28.8 C
Latur
Saturday, February 4, 2023
Homeविशेषआत्मनिर्भर स्त्रीची दर्दभरी कहाणी ‘मुक्ता’

आत्मनिर्भर स्त्रीची दर्दभरी कहाणी ‘मुक्ता’

एकमत ऑनलाईन

सांगली येथील कवयित्री आणि लेखिका प्रतिभा जगदाळे यांची ‘मुक्ता’ ही स्त्रीविश्वाचे पारंपरिक दु:ख, वेदना, घुसमट आणि पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेत होणारी दमवणूक निर्वेधपणे मांडणारी कादंबरी असून ती मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनाने नुकतीच देखण्या रूपात प्रकाशित केली आहे.सुशिक्षित मध्यमवर्गीय घरातली कलासक्त मनाची मुक्ता ही पदवीधर झाल्यावर श्रीधरसारख्या श्रीमंत व्यावसायिकाची पत्नी होते; परंतु विवाहानंतर तिला चित्रकलेची आवड जोपासता येत नाही. श्रीधरच तिची अडवणूक करतो आणि अशातच ती गर्भवती होते. दरम्यान श्रीधर फ्रान्सला निघून जातो आणि तिकडेच स्थायिक होतो. मुक्ता गोंडस मुलीला जन्म देते आणि त्याची वाट पाहत राहते. शेवटी तिचे गाव सोडून ती कोल्हापूरला येते आणि के. के. कंपनीत जॉबला लागते. पुढे वडिलांकडून काही रक्कम घेऊन तेथेच घर बांधते. नंतर निर्दयी मनाचा श्रीधर अचानक तिला घटस्फोट देतो आणि पुनर्विवाह करतो. छोट्या मुलीची; मनूची पूर्ण जबाबदारी मुक्तावर येऊन पडते. पण स्वाभिमानी मनाची खंबीर मुक्ता या आघाताने डगमगत नाही वा कोसळतही नाही; तर येणा-या परिस्थितीला धैर्याने सामोरे जायचा निर्धार करते आणि आनंदी मनाने जीवन जगू लागते.

पण काही दिवसांतच पुन्हा दुसरे एक वादळ तिच्या आयुष्यात येऊन उभा राहते. तिच्यापेक्षा पाच-सहा वर्षांनी लहान असलेला करण नावाचा इंजिनीअर तरुण तिच्या प्रेमात पडतो आणि तिच्यावर जिवापाड प्रेम करू लागतो. मग मुक्ता स्वत:ची सारी ‘अभागी’ कहाणी त्याला सांगते, पण तरीही तो मुक्ताला तिच्या मनूसह स्वीकारण्यास तयार होतो. शेवटी वैवाहिक सुखापासून वंचित असलेली हाडा-मांसाची मुक्ता त्याचा स्वीकार करते आणि ते दोघे मुक्ताच्या घरी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहू लागतात. मुक्ताच्या या समाजमनाला न रुचणा-या संबंधामुळे तिच्या घरचेही तिला दुरावतात आणि तिची डॉक्टर झालेली मनूही तिच्यापासून काहीशी दुरावते; पण तरीसुध्दा निर्भर मुक्ता डगमगत नाही. पुढे जेव्हा मनूच्या लग्नाचा विषय होतो तेव्हा मात्र समोरच्यांना मुलीच्या आईचे चालू असलेले ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ प्रकरण खटकते आणि ते मनूच्या पसंत पडलेल्या स्थळाला नकार देतात. दोन-तीनदा असे घडल्यानंतर प्रेमभंग झालेली मुक्ताची मनू आकस्मिकपणे आत्महत्या करते. तिच्या आत्महत्येनंतर आपल्यावर काही पोलिसांचे बालंट येईल म्हणून करणही मुक्ताचा त्याग करून कोल्हापूर सोडून बेपत्ता होतो.

‘मुक्ता’ ही कादंबरी आजच्या जागतिकीकरणानंतरच्या काळातील सुशिक्षित अशा स्त्री जीवनाची वर्तमानकालीन स्थिती-गती रेखाटणारी आहे. आजची शिक्षित स्त्री तिला सातत्याने काचत राहणारे सामाजिक नीतीनियम, रूढी, संकेत, परंपरा या सर्वांविरुध्द पेटून उठते आणि तिला हवे असणारे स्वतंत्र नि आनंददायी जीवन, पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेला झुगारून जगू इच्छिते, हेच ‘मुक्ता’ च्या समरसून जगण्यातून इथे अधोरेखित झाले आहे.शिवाय नियतीने पुढे वाढून ठेवलेल्या दु:खद प्रसंगांच्या मालिकेतून मुक्ताचे न कोसळता आत्मनिर्भरतेने खंबीरपणे उभे राहणे आणि संवेदनशीलतेने इतर दु:खी जनांच्या आयुष्यात चार सुखाचे नि आनंदाचे क्षण आणण्यासाठी अथकपणे कार्यरत राहणे प्रेरक नि दिशादर्शक झाले आहे. तसेच मुक्ताच्या कथानकासोबतच तिच्या मैत्रिणीच्या; साराच्या आयुष्याची तिच्या नातेवाईकांकडून झालेली फरफट, सविताची मोलकरीण सखूची नव-याकडून होणारी सततची दमकोंडी ही उपकथानकेही आजच्या युगातही पुरुषसत्ताक व्यवस्थेकडून स्त्रियांचे होणारे शोषण उजागर करतात आणि बंडखोर मुक्ताच्या जीवनसंघर्षाला बळ देतात. सदैव मुक्ताच्या पाठीशी सावलीसारखी उभी असणारी सविता आणि मुक्ताच्या निरपेक्ष मैत्रभावातून लेखिकेने मैत्रीच्या नात्यातील अतूट भावबंध नेटका गोचर केला आहे.

तसेच आज शहरी जीवनात प्रचलित होत असलेल्या ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ च्या नात्यावर झोत टाकून त्यातील अंतर्विरोधही नेमके नोंदवले आहेत.कादंबरीतील पात्रचित्रण नेटके झाले असून मुक्ता, सविता, सारा, उदय या व्यक्तिरेखा लेखिकेच्या लेखणीव्दारे अगदी जिवंत अशा हाडा-मांसाच्या झालेल्या आहेत. परंतु ओघवत्या शैलीत कथानकाची कौशल्याने गुंफण केलेल्या या कादंबरीत घटस्फोटित मुक्ताला तिचा पहिला पती; श्रीधर उदयच्या घरी कोल्हापूरला पुन्हा भेटतो, तो प्रसंग आणि त्याचे फेसबुकवर तिला ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवणे, हे मात्र खटकते आणि मनालाही पटत नाही. असे असले तरीही मुक्ताच्या आयुष्याची झालेली ससेहोलपट, फसवणूक नि दमकोंडी यामुळे ती शोकांतिकेच्या कड्यावर असूनसुध्दा ती स्वत:चा कडेलोट तिच्या ठायी असलेल्या आत्मनिर्भरतेने नि संयमाने थोपवते आणि ती पुढच्या जीवन संघर्षासाठी ठामपणे उभी राहते आणि हेच लेखिका प्रतिभा जगदाळे यांच्या ‘मुक्ता’ कादंबरीचे यश आहे.
लेखिका – प्रतिभा जगदाळे, प्रकाशक – ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
( ०२२) -२४२१६०५०, पृष्ठे – २१०, मूल्य – २५०, मुखपृष्ठ – सतीश भावसार

-उमेश मोहिते
मोबा. : ७६६६१ ८६९२८

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या