27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeविशेषब्रिटनमध्ये नवे पर्व

ब्रिटनमध्ये नवे पर्व

एकमत ऑनलाईन

ब्रिटनमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आपली खुर्ची कशीबशी वाचवणारे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर पुन्हा राजकीय संकटाचे ढग दाटले आणि अखेर राजीनामा द्यावा लागला. विशेष म्हणजे त्यांचे दोन खास मित्र आणि कॅबिनेटमधील सहकारी असणा-या ऋषी सुनक आणि साजिद वाजिद यांनी त्यांना चांगली साथ दिली. पक्षांतर्गत विरोध असतानाही आणि पार्टीगेट प्रकरणाने बोरिस जॉन्सन यांना प्रखर टीकेला सामोरे जावे लागत असतानाही हे दोघे त्यांच्यासोबत होते. एखाद्या भक्कम भिंतीप्रमाणे ते जॉन्सन यांच्यासमोर उभे होते. यामुळेच गेल्या महिन्यात आपल्याच पक्षाकडून मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावात बोरिस जॉन्सन यांचा विजय झाला. अविश्वासाच्या ठरावादरम्यान काही खासदारांनी बोरिस जॉन्सन यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे ते पराभूत होतील, असा कयास बांधला गेला होता. परंतु ते विजयी झाले. या विजयानंतर सर्वकाही ठीक आहे, असे समजले गेले. मात्र काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी राजीनामा देऊन ब्रिटनमध्ये राजकीय खळबळ उडवून दिली. ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदानंतर सर्वांत मोठे पद अर्थमंत्र्यांचे समजले जाते. त्यास चान्सलर किंवा चान्सलर ऑफ एक्सचेकर असेही म्हटले जाते. त्या पदापर्यंत पोहोचणारे ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती आहेत.

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक हे केवळ ३५ वर्षांचे आहेत. २०१५ मध्ये पहिल्यांदा कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे ते खासदार झाले. तेव्हापासून ब्रिटनच्या आर्थिक धोरणात त्यांचा सहभाग राहिला आहे. २०१८ मध्ये ते थेरेसा मे यांच्या सरकारमध्ये सामील झाले आणि २०१९ मध्ये कोषागाराचे चीफ सेक्रेटरी म्हणून त्यांना नेमण्यात आले. बोरिस जॉन्सन यांच्या निवडणूक प्रचारात सुनक यांची भूमिका महत्त्वाची राहिली. कन्झर्व्हेटिव्ह पक्षाने आपल्या प्रचार मोहिमेत आणि पत्रकार परिषदेत ऋषी सुनक यांनाच पुढे केले होते. ब्रेक्झिटच्या काही आठवड्यांनंतर जेव्हा ब्रिटनचे अर्थमंत्री साजिद जाविद यांनी राजीनामा दिला तेव्हा या तरुण खासदारावर अर्थमंत्रालयासारखी महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर साजिद जाविद हे आरोग्यमंत्री झाले. ऋषी सुनक हे चान्सलर म्हणजेच अर्थमंत्री झाले तेव्हा कोरोना पसरण्यास सुरुवात झाली होती. कोविड तेव्हा जागतिक साथ झालेली नव्हती. बोरिस जॉन्सन यांच्या सरकारने देशव्यापी लॉकडाऊन लागू केले आणि ऋषी सुनक यांंच्यावर ब्रिटनला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी आली. ऋषी सुनक यांनी रोजगाराच्या सुरक्षेसाठी व्यापक प्रमाणात आर्थिक पॅकेजची घोषणा केली. त्याचबरोबर कोरोनाच्या काळात महागाईवर अंकुश आणणे हे एक मोठे आव्हान होते. त्यासाठी देखील त्यांनी धोरणे आखली.

ऋषी सुनक यांच्या एका वाक्याने ते ब्रिटनमधील तरुणाईचे हीरो बनले. ते म्हणाले, की नव्या पिढीला केवळ बिल भरणा करणारी जनता म्हणून समोर आणता येणार नाही. त्यांच्यासाठी आणखी वेगळा विचार करावा लागेल आणि हा विचार आमचे सरकार करेल. यामुळे सुनक यांची लोकप्रियता वाढली. सुनक यांनी राजीनाम्यात म्हटले, की ब्रिटनचे सरकार योग्य रीतीने आणि गांभीर्याने काम करेल, अशी जनतेला अपेक्षा आहे. कदाचित हे मंत्रिपद माझे शेवटचे ठरू शकते. परंतु चांगल्या कामासाठी आपण संघर्ष करायला हवा. म्हणून आपण पदाचा राजीनामा देत आहोत. आज ब्रिटनमध्ये महागाईने कळस गाठला असून ती चार दशकांतील उच्चांक मानला जात आहे. अशा स्थितीतही जनतेवर करांचा मारा केला जात आहे. ब्रिटनच्या जनतेला आर्थिक दिलासा देण्यासाठी ऋषी सुनक कोणते धोरण आणू इच्छित होते आणि त्यास बोरिस जॉन्सनकडून का आडकाठी आणली गेली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. महागाईने त्रस्त झालेल्या ब्रिटन जनतेसाठी सुनक यांना व्हिलन बनायचे नव्हते आणि म्हणूनच त्यांनी सरकारमधून बाहेर पडणे श्रेयस्कर समजले.

ऋषी यांचे आजोबा हे पंजाबचे रहिवासी होते. तेव्हा भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. त्यानंतर ते पूर्व आफ्रिकेत गेले. तेथे त्यांच्या वडिलांचा जन्म झाला. त्यांची आई उषा या टांझानियाच्या रहिवासी होत्या. १९६० च्या दशकात सुनक यांचे आजोबा हे मुलाबाळासाह ब्रिटनला गेले. ऋषी यांचे वडील ब्रिटनमध्ये सरकारी डॉक्टर तर आई फार्मसी चालवित होती. सुनक यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र, राज्यशास्त्राचा अभ्यास केला. व्यवस्थापनाच्या अभ्यासासाठी ते अमेरिकेत गेले. तेथे नारायण मूर्तींची कन्या अक्षता भेटली. ही गोष्ट इथे सांगणे महत्त्वाचे आहे. कारण यावरून त्यांचा राजीनाम्याचा विचार आणि पार्श्वभूमीचा आपल्याला अंदाज येऊ शकेल. ऋषी यांनी राजीनामा देण्यामागे आणखी एक कारण म्हणजे बोरिस जॉन्सन यांनी लैंगिक शोषणाचा आरोप असणारे खासदार ख्रिस पिंचर यांची पक्षाचे उप मुख्य व्हिप म्हणून केलेली नियुक्ती. ही महत्त्वाची सरकारी जबाबदारी जॉन्सन यांनी त्यांच्या खांद्यावर टाकली. त्यामुळे सुनक नाराज होते. अर्थात बोरिस जॉन्सन यांनी या प्रकाराबद्दल माफी देखील मागितली.

दुसरीकडे कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेत ब्रिटनमध्ये झालेल्या मृत्यूप्रकरणासाठी बोरिस जॉन्सनच्या धोरणांना थेटपणे जबाबदार धरण्यात आले. यातून देशाला बाहेर काढण्यासाठी आणि आरोग्य व्यवस्था चांगली करण्यासाठी गतवर्षी साजिद जाविद यांना आरोग्यमंत्री म्हणून नेमण्यात आले. यादरम्यान जगभरात लसीकरणाची मोहीम सुरू झाली होती. ब्रिटनमध्ये साजिद यांनी लसीकरण मोहिमेला वेग दिला. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे ब्रिटनमध्ये आतापर्यंत दोन्ही डोस ९० टक्के नागरिकांनी घेतले आहेत तर बूस्टर डोस ७० टक्के नागरिकांनी घेतले आहेत. या कार्याबद्दल आरोग्यमंत्री साजिद जाविद यांचे कौतुकही झाले. जाविद यांनी राजीनाम्यात म्हटले, की ब्रिटनमध्ये सातत्याने होणा-या गैरव्यवहारामुळे बोरिस जॉन्सन यांच्या क्षमतेवर विश्वास राहिलेला नाही. यावरून एक बाब लक्षात येते की, सरकारमध्ये जे काही घडतेय ते काही ठीक नाही. पक्षाकडूनच दाखल झालेल्या अविश्वास ठरावाचा सामना करून महिनाही लोटला नसेल तेव्हा साजिद जाविद हे जॉन्सन यांच्या खांद्याला खांदा लावून उभे होते. परंतु असे काय घडले की, काही दिवसांतच त्यांचा पंतप्रधानांच्या क्षमतेवर विश्वास राहिला नाही. याची उत्तरे गुलदस्त्यात आहेत.

– विनिता शाह

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या