचेच एकमत असते. रामदास कामत यांना तर दिग्गजांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभले आणि या दोन्ही बाजू मजबूत होत गेल्या. त्यांच्या नाट्यपदांपैकी ‘देवा तुझा मी सोनार,’ ‘पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव,’ ‘प्रथम तुज पाहता’ आदी पदे प्रचंड लोकप्रिय झाली. आजसुद्धा ही गाणी ऐकली जातात. लहानपणी पालखीच्या दिवशी दत्तमंदिरात पदे म्हणणा-या रामदास कामतांना पुढे दिगंत कीर्ती लाभली. एअर इंडियातील नोकरीत स्थिरस्थावर होण्यात आनंद न मानता ते आपल्या मूळ आवडीकडे वळले आणि तिथेच रमले. परंतु केवळ आवडणे आणि रमणे याच्या पलीकडे जाऊन सतत शिकणे आणि आवडीच्या क्षेत्रात परिश्रम घेणे हा त्यांचा मूळ पिंड होता. या मेहनतीनेच त्यांना इतरांपेक्षा वेगळा असा कसदार गायक-अभिनेता बनविले.

कोणतीही आवडती कला जोपासताना कधीतरी थांबण्याचा क्षण येतो आणि कलावंताच्या जीवनातील तोच सर्वांत वाईट क्षण असतो. कलाक्षेत्रातून निवृत्ती घेण्याची कल्पनाही कलावंताला सहन होत नाही. परंतु प्रत्येकाला त्या क्षणाला सामोरे जावेच लागते. रामदास कामत यांच्या निवृत्तीच्या वेळी रसिक अक्षरश: रडले होते. ते स्वत:सुद्धा भावूक झाले होते. १९९७ मध्ये त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला. पुण्यात झालेल्या या कार्यक्रमात ‘संगीत मानापमान’ या नाटकातील एक पद सादर करण्यात आले. तसेच निवृत्तीचे प्रतीक म्हणून त्यांनी धैर्यधराची चांदीची पगडी काढून ठेवली. या घोषणेनंतर ते रसिकांमधून चालत गेले आणि रसिकांनी त्यांच्यावर पृष्पवृष्टी केली. त्यानंतर मेकअप रूममध्ये जाऊन ते धाय मोकलून रडले होते. रामदास कामत निवृत्त होत आहेत, हे पाहून अनेकांना त्या दिवशी गहिवरून आले होते. त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी प्रेक्षागृहात उपस्थित असलेल्या रसिकांना त्यांच्या निधनाची बातमी जेव्हा समजली असेल, तेव्हा त्यांना पुन्हा एकदा तो सोहळा आठवला असेल आणि निश्चितपणे पुन्हा एकदा गहिवर दाटून आला असेल.

– अमृता साठे,
संगीत विशारद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या