25.2 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeविशेषकांबळीच्या याचनेच्या निमित्ताने...

कांबळीच्या याचनेच्या निमित्ताने…

एकमत ऑनलाईन

बी. आर. चोप्रा यांच्या ‘वक्त’ चित्रपटातील एक संवाद अतिशय कालातीत आहे. चित्रपटातील एक महाराज धनाढ्य असलेल्या बलराज साहनींना म्हणतात की, वक्त किसी से क्या करवाएं ये कुछ नही कह सकते. साहनी यांनी आपल्या तिन्ही मुलांचे भविष्य सांगितलेले असते. परंतु महाराज म्हणतात की, आपण किती ठरवत असलो तरी वेळ आपल्याकडून काय करून घेईल, हे सांगता येत नाही. काही दिवसांतच भूकंप होतो आणि बलराज साहनी यांच्या कुटुंबाची वाताहत होते. चित्रपटातच नव्हे तर प्रत्यक्ष आयुष्यातही असे अनुभव आपण ऐकले असतील. सध्या याचे चर्चेत आलेले उदाहरण म्हणजे विनोद कांबळी. भारतीय क्रिकेटविश्वात एकेकाळी यशाच्या शिखरावर असणारा दमदार खेळाडू म्हणून विनोद कांबळीची ओळख होती. परंतु अलीकडेच तो आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याने एका मुलाखतीत म्हटले की, भारतीय क्रिकेट मंडळाकडून मिळणारी ३० हजारांची पेन्शन वगळता उत्पन्नाचे अन्य कोणतेही साधन नाही. कांबळी हा सध्या ५० वर्षांचा आहे आणि त्याच्या मते, निवृत्तीनंतर आपले क्रिकेट पूर्णपणे संपले आहे. मुंबई क्रिकेटने आपल्याला खूप काही दिले. या खेळासाठी आपण पुढेही आयुष्य देऊ शकतो. त्याने मुंबई क्रिकेट संघटनेकडून कामाची अपेक्षा व्यक्त केली. बालमित्र सचिन तेंडुलकरबद्दल म्हणाला की, त्याला माझे सर्वकाही ठाऊक आहे. परंतु त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा बाळगत नाही. कांबळी आणि तेंडुलकर हे एका ग्लोबल अ‍ॅकेडमीसमवेत काम करत होते.

परंतु दीर्घकाळ प्रवास करावा लागत असल्याने कांबळीने हे काम सोडून दिले. त्याच्या बोलण्यातून आपल्याला आर्थिक स्थितीचा अंदाज येऊ शकतो आणि सध्या तो कोणत्याही मैदानावर काम करण्यास तयार आहे. कांबळीसंदर्भात असेही म्हटले जाते की, त्याच्याकडे सचिनपेक्षा अधिक प्रतिभा होती. परंतु वादामुळे कांबळीचे करिअर पुढे सरकले नाही. २००० च्या दशकात विनोद कांबळीचे नाव मागे पडले. विनोद कांबळीने शालेय जीवनात सचिन तेंडुलकरबरोबर विक्रमी ६६४ धावांची भागिदारी केली होती. या दोघांनी क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली. या भागिदारीत कांबळीने ३४९ धावा आणि सचिनने नाबाद ३२६ धावा केल्या. कांबळीने भारतासाठी १०४ एकदिवसीय सामने आणि १७ कसोटी सामने खेळले. १७ कसोटीत ५४.२० च्या सरासरीने १०८४ धावा केल्या आणि त्यात २२७ ही सर्वाधिक धावसंख्या राहिली. कसोटीत त्याने चार शतके आणि तीन अर्धशतके ठोकली. एकदिवसीय १०४ सामन्यांत त्याने ३२.५९ च्या सरासरीने २,४७७ धावा केल्या. त्यात दोन शतकं आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. आपल्याकडे क्रिकेटच असा एकमेव खेळ आहे की, ज्याचे अर्थकारण मोठे आहे.

कांबळीने करिअरवर लक्ष केंद्रित केले असते तर तो आर्थिकदृष्ट्या सक्षम राहण्याबरोबरच खेळाडू म्हणूनही त्याचा नावलौकिक राहिला असता. भारतीय क्रिकेटसंघात किंवा अन्यही क्रीडाप्रकारांमध्ये स्थान पटकावणारे बहुतांश खेळाडू हे सामान्य कुटुंबातून येतात. यातील कौशल्य, क्षमता आणि अफाट परिश्रमांची तयारी असणा-यांना भारतीय क्रिकेट उच्च स्थानावर नेऊन बसवते. सुनील गावसकर, बिशनसिंग बेदी, सचिन तेंडुलकर, कृष्णम्माचारी श्रीकांत यांच्यासारख्या नामांकित खेळाडूंच्या मुलांनी खूप प्रयत्न केले, परंतु ते वडिलांप्रमाणे ते क्रिकेटमध्ये छाप पाडू शकले नाहीत. काही दशकांपूर्वी अशी स्थिती होती की, भारतीय क्रिकेट संघात देशातील मुंबई आणि दिल्ली या दोन मोठ्या शहरांमधील खेळाडूंचा बोलबाला होता. यातील बहुतांश खेळाडू सधन कुटुंबातील असायचे. क्रिकेट हा केवळ श्रीमंतांचा, इंग्रजांचा खेळ असल्याचे मानले जात होते. पण कपिल देवपासून ही परंपरा बदलली. धोनीच्या आगमनानंतर तर भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला. धोनीने नुसते तीन फॉरमॅटमध्ये टीमचे यशस्वी नेतृत्व केले नाही तर ग्रामीण भागातून येणा-या प्रतिभावान खेळाडूंना भारतीय संघात येण्यासाठी एक आदर्श घालून देत त्यांचा मार्गही मोकळा केला.

आयपीएल संघाच्या माध्यमातून लहान शहरे आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना आपली प्रतिभा दाखविण्याची संधी मिळत आहे. आझमगड जिल्ह्यातील रहिवासी सर्फराज खान, प्रवीण दुबे, गाझीपूरचा सूर्यकुमार यादव, भदोहीचा यशस्वी जयसवालबरोबर शिवम दुबे देखील आयपीएल खेळत आहेत. वेगवान गोलंदाज मोहंमद सिराजला जेव्हा स्थान मिळाले तेव्हा त्याने निवडकर्त्याचा अपेक्षाभंग केला नाही. त्याचे वडील हैदराबाद येथे ऑटोरिक्षाचालक होते. ऑस्ट्रेलिया दौ-याच्या वेळी त्याच्या वडिलांचे निधन झाले. परंतु तो मैदानात ठाण मांडून राहिला. बहुचर्चित फलंदाज शुभमन गिल हा पंजाबच्या जैमलवाला गावातील आहे. आणखी एक बहुचर्चित खेळाडू टी. नटराजन हा तामिळनाडूतील सालेम जिल्ह्यातील आहे. त्याचे वडील सूतगिरणीत कामगार. आई देखील कष्टकरीच होती. शार्दुल ठाकूर हा मुंबईपासून ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या पालघरचा रहिवासी. वॉशिंग्टन सुंदर हा २०१६ च्या अंडर १९ विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचा सदस्य. त्याचे वडील साधारण खेळाडू होते. परंतु त्यांच्या मुलाने त्याना निराश केले नाही. वास्तविक आपण आर्थिक प्रारूपावर चर्चा करण्याची गरज आहे. नवीन अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानाने भारताचे जागतिकीकरण झाले आहे. आपण परकीय मॉडेलचे अनुकरण करत आहोत, परंतु त्यापासून निर्माण होणा-या आव्हानांकडे लक्ष देत नाहीत. वास्तविक, जागतिकीकरणाचे फायदे असतील तर नुकसान देखील आहे.

– नितीन कुलकर्णी,
क्रीडा अभ्यासक

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या