५ सप्टेंबर हा दिवस ‘शिक्षकदिन’ म्हणून भारतभर साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती, थोर तत्त्वज्ञ व प्राध्यापक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्म दिवस. ५ सप्टेंबर १८८८ रोजी त्यांचा जन्म झाला. वयाच्या केवळ १५ व्या वर्षी त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली… त्यानंतर त्यांनी तत्त्वज्ञान व नीतिशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणूनही काम केले. जगातील नामवंत ऑक्सफर्ड विद्यापीठामध्येही ते प्राध्यापक होते.
आंध्र व बनारस हिंदू विद्यापीठाचे ते कुलगुरूही होते. राष्ट्रसंघात भारताचे त्यांनी सुमारे १९३१ ते १९३९ अशी ८ वर्षे प्रतिनिधित्व केले. १९४९ ते १९५२ या काळात ते रशियात भारताचे राजदूत होते. स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणूनही त्यांची कारकीर्द १९५२ ते १९६२ अशी राहिली. १९६२ ते १९६७ या काळात ते भारताचे राष्ट्रपती झाले. एका शिक्षकाला हा सर्वोच्च बहुमान मिळाला होता.
शिक्षकांच्या प्रति आदर म्हणून राधाकृष्णन यांचा हा जन्म दिवस सर्व भारतभर ‘शिक्षकदिन’ म्हणून साजरा होत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात माता-पित्यानंतर स्थान शिक्षकाचेच असते. त्या दृष्टीने संस्काराचा ठेवा शिक्षकच मुलाला देतात. बालपणी मुलांना घडविण्याचे सामर्थ्य शिक्षकांत असते. शिक्षक हा घटक केवळ शिकवत नाही तर तो आयुष्य व व्यक्तिमत्त्व घडवितो. संस्कारक्षम पिढी तयार करण्याचे महत्त्वाचे काम शिक्षक बजावतात.
थोडक्यात ते मुलांना देशाचे आदर्श नागरिक बनवितात…. हे शिक्षकाचे ऋण आपण मान्यच केले पाहिजे. त्यांना योग्य तो सन्मान व प्रेम द्यावयास पाहिजे. आज अनेक थोर असलेल्या व्यक्तींना शिक्षकांनीच घडविले असल्याचे दिसून येते. नुकतेच दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीसुद्धा आपल्या करिअरची सुरुवात शिक्षकी पेशाने केली होती. आयुष्याला वळण देणारा एक घटक म्हणून शिक्षकांकडे समाजाने पहावयास हवे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंत:करणात शिक्षकांविषयी आदरभाव वाढविणे हीच आजच्या काळाची गरज आहे.
– शांताराम वाघ, पुणे