मकर संक्रांती हा नववर्षातील पहिलावहिला सण. दरवेळी आपण नव्या वर्षाकडे मोठ्या आशेने पाहतो. अर्थात ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे आणि ती पुढेही राहील. मावळत्या वर्षाने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या आणि त्या आयुष्याच्या कठीण काळात, महत्त्वाच्या टप्प्यावर वाटचाल करताना महत्त्वाच्या ठरणार आहेत. आगामी काळ भारतीय महिलांसाठी आशादायी ठरेल. आर्थिक आत्मनिर्भरतेबाबत त्यांच्या मनात निर्माण झालेला आत्मविश्वास हा केवळ शहरातच नाही तर ग्रामीण भागातही दिसून येत आहे.
नवे वर्ष आशा आणि आकांक्षांनी भरलेले आहे. याचा विचार करत आपण मोठ्या आशाळभूत नजरेने एखाद्या नव्या कार्याला सुरुवात करतो. पण गेल्या काही वर्षांत ‘मी’पणाच्या अविर्भावाने समाजाची घडी विस्कटलेली दिसून येते. अहंकार, मी पणा, गर्व यावरून संघर्ष पाहावयास मिळत असून कुटुंब, समाज यात ताणतणाव निर्माण झाले. अशा प्रकारची स्थिती मान्य करणे हे संवेदनशील समाजाला क्लेषदायक ठरले. त्याचवेळी कोरोना संकटामुळे लोकांवर झालेले मानसिक आघात, जिवाभावाला गमावल्याचे दु:ख दिसून आले आणि समाजात पुन्हा एकोपा आणि आपुलकीची भावना जागृत झाली. एखाद्या क्षणी आपण मागील काही वर्षांतील पाने उलटून पाहिली तर भारतीय संस्कृतीचा गाभा हा प्रेम, समर्पण, नि:स्वार्थी त्यागाने भरलेला आहे आणि त्याची प्रचीती पुन्हा आपल्याला कोरोना काळात आली.
एवढेच नाही तर त्याचे महत्त्वही अधोरेखित झाले. कोणताही भेदभाव न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी असंख्य लोकांनी केलेली धडपड ही भारताची प्रतिमा वेगळ्या रूपातून उजळून टाकणारी ठरली. यावरून एक गोष्ट लोकांच्या मनात बिंबवली गेली आणि ती म्हणजे कितीही काळोख असला तरी पहाट ही होणारच. अनोळखी व्यक्तीविषयी आपुलकीची भावना निर्माण झाली. एकत्र येऊन भविष्याकडे आपण सामूहिकरीत्या कशी वाटचाल करू शकतो, या विचाराने जन्म घातला. याचे सुखद परिणाम नव्या वर्षात पाहावयास मिळतील. इथे ‘आधी आबादी’चा म्हणजेच महिला-शक्तीचा विचार करणे महत्त्वाचे आहे. आगामी काळ भारतीय महिलांसाठी आशादायी ठरेल. आर्थिक आत्मनिर्भरतेबाबत त्यांच्या मनात निर्माण झालेला आत्मविश्वास हा केवळ शहरातच नाही तर ग्रामीण भागातही दिसून येत आहे. याकडे एक नवीन अध्याय म्हणून पाहता येईल. हा केवळ आशावाद नाही तर आगामी काळात भारतातील कुटुंबव्यवस्था ही महिलांचा सन्मान करण्याबाबत अधिक सजग राहील, असा विश्वास वाटत आहे. आता स्त्री-पुरुष भेदभाव हा मिटल्यागत जमा झाले आहेत. महिला शक्तीचा सन्मान करणे, त्यांना समान स्थान देणे या मुद्यावर काही ठिकाणी अजूनही संभ्रमावस्था दिसते. पण महिलाशक्तीचा आदर करण्याबाबतचे अभियान घरातूनच सुरू केल्यास प्रत्येक महिलांचे आयुष्य सुरक्षित आणि सुखदायी होऊ शकते. नव्या वर्षात त्यादृष्टीने प्रयत्न करण्यासाठी सकारात्मक पाऊल टाकले जाईल.
आपल्याकडे कमी स्रोतात, कमी उत्पन्नात जीवन जगण्याची असणारी संस्कृती ही गेल्या काही दशकांपासून पश्चिम संस्कृतीच्या झगमगाटासमोर हरवली होती. परिणामी देशभरात औद्योगीकरणाला चालना मिळाली आणि असंख्य कारखाने, सिमेंटचे जंगल पृथ्वीच्या छातीवर उभे राहिले. यासाठी बेसुमार जंगलतोड झाली. प्रदूषणाचे सावट वाढत गेल्याने भारतीयांचे आयुर्मान सुमारे पाच वर्षांपर्यंत घटले. अर्थात भारतीयांनी आपली चूक कबूल केली आहे. म्हणूनच दहापैकी नऊ भारतीय पर्यावरण संरक्षणाबाबत सजग आहेत. याचे स्पष्टीकरण ‘द ग्लोबल कॉमन्स सर्व्हे अॅटिट्यूड टू प्लेनेटरी स्टेवर्डशिप अँड ट्रान्सफॉर्मेशन अमंग जी-२० कंट्रीज’च्या अहवालातून दिले आहे. भारतीय पर्यावरणाबाबत जागरूक राहिल्यास प्रदूषणवाढीस हातभार लावणा-या घटकांना नष्ट करण्यासाठी आगामी काळात पावले टाकली जातील असा विश्वास आहे. नव्या जगात प्रवेश करणा-या नवजात बाळांकडे देखील नव्या आशेचा स्पर्श होत आहे. म्हणून एकप्रकारे त्यांच्यावर जन्मापासूनच अपेक्षांचे ओझे लादले जात आहे. तरुणांना आपली स्वप्नपूर्ती करण्यासाठी सक्षम व्यासपीठ असणे महत्त्वाचे आहे. एकुणातच कुटुंब आणि समाजात सुदृढ व्यवस्था विकसित झाल्यास नवजात आणि तरुणाईच्या आयुष्याला नवी भरारी मिळू शकते. याकामी केवळ एक पाऊल टाकणे गरजेचे आहे.
कारण नवजात बाळांचे जीवन हे विकासकामांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. अहोरात्र मेहनत करून घर सांभाळण्यासाठी आपले आयुष्य, जीवन अर्पण करणा-या ‘ती’चा आवाज कोठेतरी हरवलेला दिसतो. गुदमरलेला श्वास, हुंदके हे सध्याच्या वेगवान प्रगतीच्या काळात आणि दमविणा-या जगाला ऐकू येत नाहीत. चूल आणि मूल चौकटीत आजही असंख्य गृहिणी वावरत असून त्या देखील नव्या वर्षाकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. आपल्या श्रमाला, कष्टाला सन्मान मिळेल आणि आपण एक कुटुंबाचे आधारस्तंभ आहोत, यास समाज, कुटुंबाकडून मान्यता मिळेल या आशेवर राहात आहेत. समाजबांधणी आणि देशउभारणीत गृहिणींचे योगदान सर्वाधिक आहे. त्याचवेळी नवे वर्ष थरथरत्या हाताला देखील आधार देण्याचे काम करेल. ज्यांच्या खांद्यावर बसून जग पाहिले ते थकलेल्या पालकांच्या चेह-यावर हास्य आणतील. या जोडीला आगामी वर्ष हे आरोग्यदायी वातावरण व समाधानी आयुष्य प्रदान करण्याचे काम करेल आणि यात प्रत्येकाचे योगदान असेल, अशी अपेक्षा आहे. कारण ज्येष्ठांच्या चेह-यावरचे हास्य हे सर्वांचे भविष्य सुरक्षित असल्याचा विश्वास मनात निर्माण करणारे असेल. कोरोना संकटाने सामाजिक सुदृढता आणि बांधीलकी निर्माण केली. त्याचवेळी आरोग्याप्रति जागरूकता वाढविण्यास मदत मिळाली.
-डॉ. ऋतू सारस्वत,
समाजशास्त्र अभ्यासक