22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeविशेषनाते मैत्रत्वाचे

नाते मैत्रत्वाचे

एकमत ऑनलाईन

जगातील सर्वात सुंदर नातं, मित्रत्वाचं! सखा किंवा मित्र या शब्दाला, नात्याला बहुपदरी आयाम आहे, अर्थ आहे. मित्र हा एखाद्या भिंतीसारख्या आपला पाठीराखा असतो. त्याला आपली सर्व गुपित माहिती असतात. पण तो ते उघडं करत नाही किंवा त्याचे भांडवल करत नाही. ज्यांना असे मित्र लाभलेले आहेत ते खरंच भाग्यवान म्हणावे लागतील. असतील असे तर ते प्राणपणानं जपा. नसतील तर असे मित्र जोडा! मैत्रीदिनाच्या निमित्तानं दरवर्षी आपण कृष्ण- सुदामा, कृष्ण द्रौपदी, दुर्योधन – कर्ण यांच्या मैत्रीची उदाहरणं आठवतो. आज इतक युग लोटलीत पण आजही ती आदर्श म्हणून दिली जातात. मानली जातात.

दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा मैत्रीदिन किंवा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा होतो. मित्र ही देवाने मानवाला दिलेली विलक्षण भेट आहे. अनेक नाती आपल्याला मिळाली आहेत. यातील काही देैवाने, काही समाजाने, काही जन्माने मिळाली आहेत. या सा-या नात्यांमध्ये सर्वांत वरचे आणि उच्चकोटीचे नाते असे ज्या नात्याविषयी बोलले जाते ते म्हणजे मैत्रीचे नाते. सखा किंवा मित्र या शब्दाला, नात्याला बहुपदरी आयाम आहे, अर्थ आहे. जगातील सर्वांत सुंदर नातं, मित्रत्वाचं! मैत्रीचं नातं जपणं केव्हाही चांगलंच असतं! मित्रत्व ही एक सुंदर कल्पना आहे. या नात्याचे अप्रुप माणसांना तर आहेच पण देवीदेवतांना देखील आहे. कोणत्याही नात्यात मैत्री जपली पाहिजे. मैत्रीत नातं जोडण्याची आणि जपण्याची आवश्यकता नाही. मैत्रीला लेबल्सची पण जबरी नाही! मैत्र या शब्दापासून मैत्री तयार झाली. नात्यात देखील मैत्री जपता येते. कोणत्याही नात्यात मैत्री असली तर समन्वय साधला जातो. मैत्री ही नेहमी साकवाचे म्हणजे पुलाचे काम करते. वयाच्या, स्तराच्या पलीकडे जाते ती मैत्री. विचारांची समन्वयता किंवा समसमान विचारांचीही यासाठी आवश्यकता नसते. कारण या सर्वांच्या पल्याड मैत्री असते. यावरून एक गम्मत आठवली. माझ्याच दोन मैत्रिणींची कथा. त्यातून शिकण्यासारखे काही आहे.

दोघी माझ्याच सख्या! दोघींच्या मुला-मुलीने आपले लग्न ठरविले. खूप आनंदात पार पडले. नजर लागावी इतका सुंदर सोहळा झाला. मुलाकडचे वेगळे, मुलीकडचे वेगळे असे कुठेही वातावरण नव्हते. सारे काही अतिशय उत्साहात, आनंदात कार्य संपन्न झाले. लाडाकोडाचे, कौतुकाचे, नव्या नवलाईचे दिवस संपले. दोन्ही मुलं परदेशात रवाना झाली आणि या दोघी मैत्रिणींच्या एकत्र सहली सुरू झाल्या. काही दिवसांनी एकीच्या घरच्याचा फोन वाजला, ‘आई, आम्ही वेगळे होतोय!’ त्यानेही त्याच्या आईला फोन करून ही बातमी दिली. भारतात दोन्ही घरं हादरली. कोणाचं काय चुकलं याचा विचार करू लागली. एकमेकांची तोंड चुकवू लागली. मनमोकळं करायची हक्काची जागा दोघींनी गमावली. दोघींच्या नव-यांना ही अवस्था बघवत नव्हती. आवडीचे पदार्थ दोघींच्याही घशाखाली उतरत नव्हते. एका भल्या पहाटे त्यातील एकीला रियलाईज झालं की, अरे नातं तर नंतर जुळलं. मैत्री तर आधीपासूनच होती.. आहे. ती कशी इतकी कच्ची, तकलादू? मुलांचं काय? तो त्यांचा विचार? आपणच जाऊन बोललं पाहिजे. ती तर पहिल्यापासून अतिशय हळवी आहे. मी तर कणखर आहे ना? ती नव-याला म्हणाली आपण तिच्याकडे जाऊया का? नवरा हसत होता.

प्रेमानं तिला जवळ घेत म्हणाला, ‘‘मी याच दिवसाची वाट बघत होतो. तिच्याकडेही अशीच परिस्थिती आहे. चल जाऊया. मैत्रीण वाट बघत असेल.’’ आलेल्या वादळातही त्यांच्या मैत्रीचा साकव चिरेबंद होता. अशी कितीतरी निखळ मैत्रीची उदाहरणं देता येतील. इतिहासात, पुराणात, महाभारतात अनेक ठिकाणी मैत्रीची उदाहरणं सापडतात. याच विषयावर मनात आणखी एक विचार प्रकर्षाने जाणवतो. तो तसा नेहमीचा आणि अतिपरिचयाचा विषय! स्त्री-पुरुषांमधील मैत्री! गेल्या कित्येक दशकांमध्ये यावर अतोनात चर्चा झाल्या आहेत. आजच्या मॉडर्न युगातही त्या चर्चा सुरूच आहेत. खरं तर आज जग इतके विस्तारलेय की मुली मुलांच्या बरोबरीने किंवा त्याहूनही जास्त पुढे आहेत. कित्येक व्यवसायांत मुली जास्त दिसतात. अशा वेळी त्यांना स्त्रीमित्रांपेक्षा पुरुष मित्र जास्त असतात. पण तेव्हा त्या मैत्रीची खरंच परीक्षा असते. मित्र आणि प्रियकर या नात्यांमध्ये अतिशय तरल रेषा असते. खरं तर अपोझिट सेक्स मैत्री जास्त हेल्दी असू शकते. मात्र या लक्ष्मणरेषेचे भान बाळगणे गरजेचे आहे. नवरा आणि मित्र यामध्ये कधीही गफलत करू नये. नाहीतर हे नातं हेल्दी राहत नाही.

याखेरीज मैत्रीदिनाच्या निमित्ताने दरवर्षी आपण कृष्ण-सुदामा, दुर्योधन-कर्ण यांच्या मैत्रीची उदाहरणं आठवतो. आज इतकी युगं लोटलीत पण आजही ती आदर्श म्हणून दिली जातात. मानली जातात. आजही द्रौपदीचा सखा कृष्ण म्हणूनच तो सर्वांना परिचित आहे. त्या काळातील द्रौपदी आजच्या स्त्रियांइतकीच प्रगत, तडफदार होती. आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी ती कायम झगडत राहिली. आपल्या अधिकारांसाठी, न्यायासाठी तिचे कायम प्रयत्न राहिले. तिच्या अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे तिने तिचा सखा कृष्णाकडून मिळविलेली आहेत. काही संदर्भ कृष्ण आणि कुंतीच्या नात्याचेही आढळतात. कुंती त्याची आत्या असली तरी ज्येष्ठ सखी होती. त्यांच्या नात्यात मैत्रीचा अनुबंध होता. तोच वारसा कुंतीने आपल्या सुनेला म्हणजे द्रौपदीला दिला. पाच पराक्रमी असूनही तिला कृष्णाचं मित्रत्व आवश्यक वाटलं! आणि ते तिने अखेरपर्यंत टिकवलं. दुस-या कोणत्याही भावनांचे अधिकरण त्यांच्या नात्यात नव्हते! मित्र असावाच असावा. कारण तो एखाद्या भिंतीसारख्या आपला पाठीराखा असतो. त्याला आपली सर्व गुपिते माहिती असतात. पण तो ते उघड करीत नाही किंवा त्याचे भांडवल करीत नाही. ज्यांना असे मित्र लाभलेले आहेत ते खरंच भाग्यवान म्हणावे लागतील. असतील असे तर ते प्राणपणाने जपा. नसतील तर असे मित्र जोडा.
– अरुणा सरनाईक

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या