23 C
Latur
Friday, August 12, 2022
Homeविशेषचित्रपटांच्या यशाचा नवा मार्ग

चित्रपटांच्या यशाचा नवा मार्ग

एकमत ऑनलाईन

यावर्षी जानेवारी ते एप्रिलदरम्यान प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमधून जे सकारात्मक संकेत मिळत आहेत, ते त्यानंतर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्येही दिसून येतात. एंटरटेन्मेन्ट, एंटरटेन्मेन्ट, एंटरटेन्मेन्ट हाच चित्रपटाचा आधार असतो. यावर्षी मे महिन्यात प्रदर्शित झालेल्या दोन चित्रपटांचे व्यावसायिक परिणाम या संकल्पनेला बळकटी देतात.

कोरोना महामारीच्या काळात चित्रपटगृहे बंद पडल्याने चित्रपटसृष्टीवर खूप वाईट परिणाम झाला. चित्रपट प्रदर्शनाचा व्यवसाय बंद झाल्यामुळे भारतीय चित्रपट उद्योगही संकटात सापडला होता. अनेक चित्रपट पूर्ण झाले होते; परंतु त्यांचे प्रदर्शन लांबत गेले. चित्रपट प्रदर्शित न झाल्यामुळे होणारे नुकसान मोठ्या निर्मात्यांनी कसेबसे सहन केले. परंतु छोट्या निर्मात्यांवर त्यांचा विपरित परिणाम झाला. अनेक चित्रपट अर्ध्यावर बंद पडले आणि अनेक चित्रपटांची निर्मितीप्रक्रिया सुरूच होऊ शकली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर अनेक निर्बंध घालून चित्रपटगृहे उघडली गेली; मात्र अपेक्षित व्यवसाय होत नव्हता. ही परिस्थिती पाहता चित्रपटांवर लिहिणा-या काही लेखकांनी चित्रपट व्यवसायाचे बदलते स्वरूप मांडण्यास सुरुवात केली. चित्रपटगृहांच्या व्यवसायावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ लागले. साथरोगामुळे चित्रपटगृहांमध्ये कमी उपस्थिती हा प्रेक्षकांच्या बदलत्या रुचीचा परिणाम असल्याचे कारण या लेखकांकडून दिले गेले. चित्रपटगृहांऐवजी त्यांनी चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी नवीन व्यासपीठ म्हणून अ‍ॅप-आधारित प्लॅटफॉर्म स्थापन करण्यास सुरुवात केली.

चित्रपटगृहांच्या मालकांनी पारंपरिक प्रेक्षकांबद्दल घाईघाईने भाष्य करायला सुरुवात केली. असे मूल्यांकन करण्यापूर्वी आणि निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी त्यांनी कोरोना आणि त्याचा प्रसार होण्याची भीती, ही शक्यता विचारात घेतल्याचे दिसत नाही. बंद आणि वातानुकूलित वातावरणात कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता अधिक होती. ही गोष्ट पारंपरिक चित्रपटरसिकांच्या सुप्त मनात कुठेतरी होती. त्यामुळे चित्रपटगृहांना प्रेक्षकांची अपेक्षित उपस्थिती लाभत नव्हती; मात्र चित्रपटांवरील प्रेम कमी होत नव्हते. जसजशी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली, बहुतेक लोकांना लसीचा डोस मिळाला, तसतसा आत्मविश्वास वाढू लागला आणि थिएटरमध्ये प्रेक्षकांची संख्याही वाढू लागली. चित्रपटांच्या व्यवसायाच्या विविध पैसूंचे मूल्यांकन करणा-या ऑरमॅक्स इंडिया या संस्थेच्या अहवालानुसार, यावर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी चार हजार कोटींहून अधिक व्यवसाय केला. याचा अर्थ यावर्षी प्रत्येक महिन्याला चित्रपटांनी एक हजार कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला. चित्रपटसृष्टीसाठी ही खूप आनंदाची बाब आहे. परंतु या व्यवसायात एक संदेशदेखील आहे आणि त्याचा विचार हिंदी चित्रपटसृष्टीतील व्यक्तींनी करायला हवा.

यावर्षी प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालेल्या चित्रपटांमध्ये दक्षिण भारतीय चित्रपटांच्या हिंदी आवृत्त्यांचा वाटा सर्वाधिक आहे. ऑरमॅक्स मीडियाच्या अहवालानुसार, चित्रपटांच्या व्यवसायात मूलत: हिंदीत तयार केलेल्या चित्रपटांचा वाटा ३८ टक्के आहे, तर हिंदीत डब केलेल्या दाक्षिणात्य चित्रपटांचा वाटा ६० टक्के आहे. आता दक्षिण भारतातील या चित्रपटांचा विचार करूया, कारण त्यांना प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले आणि त्यांनी ५०० कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला. ऑरमॅक्स मीडियाच्या अहवालानुसार, ‘केजीएफ चॅप्टर २’ या चित्रपटाने १००८ कोटींचा व्यवसाय केला, ‘आरआरआर’ने ८७५ कोटींचा व्यवसाय केला आणि ‘द काश्मीर फाइल्स’ने २९३ कोटींचा व्यवसाय केला. ‘द काश्मीर फाइल्स’च्या यशामागे विलक्षण कारणे आहेत. त्याच्या यशाबद्दल यापूर्वी अनेकदा चर्चा झाली आहे. आता जर आपण ‘केजीएफ चॅप्टर २’ आणि ‘आरआरआर’बद्दल बोलायचे ठरविले तर त्यात थेट ज्ञान, भाषण आणि सिद्धांतावर चर्चा नाही. परंतु चित्रपट निर्मात्याने अप्रत्यक्षपणे खूप मोठा संदेश दिला आहे. चित्रपट निर्मात्यांचा तो संदेश प्रेक्षकांनी पकडला आणि त्यांना तो आवडलाही. ‘आरआरआर’ची कथा राम, भीम आणि सीता यांच्याभोवती फिरते. राम-सीता आणि भीम ही रामायण आणि महाभारत या आपल्या दोन महान पौराणिक ग्रंथांमधील पात्रे आहेत.

या चित्रपटाची कथा अशा प्रकारे लिहिली आहे, की राम आणि भीम एकमेकांना मदत करतात. सीता, राम आणि भीमाची ही कथा रामराज्यात भीमाचे महत्त्व कुठेतरी प्रस्थापित करण्याचा अप्रत्यक्ष संदेश देते. प्रेक्षकांना हे आवडते. याशिवाय चित्रपटाची भव्यताही प्रेक्षकांना बांधून ठेवते. त्याचप्रमाणे ‘केजीएफ चॅप्टर २’ चित्रपटात नायक त्याच्या संवादांमध्ये राजकारणातील घराणेशाही या विषयावर भाष्य करतो. चित्रपटात जेव्हा नायक घराणेशाहीवर भाष्य करतो तेव्हा चित्रपटगृहात टाळ्यांचा कडकडाट होतो. याचा अर्थ, प्रेक्षक स्वत:ला चित्रपट निर्मात्याच्या विचारांशी एकरूप करतो. या वर्षी जानेवारी ते एप्रिलदरम्यान प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमधून जे सकारात्मक संकेत मिळत आहेत, ते त्यानंतर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्येही दिसून येतात. एंटरटेन्मेन्ट, एंटरटेन्मेन्ट, एंटरटेन्मेन्ट हाच चित्रपटाचा आधार असतो. यावर्षी मे महिन्यात प्रदर्शित झालेल्या दोन चित्रपटांचे व्यावसायिक परिणाम या संकल्पनेला बळकटी देतात. एक चित्रपट म्हणजे ‘भूलभुलय्या-२’ आणि दुसरा चित्रपट आहे ‘अनेक’. ‘भूलभुलय्या-२’ ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. चार आठवड्यांत त्याचे कलेक्शन जवळजवळ अडीचशे कोटी रुपयांवर पोहोचले आहे तर ‘अनेक’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली आहे.

आधी ‘भूलभुलय्या-२’बद्दल बोलूया. २००७ मध्ये आलेल्या भूलभुलय्या या चित्रपटाचा हा सीक्वल असून, प्रेक्षकांना तो का आवडला? यात कार्तिक आर्यन, तब्बू आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. हा एक हॉरर चित्रपट असला तरी त्यात जबरदस्त विनोद आहे. अलीकडेच एका खासगी संभाषणात गीतकार आणि कवी प्रसून जोशी यांनी चित्रपटांबद्दल एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली होती. कोरोनानंतरच्या काळात ज्या प्रकारचे चित्रपट यशस्वी होत आहेत, ते पाहून प्रसून जोशी यांचा मुद्दा वारंवार स्मरणात येतो. प्रसून म्हणाले होते की, आपले युग हे मनोरंजनाचे युग आहे असे वाटते. आता लोक रिलेशनशिपमध्येही मनोरंजन शोधत आहेत. आज लोक त्यांच्या कुटुंबात मनोरंजक व्यक्तिमत्त्व शोधत आहेत. वडिलांकडूनही करमणूक व्हावी, अशी मुलांची अपेक्षा असते. आज आपला समाज कुटुंबात राहूनही मनोरंजनाचा आधार घेत असेल तर त्यामागचे मानसशास्त्र समजून घ्यावे लागेल. मनोरंजनाकडे आरोग्याच्या व्यापक अर्थाने पाहिले पाहिजे. समाजाचे हे बदलते दृष्टिकोन आपल्या चित्रपटांतून दाखवू शकणा-या निर्मात्याला प्रेक्षक मिळत आहे.

– विनिता शाह

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या