23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeविशेषअभिमन्यू चलता गया.. कारवॉं बनता रहा...

अभिमन्यू चलता गया.. कारवॉं बनता रहा…

एकमत ऑनलाईन

औसा मतदार संघाचा आमदार माझा मित्र अभिमन्यू पवार यांनी एक हजार किलोमीटरचे रस्ते, एक हजार जनावरांचे गोठे, एक हजार फळबाग लागवड योजनेचा शुभारंभ करण्याचे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण सोहळ्याचे आयोजन औसा येथे शनिवारी करण्याचे योजिले आहे. एक रस्ते विकासाचा आदर्श पॅटर्न निर्माण करणारा हा आमदार आज महाराष्ट्राच्या विकासात्मक नकाशावर झळकताना दिसत आहे. या सगळ्या गोष्टी घडत असताना गतकाळातल्या अनेक गोष्टी डोळ्यासमोरून तरळून जात आहेत. निवडणुकीपासून ते आतापर्यंत या माणसाच्या पाठीशी जनता कुठलाही विचार न करता उभी राहत आहे. जात, पात, धर्माच्या पलीकडे लोक अभिमन्यूवर प्रेम करत आहेत..’माझा कोणीही मेडियटर नाही, माझा कोणी दलाल नाही’ ही त्याची घोषणा लोकप्रिय होत चालली आहे.

सत्ता नसताना अभिमन्यू शांत बसून नाही, कोरोनाच्या काळात पायाला भिंगरी लावून हा माणूस फिरला. सत्ता नसतानाही मतदारसंघात नवनवीन संकल्पना राबवून त्यांनी सतत काम आणले..लोकांना काय महत्वाचे आहे हे सांगत त्यांनी शेतरस्त्याची चळवळ उभी केली..वर्षानुवर्षे बंद पडलेले शेतरस्ते जनतेला खुले करून दिले. गावागावातील भांडणे या निमित्ताने थांबले. जे रस्ते कठीण वाटत होते ते रस्ते स्वत:हून शेतक-यांनी खुले करून दिले, काही ठिकाणी अडवणूक झाली. मात्र, जनतेने यात राजकारण केले नाही. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत ज्यांच्या राशी उन्हाळ्यात व्हायच्या, त्यांना मोकळा श्वास मिळाला. आज मातीकामाच्या निमित्ताने का होईना मार्ग मोकळा झाला. उद्या त्याचे मजबुतीकरण होईल, रस्ते वाहून जातील म्हणून टीका करणा-यांच्या थोबाडीत बसली. काही तरी रुजूवात झाली, याला महत्व निर्माण झाले. एक लोकचळवळ उभी राहिली, अनेक शेतकरी स्वत: बॉण्ड बनवून आमदाराकडे येऊ लागले. बँड वाजवून, फटाके फोडून स्वागत सुरू झाले..ज्याच्यासाठी जनतेने आमदार स्वीकारला, त्याची सुरुवात झाली, पहिल्या चार महिन्यांत सहाशे किलोमीटर रस्ते तयार झाले, महाराष्ट्रासमोर नव्हे तर देशासमोर हा विक्रम अभिमन्यूने रचला..

शेतरस्ते करणारा ब्रँड अँबेसेडर म्हणून जनतेनेच पदवी बहाल केली. सत्ता नाही म्हणून आमदार रडत नाही बसला, आता पुन्हा नवीन संकल्पना पुढे आणली, एमआरजीएसमध्ये दहा लाखाचे पॅकेज शेतक-यांसाठी आणले आहे..त्यात शेततळे, अस्तरीकरणासह ठिबक, जनावरांचा गोठा, नाडेफ आदी गोष्टीचा समावेश आहे.सोबतच तुती आणि बांबू लागवडीसाठी शेतक-यांना आग्रह धरला जात आहे. निवडणुकीच्या काळात ज्या अपेक्षेने लोकांनी अभिमन्यूला निवडून दिले, तो अभिमन्यू आता काम घेऊन गावाच्या दारात स्वत:चा आमदार फंड घेऊन जात आहे.. रस्ते विकासाचा हा जनक देशाच्या नकाशात चमकेल, यात शंका नाही.

एखाद्या कामाची लोकचळवळ उभारायची, ती राबवण्यासाठी सगळ्या अधिका-यांना सोबत घ्यायचे, शेतक-यांच्या दारात जाऊन प्रबोधन करायचे, महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांना बोलावून त्यातले बारकावे टिपायचे आणि ही लोकचळवळ मोठी करण्यासाठी प्रयत्न करायचे, यासाठी हा आमदार प्रयत्न करत आहे. अभिमन्यू नेहमी म्हणत आला आहे, एक रेष आपण मारायची, त्यापुढे ती रेषा मोठी करण्याची जबाबदारी जनतेवर सोपवून त्यांच्याकडून करून घ्यायचे आणि त्याची लोकचळवळ उभारायची यासाठी धडपडणारा हा आमदार जनतेत लोकप्रिय होताना दिसत आहे. अण्णा हजारे, पोपटराव पवार, भास्करराव पेरे पाटील, सुधीर मुनगंटीवार, बबनराव लोणीकर, संभाजीराव पाटील निलंगेकर, रमेशअप्पा कराड, पंकजाताई पालवे मुंडे, विनोद तावडे, जयसिद्धेश्वर महाराज इत्यादी मान्यवरांनी चित्रफितीच्या माध्यमातून वरील कार्याचे कौतुकही केले आहे.

कोरोनाच्या संकटात सतत जनतेच्या कामात, अत्यंत कडक अशा लॉकडाऊनमध्ये मी एकदा फोन केला. एक महिला पोटात कळा सुरू झाल्याने पुण्याहून निघालेली. माझ्या मित्राची बायको.सगळे कुटुंब हैराण झालेले. मित्र अगोदरच लातुरात आलेला, त्याची आई, वडील आणि बायको इंदापूरला अडकले. मी फोन केला. सांगितले काहीही कर पण हे कुटुंब त्या पोलिसांकडून सुटून लातुरात यायला हवे. पंधरा मिनिटांनी मला फोन आला, त्या सगळ्यांचा पास पुण्यात बनतोय आणि इंदापूर पोलिसात निरोप येतोय, ते अर्ध्या तासात तिथून सुटतील आणि आश्चर्य म्हणजे हे कुटुंब पंधरा मिनिटातच लातुरकडे रवाना झाले.या दरम्यान अभिमन्यूने पुण्याच्या कमिशनरशी बोलून पाच मिनिटात हे काम मार्गी लावले होते.

एक उदाहरण मी यासाठी सांगितले की, अभिमन्यू मुंबईत मुख्यमंत्र्यांचा पी. ए. म्हणून गेला आणि त्याने पाच वर्षात फक्त चांगले संबंध तयार केले. महाराष्ट्रातील कुठल्याही पोलिस ठाण्यात अभिमन्यूने फोन केला आणि त्याचे काम समोरच्याने नाही केले असे होत नाही. अधिका-यांशी एक चांगले नाते त्यांनी निर्माण केले.आज औशाचा आमदार म्हणून तो काम करतोय, ही औसेकरांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. मैत्री ही त्याची संपत्ती. केशवराज शाळेपासून ते अगदी उच्च शिक्षण घेत असतानाचेही मित्र त्याच्यासाठी वाट्टेल ते करायला धावत असतात. एका जनता दरबाराला मी मुद्दामहून उपस्थित होतो. काही जवानांच्या विधवा पत्नी आपल्या व्यथा तिथे घेऊन आल्या होत्या. मी सगळे संभाषण ऐकत होतो. कार्यक्रमानंतर मी तो गाडीत असताना फोन केला. म्हटले अरे त्या विधवा महिलेचा प्रश्न तुझ्याने सुटणार आहे का? खूप आशा घेऊन लोक तुझ्याकडे येत आहेत, तू या लाल फितीच्या कारभारात कुठे कसा पुरणार आहेस? तो म्हणाला, मी नक्की त्यांना न्याय देईन. अरे मला कामासाठीच निवडून दिले आहे. माझ्या घरात राजकारणाचा कुणीही वारसदार नाही. एका शिक्षकाच्या मुलाला लोक निवडून देतात, मला कामच करावे लागेल. त्याचा हा आत्मविश्वास त्याला खूप मोठा करणार आहे.

सत्ता येतील जातील, आपण ज्यासाठी निवडले गेलो आहोत, त्याला न्याय मिळाला पाहिजे. मध्यंतरी अंतर्गत गटबाजीवर त्याच्याशी बोलत होतो. तो म्हणाला,’मी सगळ्यांना एक करणार. निवडणुका संपल्या, कसली गटबाजी. आम्ही एकत्रित जिल्हा बांधणार.आणि निलंगा येथून त्याची सुरुवातही त्यांनी करून टाकली. इतके सहज, साधे राजकारणात जगता येत नाही. अनेक आडाखे बांधत राजकारण सुरू असते, अभिमन्यू म्हणूनच सगळ्यांपेक्षा त्यासाठीच वेगळा आहे. कामाचा प्रचंड आवाका असलेला, या कानाचे त्या कानाला न सांगू देता सगळ्यांची काळजी घेणारा, कार्यक-यांना आर्थिक पाठबळ देणारा, कोट्यवधीची कामे मतदारसंघात खेचून आणण्याची किमया असलेला, कल्पक आणि प्रभावी कामाचे नियोजन करणारा, एक संघर्षयात्री आमदार आहे. मैत्रीसाठी काहीही सहन करणारा, दिलेला शब्द पाळणारा, होत असेल तर होते म्हणून सांगणारा आणि होत नसेल तर शक्य नाही यार, म्हणून सांगून टाकणारा पारदर्शक राजकारणी आहे.

अधिका-यांना हवाहवासा वाटणारा, माणसे गोळा करण्यात हातखंडा असलेला, कामाचा निपटारा करणारा, कितीही कामे असली तरी सांगितलेले काम आठवणीत ठेऊन करणारा अभिमन्यू एक सजग मित्र आहे. मनरेगाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास करता यावा, यासाठी औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी १३ ऑक्टोबर रोजी एका कार्यशाळेचे आयोजन केले होते.ही महाराष्ट्रातील पहिली कार्यशाळा होती. यापूर्वी त्यांनी झूमद्वारे अशी कार्यशाळा घेवून एक अभिनव उपक्रम राबवला होता. आता सगळयांना एका ठिकाणी बोलावून ही कार्यशाळा संपन्न केली.आमदार अभिमन्यू पवार झपाटल्यासारखे तालुक्याच्या विकासात आपले योगदान देत आहेत. ग्रामीण भागातील शेतक-यांच्या आयष्यात आर्थिक क्रांती घडवून आणण्यासाठी ते वेगवेगळे प्रयोग करू पाहत आहेत. तुती लागवडीच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या गोष्टी शेतक-यांच्या आयुष्यात आणण्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न, कोरोना झाला नसला तरी तोही शेतक-यांना सजग करून यशस्वी करण्याचा त्यांचा मानस आजही आहे. आज कोरोनाने देश आर्थिक संकटात आहे. ग्रामीण विकास ठप्प झाला आहे. अशा परिस्थितीत मनरेगा हा आशेचा किरण आहे. सरकार यासाठी प्रचंड निधी उपलब्ध करून देत आहे. मात्र काही तांत्रिक अडचणी या विकासाचा अडसर आहेत.

कुशल आणि अकुशल कामगारांच्या पैश्यात होणारी गैरसोय या कार्याला खीळ आणणारी आहे. मात्र ही योजनाच गावोगाव मजुरांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी असल्याने त्यातून कोणालाही पळवाट शोधता येणार नाही. सरपंचांना आपल्या गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ही योजना नक्कीच कायापालट घडवून आणू शकते.अह्याजही म्हणावा तितका विकास गावाचा झालेला नाही.सरकार दरबारी चकरा मारून चपला झिजवणा-या पुढा-यांना ही नवसंजीवनी ठरणार आहे. त्यासाठी डोक्यातून गुत्तेदारी बाहेर मागेल त्यासाठी विकास डोक्यात ठेवावा लागेल. आपसातील मतभेद बाजूला ठेवून सर्वांगीण विकासाचा आराखडा बनवावा लागेल. गावातील मजूर, कामगारांना यात सहभागी करून घेवून संपूर्ण विकास साधावा लागेल. छोट्या छोट्या विकासकामांना प्राधान्य देवून हा विकास साधता येईल. कोरोनामुळे देश संकटात आहे. विकासासाठी गरज पैशाची असते. या माध्यमातून सरकार प्रचंड पैसा खर्च करणार आहे. फक्त दृष्टी ठेवून काम करणा-या माणसाची गरज आहे. यातून गुत्तेदार घडणार नाही. मात्र समाजसेवक घडू शकतो. त्याने सुंदर आराखडा बनवून काम करावे लागेल. आमदार अभिमन्यू पवार सातत्याने नवनवीन विचार घेवून तालुक्याच्या विकासाच्या संकल्पना राबवत आहेत. त्यांच्यात पैसा खेचून आणण्याची ताकद आहे. त्यांच्या ओळखीचा फायदा अनेकांना या निमित्ताने होणार आहे.राजकीय जोडे बाहेर ठेवून सगळ्यांनी एकत्र येवून या विकासकामात झोकून द्यायला हवे. सरपंचांनी यात मोठ्या संख्येने सहभाग घेऊन हा विकासरथ पुढे न्यावा लागणार आहे.

-संजय जेवरीकर
ज्येष्ठ पत्रकार,सरपंच

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या