22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeविशेषसेबीकडून गुंतवणूकदारांना मदतीचा हात

सेबीकडून गुंतवणूकदारांना मदतीचा हात

एकमत ऑनलाईन

सेबीकडून बाजारातील ट्रेंडबाबत नियमित रूपाने ‘रिस्क फॅक्टर डिस्क्लोजर’ जारी करण्याची योजना आखली जात आहे. यात बाजारातील तेजी आणि घसरण या दोन्ही स्थितीतील ट्रेंडचा समावेश राहणार आहे. यामुळे गुंतवणूकदारांना अचूक निर्णय घेण्यास मदत मिळणार आहे. अर्थात ही चर्चा प्राथमिक टप्प्यावर असून त्यानुसार समूहाच्या कलामागे आंधळेपणाने जाण्याच्या प्रवृत्तीपासून गुंतवणूकदारांचा बचाव होईल.

गेल्या काही वर्षांत विशेषत: कोरोनाच्या काळात अशा प्रकारचा ट्रेंड पाहावयास मिळाला. गुंतवणूकदारांनी भीतीपोटी शेअरची विक्री केली आणि लवकरात लवकर श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी मोठी खरेदी केली. यात त्यांना बरेच नुकसान सहन करावे लागले. विशेषत: मोेठ्या संख्येने आलेले आयपीओ आणि वायदेबाजार यात गुंतवणूकदारांना बरेच नुकसान सहन करावे लागले. प्रत्येक वेळी एक वेगळा ट्रेंड पाहावयास मिळाला. जेव्हा शेअर वाढू लागतो, तेव्हा त्याच्या खरेदीसाठी सर्वजण पळतात, पण संकट येताच विक्रीचा सपाटा लावतात.

अर्थात भांडवली बाजारात गुंतवणुकीच्या मूळ उद्देशाला नेहमीच बगल दिली जाते. यामागचे प्रमुख कारण म्हणजे सर्वंकष विचार करण्याची प्रवृत्ती कमी असणे. बाजारातील चढ-उताराचा अभ्यास करण्यासाठी पुरेसे साधन उपलब्ध असून ते सहभागी असणा-या लोकांकडूनच तयार करण्यात आले आहे. या गोष्टी नक्कीच व्यावसायिक हिताच्या आहेत. अशा स्थितीत सेबी स्वत:च बाजारातील तेजीला आणि घसरणीला आपल्या दृष्टिकोनातून मांडत असेल तर ही गोष्ट चांगली राहू शकते. म्हणून सध्याचा काळ पाहता सेबीकडून ट्रेंडबाबत उदाहरणे सांगण्याची वेळ आली आहे. या गोष्टी गुंतवणूकदारांना फायद्याच्या राहू शकतात. सध्याच्या काळात एक वाक्य नेहमीच सांगितले जाते आणि ते खूपच रुळले गेलेले आहे. ‘काही गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीशी संलग्न आहे. या वाक्याचा चोथा झाला असून, त्याकडे फारसे कोणाचे लक्ष जात नाही. पण आता सेबीकडून गुंतवणूकदारांना अचूक आकडे मिळावेत ही अपेक्षा आहे. त्याचवेळी व्यवसायवाढीचा उद्देश बाळगून असलेल्या फंड व्यवस्थापनांकडून अशा प्रकारची आकडेवारी अपेक्षित नाही. एका अर्थाने बाजाराचा स्वभाव आणि जबाबदारी गुंतवणूकदारांना सांगणे हे सेबीचे कर्तव्य आहे. कोणत्या मार्गाने गुंतवणूकदारांना बाजारातील जोखीम सांगायला हवी याबाबतही नियामकाने स्पष्टीकरण करायला हवे. अशा प्रकारच्या सूचना आणि माहिती देऊन गुंतवणूकदारांचे हित साधले जाईल, अशी अपेक्षा सेबीला आहे. अडचणीच्या काळात गुंतवणूकदारांवर अफवा आणि फसव्या बातम्यांचा परिणाम होऊ नये आणि केवळ व्यवहारावर लक्ष केंद्रित करता यावे, नफा किंवा नुकसानीचे आकलन करता यावे आणि अधिक नफा आणि अधिक तोटा असणा-या घटकांची ओळख पटावी यासाठी सेबीकडून काम केले जात आहे.

अलीकडच्या काळात पहिल्यांदाच गुंतवणूक करणा-या लोकांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. डेरेव्हेटिवमध्ये देखील तोटा झाला आहे. यात फायदा आणि नुकसान दोन्हीचा समावेश आहे. बाजार नियामक संस्थांकडे अशा जोखमींची आणि आकडेवारीची उपलब्धता असून ती सार्वजनिक रूपाने मांडलेली नाही. या आकडेवारीचा सखोल अभ्यास केल्यास त्याचे अधिक अचूकरीत्या विश्लेषण करता येईल. या माध्यमातून व्यापक दृष्टिकोन मांडता येईल. पारदर्शकतेतून भूमिका घेऊन जोखमीची आकडेवारी जारी केल्यास निश्चितच गुंतवणूकदारांना मदत मिळू शकते. तूर्त बाजार व्यवस्थापन, पारदर्शकता, बाजारमूल्यांची सर्वांपर्यंत माहिती पोचवणे आणि आर्थिक व्यवहारातील सुलभता याबरोबरच सर्व गुंतवणूकदारांसाठी पोषक वातावरण तयार करणे यावर सेबीचा भर राहिलेला आहे. त्याचवेळी सार्वजनिक रूपातून व्यवसाय करणा-या कंपन्या, बाजारात असलेल्या वित्तीय कंपन्या, शेअर, आर्थिक धोरण आणि भविष्यातील रणनीतीवरून सेबीने जोखीम आणि दिशानिर्देश जारी करणे गरजेचे आहे. अर्थात सेबीने बाजार व्यवस्थापनाच्या निकषांना मजबूत आधार दिला असून लिस्टेड कंपन्यांसाठी आवश्यक असणा-या जोखमीवर काम केले आहे. परंतु गुंतवणूकदारांच्या निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप करू शकत नाही. सेबीकडून व्यवसाय करणा-या कंपन्या आणि संस्थांची अधिकाधिक माहिती गोळा केली जाते. परंतु सेबीने अशा प्रकारची कृती टाळायला हवी. कारण या कृतीमुळे सेबीने जारी केलेले जोखमीचे आकडे हे चुकीचे समजले जाऊ शकतात किंवा त्यांच्या जोखमीबाबत शेरेबाजी केली जाऊ शकते. तसेच जोखमीबाबत शिफारस करणारी संस्था असेही ‘सेबी’ला म्हटले जाऊ शकते.

अशा स्थितीत बाजारातील जोखमींच्या कारणांबाबत मत मांडून स्वत बळीचा बकरा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर प्रत्यक्षात सेबी झुंडप्रवृत्तीला देखील प्रोत्साहन देऊ शकते. एखाद्या विशेष जोखमीबाबत सेबीकडून दिशानिर्देश दिला जात असेल तर किंवा एखादी विशेष संधी साधण्याचे आवाहन केले जात असेल तर लोकांची एकतर्फी पाऊल टाकण्याची वृत्ती आणि ट्रेंड वाढेल. यानिमित्ताने आणखी एक गोष्ट सांगता येईल की, सेबीकडून जोखमीबाबत पारदर्शकतेने दृष्टिकोन आणि भूमिका मांडली जात असली तरी या जोखमीबाबत सकारात्मक असलेले घटक या दृष्टिकोनावर परिणाम करू शकतात. अशा बाबतीत मोठ्या प्रमाणात लॉबिंग पाहावयास मिळेल. उदाहरणादाखल एखाद्या मोठ्या सरकारी कंपनीच्या निर्गुंतवणुकीसाठी सरकारी स्रोतांकडून दबाव येऊ शकतो. सेबीकडून जोखमीबाबत अधिकाधिक आकडे सार्वजनिक केले जात असतील आणि गुंतवणूकदारांना दिशा देण्याचा निर्णय घेत असेल तर तो निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु आकडेवारीचे विश्लेषण करणे आणि त्यांचे संभाव्य धोके स्पष्ट करण्याची जबाबदारी ही गुंतवणूकदारांवरच सोडून द्यायला हवी. यासाठी एक बारीक रेषा ओढावी लागेल. बाजाराचे बारकाईने आणि काटेकोरपणे व्यवस्थापन करू नये, एवढीच अपेक्षा आहे.

– सीए सागर शहा

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या