26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeविशेष३ अॉगस्टला काय होणार?

३ अॉगस्टला काय होणार?

एकमत ऑनलाईन

ऑगस्ट महिना क्रांतिकारी आहे. ९ ऑगस्ट, १५ ऑगस्ट हे या देशाच्या क्रांतीचे आणि स्वातंत्र्याचे दिवस आहेत. ९ अॉगस्ट हा क्रांतिदिन आहे. ‘चले जाव’, ‘छोडो भारत’, ‘जय हिंद’… जगात दोन शब्दांनी देश स्वतंत्र झाल्याचे एकमेव उदाहरण म्हणजे भारत आहे. हे दोन्ही दिवस राष्ट्रीय सण आहेत. या दोन दिवशी देशाबद्दलच्या सर्व आत्यंतिक आदराच्या भावना व्यक्त व्हायला पाहिजेत. पण १५ ऑगस्ट हा या देशात ‘सुटीचा दिवस’ म्हणून समजला जातो. या वर्षी तर १५ ऑगस्ट सोमवारी आला आहे. म्हणजे शनिवार, रविवार, सोमवार या दिवशी खंडाळा, लोणावळा, महाबळेश्वर येथे मुंबईकरांची तुफान गर्दी. १५ ऑगस्टचे कोणाला काय पडले आहे? ‘हर घर तिरंगा….’ ही ‘मोहीम’ करावी लागते. असा एक स्वातंत्र्यदिन सांगा की, ज्या दिवशी प्रत्येक घरावर झेंडा फडकला गेला…. प्रत्येक घराने आपल्या अंगणात राष्ट्रगीत म्हटले? प्रत्येक मुंबईकराने आपल्या चाळीत, आपल्या गॅलरीत आपल्या घराच्या दारात झेंडा फडकवला? त्यावेळचा त्याग आणि समर्पण आम्ही सगळेच विसरलो आहोत. आज त्याची गरजही नाही.

५०-६० वर्षांत देश कसा उभा राहिला… एका खंडाएवढी लोकसंख्या असलेला हा देश…. सगळा युरोपसुद्धा सव्वाशे कोटींचा नाही. हा एक देश एवढा प्रचंड… अनेक जाती, धर्म, पंथ, पक्ष, दारिद्र्य, बेकारी, अज्ञान, अंधश्रद्धा… काय नव्हते? पण एक जबरदस्त जमेची बाजू आहे… ती म्हणजे या देशाच्या विविधतेमागे दडलेली ठाम एकता. त्या ऐक्याच्या जोरावरच या देशातील लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव टिकला…कायम राहिला…आणि कितीही प्रयत्न केले तरी जिथपर्यंत या देशातील सामान्य माणूस घटनेवर विश्वास ठेवणारा आणि सर्वधर्म समभावावर विश्वास ठेवणारा आहे, तिथपर्यंत कितीही आणि कशीही भ्रम निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण केली तरी हा देश असाच अखंड राहील. सर्व जाती-धर्म गुण्यागोविंदानेच नांदतील. तोडफोड करून मने नासवण्याचे काम यशस्वी होणार नाही. आजपर्यंत ते झालेही नाही. प्रयत्न खूप सुरू आहेत. पण ज्या दिवशी हा सामान्य माणूस पेटून उठेल त्या दिवशी असे प्रयत्न करणारे उघडे पडतील. देशाच्या अस्मितेची जाणीव होऊ देणारा हा ऑगस्ट महिना आहे. नवीन पिढीला ‘९ अॉगस्ट’ हा क्रांतिदिन माहिती नाही. देशातील सा-या पुढा-यांना आगाखान पॅलेसमध्ये कोंडून ठेवल्यानंतरही- त्यात महात्मा गांधी हेही होते – एक २० वर्षांची तरुणी अॉगस्ट क्रांती मैदानावर पोलवर चढून तिरंगा झेंडा फडकवते… पोलिसांच्या लाथा-बुक्क्यांचा मार खाते… त्या अरुणा असफअली कितीजणांना लक्षात आहेत? ते गफार खान… गांधी… नेहरू… पटेल… सुभाष… राजेंद्रबाबू… मालवीय… मौलाना आझाद… वीर नरिमन… किती नावं… किती नेते… किती धर्माचे नेते… देशासाठी हातात हात घालून लढायला उभे राहिले. तीच खरी राष्ट्रीय संस्कृती. त्या संस्कृतीचे स्मरण म्हणजेच ऑगस्ट क्रांतीचे स्मरण.

अशा या ऑगस्ट महिन्यात ९ ऑगस्ट आणि १५ ऑगस्टच्या चर्चेऐवजी सध्या चर्चा आहे ती ३ऑगस्टला काय होणार याची… २० दिवसांपूर्वी चर्चा होती, ११ जुलैला काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने त्या दिवशी निर्णय दिला… पण, महाराष्ट्रातल्या नवीन सरकारचा गाडा अजूनही चिखलात रुतलेलाच आहे. पुढे सरकतच नाही. अजूनही मंत्रिमंडळ अस्तित्वात येत नाही. अनेक जिल्हे महापुरात होते. पिके वाहून गेली… महागाई वाढत चालली. गॅस सिलिंडर आणखी महाग झाले… कष्टकरी आणि गरीब माणसांना जेऊ घालणा-या खानावळी बंद पडू लागल्या. भाव परवडत नाहीत, हे त्याचे कारण. त्यामुळे या खानावळीत जेवण थोडे स्वस्त मिळायचे बंद झाले. सामान्य हॉटेलमधील राईसप्लेटही आता २५० रुपये झाली आहे. कितीजणांना परवडणार? सामान्य माणसांची सर्व बाजूंनी कुचंबणा आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत…. पण प्रश्नांना कोणीच भिडत नाहीत. रस्त्यावर खड्डे पडले आहेत… वाहतूक कोंडी होत आहे… तिकडे अनेक जिल्ह्यांत महापुराने शेती उद्ध्वस्त झाली आहे… ना मुख्यमंत्री दौ-यावर गेले…. ना उपमुख्यमंत्री दौ-यावर गेले.

उद्योगपती रतन टाटा यांच्या वाढदिवसाला एकनाथजी, तुम्ही त्यांच्या घरी जाऊन अभिनंदन केलेत ते अतिशय चांगले केलेत. कारण टाटा उद्योग घराणे हा देशाच्या अभिमानाचा विषय आहे. अंबानी, अदानींचे अभिनंदन करण्याची गरज नाही. तुम्ही आता गावच्या शेताच्या बांधावर जा… शेतक-यांच्या घरात जा…. इकडे अभिनंदन झाले… तिकडे सांत्वनाला जा… त्यांच्या मदतीला जा…. ३० दिवस झाले, मंत्रिमंडळ नाही. अर्थात मंत्रिमंडळ झाल्यामुळे फार मोठा कामाचा उरक होईल, असे कोणी मानत नाही. कारण तुमच्याजवळ जी टीम आहे त्यात कोणीही यशवंतराव मोहिते, राजारामबापू पाटील, मधुकरराव चौधरी, प्रतिभाताई पाटील नाही… आवाका असलेली ती माणसं होती. राज्याचे प्रश्न समजून घेणारी ती माणसं होती. महाराष्ट्र समजणारी ती माणसं होती. आता मतलब साधणारी माणसं आहेत. पण, जे आहेत त्यातूनही मंत्रिमंडळ होत नाही… राज्य ठप्प झाल्यासारखे आहे. अशा स्थितीत ३ अॉगस्टला काय होणार? दोन विषयांचे निर्णय सर्वाेच्च न्यायालयाला द्यायचे आहेत. एक म्हणजे ४० आमदारांना अपात्र ठरवायचे की नाही? पक्षातील फूट ३/४ (तीन चतुर्थांश) असेल तर त्या गटाला दुस-या पक्षात विलीन व्हावे लागेल की नाही? आणि दुसरा विषय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची नियुक्तीच बेकायदा आहे… या याचिकेवरही निर्णय द्यायचा आहे. दोन्ही विषय वेगवेगळ्या पद्धतीने मांडले जात आहेत. सामान्य माणसांना यात फार काही कळत नाही. पण, कायदेतज्ज्ञ वेगवेगळी मते मांडत आहेत. पण, सगळ्यांचा लघुत्तम साधारण विभाजक काढला तर, कोणताही निर्णय झाला तरी, तो भाजपाच्या फायद्याचाच आहे. समजा, सर्वाेच्च न्यायालयाने सरकारच बेकायदेशीर ठरवले तर राष्ट्रपती राजवट येणार.

दुसरा कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकणार नाही. राष्ट्रपती राजवट आली तरी ती राजवट भाजपाच्या फायद्याचीच आहे. मग इथे जो प्रशासक बसेल… ज्याला राज्यपाल नेमतील तो भाजपवालाच असेल. विधान परिषदेच्या ज्या १२ आमदारांची यादी राज्यपालांकडे पडली आहे तीही झटकन मंजूर होईल. ती नावेही भाजापवाल्यांचीच असतील. समजा शिंदे गटाच्या बाजूने निर्णय लागला, शिंदेंनी कितीही म्हटले तरी, ते मुख्यमंत्री असले तरी, वर्चस्व भाजपाचेच राहणार… फडणवीसांना दुय्यम भूमिका घ्यावी लागली त्यात त्यांचा अपमान आहे… पण भाजपाचा काही तोटा नाही. कारण भाजपाला शिवसेनेची तोडफोड करायची आहे. आणि हे काम मोदी-शहांच्या पातळीवर ठरलेले आहे. फडणवीस ते करू शकत नाहीत. शिंदेच करू शकतात. त्यासाठी शिंदे यांना वापरून घ्यायचे आहे. शिंदे यांच्या अभिनंदनाच्या पोस्टर्सवर मोदी-शहा-नड्डा यांचे मोठे फोटो आहेत… बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो पोस्टाच्या स्टँपएवढेच आहेत. काही दिवस हे फोटो लावले जातील आणि एकदा का शिंदे आणि त्यांचा गट भाजपाच्या पूर्ण ताब्यात आला की, तेही फोटो हटवले जातील. सध्या एकच काम आहे…. ते म्हणजे शिवसेनेची तोडफोड… सागराला भरती येते ती काही काळ टिकते. या तोडफोडीचेही असेच आहे. या महाराष्ट्रात कोणत्याही राजकीय पक्षाच्या माणसाला विचारा…. मुंबई, ठाणे, औरंगाबाद या ठिकाणच्या कोणत्याही पक्षाच्या किंवा पक्षीय विचार न करणा-या व्यक्तीला विचारा…. त्यांचे स्पष्ट मत असे आहे की, ‘शिवसेना हवीच… आणि ती ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच हवी…’

३ ऑगस्टला कोर्टाचा निर्णय काय होतो, हे महत्त्वाचे आहेच… तो कसाही झाला तरी त्याचा तात्पुरता भाजपालाच फायदा आहे. पण, हे बंड किंवा हे सरकार तात्पुरतेच आहे…. एकदा कामाला सुरुवात होऊद्या… मंत्रिमंडळ होऊद्या… प्रश्नांना सामोरे जायची वेळ येऊद्या… मग कशी त्रेधातिरपीट होते बघा…. आणि हे ही बघायला भाजपाला मजाच वाटणार आहे… पुढचे दोन अंक कसे असतील याच्यासाठी फार मोठा विचार करण्याची गरज नाही. २०२४ च्या लोकसभेचा हिशेब मोदी-शहा या जोडीने करून ठेवलेला आहे. आणि नंतर त्यांना तुम्ही किती जवळचे आहात की नाही, याचा हिशेबही ते नंतर करतील. त्यामुळे ३ ऑगस्टला काही निर्णय झाला तरी भाजपा घाट्यात जाणार नाही. महाराष्ट्रातला पहिला अंक झाल्यावर आता हाच अंक बंगालसाठी वापरला जाणार आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आली तरीही ते खुशच होतील. तुमच्या बाजूने निर्णय झाला तरी त्यांचे नुकसान नाही.

-मधुकर भावे

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या