29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeविशेषअभी नही तो कभी नही

अभी नही तो कभी नही

एकमत ऑनलाईन

महामहीम राज्यपाल महोदयांनी केलेले वक्तव्य ‘गुजराती आणि राजस्थानी मुंबई सोडून गेल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही’ हे अतिशय मार्मिक व येणा-या कालखंडात मराठी तरुणांचे मुंबईतील उद्योग जगतातील अस्तित्वासाठी अतिशय व्यवहारी दृष्टिकोनातून योग्य की अयोग्य याचे चिंतन आकलन करावयास लावणारे आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या असतीलही शंकाच नाही पण महामहीम राज्यपालांनी केलेले वक्तव्य हे वास्तविकतेला धरून आहे. मराठी तरुणांच्या भावनाशील मनाला झोंबणारे व मस्तकात प्रकाश पाडणारे आहे.

वाळवंटातून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राजस्थानने भौगोलिक व नैसर्गिक परिस्थितीवर मात करून कुरकुर न करता बुद्धिकौशल्याने व्यापार आणि एज्युकेशन हब यामध्ये उत्तुंग भरारी घेतली. दोन वेळा सुरत आणि दोन वेळा दिल्ली जिंकलेल्या व कृषी, शिक्षण आरोग्य उद्योग संस्था जागतिक व्यापारी बंदर मुबलक खनिज संपत्ती उपलब्ध असलेल्या व भौगोलिकदृष्ट्या नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या महाराष्ट्राचा इस्रायलच्या संशोधन वृत्तीतून आणि कृतीतून जगातील सर्वोत्कृष्ट हवामान व माती असलेल्या महाराष्ट्राच्या संशोधनशून्य अधोगतीला कोण जबाबदार आहे? एक रुपयामध्ये आयएएस निर्माण करण्याची जिद्द बाळगून गुजरातमध्ये दोन आणि राजस्थानमध्ये दोन भव्यदिव्य इमारती तिथे एका अल्पशिक्षित महत्त्वाकांक्षी व्यक्तींनी उभ्या केल्या आहेत. कल्पनेच्याही पलीकडचे भविष्यातील प्रशासन व्यवस्थेवर मजबूत पकड निर्माण करण्यासाठी केलेला हा संकल्प आहे.

जर अमराठी उद्योजकांनी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असलेल्या या महानगरांमध्ये केलेली गुंतवणूक, कुशल व अकुशल मनुष्यबळ महाराष्ट्राबाहेरील राज्यात गेले तर निश्चितच त्याचा परिणाम सर्व व्यवसाय व आर्थिक राजधानी मुंबईवर तथा आर्थिक उलाढालीवर होणार नाही का? मुंबईचे आर्थिक राजधानीचे प्रस्थ संपणार नाही तर काय होणार? महाराष्ट्रीयन प्रस्थापित राज्यकर्त्यांकडे राजकारणाच्या चष्म्यातून पाहणा-या बड्या बड्या नेत्यांकडे महाराष्ट्रातील मराठी मनाचा उद्योजक मुंबईमध्ये स्थिर राहून उद्योग केले पाहिजे याच्यासाठी काही ब्लू प्रिंट आहे का? कधीच मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे. स्टॉक एक्सचेंज, हॉटेल्स, कन्स्ट्रक्शन, कापड, उद्योग, हि-याच्या एक्सपोर्ट-इम्पोर्ट व्यापारामध्ये गुंतवणूक करणारे मुंबईला पाणी, वीजपुरवठा करणारे किती महाराष्ट्रीयन उद्योजक आहेत? टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी, महिंद्रा असे एक नव्हे डझनभर अब्जाधीश उद्योजक अमराठीच आहेत हो की नाही? मुंबईत याच उद्योजकांचे साम्राज्य आहे. अमराठी उद्योजकांनी विविध क्षेत्रांत गुंतवणूक करून खूप मजबूत जाळे निर्माण केले आहे. व्यवसायातील कौशल्य, सातत्य, व्यवहारचातुर्यता यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. मेहनत वेळ आणि त्याग या सर्व गोष्टींसाठी ते खरोखरच पात्र आहेत.

अमेरिकेसारखा आर्थिक महासत्ता असलेला देश आज कर्जबाजारी आहे. त्यांनी महाराष्ट्रातील महानगरांमध्ये असलेली आयटी क्षेत्रातील आऊटसोर्सिंग जर बंद केली तर आपल्या देशात बेरोजगारांचे कारखाने तयार होतील की नाही? त्यामुळे महाराष्ट्रीयन युवकांनी मुंबई कोणाची मराठी की अमराठी उद्योजकांची? अशा वादात न पडता मराठी उद्योजकांचा टक्का टिकून राहील? याचा विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्रीयन तथा मुंबईतील युवकांसाठी अतिशय गंभीर असा सकारात्मक अल्टीमेटम आहे. अजूनसुद्धा मराठी युवकांनी उद्यमशीलतेच्या दृष्टिकोनातून वास्तव जाणून अहंकाराच्या भावनेतून संकुचित वृत्तीच्या दुनियेतून बाहेर येऊन आऊट ऑफ बॉक्स चिकित्सक बुद्धीने विचार करण्याची वेळ आलेली आहे. रिटेल व्यापार, लघु उद्योग, कृषी उद्योग, शिक्षण, आरोग्य, स्टार्टअप कंपनी कन्स्ट्रक्शन, मेडिसिन इंडस्ट्री, कापड उद्योग, मॅन्युफॅक्चरिंग हब, एज्युकेशन हब, बँकिंग ई-कॉमर्स, मार्केटिंग कम्युनिकेशन स्किल, आयटी क्षेत्रामध्ये मराठी उद्योजकांनी आत्मविश्वासपूर्वक कौशल्य शिकून घ्यावे अन्यथा महाराष्ट्रीयन तरुणांसाठी व्यवसाय सोपा नसेल म्हणून मजबूत इच्छाशक्तीने व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून स्पर्धेत उतरल्याशिवाय पर्याय नाही .

प्रस्थापित राजकीय प्रशासकीय व्यवस्थेने महाराष्ट्राबाहेरील उद्योजकांना व्यावसायिकदृष्ट्या अदृश्य शक्ती दिली हे वास्तव नाकारता येणार नाही. मराठी तरुणांच्या हाताला रोजगार देऊन चुली पेटवण्यापेक्षा त्यांची माथी भडकवली जात आहेत. गुणवत्तापूर्ण, कौशल्यपूर्ण शिक्षण देऊन त्यांच्यातील ऊर्जा विघातक कृतीसाठी घालवण्यापेक्षा त्यांच्यातील कौशल्य विधायक कामासाठी वापरले तर मराठी माणसाचे अस्तित्व देशासमोर वेगळेच दृष्य दिसेल. महाराष्ट्रीयन मुलांना आत्मविश्वास, महत्त्वाकांक्षा, जिद्द आणि गुणवत्ता असतानासुद्धा पैशाअभावी उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे.
बाहेरील राज्य उद्योजकांना सकारात्मक वातावरण निर्माण करून देऊन गुंतवणूक करण्यासाठी परवानगी, वीज, पाणी, अल्प दरात, टॅक्सेसशिवाय प्रशासन स्तरावर सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देत आहेत त्यामुळे उद्योजक त्यांची महाराष्ट्रातील गुंतवणूक कमी करून इतरत्र त्यांचे प्लांट स्थलांतर करत आहेत म्हणून येणा-या काळात महाराष्ट्रीयन युवकांवर बेरोजगारीचा हातोडा बसणार आहे आणि याच संधीचा फायदा घेऊन मराठी युवकांनी उद्योग क्षेत्रात गुंतवणूक करून स्पेस निर्माण करण्याची गरज आहे.

आर्किटेक्ट अभ्यासक्रमामध्ये समावेश असलेला यशस्वी उद्योजक डी. एस. के. बांधकाम व्यवसायातून कसा संपवला? मात्र राजसत्ता टिकवण्यासाठी दिवसरात्र झटणा-यांनी, धडपडणा-यांनी डी. एस. के. सारखे नामवंत मराठी उद्योजक संकटात असताना कोणीतरी मराठी मनाच्या प्रस्थापितांनी समन्वयकाची भूमिका घेतली असती तर जनतेच्या ठेवीचा प्रश्न निकाली निघाला असता आणि डी. एस. के. सारख्या उद्योजकांनी उद्योग क्षेत्रात भरारी घेतली असती. मराठी उद्योजकांची कुचंबणा होताना दिसत आहे त्यामुळे मराठी युवकांनी स्वत:मधील उणीवा दूर करून मार्केटिंग स्किल, व्यावसायिक दृष्टिकोन, कम्युनिकेशन स्किल, परस्पर संबंध, सहकार्याची भूमिका आणि व्यावसायिक दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे. एकमेकांना पाण्यात बघून खेकड्याप्रमाणे पाय ओढून खच्चीकरण करून एकमेकांना संपवण्यापेक्षा उद्योग क्षेत्रात गुंतवणूक करून भक्कम स्थान निर्माण केले पाहिजे अन्यथा येणारा काळ हा पुढच्या पिढीसाठी धोक्याची घंटा असणार आहे याकडे कानाडोळा करून चालणार नाही .जर अमराठी उद्योजकांनी गुंतवणूक काढून घेतली तर मात्र आर्थिक राजधानीचे प्रस्थ संपायला वेळ लागणार आहे का? युवकांनो आपल्यातील नैराश्य बाजूला ठेवून व्यवसाय, उद्योग क्षेत्रात जिद्दीने व्यवहारचातुर्यतेने दमदार पाऊल ठेवून यशस्वी उद्योजक व्हा! ‘अभी नही तो कभी नही’

-अशोक गोविंदराव देवकते मोबा.: ७०८३५ ४३०१३

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या