31 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home विशेष भारतीय संस्कृतीतील एक सण : मकरसंक्रांत !

भारतीय संस्कृतीतील एक सण : मकरसंक्रांत !

एकमत ऑनलाईन

मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेतीशी संबंधित सण आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगड्यात भरून त्या देवाला अर्पण करतात. बायका उखाणे घेतात. हा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो.संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते अशी समजूत प्रचलित आहे. कधी तिचे वाहन हत्ती, कधी गाढव तर कधी डुक्कर असते. आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होताना अतिशय उत्साह, आनंद, एकमेकांना मान-सन्मान देण्याची पध्दत, रूढी-परंपरा यांना फार महत्त्व दिल्याचे आपण पाहतो. या परंपरा सुरू झाल्या त्यामागे देखील पूर्वजांचा एक चांगला हेतू असल्याचे लक्षात येते. मकरसंक्रांत सणापूर्वी वातावरणात कमालीचा गारठा असतो.

प्रत्येक सजिवाला या थंडीची हुडहुडी गारेगार करून सोडते. कधी एकदा सूर्य तापतो आणि ही थंडी कमी होते असे प्रत्येकाला वाटते. आणि हा सूर्यदेव तापायलाच तयार नसतो! तो तयार होतो ते मकर संक्रांतीला. संक्रांत भारताच्या विविध राज्यांत विविध नावांनी आणि विविध पद्धतींनी साजरी केली जाते जसे मकरसंक्रांत (महाराष्ट्र), पोंगल (तामिळनाडू), उत्तरायण (गुजरात व राजस्थान), लोहढी (पंजाब), माघमेला (ओडिशा), भोगाली बिहु (आसाम)… संक्रांती (कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, बिहार) अशी विविध नावं या सणाला आहेत. प्रत्येक धर्म आपापल्या प्रथांप्रमाणे या दिवसाला साजरा करत असले तरी देखील आनंद, उत्साह, जल्लोष हा सगळीकडे असतोच असतो. मकरसंक्रांत या सणाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम १४ जानेवारीलाच येतो (कधीतरी हा सण १३ जानेवारी किंवा १५ जानेवारीला आल्याचे आपण पाहतो पण ही अपवादात्मक स्थिती सोडल्यास हा उत्सव नेहमी १४ जानेवारीला येतो) पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव सर्वत्र संपन्न करण्याची परंपरा आहे. हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा सण असून शेतीशी देखील संबंधित आहे.

मकरसंक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. सूर्याची तीव्रता दाहकतेत बदलत पुढेपुढे सरकायला लागते आणि साधारण १० ते १५ दिवसांच्या अंतराने रथसप्तमी असते (मकरसंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत अनेक सुवासिनी हळदीकुंकवाचे आयोजन करतात.) असे म्हणतात की या रथसप्तमीपासून सूर्याच्या रथाला घोडे लागतात आणि सूर्यदेव चांगलेच मनावर घेतल्याप्रमाणे आग ओकायला (तापायला) सुरुवात करतात. मकरसंक्रांतीला सुवासिनी एकमेकींना सुगड्याचे वाण देतात. या वाणात हरभरे, मटार, बोरं, ऊस, गहू, तीळ, नाणे, असल्याचे आपण पाहतो. (हरभरे, मटार, बोरं, गव्हाच्या ओंब्या या दिवसांमध्येच विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वाणात त्याचा समावेश आपल्याला पहायला मिळतो.) ऊस, हरभरे, बोरं, गव्हाच्या ओंब्या, तीळ सुगड्यात भरून हे वाण महिला ज्यापध्दतीने एकमेकींना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सवाष्ण स्त्रिया आजच्या दिवशी हे वाण देण्याकरता गर्दी करताना दिसून येतात. मकरसंक्रांतीला काळे कपडे घालण्याची, एकमेकांना देण्याची देखील प्रथा आहे. ‘तीळगूळ घ्या आणि गोडगोड बोला’’असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते!

८३ तेजस विमानांच्या खरेदीला हिरवा कंदील

तीळ आणि गूळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या मोसमात आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तीळगूळ पूर्ण करते आणि याच मुख्य कारणामुळे मकरसंक्रांतीला तीळगूळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी. नवे लग्न झालेल्या नववधूचे हळदीकुंकू या दिवसांमध्ये पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात हौसेने करताना आपण पाहतो. याकरता तिच्यासाठी काळी साडी, हलव्याचे दागिने (नव्या नवरदेवाला देखील हलव्याचे दागिने घालतात), विविध आभूषणं घालून तिला सजविले जाते. कोणताही सण आपल्याला आनंद, उत्साह, नवचैतन्य देण्याकरताच येत असतो. रोजच्या दैनंदिन आयुष्यातल्या घडामोडींपासून चार क्षण निवांत काढून आपण देखील हा सण अंगिकारतो व त्यात रममाण होतो, भेटीगाठी होतात आणि या सण-उत्सवापासून मिळालेली ऊर्जा पुढे कित्येक दिवस आपल्याला रोजच्या दिनक्रमात जगण्याकरता उपयोगाला येते! आणि म्हणून आपण प्रत्येक सण उत्साहाने, आनंदाने जगावयास हवा तरच आपल्या जीवनामध्ये उत्कर्षाची पहाट उजाडेल!

राजू जाधव
मांगूर, जि. बेळगाव

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,414FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या