24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeविशेषअभिनयसम्राट दिलीपकुमार

अभिनयसम्राट दिलीपकुमार

एकमत ऑनलाईन

मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये एके काळी फळे विकणारा यूसुफ सरवर खान कधी काळी रूपेरी पडद्यावरील अभिनयसम्राट होईल हे त्या वेळी यूसुफ खानला कधी वाटले असेल का? हा एक प्रश्नच आहे. यूसुफ सरवर खान हे आहे दिलीपकुमारचे खरेखुरे नाव. पाकिस्तानातील पेशावर शहराच्या मोहल्ला खुदादाद भागात दिलीपकुमारचा जन्म सोमवार, दि. ११ डिसेंबर १९२२ रोजी झाला.त्यांचे वडील फळविक्रीचा व्यवसाय करीत होते.

भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने १९४४ ते १९४७ ही तीन वर्षे महत्त्वाची ठरली. या तीन वर्षांत पुढील काळात इतिहास घडवणारे दिलीपकुमार-राज कपूर-देव आनंद ही त्रिमूर्ती चित्रपटसृष्टीत प्रवेश करती झाली. देविकाराणीने यूसुफ खान नावाच्या फळविक्रेत्याला दिलीपकुमार बनवून ‘ज्वार भाटा’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत प्रवेश मिळवून दिला.

सुरुवातीच्या काळात ‘ज्वार भाटा’नंतर त्यांनी ‘जुगनू’, ‘अंदाज’, ‘मेला’ या चित्रपटांत अभिनय सादर केला. देविकाराणी यांच्या बॉम्बे टॉकीज या कंपनीत दिलीपकुमार यांनी त्या काळी १२५० रुपये महिन्यावर काम केले. नियमितता व शिस्तपालनासाठी नामांकित असणा-या दिलीपकुमारांना त्यांच्या प्रारंभीच्या कारकीर्दीत अनेकदा दंड भरावा लागला होता. अर्थातच हा दंड देविकाराणी यांनीच ठोठावला होता. स्टुडिओत एकदा प्रवेश केल्यानंतर बाहेर जायचे नाही तसेच स्टुडिओत धूम्रपान करायचे नाही असा नियम घालून दिला असतानाही दिलीपकुमार यांनी याचे पालन न केल्याने त्यांना अनेकदा १०० रुपये दंड भरावा लागला होता.

दिलीपकुमार यांनी जवळजवळ ६० हून अधिक चित्रपटांत अभिनय सादर केला. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी अभिनयास सुरुवात केली. आपल्यापेक्षा २२ वर्षांनी लहान असलेल्या सायरा बानू हिच्याशी रविवार, दि. ११ ऑक्टोबर १९६६ रोजी त्यांनी लग्न केले. दिलीपकुमार यांना मूलबाळ होत नसल्या कारणाने त्यांनी हैदराबादेत फेब्रुवारी १९८२ मध्ये आसमा साहिबा यांच्याशी निकाह लावला. त्यांचे आसमा साहिबांशी असलेले वैवाहिक संबंध जास्त काळ टिकू शकले नाहीत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर उदयाला येण्याआधी सिनेजगतात गायिका शमशाद बेगम यांचा दबदबा होता. शमशाद बेगम या दिलीपकुमारच्या आजी सासू. त्यांची कन्या नसीम बानू. नसीम बानूची कन्या सायरा बानू.

दिलीपकुमार हे केवळ हिंदी चित्रपटाचे महानायक व अभिनयसम्राटच नाहीत तर ते महान सामाजिक कार्यकर्तेही होते. मुंबईचे शेरीफ पद त्यांनी भूषविले. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे एकदा भर सभेत विनोदाने म्हणाले होते की, अफाट लोकप्रियता मिळवायला मी काही दिलीपकुमार नाही. दिलीपकुमारच्या लोकप्रियतेची ही जणू काही पावतीच होती. ‘गंगा जमना’या चित्रपटात दिलीपकुमार यांनी हिंदू नायक साकारला होता. तेव्हा ते मंदिरात गेले त्याबद्दल काही कट्टर मुसलमानांनी त्यांची बदनामी तर केलीच पण त्यांच्या घरावर दगडफेकही करण्यात आली होती. सिनेरसिकांना दिलीपकुमार आपल्याकडे चुंबकासारखे खेचून घेत असत. दिलीपकुमार यांनी कित्येक वर्षे स्वत:ला सामाजिक सेवेत झोकून दिले होते. गरिबांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी किंवा मूत्रपिंडाच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांनी सढळ हस्ते लाखो रुपयांची मदत दिली आहे. त्या मदतीचे त्यांनी कोठेही स्तोम माजविले नाही. अगदी विनम्रपणे ते प्रसिद्धीपासून कोसो दूर राहिले. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा म्हणावा लागेल.

‘बैजू बावरा’,‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘संगम’ या चार चित्रपटांसाठी दिलीपकुमारला भूमिकेबद्दल विचारण्यात आले असता दिलीपकुमार यांनी त्याला नकार दिला होता. पुढे त्यांना या नकाराबद्दल पश्चात्तापही झाला होता. दिलीपकुमारचे अनेक चित्रपट तुफान गाजले. ‘मुगल-ए-आझम’, ‘कोहिनूर’, ‘आदमी’, ‘नया दौर’, ‘देवदास’, ‘यहुदी’, ‘पैगाम’, ‘मधुमती’, ‘राम और श्याम’, ‘लीडर’, ‘दिल दिया दर्द लिया’, ‘संघर्ष’, हे त्यांचे तुफान यश मिळविलेले व्यावसायिक चित्रपट होते.
दिलीपकुमार आणि सायरा बानू या जोडगोळीने ‘गोपी’, ‘सगीना’, ‘बैराग’ या चित्रपटांत अभिनय सादर केला. ‘सगीना’ वगळता वरील दोन्ही चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या कमालीचे यशस्वी ठरले आहेत.

देविकाराणी व हिमांशू रॉय यांच्या ‘बॉम्बे टाकीज’ या कंपनीने तयार केलेले दिलीपकुमार यांचे चित्रपट अयशस्वी ठरल्यामुळे त्यांचा सख्खा भाऊ नासिर खान यांना आगामी चित्रपटांमध्ये घेण्यासाठी कंपनीच्या हालचाली सुरू झाल्या. नासिर खानने फिल्मिस्तानच्या ‘मजदूर’ (१९४५) मध्ये सिने कारकीर्द सुरू केली. त्यानंतर दिलीपकुमार व नासिर खान हे ‘गंगा जमना’ या चित्रपटात सख्ख्या भावांच्या भूमिकेत चमकले. दुर्दैवाने नासिर खान यांना दिलीपकुमारएवढे यश मिळू शकले नाही.

‘देवदास’ चित्रपटामुळे ‘ट्रॅजेडीकिंग’चा शिक्का दिलीपकुमार यांच्यावर बसला. दिलीपकुमार यांनी अनेक चित्रपटांतून हलक्याफुलक्या विनोदी भूमिका उत्तमरीत्या रंगविल्या. त्या भूमिकांना तोड नव्हती. त्यामुळे दिलीपकुमार अष्टपैलू कलाकार बनले. दिलीपकुमार यांना अभिनयाची एक संस्था म्हणूनही ओळखले जायचे. त्या काळी अभिनय सादर करताना कलाकार तसे प्रत्यक्षात भूमिका जगत असत. म्हणूनच आजही त्यांचे चित्रपट आवर्जून पहावेसे वाटतात. दिलीपकुमार यांना १९९१ साली भारत सरकारने पद्मभूषण या पदवीने सन्मानित केले होते. तर २०१५ साली त्यांना पद्मविभूषण ही पदवीही बहाल केली होती. आता दिलीपकुमारसारखे कलाकार होणे नाही. वयाची ९८ वर्षे ६ महिने त्यांनी पूर्ण केली. ‘प्रोटेस्ट कॅन्सर’ या आजाराने ते त्रस्त होते. त्यांना श्वसनाचाही त्रास होता. बुधवार, दि. ७ जुलै २०२१ रोजी सकाळी ७.३५ वा. दिलीपकुमार यांची मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. मृत्युसमयी त्यांच्याजवळ सायरा बानू, मधुर भांडारकर, शबाना आझमी हजर होते.

-शरद वा. खर्चे
मोबा. : ९६६५५ ९९५५५

बनावट सीबीआय अधिका-यास अटक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या