लातूर : प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांन कारवाई करीत घरफोड्या करणा-या चार सराईत गुन्हेगारांना अटक केली. चोरीचे ३ गुन्हे उघडकीस आले असून सोन्या, चांदीच्या दागिण्यांसह २ लाख ६८ हजार रुपयाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणारे चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित व निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखचे विविध पथके तयार करुन जिल्ह्यात घडलेल्या घरफोड्या संदर्भाने तपास करण्यात येत होता. त्या अनुषंगाने दि. ४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारावर पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विजय बब्रू भोसले, वय २४ वर्ष, राहणार घाटशीळ रोड, पाण्याच्या टाकीजवळ, तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद, शिवमणी संतोष भोसले, वय २० वर्ष, राहणार जनवडा बिदर कर्नाटक, सध्या राहणार निलंगा, अजय व्यंकट शिंदे, वय १९ वर्ष, राहणार सुगाव तालुका चाकूर जिल्हा लातूर, एक विधी संघर्ष ग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले.
त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल दोन गुन्हे व एमआयडीस पोलीस ठाण्यात दाखल एक गुन्हा, असे तीन गुन्हे सदर आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारासह केल्याचे कबूल करुन नमूद गुन्ह्यात चोरलेला सोने-चांदीचा दागिन्याचा २ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे. उर्वरित फरार आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घेत असून पुढील तपास शिवाजीनगर व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा लातूर येथील सहायक पोलीस निरीक्षक राहुल बहुरे, सचिन द्रोणाचार्य, पोलीस उपनिरीक्षक शैलेश जाधव, पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, राजू मस्के, राम गवारे, सुधीर कोळसुरे, नितीन कटारे, सिद्धेश्वर जाधव, प्रदीप चोपणे, प्रमोद तरडे, नुकुल पाटील यांनी बजावली आहे.