23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeविशेषचित्रपटांत हिट, ओटीटीवर फ्लॉप!

चित्रपटांत हिट, ओटीटीवर फ्लॉप!

एकमत ऑनलाईन

रंगमंच, टीव्ही आणि मोठा पडदा या मनोरंजनविश्वाच्या तीन पारंपरिक व्यासपीठांमध्ये किंवा माध्यमांमध्ये गेल्या दोन-तीन वर्षांत ओटीटी या प्लॅटफॉर्मचा समावेश झाला. पाहता पाहता या नवमाध्यमाला कमालीची लोकप्रियता लाभली. विशेषत: कोविड काळात ओटीटीला सुगीचे दिवस लाभले. अनेक वेबसीरिज लोकांच्या पसंतीस उतरल्या, चर्चेत राहिल्या. ही लोकप्रियता पाहून बॉलिवूडमधील सर्वच कलाकारांची पावले याकडे वळली. विशेष म्हणजे अनेकांना यामध्ये यश आले; परंतु त्याच वेळी बॉलिवूडमध्ये सुपरहिट ठरलेले अनेक कलाकार ओटीटीवर साफ अपयशी ठरताना दिसले.

कोरोना काळात मनोरंजन क्षेत्राला जबरदस्त फटका बसला. मल्टीप्लेक्स, सिंगल स्क्रीनला अनिश्चित काळासाठी टाळे लागले. अनेकांना ही परिस्थिती जेमतेम पाच ते सहा महिने राहील असे वाटले. परंतु लॉकडाऊनचा कालावधी वाढत गेला आणि कलाकारांचे उत्पन्न थांबले. गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हणतात. मनोरंजनासाठी ओटीटी नावाचा पर्याय शोधण्यात आला. या प्लॅटफॉर्मने मनोरंजन क्षेत्राला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला. चित्रपट, मालिकांचे प्रदर्शन ओटीटीवर होऊ लागले. काहींसाठी हा प्लॅटफॉर्म फायद्याचा ठरला तर काहींना नुकसानकारक. अर्थात या प्लॅटफॉर्मने कलाकारांना नवीन व्यासपीठ उपलब्ध करून दिले. काळानुसार ओटीटी प्लॅटफॉर्मची लोकप्रियता वाढत गेली आणि बड्या कलाकारांची पावले याकडे वळली. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना ओटीटीचे डोहाळे लागले आणि काहींनी डावही खेळून पाहिला. मात्र सर्वांचे नशीब सारखे कसे असेल? काही बॉलिवूड नायक-नायिकांनी मोठ्या पडद्यावर धमाल उडवलेली असताना ओटीटीवर मात्र त्यांचा बेरंग झाला. ओटीटीच्या मैदानावर कोणाला अपयश आले, ते पाहू.

अजय देवगण : बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण हा चित्रपट उद्योगातील आघाडीचा नायक. सर्वाधिक कमाई करणारा नायक म्हणूनही त्याची ओळख आहे. अ‍ॅक्शन चित्रपटांतून आपल्या करिअरची सुरुवात करणा-या अजय देवगणने आपल्या दमदार अभिनयाने छाप पाडली आहे. गंभीर चेह-याची ठेवण असल्याने अजय हा गंभीर भूमिका निवडण्याबाबत सजग असतो. ‘गंगाजल’ आणि ‘दृश्यम’ हे चित्रपट सुपरडुपर हिट ठरले. अशा अजय देवगणची एकूण कमाई ही ४० मिलियन डॉलर आहे. भारतीय रुपयांत त्याची मोजदाद करायची झाल्यास त्याच्याकडे २९५ कोटींची मालमत्ता आहे. अजय देवगण हा अभिनयाच्या शुल्काबरोबरच चित्रपटातून होणा-या नफ्यातूनही वाटा उचलतो. अजय देवगण हा सर्वाधिक प्राप्तिकर भरणा-या कलाकारांत सामील आहे. असा दमदार नायक मात्र ओटीटीवर चालला नाही. अलीकडेच त्याने हॉटस्टारवर वेब मालिका ‘रुद्रा’मध्ये पदार्पण केले. या मालिकेतून त्याला फारसे यश लाभले नाही. त्याच्या कामाची दखलही कोणी घेतली नाही. अभय देओल : अभय देओलने बॉलिवूडमध्ये जिंदगी मिलेगी ना दोबारा, आयशा यासारख्या अनेक चित्रपटांत काम केले आहे. २०२० मध्ये प्रदर्शित झालेली वेब मालिका ‘जेएल ५०’ मध्ये त्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले खरे, परंतु या मालिकेला यश मिळाले नाही. मोठ्या पडद्यावर जेमतेम यश मिळवणा-या अभय देओलला आपल्या अभिनयाची छाप ओटीटीवरूनही पाडता आली नाही.

ईशा देओल : धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांच्या अभिनयाचा वारसा ईशा देओल समर्थपणे चालवेल,असे सर्वांनाच वाटले होते. परंतु ती ना अभिनयात उजवी ठरली ना सौंदर्यात. बॉलिवूडमध्ये हेमामालिनीची कन्या ही ओळख ती पुसू शकली नाही. अशा ईशा देओलचे बालपण अत्यंत साधेपणात गेले. ईशा देओलने स्वत:ला प्रसिद्धीपासून दूर ठेवले होते. लहानपणी त्यांना घराबाहेर पडणे खूपच सोपे असायचे. कारण त्यावेळी मीडियाचा ससेमिरा नसायचा. एखाद्या व्यक्तीने ओळखलेच तर ते तिच्याकडे बोट दाखवत ती धर्मेंद्र आणि हेमामालिनीची मुलगी आहे, असे म्हणायचे. आपण अनेकदा रिक्षा, ऑटोरिक्षातून शाळेत, कॉलेजला गेलो असल्याचे ईशा सांगते. रेल्वेतूनही पर्यटन केल्याचे ती सांगते.

जे मला ओळखतात, त्यांना ठाऊक आहे की मी किती साधी राहते, असे ईशाने एका मुलाखतीत सांगितले. अशा ईशाचे चित्रपट करिअर फार चालले नाही. क्या दिल ने कहा, शादी नंबर वन, धूम यासारख्या चित्रपटांत ती दिसली. पण तिच्या करिअरला फारसे बूस्ट मिळाले नाही. तिने ओटीटीवर नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. ती वेब मालिका ‘रुद्रा’मध्ये दिसली. या मालिकेत अजय देवगण देखील सोबत होता; परंतु तिला प्रभाव पाडता आला नाही. विनितकुमार सिंह : २०२० मध्ये प्रदर्शित झालेली वेब मालिका ‘बेताल’मध्ये अभिनेता विनितने महत्त्वाची भूमिका बजावली. ही वेब सीरिज फारशी प्रसिद्धी मिळवू शकली नाही. त्याचवेळी ‘बार्ड ऑफ ब्लड’मध्ये देखील विनितने अभिनय केला. तेथेही तो कमाल करू शकला नाही. एका अर्थाने विनितकुमार सिंहची ओटीटीवरची एन्ट्री फ्लॉपच ठरली आहे. हिंदी चित्रपटांचा विचार केल्यास मुक्काबाज, सांड की आँख, गँग्ज ऑफ वासेपूर यासारख्या चित्रपटांत जबरदस्त काम केले आहे. परंतु त्याचा फायदा ओटीटीवर झाला नाही.

अर्जुन रामपाल : अर्जुन रामपाल हा बॉलिवूडमधला अष्टपैलू अभिनेता. तो फार चित्रपट करत नाही. बहुतांश वेळी त्याने नकारात्मक भूमिका स्वीकारल्या आहेत. त्याला चॉकलेट हीरो म्हणूनही ओळखले जायचे. २००१ च्या ‘प्यार मोहब्बत इश्क’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. आतापर्यंत त्याने चाळीसपेक्षा अधिक चित्रपटांत काम केले. रॉक ऑन, राजनिती, ओम शांति ओम हे त्याचे गाजलेले चित्रपट. चित्रपटातील रामपालची केशरचना पाहून तरुण मंडळी त्याची कॉपी करायचे. एक काळ होता की अर्जुन रामपालने तरुणाईला वेड लावले होते. कालांतराने त्याने नायकाची भूमिका करणे बंद केले. तरीही त्याचे काम सुरूच होते. अलीकडेच अर्जुन आणि कंगना राणावतचा ‘धाकड’ चित्रपट रिलिज झाला. तो सपशेल आपटला. त्याच्या ट्रेलरला दर्शकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, परंतु तिकिटबारीवर ‘धाकड’ चालला नाही. त्याने आपले नशीब ओटीटीवर आजमावून पाहिले. त्याने ‘द फायनल कॉल’मध्ये पदार्पण केले. पण ही मालिका फार काळ चालली नाही.

सोनम परब

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या