राहुल गांधी यांना बदनामीकारक वक्तव्यावरून सुरत न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेचे आणि त्यामुळे गेलेल्या त्यांच्या खासदारकीचे कवित्व अद्यापही सुरू आहे. वास्तविक, अलीकडील काळात विविध राजकीय पक्षांमध्ये बेताल वक्तव्य करणा-या वाचाळवीरांच्या जणू टोळ्याच निर्माण झाल्या आहेत. इतिहासात डोकावल्यास अनेक अनुभवी आणि परिपक्व मानल्या जाणा-या नेत्यांनी केवळ आक्षेपार्हच नव्हे तर अश्लील टिप्पण्या केल्याचीही उदाहरणे आहेत. राहुल यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर असे वाचाळवीर धडा घेतात का हे पाहणे रंजक ठरणार आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केलेल्या वक्तव्यावरून दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. परिणामी त्यांची खासदारकी देखील गेली. कधीकाळी काँग्रेसमध्ये राहिलेल्या खुशबू सुंदर या आज भाजपच्या नेत्या असल्या तरी राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केले होते, तेच मत खुशबू यांंच्या ट्विटर हँडलवर वाचता येईल. आज प्रत्येक पक्षात वाचाळवीरांची टोळीच बनली आहे. पक्षात पडलेल्या गटांसाठी आणि गटबाजी करणा-यांसाठी दुधारी शस्त्रासारखा आपला वापर होईल अशा प्रकारे ही मंडळी काम करत असतात. धक्कादायक बाब म्हणजे, अशा वाचाळवीरांना माध्यमांकडून इतकी प्रचंड प्रसिद्धी दिली जाते की, त्याचा परिणाम विविध पक्षांतील अशा प्रकारची प्रवृत्ती बाळगणा-यांमध्ये जणू बेताल बडबड करण्यासाठी उत्साहच संचारतो.
एक वेळ अशी होती की, एखाद्या चॅनलचा माईक पाहून भरभरून बोलले जायचे. हळूहळू त्यातून वाचाळवीरांना बळ मिळत गेले. आता तर अशांची जणू टोळीच बनली आहे. त्यांची उदाहरणे तरी किती सांगायची? एकेकाळी मायावती यांच्या पक्षाने एक घोषणा दिली. ‘तिलक, तराजू आणि तलवार, इनको मारो … चार.’ मायावती यांनी स्वत:ला जिंदादेवीही म्हटले होते. सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना ‘मौत के सौदागर’ म्हटले होते. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे माजी अध्यक्ष मनोज सिन्हा यांनी महात्मा गांधी यांच्याकडे कोणत्याही विद्यापीठाची पदवी नसल्याचा दावा केला. लालू प्रसाद यादव यांनी बिहारमध्ये ‘भूराबाल साफ करो’ अशी मोहीम सुरू केली. भूराबाल म्हणजे भूमिहार, राजपूत, ब्राह्मण आणि लाला. शरद यादव यांनी जून १९९७ मध्ये महिला आरक्षणासंदर्भात अनेक वादग्रस्त विधानं केली. ‘‘या विधेयकाचा केवळ सुडौल स्त्रियांना फायदा होईल’’, असे यादव म्हणाले. त्यांनी वसुंधरा राजे यांची शरीरयष्टी आणि दक्षिणेकडील महिलांच्या सौंदर्याचे वर्णन असे काही केले की त्यामुळे त्यांना तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. ५०कोटींच्या गर्लफ्रेंडचे त्यांचे वक्तव्यदेखील एका निवडणुकीत चर्चेत राहिले.
भाजपचे नेते नरेश अग्रवाल यांनी सपच्या खासदार जया बच्चन यांचा चित्रपटातील नाचणारी असा उल्लेख केला. शरद यादव यांनी देखील भाजपच्या खासदार स्मृती इराणी यांच्यावर अशाच प्रकारची आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तर काँग्रेसचे संजय निरुपम यांनी २०१२ च्या गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर टीव्हीवर आयोजित चर्चासत्रात म्हटले, ‘‘कालपर्यंत आपण पैशासाठी ‘ठुमके’ लावत होता. आज आपण राजकारण शिकवत आहात.’’ २०१२ च्या एका प्रचारसभेत सीपीआयएमचे नेते अनिसर रेहमना यांनी तर पातळी सोडून वक्तव्य केले. ते म्हणाले की, ‘‘आम्ही ममता दीदींना विचारू इच्छित आहोत की, त्यांना किती मोबदला हवा. बलात्कारासाठी किती घ्याल? ’’
काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांविषयी वादग्रस्त विधान करत ‘नीच’ म्हटले होते. हे प्रकरण खूप गाजले. काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी नरेंद्र मोदी यांना मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे म्हटले होते.
दिग्विजय सिंह यांनी ‘मोदीराज’ला ‘राक्षसराज’ आणि मोदी यांना रावण असे म्हटले होते. प्रमोद तिवारी यांनी मोदी यांना हिटलर, मुसोलिनी, गद्दाफी यासारख्या नेत्यांच्या यादीत टाकले होते. एका काँग्रेस नेत्याने तर पंतप्रधानांंना ‘माकड’ असे म्हटले होते. जयराम रमेश यांनी त्यांची तुलना भस्मासुराशी केली. बेनी प्रसाद वर्मा यांनी त्यांना पिसाळलेले कुत्रे आणि गुलाम नबी आझाद यांनी त्यांना गंगू तेली असेही म्हटले. रेणुका चौधरी यांनी त्यांना व्हायरस आणि इम्रान मसूद यांनी मोदी यांचे दोन तुकडे करण्याची भाषा वापरली होती. भाजपचे नेते संगीत सोम यांनी ताजमहालला कलंंक असल्याचे म्हटले होते. गिरीराज सिंह यांनी मुस्लिमांना भगवान श्रीरामाचे अपत्य असल्याचा दावा केला होता. आझम खानने भरसंसदेत भारतमातेला ‘डायन’ बोलण्यापर्यंत मजल मारली होती. अलवर जिल्ह्यातील मालाखेडा येथे एका सभेत योगी आदित्यनाथ यांनी बजरंगबलीला दलित, वनवासी, गिरवासी आणि वंचित असल्याचे म्हटले होते. सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे ओमप्रकाश राजभर यांनी तर अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत.
निषाद पक्षाचे नेते आणि योगी मंत्रिमंडळातील मंत्री संजय निषाद यांनी प्रयागराजमध्ये प्रसारमाध्यमांना सांगितले की, भगवान राम यांचा जन्म राजा दशरथाच्या कुळात झाला नसून निषाद कुटुंबात झाला आहे. जेव्हा राजा दशरथांना संतती नव्हती, तेव्हा त्यांनी शृंगी ऋषींना यज्ञ करायला लावला. शृंगी ऋषींनी दिलेली खीर खाल्ल्याने दशरथाच्या तिन्ही राण्यांना पुत्र झाला असे म्हणतात. खीर खाऊन कोणतीही स्त्री गर्भवती होऊ शकत नाही, हे वास्तव आहे. त्यावेळच्या इतिहासकारांनी सत्य लिहिले नसल्याचा दावा संजय निषाद यांनी केला.
भगवद्गीता म्हणते की, प्रतिष्ठित व्यक्तीची बदनामी मृत्यूपेक्षा वाईट असते. म्हणजेच, मानहानी हे मोठे पाप मानले जाते. कारण प्रतिष्ठा हा कोणाही व्यक्तीच्या गरीमेचा अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळेच अनेक जण अपमानित झाल्यावर वाट्टेल ते करताना दिसतात. याउलट आयुष्यभर रेल्वे, रस्ता, पोलिस स्टेशन, सरकारी कार्यालय आणि इतर ठिकाणी अपमान होऊनही सामान्य लोक निमूटपणाने ते सहन करत राहतात. बदनामीला कायद्याद्वारे संरक्षण देण्याच्या मुद्याचा विचार करता मुळातच भारतासह अनेक देशांतील बदनामीविषयक कायदे मुळात इंग्रजी कायद्यातूनच जन्माला आले आहेत. इंग्लंडमध्येही त्यांचा उगम १२७२ च्या सुमारास एडवर्ड पहिला याच्या काळात झाला असे मानले जाते. कालोघात इंग्लंडने आपल्या कायद्यांमध्ये सातत्याने सुधारणा केल्या आहेत.
२०१३ च्या बदनामी कायद्याद्वारे एक मोठी आणि व्यापक सुधारणा करण्यात आली. २०१३ च्या कायद्याद्वारे, मानहानीचा दावा करण्याचे निकष मजबूत केले गेले आहेत. ज्यामध्ये प्रत्यक्ष किंवा संभाव्य नुकसानीचा पुरावा अनिवार्य करण्यात आला आहे. २०१३ चा कायदा १ जानेवारी २०१४ पासून लागू झाला आहे. परंतु आपल्याकडे बदनामीशी संबंधित आयपीसीची कलमे १८६० पासून अमलात आहेत. या कायद्याच्या आणि कलमांच्या आधारे सदस्यत्व गमावणारे राहुल गांधी हे पहिलेच व्यक्ती आहेत असे नाही. यापूर्वी त्यांची आजी इंदिरा गांधी, आई सोनिया गांधी यांनीही वेगवेगळ्या कारणांमुळे सदस्यत्व गमावले होते. याशिवाय लक्षद्वीपचे केएनसीपीचे खासदार मोहम्मद फैजसा, उत्तर प्रदेशचे आमदार अब्दुल्ला आझम खान, खासदार आझम खान, भाजपचे आमदार कुलदीप सेंगर, हरियाणाचे प्रदीप चौधरी, लालूप्रसाद यादव, रशीद मसूद, जे. जयललिता, जया बच्चन, खासदार जगदीश शर्मा, बिहारचे अनंत सिंह, बिहारचे अनिल कुमार साहनी आणि मुझफ्फरनगरचे भाजप आमदार विक्रम सैनी यांनाही सदस्यत्व गमवावे लागले आहे.
यामध्ये प्रदीप चौधरी आणि मोहम्मद फैजसा यांचे सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले आहे. जवाहरलाल नेहरू यांनी १९५३ मध्ये त्यांचे गृहमंत्री कैलाश नाथ काटजू यांना एक पत्र लिहिले होते. भारताचे भवितव्य मोठ्या प्रमाणात हिंदू दृष्टिकोनाशी जोडलेले आहे. जर सध्याचा हिंदू दृष्टिकोन भौतिकदृष्ट्या बदलला नाही तर मला खात्री आहे की भारताचा विनाश होणार आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले होते. २०१४ पासून, भारताने आपला हिंदू दृष्टिकोन बदलला आहे. म्हणजेच भारताने विनाशाचा मार्ग मागे सोडला आहे. पण काँग्रेस आणि त्यांचे नेते ही बाब समजून घ्यायला, स्वीकारायला आणि पाळायला का तयार नाहीत, हे अनाकलनीय आहे. उत्तर आफ्रिकेतील इतिहासकार आणि समाजशास्त्रज्ञ इब्र खाल्दुन यांना तैमूरने राजवंशांच्या भवितव्याबद्दल विचारण्यात आले होते. तेव्हा खालदुनचे उत्तर होते- राजवंशांचे वैभव आजवर कधीही चार पिढ्यांपेक्षा पुढे गेलेले नाही. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी. आधुनिक समाजशास्त्राचे संस्थापक मानल्या जाणा-या इब्रा खाल्दुन आणि त्यांचे पूर्वज जवाहरलाल नेहरू यांचे शब्द राहुल गांधींनी समजून घ्यायला हवेत.
-योगेश मिश्र,
ज्येष्ठ विश्लेंषक-निरीक्षक, लखनो