34 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home विशेष ‘बर्ड फ्लू’विषयी थोडेसे

‘बर्ड फ्लू’विषयी थोडेसे

एकमत ऑनलाईन

कोरोनापाठोपाठच आता मानवाच्या शारीरिक, सामाजिक आणि आर्थिक आयुष्यावर घोंघावणारे अजून एक संकट बर्ड फ्लूच्या रूपाने आपल्यासमोर उभे ठाकले आहे.

बर्ड फ्लू म्हणजे काय?
‘बर्ड फ्लू’ला एवियन एनफ्लूएन्झा असेही म्हणतात. हा एक विषाणूजन्य आजार आहे. हा आरएनए विषाणू असून तो orthomyxoviridae प्रकारातील आहे. त्याचे ए, बी आणि सी असे तीन प्रकार असतात. त्यापैकी ‘ए’ हा महत्त्वाचा आहे. या विषाणूच्या पृष्ठभागावर आढळणा-या प्रथिनांच्या रचनेनुसार एच आणि एन ची वेगवेगळी संयुगे तयार होऊन त्याचे कारक घटक तयार होतात. बर्ड फ्लूचे ढोबळमानाने हाय पॅथोजनिक (HPAI) आणि लोपॅथोजनिक (LPAI) असे दोन प्रकार पडतात. पाणथळ जागी वावरणारे पक्षी आणि विदेशी स्थलांतरित पक्षी यांच्यामार्फत हा आजार आपल्याकडे थंडीच्या वातावरणात येत असतो. तो नंतर आपल्याकडील वेगवेगळ्या पक्ष्यांमध्ये आढळून येतो. तसेच काही पोल्ट्री फार्ममध्ये त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. परंतु आपल्याकडील कुक्कुटपालन अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने केले जात असल्यामुळे आणि सर्व खबरदारी वेळोवेळी घेतली जात असल्यामुळे भारतातील पोल्ट्री फार्ममध्ये त्याचा जास्त प्रभाव दिसून येत नाही. तसेच आपल्याकडील अन्न शिजवण्याच्या आणि खाण्याच्या पारंपरिक पद्धतीमुळे आपल्याकडे आजपर्यंत हा संसर्ग मानवात आढळून आलेला नाही.

बर्ड फ्लूचा पक्ष्यांना संसर्ग
पाणथळ जागी मुक्तपणे संचार करणा-या पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचे विषाणू निसर्गत: असतात. हे पक्षी दुस-या पक्ष्यांच्या (बदके, बटेर, कोंबड्या, कावळे, इ.)संपर्कात आल्यास त्यांना बाधा होते. मात्र या सर्व प्रवासात विषाणूच्या जनुकात बदल होणे आवश्यक असते. हे बाधित पक्षी पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांच्या संपर्कात आल्यास त्यांनाही बाधा होऊ शकते. या बाधित पक्ष्यांची विष्ठा, खाद्याची भांडी, पाण्याची भांडी, त्यांना हाताळणारे कामगार, पाणी खाद्य यांच्यामार्फत दुस-या चांगल्या पक्ष्यांनाही या आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

बर्ड फ्लूचा माणसाला संसर्ग दोन प्रकारे होऊ शकतो. बाधित पक्षी, त्यांची विष्ठा, त्यांचे वेगवेगळे स्त्राव यांच्याशी नजीकचा संपर्क आल्यास आणि वेगळ्या प्रजातीमध्ये त्याचे जनुकीय बदल होऊन त्यांना संसर्ग झाल्यास (डुक्कर, कुत्रे, घोडे) माणसाला याचा संसर्ग सहजगत्या होत नाही. बाधित, अथवा मृत पक्ष्यांशी घनिष्ठ संपर्क आल्यास आणि त्यामध्ये जनुकीय बदल झाल्यासच हा संसर्ग होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार व्यवस्थित शिजवलेल्या चिकन व अंड्याच्या सेवनातून माणसाला झालेल्या बर्ड फ्लूचा आजतागायत जगात एकही पुरावा नाही. इ.स. २००६ सालापासून भारतातील कोंबड्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग नेहमी होत असला तरी, माणसात आजपर्यंत त्याचा संसर्ग आढळून आला नाही.

इतिहासाच्या पुस्तकात मोघलांचे तथ्यहिन कौतूक

पक्ष्यांमधील लक्षणे :
हा विषाणू श्वसन संस्था आणि पचनसंस्थेमध्ये बिघाड करतो, त्यामुळे नाकातून स्त्राव येणे, शिंकणे, खोकणे, डोळे सुजणे, भूक मंदावणे, शरीरातील पाणी कमी होणे, एका जागी बसून राहणे. समन्वयाचा अभाव असणे ही लक्षणे पक्ष्यांमध्ये दिसून येतात. या आजाराचा खूप वेगाने प्रसार होत असल्याने पक्ष्यांची अंडी व वजन कमी होते. यामध्ये पक्षी अचानक दगावण्याचे प्रमाण खूप जास्त असते.

माणसांमधील लक्षणे:
या आजाराचे माणसांमध्ये संसर्ग होण्याचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. इतर फ्लूप्रमाणे याचीही लक्षणे दिसतात. या आजारात माणसांमध्ये खोकणे, शिंकणे, अंगदुखी, न्युमोनिया, ताप, घसा खवखवणे, conjunctivitis, श्वास घेण्यास अडथळा येणे, ही लक्षणे दिसून येतात.

पोल्ट्री व्यावसायिकांनी घ्यावयाची काळजी :
कोंबड्यांचे नियमित लसीकरण करणे, नियमित निरीक्षण करणे, पोल्ट्री शेडचे बाहेरील इतर पक्ष्यांपासून संरक्षण करणे, जसे कावळे, चिमण्या, बदक इ.). इतर प्राणी डुक्कर, कुत्रे, मांजर यांचा शेडमध्ये शिरकाव होऊ न देणे. बाहेरून येणा-या माणसांना किंवा वाहनांना फार्ममध्ये येण्यास मज्जाव करणे. शेडमध्ये व शेडच्या बाजूने वेळोवेळी निर्जंतुक औषधांचा फवारा करणे. शेडच्या बाहेरील बाजूने प्रवेशद्वारावर चुना मारावा. शेडमध्ये काम करणा-या माणसांनी हॅण्डग्लोज, गमबूट आणि मास्कचा वापर करावा. प्रत्येक शेडचे कामगार आणि उपकरणे वेगवेगळी असावीत. प्रत्येक शेडमध्ये येणा-या खाद्याच्या व अंड्याच्या गाड्या सॅनिटायझरचा फवारा मारूनच आत घ्याव्यात. आजारी पक्ष्यांचे विलगीकरण करून त्वरित पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा आणि त्याचे काटेकोर पालन करावे.

माणसांनी घ्यावयाची काळजी :
बाधित पक्ष्यांचा संपर्क टाळावा. त्यांची विष्ठा, वेगवेगळे स्त्राव, खाद्य आणि शेडशी संपर्क टाळावा. हा आजार बाहेरच्या देशातून स्थलांतरित पक्ष्यांपासून येत असल्यामुळे वेगवेगळ्या पाणथळ जागांवर (तळी, धरणे, समुद्र) फिरणे टाळावे. आपले पाळीव प्राणी बाहेरील प्राण्यांच्या संपर्कात येऊ नयेत याची काळजी घ्यावी. पाळीव प्राण्यांची सतत स्वच्छता ठेवावी. कोंबड्यांना किंवा प्राण्यांना हाताळल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. चिकन व अंडी नेहमीप्रमाणे नीट शिजवून किंवा फ्राय करून खावीत. आपल्याकडील काही राज्यांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे. पण या आजाराची अनाठायी भीती बाळगण्यापेक्षा एक सजग नागरिक या नात्याने आपण सरकारी निर्देशांचे पालन करून योग्य ती काळजी घेतली तर या आजारावर यशस्वी मात करू शकतो.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या