23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeविशेषएकटेपणाचा उत्सव... गर्दी जमवून!

एकटेपणाचा उत्सव… गर्दी जमवून!

एकमत ऑनलाईन

गुजरातच्या वडोदरा येथील चोवीस वर्षांच्या क्षमा बिंदू या मुलीने एकल विवाह म्हणजेच ‘सोलोगॅमी’ करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे ती बरीच चर्चेत आली आहे. जपानमधील महिला सध्या मोठ्या संख्येने एकल विवाह म्हणजेच ‘सोलोगॅमी’चा स्वीकार करीत आहेत. आपल्या ज्या कुटुंबव्यवस्थेचे गोडवे जगभर गायिले जातात, तिचे पुनरावलोकन करण्याची वेळ या निमित्ताने आली आहे. याखेरीज सांस्कृतिक अभिसरणाच्या नावाखाली जो ‘सांस्कृतिक संकर’ आपल्याकडे व्यापारी मार्गाने आला, त्यामुळे झालेल्या बदलांवर साधकबाधक चर्चा करण्याची वेळही येऊन ठेपली आहे.

ज्यावर खरोखर प्रेम करावे, अशा असंख्य गोष्टींची यादी कुसुमाग्रजांनी आपल्याला ‘प्रेम कुणावरही करावे’ या कवितेतून दिली असली तरी आपल्याकडे प्रेम ही मुलाने मुलीवर आणि मुलीने मुलावर करण्याची गोष्ट ठरली. कालांतराने मुले मुलांवर आणि मुली मुलींवर प्रेम करू लागली. प्रत्येकाला प्रेम करायचा अधिकार आहे, मग तो नैसर्गिकरीत्या इतरांपेक्षा वेगळा असला तरी चालेल, असे त्यामागचे तत्त्वज्ञान आहे आणि ते पटण्याजोगेही आहे. यातूनच समलैंगिक विवाह होऊ लागले आणि प्रदीर्घ संघर्षानंतर संबंधितांनी आपल्या हक्कावर कायद्याने शिक्कामोर्तबही करून घेतले. विवाह भिन्नलिंगी व्यक्तींमध्येच झाला पाहिजे, असे काही बंधन आता उरले नाही. तथापि, लग्नासाठी किमान दोन व्यक्ती असणे आवश्यक आहे, असे सामान्य माणूस अजून तरी मानतो.

या पार्श्वभूमीवर, गुजरातच्या वडोदरा येथील चोवीस वर्षांच्या क्षमा बिंदू या मुलीने एकल विवाह म्हणजेच ‘सोलोगॅमी’ करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे ती बरीच चर्चेत आली आहे. ‘सोलोगॅमी’ म्हणजे स्वत:च स्वत:शी लग्न करणे. वस्तुत: ज्यांना कुणाशीच लग्न करायचे नाही, अशांसाठी अविवाहित राहणे हा एकच पर्याय यापूर्वी होता. परंतु असे झाल्यास विवाहसोहळा अनुभवता येत नाही, म्हणून सर्वांना निमंत्रणे पाठवून वाजत-गाजत स्वत:शी लग्न करण्याचा दुसरा अर्थ असा होतो की, ‘मी अविवाहित राहणार आहे’, असे वाजत-गाजत समाजाला सांगणे. अविवाहित राहणा-यांना पूर्वी ही सोय उपलब्ध नव्हती. क्षमा बिंदूच्या प्रस्तावित ‘सोलोगॅमी’मुळे देशभरात चर्चा सुरू आहे. यापूर्वीही समलैंगिक विवाहासारख्या विषयावरून उलटसुलट मते व्यक्त केली गेली. त्याचे कारण म्हणजे आपल्या समाजात लग्नाला दिले गेलेले पावित्र्याचे कोंदण.

याखेरीज लग्न ही एक ‘सामाजिक संस्था’ मानली गेली आहे. लग्नाला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पैलूही आहेत. लग्नाची आवश्यकता अनेक कारणांमुळे असते आणि त्याला सामाजिक स्थायित्व प्रदान करून कुटुंब नावाची संस्था उभी करणारी घटना म्हणून लग्नाकडे पाहिले जाते. हे सर्व नाकारणारी व्यक्ती अविवाहित राहते. ‘सोलोगॅमी’मध्ये अविवाहित राहण्याच्या निर्णयाला सामाजिक मान्यता मिळवून देणे, एवढेच महत्त्व आहे. लग्नसंस्था नाकारण्यासाठी असा स्व-विवाह केला जाऊ शकतो, तसेच स्वत:वरील प्रेम व्यक्त करण्यासाठीही! जगभरात जेवढे ‘सोलोगॅमी’ विवाह झाले आहेत, त्यामागे स्वत:वरील प्रेम व्यक्त करणे हाच मूळ धागा राहिल्याचे दिसते. काळाबरोबर परंपरांमध्ये बदल होणे स्वाभाविक असते. परिणामी, अनेकांनी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’सुद्धा कालांतराने स्वीकारली. याखेरीज ‘सिंगल पॅरेन्टिंग’ म्हणजेच एकल पालकत्वही स्वीकारले. हे प्रकार आपल्या सांस्कृतिक अनुबंधाशी मिळतेजुळते नसले तरी हळूहळू त्यांना स्वीकारार्हता मिळाली. लग्न ही संस्था ज्या कारणांमुळे उभी केली होती, त्या कारणांना क्रमश: दिलेला हा नकार होता. हा नकारही वेगवेगळ्या कारणांनी दिला गेला. समाजाबरोबरच निसर्गाच्या नियमांचाही भंग करणारे अनेक घटक स्वीकारले गेले. एवढेच नव्हे तर समलैंगिकतेच्या बाबतीत तर ‘तोही एक निसर्गच आहे,’ हेही मान्य केले गेले आणि सांस्कृतिक कारणांसाठी होत असलेल्या विरोधाची धार हळूहळू बोथट झाली.

जपानमधील महिला सध्या मोठ्या संख्येने एकल विवाह म्हणजेच ‘सोलोगॅमी’चा स्वीकार करीत आहेत. स्त्रीमुक्तीच्या कोनातून पाहिले असता, स्त्रीवर नियंत्रण राखणा-या सर्व सामाजिक निकषांना नकार देण्याचा हा एक मार्ग असल्याचे सकृतदर्शनी दिसते. तथापि, स्वत:वरील प्रेम व्यक्त करणे, हा जो हेतू सांगितला जातो, त्याबाबत मतभिन्नता होऊ शकतात. कारण सर्वांचेच स्वत:वर प्रेम असते. एवढेच नव्हे तर सर्वांत आधी आणि सर्वांत शेवटी माणसाचे प्रेम स्वत:वरच असते. ते व्यक्त कसे होते, हा प्रश्न महत्त्वाचा! एक व्यक्ती दुस-या व्यक्तीवर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करत असती, तर या जगात संघर्षाच्या घटना कितीतरी कमी झाल्या असत्या. स्वत:वरच्या प्रेमाकडे ‘सेल्फ रिस्पेक्ट’ म्हणून पाहता येते आणि ‘इगो’ म्हणूनही पाहता येते. या दोहोंमध्ये फरक असला तरी दोघांमधील सीमारेषा अत्यंत धूसर असते. आपण विनम्र आहोत, असे ज्या क्षणी आपल्याला वाटते, त्याच क्षणी आपण उद्धट झालेले असतो, असे सांगणारी एक इंग्रजी म्हण आहे आणि ती येथे चपखल लागू पडते. विवाहित स्त्री-पुरुषांचे स्वत:वर प्रेम असते म्हणूनच भांड्याला भांडे लागते आणि प्रसंगी घटस्फोटही होतात. मग ‘सोलोगॅमी’ करून स्वत:वरील प्रेम व्यक्त करण्याला काय अर्थ उरतो? जो काही उरतो, तो ‘सेल्फी’ घेऊन तिच्यावर लाइक्स मिळवण्याइतकाच क्षणभंगुर!

सर्व प्रकारचे अभिनिवेश बाजूला ठेवून आपण कुटुंब या संस्थेकडे पाहिले तरी आपल्याला त्याची गरज कळून चुकते. ही संस्था पाश्चात्त्य देशांमध्ये टिकू शकली नाही, याचा त्या मंडळींना अभिमान बिलकूल वाटत नाही. वाटतो तो फक्त खेद! म्हणूनच, लग्न ही केवळ प्रजननासाठी निर्माण केलेली संस्था उरत नाही. ती एक व्यापक संस्था बनते. एकमेकांचा एकमेकांना आधार असणे, एकमेकांना सल्ले देणे, प्रोत्साहन देणे, शिक्षण-प्रशिक्षण देणे, साथ देणे, सांत्वन करणे, सुख-दु:खाची, यशापयशाची देवाणघेवाण करणे अशा असंख्य गोष्टी आहेत, ज्या प्रजननाच्या उद्देशापेक्षा कितीतरी लांब आहेत. कुटुंबाची स्थापना कोणत्याही प्रकारे केली, तरी या गोष्टी घडून येतात. त्यात दोष असणे स्वाभाविक आहे. परंतु ते तर प्रत्येक प्रकारच्या एकत्र येण्यात आहेत. अशा पार्श्वभूमीवर, एकत्र यायचेच नाही, जाणीवपूर्वक एकटेच राहायचे, शिवाय लोक गोळा करून त्या एकाकीपणाचा सोहळा करायचा, हे सगळे पालथ्या घड्यावर पाणीच नव्हे का? स्वत:वर कितीही प्रेम असले, तरी जगात किती गोष्टी एकट्याने शक्य असतात? एकटेपणाचा उत्सव साजरा करायलाही गर्दीच लागते ना? कोणत्याही कारणाने जेव्हा एकट्याने निभेनासे होते, तेव्हा गडगंज श्रीमंतीही कामाला येत नाही, हा जगाचा अनुभव आहे.

इथे काही महत्त्वाचे प्रश्न उभे राहतात. पहिला म्हणजे, एकटे राहून स्वत:वरील प्रेम व्यक्त करता येते का? दुसरे असे की, इतरांना प्रेम वाटले तर ते संपते का? आनंद आणि प्रेम वाटल्याने वाढते, असे जे आपल्याला सांगितले गेले ते चुकीचे होते का? तिसरा प्रश्न असा की, इतरांनी आपल्यावर प्रेम करू नये, असे कुणाला वाटते का? एखाद्याने तसे सांगितले तरी ते खरे असते का? हे असे प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे प्रामाणिकपणे आपण स्वत:च स्वत:ला देऊ शकतो. जर हा प्रामाणिकपणा आपण इतरांसमोर दाखवला तर ती उत्तरे अधिक पक्की होतात. या पार्श्वभूमीवर, अशा प्रकारचे लग्न करावेसे का वाटते? त्याने नेमके काय साध्य होणार? त्याची आवश्यकता खरोखर आहे का? ‘एकाकी’ हा शब्द केवळ लग्नापुरताच मर्यादित राहणार की आयुष्याला चिकटून राहणार? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याचबरोबर जोडीदारावरील विश्वासाला तडे जात असल्यामुळे तर असे काही घडत नाही ना, याची प्रामाणिकपणे चिकित्सा करणे समाज म्हणून आपले सर्वांचे कर्तव्य ठरते.
एकाकी विवाह हा स्त्रियांच्या स्वावलंबी आणि सशक्त मानसिकतेचा हुंकार मानला जाऊ शकतो. दुसरीकडे लग्नात जोडीदारच नसणे ही बाब आपल्या सामाजिक संरचनेला मोठे धक्के बसत असल्याचे संकेत देणारी आहे. भारतीय समाजव्यवस्थेत पत्नीला ‘अर्धांगिनी’ म्हटले गेल्यामुळे तिची भूमिका आपोआपच गौण ठरते. परंतु पती-पत्नी ही रथाची दोन चाके आहेत, असेही आपल्याकडे मानले जाते.

अशा वेळी हा ‘एकचाकी रथ’ केवळ लक्ष वेधून घेणारा नव्हे तर असंख्य सवाल उपस्थित करणारा ठरतो. आपल्या परिचितांच्या बाबतीत घडलेल्या काही कटू घटना तर असा निर्णय घेण्यास कारणीभूत ठरत नाहीत ना, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. लग्नाला आपण ‘बंधन’ मानतो; पण हे बंधन दोघांसाठीही लागू असायला हवे, ही पहिली अट आणि हे बंधन प्रीतीचे असावे, जुलमाचा रामराम नसावा, ही दुसरी अट! मुलींनी ‘वेडिंग सूट’ परिधान करून एकटीचेच ‘प्रीवेडिंग शूटिंग’ करून ते सोशल मीडियावर टाकायचे, हे ‘बंधन’ या शब्दाला दिले गेलेले खुले आव्हान आहे. तात्पर्य, एकीकडे स्वत:शीच लग्न करणे हे अत्यंत निरर्थक आहे तर दुसरीकडे त्याला अनेक अर्थ आहेत. ‘बंधन’ या शब्दावर विश्वास नसलेले स्त्री-पुरुष अविवाहित राहून स्वत:ची या बंधनातून मुक्तता करून घेत होते. आज वाजतगाजत ही गोष्ट सांगितली जात आहे. आपल्या ज्या कुटुंबव्यवस्थेचे गोडवे जगभर गायिले जातात, तिचे पुनरावलोकन करण्याची वेळ या निमित्ताने आली आहे. याखेरीज सांस्कृतिक अभिसरणाच्या नावाखाली जो ‘सांस्कृतिक संकर’ आपल्याकडे व्यापारी मार्गाने आला, त्यामुळे झालेल्या बदलांवर साधकबाधक चर्चा करण्याची वेळही येऊन ठेपली आहे.

-राजीव मुळ्ये,
ज्येष्ठ पत्रकार

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या