23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeविशेषमनोरंजनाचा ‘डबल डोस’

मनोरंजनाचा ‘डबल डोस’

एकमत ऑनलाईन

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकारांनी रुपेरी पडद्यावर दुहेरी भूमिका म्हणजेच डबल रोल साकारले. वास्तविक हे काम अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक होते. कारण यामध्ये दोन्हीही व्यक्तिरेखा तितक्याच ताकदीने प्रेक्षकांसमोर येणे गरजेचे असते. तसेच दोन्हीही व्यक्तिरेखा काही वेळा भिन्न धाटणीच्या असतात. त्यामुळे हावभाव, संवादफेक, लकबी, पोशाख, शारीरिक हालचाली या सर्वांमध्ये वेगळेपण असणारी ही पात्रे साकारणे ही बाब सोपी नसते. पण केवळ नायकांनीच नव्हे तर नायिकांनीही ही किमया अत्यंत सक्षमपणाने साधली आणि प्रेक्षकांचीही त्याला भरभरून दाद मिळाली. बॉलिवूडमधील या ‘डबल धमाक्या’विषयी…

बॉलिवूडमध्ये प्रारंभीपासूनच दुहेरी
भूमिका असलेल्या चित्रपटांची चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या इतिहासात तब्बल आठ दशकांपासून डबल रोल असलेले चित्रपट झळकलेले आहेत. दुहेरी भूमिकेतून अभिनेता किंवा अभिनेत्रीला आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळते. प्रेक्षकांचेही भरपूर मनोरंजन होते. दिलीपकुमार यांचा ‘राम और श्याम’, हेमामालिनी यांचा ‘सीता और गीता’, अमिताभ आणि गोविंदा यांचा ‘बडे मियाँ, छोटे मियाँ’ आणि श्रीदेवीचा ‘चालबाज’ या काही प्रमुख चित्रपटांचा उल्लेख करता येईल.
आगा जानी काश्मिरी लिखित चित्रपट ‘किस्मत’ (१९४३) हा बॉलिवूडच्या इतिहासात अनेक अर्थाने मैलाचा दगड ठरला. ज्ञान मुखर्जी दिग्दर्शित चित्रपटात अशोककुमार यांनी दुहेरी भूमिका साकारली. तसेच मुमताज शांती, शाह नवाज आणि मेहमूद यांचीही प्रमुख भूमिका होती. दुहेरी भूमिका असलेला हा पहिला भारतीय ब्लॉकबस्टर चित्रपट होता.

‘राम और श्याम’पासून प्रेरणा : बॉलिवूड-पटातील दुहेरी भूमिकेचा संंदर्भ पाहिल्यास दिलीप कुमार यांचा ‘राम और श्याम’(१९६७) हा चित्रपट दुहेरी भूमिका असलेल्या चित्रपटांचा मापदंड मानला जातो. या चित्रपटात एक भूमिका घाबरट असलेल्या व्यक्तीची आहे तर दुसरी व्यक्तिरेखा ही धाडसी आणि धडाकेबाज व्यक्तीची. या दोन्ही व्यक्तिरेखांना दिलीपकुमार यांनी अतिशय लीलया साकारले. दिलीपकुमार यांनी राम आणि श्याम या दोन वेगळ्या व्यक्तिरेखा असल्याचे आपल्या बहारदार अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर ठसविले. राम आला की श्याम हे सांगण्याची गरज भासत नव्हती. अर्थात बहुतांश दुहेरी भूमिकेतील फरक जाणवण्यासाठी एकाला मिशा तर दुस-याला मिशा नसलेली व्यक्तिरेखा म्हणून समोर आणले गेले. याच चित्रपटाची प्रेरणा घेऊन पुढे हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट झळकले आणि गाजले देखील. फरक एवढाच की पुरुषाऐवजी महिलेला भूमिका देण्यात आली. उदा. रमेश सिप्पी यांचा चित्रपट ‘सीता और गीता (१९७२) यात हेमामालिनी यांनी लहानपणीच विभक्त झालेल्या बहिणींची भूमिका साकारली. सीता ही कमकुवत असते तर गीता ही मारधाड करण्यात पटाईत असते. याच चित्रपटापासून प्रेरणा घेत श्रीदेवीने ‘चालबाज’ (१९८९) मध्ये ताटातूट झालेल्या बहिणींची भूमिका साकारली.

कथा असते रंजक
बॉलिवूडपटात डबल रोलचा प्रमुख आधार असतो जुळे भाऊ-बहीण. ही भावंडं कोणत्या ना कोणत्या कारणामुळे एकमेकांपासून दूर जातात आणि शेवटी एकत्र येतात. नाट्यमयरीत्या दोघांचे व्यक्तिमत्त्व वेगळे असते. उदा. एखादे पात्र पोलिस अधिकारी असेल तर दुसरा चोर. परंतु कधी कधी दुहेरी भूमिकेचा अर्थ हा एकच कलाकार साकारत असलेल्या दोन भूमिका असाही असतो. जसे वडील-मुलगा किंवा आई-मुलगी. डबल रोलमुळे चित्रपटात काही वेळा विनोदाचे प्रसंगही येतात आणि त्यास प्रेक्षकही मनमुरादपणे दाद देतात. प्रत्येक कलाकाराची पसंती : बॉलिवूडमध्ये काम करणा-या प्रत्येक नायक आणि नायिकेला एक तरी चित्रपट दुहेरी भूमिकेचा असावा, अशी इच्छा असते. डबल रोल करून तो आपल्या अभिनयाला ‘चार चाँद’ लावू इच्छित असतो. या चित्रपटांतून कलाकार आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवितात. कारण तो संपूर्ण चित्रपटात छाप पाडतो.

एकाच कलाकाराकडून एकाच चित्रपटात विविध आणि विरुद्ध भूमिका साकारण्याच्या संदर्भात आघाडीच्या पाच चित्रपटांची निवड करायची झाल्यास पहिल्या क्रमांकावर ‘राम और श्याम’ या चित्रपटाची निवड करावी लागेल. त्यानंतर गुलजार यांचा ‘मौसम’ (१९७५). यात शर्मिला टागोरने आई चंदा थापा आणि मुलगी कजलीची भूमिका साकारली. २३ व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘मौसम’ चित्रपटाला रौप्य कमळाने गौरविण्यात आले. तिस-या स्थानावर ‘अनहोनी’ (१९५२) चा उल्लेख करता येईल. यात नर्गिस या रूपा आणि मोहिनी यांच्या भूमिकेत दिसल्या. अमिताभ बच्चन यांचा ‘डॉन’ (१९७८) ला चौथे स्थान देता येईल. त्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि साधा पान खाणारा स्ट्रिट सिंगर अशा दोन भूमिका होत्या. अर्थात शाहरूख खानचा ‘फॅन’ (२०१६) ने फार छाप पाडली नाही. पण सुपरस्टार आणि फॅन या दोन भूमिका शाहरूख खानने दमदार रीतीने साकारल्या. म्हणून या चित्रपटाला पाचवे स्थान देता येईल.

डबल रोलच्या क्लासिक मूव्ही
डबल रोलचे अनेक चित्रपट हिट झाले आहेत, जसे की जुडवाँ (१९९७), धूम-३ (२०१३) यांचा उल्लेख करता येईल, तर हमशक्ल (२०१४) सारखा चित्रपट तिकिटबारीवर अपयशी ठरला. काही क्लासिक कॉमेडीपटांचा देखील उल्लेख करता येईल. गुलजार यांचा ‘अंगूर’ (१९८२). यामध्ये संजीव कुमार आणि देवेन वर्मा हे दोघेही दुहेरी भूमिकेत होते. मेहमूद यांचा हमजोली (१९७०) हा चित्रपट कोण विसरेल. तसेच ‘नया दिन, नई रात’मध्ये संजीवकुमार यांनी नऊ प्रकारच्या भूमिका करून सर्वांना धक्का दिला. अमोल पालेकर यांचा ‘गोलमाल’ हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिजात चित्रपट म्हणून ओळखला जातो. अमोल पालेकर यांच्या ‘गोलमाल’ची अनेक निर्मात्यांनी कॉपी केली, परंतु त्याची सर कोणालाच आली नाही. आजही डबल रोल भूमिका असलेल्या चित्रपटांची क्रेझ कमी झालेली नाही. म्हणूनच डबल रोलचे चित्रपट पडद्यावर येत आहेत आणि पुढेही येत राहतील.

– सोनम परब

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या