कसबा मतदारसंघातून लागोपाठ सहा वेळा निवडून आलेले पुण्यातील लोकप्रिय आमदार गिरीश बापट यांच्या निधनाने वर्षानुवर्षांपासूनचा आमचा हक्काचा माणूस हरपला आहे. श्री. बापट आणि मी शाळेपासून एकत्र होतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आमची मैत्री आणखी घट्ट झाली. बी.एम.सी.सी. महाविद्यालयात मला बापट यांच्यात असलेल्या नेतृत्वगुणांचा अनुभव येत गेला. राजकारणात त्यांनी जी मजल मारली त्यामागे त्यांचे प्रचंड कष्ट होते. त्याचबरोबर शहराचे, नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्याची हातोटीही होती. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ नागरिकांच्या हितासाठी झटणारा हा हाडाचा लोकनेता होता. त्यांचा वियोग अत्यंत वेदनादायी आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघाचे अत्यंत लोकप्रिय खासदार म्हणून ओळखल्या जाणा-या गिरीश बापट यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन पुणेकरांचा ‘हक्काचा माणूस’ असे एका वाक्यात सार्थपणे करता येईल. गिरीशजींची आणि माझी ओळख खूप वर्षांपूर्वी झाली. अगदी लहान वयात. आम्ही शाळेपासूनचे मित्र असल्यामुळे त्यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द मी जवळून पाहिली आहे. आपल्या कोणत्याही कामासाठी हक्काने त्यांचा दरवाजा अर्ध्या रात्रीही ठोठावता यायचा, हे त्यांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य होते असे मला वाटते. खरं तर त्यांच्यातील हा कार्यकर्ता पुणेकर गेली चार दशके जवळून अनुभवत आले आहेत. बापटांकडे जाताना सामान्य माणसाला त्यांच्या नेतेपदाचं कधीच दडपण येत नसे. सामान्य माणसं अत्यंत मोकळेपणाने त्यांच्यापुढे आपल्या समस्या मांडत. राजकीय नेते, पुढारी हे सामान्य माणसाची कामे करण्याची फक्त आश्वासनेच देतात, असा अनुभव सर्वांना नेहमीच येत असतो. बापटांकडे मात्र असा अनुभव कधीही आला नाही, असे सांगणारे हजारो लोक आज आहेत.
गेली ४० वर्षे बापटांनी राजकारणात जे यश मिळवले त्यामागे त्यांची कामे करण्याची पद्धतच कारणीभूत होती. अनेक नेत्यांना, मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना सामान्य माणसं आपल्या कामाबाबतचे निवेदन देतात. हे निवेदन मंत्री, आमदार आपल्या पी.ए.कडे सोपवतात. त्यावर कसला तरी शेरा मारला जातो. ‘तुमचं काम लवकरच होईल’, असे आपल्याला सांगितले जाते. मात्र अनेकदा आपलं काम होतच नाही. आपण पुन्हा ‘माननीयांना’ भेटायला जातो. याच कामासाठी आपण पूर्वी भेटलो होतो, याचे स्मरण त्या ‘माननीयांना’ करून द्यावे लागते. बापटांची कार्यपद्धती याहून फार वेगळी होती. ते अगदी सुरुवातीला नगरसेवक झाले तेव्हापासून त्यांनी आपल्याकडे कामे घेऊन येणा-या लोकांची वहीमध्ये नोंद करण्याची पद्धत सुरू केली. या वहीत त्यांच्याकडे येणा-या प्रत्येक अभ्यागताचे नाव, त्याचे काम, काम कोणत्या विभागात आहे याची नोंद केलेली असायची. नुसती नोंद करून न थांबता त्या कामाचे पुढे काय झाले याचीही नोंद त्या वहीत केलेली असायची. ते काम पूर्ण होईपर्यंत बापट त्याचा पाठपुरावा चालू ठेवत.
या पद्धतीमुळे त्यांना कोणाचे काम कोणत्या टप्प्यात आहे याची पूर्ण माहिती असायची. या पद्धतीने काम केल्याने त्यांच्याकडे काम घेऊन येणा-यांची निराशा होत नसे. सलग पाच वेळा कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडून येण्यामागे आणि नंतर पुणे लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून घवघवीत यश मिळवण्यामागे बापट यांनी मनापासून केलेली लोकसेवा होती, हे कदापि विसरता येणार नाही. श्री. बापट आणि मी शाळेपासून एकत्र होतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आमची मैत्री आणखी घट्ट झाली. बी. एम. सी. सी. महाविद्यालयात मला बापट यांच्यात असलेल्या नेतृत्वगुणांचा अनुभव येत गेला. राजकारणात त्यांनी जी मजल मारली त्यामागे त्यांचे प्रचंड कष्ट होते. त्याचबरोबर शहराचे, नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्याची हातोटीही होती. याच्या जोरावरच ते सलग २५ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेवर निवडून गेले आणि नंतर लोकसभेसाठीही त्यांनी योगदान दिले.
त्यांच्या यशाचे आणखी एक कारण म्हणजे त्यांचे सर्वसमावेशक नेतृत्व. बापट यांच्याबद्दल बहुजन समाजातील नागरिकांना, अल्पसंख्याक समाजाच्या नागरिकांनाही हा ‘आपला माणूस’ आहे, असा विश्वास होता. सर्व समाजात मिळून मिसळून वागण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढत राहिली. आपल्या कसबा मतदारसंघातील बारा बलुतेदारांचे प्रश्न त्यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून मार्गी लावले. कुंभारवाड्यातील व्यावसायिकांना व्यवसायासाठी सध्याची जागा अपुरी पडत होती. बापट यांच्यापर्यंत हा मुद्दा पोहोचवण्यात आल्यानंतर त्यांनी अनेक व्यावसायिकांना मुंढवा येथे व्यवसायासाठी जागा मिळवून दिली.
बेलदार समाजाच्या गोठ्यांच्या स्थलांतराचा प्रश्न मार्गी लावला. गटई कामगारांना पादत्राणे विक्री आणि दुरुस्ती व्यवसायासाठी महापालिकेकडून परवाने मिळवून दिले. बोहरी समाजाच्या दफनभूमीसाठी शासनाकडून निधी मिळवून दिला. अशा अनेक कामांमुळे बापट यांची प्रतिमा सर्वसमावेशक नेता म्हणून तयार झाली. त्यांच्यावर जातीचा आधार घेऊन टीका करणे कोणालाही शक्य झाले नाही ते यामुळेच. खासदार बापट हे अस्सल पुणेकर होते. पुण्याच्या समस्यांची त्यांना चांगली जाण होती. अनेक वर्षे आमदार असताना पुण्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ते प्रसंगी रस्त्यावरही येत असत. काही वर्षांपूर्वी वाहतूक हा पुणेकरांच्या दृष्टीने संवेदनशील प्रश्न बनला होता. वाढत्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी सरकारने पुरेसा निधी द्यावा अशी मागणी श्री. बापट यांनी विधानसभेत करून शासनाचे पुण्याच्या वाहतूक प्रश्नाकडे लक्ष वेधले आणि त्यानुसार उपाययोजनांची सुरुवातही झाली.
श्री. बापट यांची सामान्य माणसाशी नाळ कशी जोडली गेली आहे याचे प्रत्यंतर अनेक प्रसंगांतून, घटनांमधून येत गेले. रिक्षाचालक हा पुण्याच्या सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या रिक्षाचालकालाही समाजाने सन्मान दिला पाहिजे अशी बापट यांची भूमिका असायची. त्यामुळे ‘ए रिक्षावाला’ नव्हे तर ‘अहो रिक्षावाले’ अशा शब्दांत त्यांना हाक मारली जावी, अशी सूचना बापट यांनी केली. तसेच रिक्षाचालकांचे प्रश्न विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे त्यांनी उपस्थित केले. तामिळनाडूत रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर राज्यातही कल्याणकारी मंडळ स्थापन केले जावे अशी मागणी बापट यांनी विधानसभेत केली होती. बापट यांच्या या मागणीची दखल तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी घेतली आणि रिक्षाचालकांच्या प्रश्नात लक्ष घालण्याचे आदेश सरकारला दिले. पुण्याच्या मध्यवर्ती भागात म्हणजे कसबा मतदारसंघात वाहतुकीचा प्रश्न भेडसावत असे. यावर उपाय म्हणून श्री. बापट यांनी आपल्या मतदारसंघात आर्यन, मिनर्व्हा, हमालवाडा आणि हरिभाऊ साने असे चार वाहनतळ उभारण्यासाठी पुढाकार घेऊन आपण केवळ मागण्या करीत नाही तर कृतीही करतो असे दाखवून दिले.
आपल्याला निवडून दिलेल्या मतदारांना आपण जबाबदार असतो याची जाणीव श्री. बापट यांना सतत असायची. त्यामुळे विधिमंडळ अधिवेशनांना त्यांची उपस्थिती जवळ जवळ १०० टक्के असायची, हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. अधिवेशनाला उपस्थिती लावण्याबरोबर कामकाजात जागरूकपणे भाग घेणे हे ही आपले कर्तव्य असल्याचे श्री. बापट यांनी वेळोवेळी दाखवून दिले होते. लोकसभेवर निवडून गेल्यानंतरही त्यांनी समस्त पुणेकरांच्या समस्यांसाठी, सुविधांसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याबाबत आग्रही भूमिका मांडली. एकूणच आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा हे श्री. बापट यांनी आपल्या वर्तनातून दाखवून दिले. राजकारणात येणा-या नवोदितांसाठी आणि प्रस्थापितांसाठी गिरीशजी हे एक विद्यापीठच होते.
-सूर्यकांत पाठक, खा. बापट यांचे बालमित्र