22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeविशेषअस्तित्वाची लढाई

अस्तित्वाची लढाई

एकमत ऑनलाईन

देशातील सर्वांत श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता तोंडावर आली आहे. या निवडणुकीत १५० च्या वर जागा जिंकण्याचा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या वतीने बोलून दाखवला आहे. आजपर्यंत मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता होती आणि आजही आहे. पण आता शिवसेना दोन गटांत विभागली गेली आहे. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीबरोबर जायचे ठरवले आहे तर एकनाथ शिंदे भाजपबरोबर आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची आणि शिवसेनाप्रमुख म्हणून अस्तित्वाची लढाई आहे. मुंबई स्वत:कडे राखू शकले तर शिवसेनेवरील त्यांचे वर्चस्व अधिक भक्कम होईल.

मुंबई महानगरपालिकेत पूर्ण बहुमत मिळवण्याचा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या मुंबई दौ-यात बोलून दाखवला. भाजपच्या महापालिकेत १५० हून अधिक जागा निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. २०१७ मध्ये पहिल्यांदा भाजपकडून शिवसेनेला हादरा बसला होता. पण तरीही शिवसेना त्याही वेळी आपले वर्चस्व राखू शकली. यावेळी शिवसेनेची स्थिती अत्यंत नाजूक आहे. एक तर या पक्षाचे विभाजन झाले आहे. अर्थात हे विभाजन अधिकृत नसले तरी शिवसेनेत आता दोन गट आहेत आणि या दोन्ही गटांमधून विस्तवही जात नाही अशी स्थिती आहे. त्यातूनही उद्धव ठाकरे यांचा गट आहे महाविकास आघाडीबरोबर आणि एकनाथ शिंदे आणि त्यांचे साथीदार भाजपबरोबर आहेत. शिवसेनेत झालेल्या या विभाजनाचा फटका महापालिका निवडणुकीत त्या पक्षाला बसण्याची शक्यता आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मतदार शिवसेनेतील कोणत्या गटाकडे झुकते माप टाकतात यावर बरेच काही अवलंबून आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंड झाल्यावर बहुसंख्य आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे यांच्याकडे गेले. त्यात मुंबईचे दोन म्हणजे मंगेश कुडाळकर (कुर्ला) आणि सदा सरवणकर (माहीम) हे आमदार आहेत. बाकीचे सगळे आमदार हे राज्यातील अन्य भागांतील आहेत. त्यामुळे मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या गटाची ताकद उद्धव ठाकरे गटापेक्षा जास्त आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या गटाला अजूनही पाठबळ आहे आणि त्याचे प्रतिबिंब मुंबई महापालिका निवडणुकीत दिसून येईल असे ठाकरे गटाला वाटत आहे.

पण हे वाटते तितके सोपे नाही. कारण भाजपची ताकद वाढली आहे. २०१७ च्या निवडणुकीत मुंबई महापालिकेत शिवसेनेचे ८४ तर भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले. म्हणजे शिवसेनेला जबरदस्त टक्कर देण्याचे सामर्थ्य आता भाजपकडे आहे. थोडक्यात आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेकडून सत्ता खेचून घ्यायची महत्त्वाकांक्षा जर भाजपने बाळगली तर त्यात चुकीचे काहीच नाही. एकनाथ शिंदे गटाकडे मुंबईवर वर्चस्व गाजवण्याचे बळ आत्ता नसले तरी भाजपच्या मदतीने हा गट आपला राजकीय पाया आणखी भक्कम करण्याच्या मन:स्थितीत आहे. यावेळी दहिहंडी आणि सार्वजनिक गणेशोत्सवावर राज्य सरकारची मेहेरनजर असण्यामागे हेच कारण आहे. हिंदुत्वाबरोबरच मराठी माणूस हा शिवसेनेच्या राजकारणाचा मुख्य आधार आहे. हा आधारच काढून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. म्हणूनच स्थानिक पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू असताना राज्य आणि केंद्र पातळीवरही जोरदार समर्थन देऊन आपली ताकद भाजप दाखवत आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न करणार हे तर उघडच आहे. पण लोकांचे लक्ष आहे ते उद्धव गटाकडे. कारण बाकी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे पारडे जड असले तरी मुंबईत अजूनही ठाकरे कुटुंबियांबाबत जिव्हाळा आणि सहानुभूती आहे. कोविड काळात उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील परिस्थिती उत्तमपणे सांभाळली. तेही मुंबईकर विसरलेले नाहीत. शिवाय मुंबईत मराठी माणूस आणि मराठी भाषा टिकवण्यात ठाकरे कुटुंबियांचे योगदान मुंबईकर विसरलेले नाहीत. याचा फायदा उद्धव ठाकरे यांना होईल यात शंका नाही. पण सध्या ते एकटे आहेत. त्यांचे खंदे शिलेदार त्यांना सोडून गेले आहेत. निवडणुकीच्या राजकारणातील डावपेच आणि रणनीती आखण्यासाठी त्यांना योग्य सल्लागारांची मदत लागणार आहे. मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी त्यांना महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन सहकारी पक्षांचा फारसा उपयोग होणार नाही. उलट भाजपकडे शिवसेनेच्या फुटीर गटाचे उत्साही कार्यकर्ते आहेत आणि भाजपची स्वत:चीही मोठी यंत्रणा आहे.

मुंबईचे प्रश्न सोडवण्याचे सामर्थ्य मुंबई महापालिकेत नाही. पण देशातील सर्वांत श्रीमंत महापालिका ज्या पक्षाकडे असेल त्या पक्षाचे राज्यात आणि देशातही वजन वाढणार यात शंका नाही. यावेळी शिवसेनेला मतांच्या विभाजनाचा जबरदस्त फटका बसेल. त्यातूनही उद्धव ठाकरे आपल्या गटातील नगरसेवकांना बहुसंख्येने निवडून आणू शकले तर तो मोठा चमत्कार म्हणावा लागेल. इतकेच नाही तर एकनाथ शिंदे यांचे बंड तकलादू ठरेल आणि ठाकरे यांना सोडून गेलेले आमदार, कार्यकर्ते पुन्हा त्यांच्याकडे येतील. पण हे घडण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मूळ धोरण आणि भूमिका तितक्याच ठामपणे आणि खंबीरपणे स्वीकारायला हवी आणि मांडायलाही हवी. निव्वळ बंडखोरांवर शेरेबाजी करून हाती काहीही लागणार नाही. उलट आहे ती सहानुभूती ते गमावून बसतील. २०१९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाताना त्यांनी भाजपने विश्वासघात केला असा कांगावा केला होता. त्यावेळी अमित शहा काही बोलले नव्हते. पण नंतर आणि आताही त्यावर ते सविस्तर बोलतात. आपण कोणतेही आश्वासन शिवसेनेला दिले नव्हते आणि बंद खोलीत आम्ही राजकीय चर्चा करत नाही, शिवसेनेनेच आम्हाला धोका दिला असा टीकेचा भडिमार करत त्यांनी मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना १५० जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला.

विभागलेली शिवसेना आणि मुंबईत अजिबात वाव नसलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष यांच्यासमोर पूर्णपणे एकजुटीने भाजप उभा आहे. त्याला एकनाथ शिंदे गटाची मदत असणार आहे. अर्थात काँग्रेसची ताकद कमी झाली असली तरी काँग्रेसचा असा पारंपरिक मतदार आहे. त्याचा फायदा शिवसेनेला होईल. पण शिवसेना या निवडणुकीसाठी सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करेल असे बोलले जात आहे. काँग्रेस मात्र स्वबळावर निवडणूक लढवू इच्छित आहे. मुंबईतील मराठी माणूस या मुद्यावर भाजपला पराभूत करता येईल असे शिवसेनेला वाटत आहे. पण आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मुंबई महापालिकेची येऊ घातलेली निवडणूक ही कमालीची अटीतटीची होणार हे स्पष्ट दिसत आहे. उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेतील सत्ता राखू शकले तर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवसेना जोरदारपणे मुसंडी मारेल. पण शिवसेनेने केलेल्या विश्वासघातामुळे दुखावलेला भाजप शिवसेनेला जोरदार टक्कर देईल, हेही तितकेच खरे आहे. भाजप शिवसेनेची मुंबईतील सत्ता हिसकावून घेणार का यापेक्षा शिवसेना मुंबईतील आपली सत्ता कशी राखते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

– विदुला देशपांडे,
ज्येष्ठ पत्रकार

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या