सध्याचं युग हे यांत्रिकीकरणाचं युग आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये. प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने यांत्रिकीकरण होताना दिसतेय. अर्थातच कृषि क्षेत्र देखील याला अपवाद नाही. अद्ययावत स्वरूपाच्या आधुनिक यंत्रांमुळे शेतीची खुरपणी, कापणी, मळणी, लावणी, काढणी आणि पीक काढणी पश्चातची अनेक शेतीची कामे झपाट्याने होऊ लागलेली दिसतात. अर्थात त्यामुळेच श्रम, वेळ आणि पैशाची देखील मोठी बचत होतेय. कृषि क्षेत्रातील हे अद्ययावत यांत्रिकीकरण विकसित करण्यात कृषि विद्यापीठातील संशोधन विभागाचे फार मोलाचे योगदान आहे. मंडळी, कृषि क्षेत्रातील याच यांत्रिकीकरणाचा आजच्या कार्यक्रमात धांडोळा घेणार आहोत आणि नव्याने विकसित केलेल्या यंत्रांबद्दल विष्णू साळवे, कृषि उपसंचालक -कृषि यांत्रिकीकरण, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याशी साधलेला संवाद.
रा ज्यात कृषि यांत्रिकीकरण उप अभियान
-राज्यात सन २०१४-१५ पासून कृषी यांत्रिकीकरण उप अभियान ही योजना राबविण्यात येत आहे. ही योजना राबविण्यामागे एकूण चार उद्देश नजरेसमोर ठेवण्यात आलेले आहेत.
कृषि क्षेत्रात नेहमीच आढळून येणा-या शेतमजुरांच्या समस्येवर मात करणे.
शेतीच्या मशागतीचा खर्च कमी करून उत्पादन खर्चात बचत करणे.
कृषि क्षेत्रात शेतीच्या विविध स्वरूपाच्या कामासाठी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व पर्यायाने उत्पादनात वाढ करणे.
कृषि यांत्रिकीकरण सेवा सुविधा केंद्रे स्थापन करून शेतक-यांना कृषि यांत्रिकीकरणाची माफक दराने सुविधा उपलब्ध करून देणे व त्याद्वारे रोजगारनिर्मिती करणे.
या योजनेत कोणकोणत्या घटकांचा समावेश आहे?
केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार या योजनेत एकूण आठ घटकांचा समावेश आहे. त्यापैकी राज्यात तीन घटकांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रशिक्षण, परीक्षण व प्रात्यक्षिकाद्वारे कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन व बळकटी देणे, प्रात्यक्षिके, प्रशिक्षण व काढणी पश्चात तंत्रज्ञान व व्यवस्थापन, शेतक-यांना कृषि यंत्रे व अवजारे खरेदीसाठी अर्थसाहाय्य.
घटक ३ अंतर्गत शेतक-यांना अवजारांसाठी अर्थसाहाय्य – घटक क्रमांक तीन शेतक-यांना विविध प्रकारची कृषि यंत्रे व अवजारे खरेदी अर्थसाहाय्य देण्याशी निगडीत आहे. यात एकूण सात प्रकारच्या यंत्र अवजारांसाठी अर्थसाहाय्य देण्यात येते.
१. ट्रॅक्टर ( ८ ते ७० ऌढ) – १.० ते १.२५ लाख अनुदान
२. पॉवर टिलर ( ८ ऌस्र पेक्षा कमी अथवा जास्त) (किमतीच्या ५० टक्के अथवा १.०० ते १.२५ लाख जे कमी असेल ते)
३. स्वयंचलित यंत्रे ( किमतीच्या ५०/४० टक्के)
४. ट्रॅक्टर/पॉवर टिलर चलित यंत्र अवजारे -(किमतीच्या ५०/४० टक्के)
५. मनुष्य चलित/बैल चलित यंत्र अवजारे(किमतीच्या ५०/४० टक्के)
६. काढणीत्तोर यंत्रे उपकरण (अन्नधान्य/गळीत धान्य/फलोत्पादन)(किमतीच्या ५०/४० टक्के)
७. पीक संरक्षण उपकरणे – किमतीच्या ५०/४० टक्के)
निवडक गावात कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन
– निवडक गावात कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन या घटकाला कृषि कल्याण अभियान असेही म्हटले जाते. केंद्र शासनाद्वारे देशामध्ये १११ विशिष्ट जिल्ह्यांची या प्रकल्पासाठी निवड केलेली आहे. त्यांना आकांक्षित जिल्हे असे म्हटले जाते. आपल्या राज्यातून नंदुरबार व गडचिरोली हे दोन आदिवासी बहुल जिल्हे तर उस्मानाबाद व वाशीम हे कोरडवाहू क्षेत्रातील दोन जिल्हे अशी एकूण चार जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. कृषि कल्याण अभियान हा तीन वर्षांचा कार्यक्रम आहे. यात या चार जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यातून प्रति वर्ष २ याप्रमाणे अवजारे बँक स्थापनेसाठी या एकाच घटकासाठी अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेची खास बाब म्हणजे हा घटक राबविण्यासाठी एकूण खर्चाच्या ८० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
-संकलन-संयोजन : सुशीलकुमार
मोबा. ९६१९५ ८२८३५