25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeविशेषअर्थव्यवस्थेला आधार कृषी क्षेत्राचाच!

अर्थव्यवस्थेला आधार कृषी क्षेत्राचाच!

शेतक-यांनी रब्बी हंगामातील ९१ टक्के तेलबिया, ८३ टक्के ऊस, ८२ टक्के डाळवर्गीय पिके, ७७ टक्के मका आणि ज्वारी तसेच ३१ टक्के गव्हाची कापणी आतापर्यंत पूर्ण केली आहे. देशात अन्नधान्याची गोदामे पुन्हा एकदा तुडुंब भरणार आहेत. अन्नधान्याचे उत्पादन अंदाजापेक्षा अधिक झाले आहे. यावर्षी मान्सून सरासरीएवढा राहील असा अंदाज आहे. म्हणजेच कोरोनाकाळात सर्व क्षेत्रे लडखडत असताना कृषी क्षेत्र अर्थव्यवस्थेला आधार देणारे ठरले आहे.

एकमत ऑनलाईन

‘रबी रब के हाथ में होती है,’ अशी हिंदी पट्ट्यात एक म्हण आहे. म्हणजेच, रब्बी हंगामातील पिके निसर्गाच्या मनात असेल तरच चांगली येतात. जर निसर्गाच्या मनात नसेल तर रब्बी हंगाम साथ देत नाही, असे शेतकरी मानतात. यावर्षी खरीपाबरोबरच रब्बी हंगामावरही निसर्गाची कृपादृष्टी राहिली. खरीप हंगामादरम्यान अधूनमधून पाऊस पडत राहिला. त्याचप्रमाणे रब्बी हंगामादरम्यानही निसर्गाने चांगली साथ दिली. शेतात रब्बीची पिके तरारलेली पाहून शेतकरी आनंदी दिसत आहे. भारतीय अर्थव्यवस्था मूलत: शेतीवर आधारित आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्र किती महत्त्वाचे आहे, याचा अंदाज घ्यायचा झाल्यास कोरोनाकाळात सर्व क्षेत्रे जेव्हा लडखडली, तेव्हा कृषी क्षेत्रात वाढ झाली, एवढ्यावरून घेता येईल.

गेल्यावर्षी म्हणजे २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे आर्थिक वर्षाची सुरुवातच लॉकडाऊनमध्ये झाली. यादरम्यान सर्व आर्थिक घडामोडी थंड पडल्या. राष्ट्रीय सांख्यिक कार्यालयाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जेव्हा सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) प्रचंड घसरण आली, तेव्हा त्याच काळात केवळ कृषी क्षेत्रात वृद्धी नोंदविली गेली. कोरोना संसर्गाच्या विनाशकारी काळात मृतदेह घेऊन जाणा-या रुग्णवाहिकांच्या सायरनचे आवाजच केवळ रस्त्यावर ऐकू येत होते. जागोजागी निर्बंधांमुळे लोक घरात बंदिस्त होते. महानगरे आणि शहरांमधील सतत वर्दळ असणारे रस्ते ओस पडले होते. सगळीकडे सामसूम होती; परंतु भारतीय शेतकरी त्याही वेळी शेतात काम करीत होता. आर्थिक उदारीकरणाचा काळ सुरू झाल्यानंतर भारताचे कृषी क्षेत्र बाजारमूलक अर्थव्यवस्थेच्या चक्रात आंतरिक ताकदीच्या बळावर सातत्याने उत्पादन वाढवीत आहे. भारतीय शेतक-यांच्या उद्यमशीलतेची ओळख यावरूनच पटते. कोरोनाकाळात कुणाला फारसे उपाशी राहावे लागले नाही, याचे श्रेय भारतीय शेतक-याला आहे.

कोरोना महामारीच्या काळात रब्बी हंगामही चांगला झाला असून, रब्बीच्या ५५ टक्के पिकांची कापणी पूर्ण झाली आहे ही भारतासाठी चांगली बातमी आहे. पुढील दोन-तीन आठवड्यांत रब्बी पिकांची कापणी पूर्ण होईल. मान्सूनच्या आगमनापूर्वी पुढील पिकांसाठी शेतीची मशागत करण्यास शेतक-यांना पुरेसा वेळ मिळेल. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शेतक-यांनी आतापर्यंत ९१ टक्के तेलबिया, ८३ टक्के ऊस, ८२ टक्के डाळवर्गीय पिके, ७७ टक्के मका आणि ज्वारी तसेच ३१ टक्के गव्हाची कापणी पूर्ण केली आहे. देशात अन्नधान्याची गोदामे पुन्हा एकदा तुडुंब भरणार आहेत. अन्नधान्याचे उत्पादन अंदाजापेक्षा अधिक झाले आहे. यावर्षी मान्सून सरासरीएवढा राहील असा अंदाज आहे. अ‍ॅम्युवेदर या अमेरिक माध्यम कंपनीच्या अहवालानुसार भारतात जून ते सप्टेंबर यादरम्यान चार महिने एल नीनो आणि एल नीना पॅटर्नची शक्यता नसल्याने सरासरीएवढा पाऊस होईल. या चार महिन्यांत पाऊस सरासरीइतका झाला असे केव्हा म्हणतात? जेव्हा तो सरासरीपेक्षा ९६ टक्के ते १०४ टक्के एवढा पडतो तेव्हा! जगभरात वाणिज्यिक हवामानाचा पूर्वानुमान बांधणा-या कंपनीच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे असे आहे की, यावर्षी भारतात दुष्काळ पडण्याची चिन्हे दिसत नाहीत. सरासरीएवढा पाऊस पडणार, हीसुद्धा शेतीसाठी अत्यंत उत्साहवर्धक बातमी आहे.

नवर्याच्या मृत्युची बातमी कळताच, एका मुलासह पत्नीने तळ्यात उडी मारून केली आत्महत्या

कृषी क्षेत्र कोरोनाच्या काळ्याकुट्ट काळात एक चमकदार क्षेत्र म्हणून लख्खपणे उठून दिसले. शेतक-यांची दृढ इच्छाशक्ती, कृषी क्षेत्राला मदत करण्यात केंद्र आणि राज्य सरकारांनी दाखविलेली तत्परता आणि कृषी संशोधन संस्थांच्या वतीने देण्यात वेळेवर आलेल्या सल्ल्यांमुळे हे शक्य झाले. केंद्र सरकारने गतिमान हालचाली करून शेती क्षेत्रातील लॉकडाऊनचे निर्बंध लवकर शिथिल केले. विषाणू संसर्गामुळे घेण्यात येत असलेली खबरदारी आणि मजुरांची कमतरता असे अडथळे असूनसुद्धा अन्नधान्य खरेदीत कुठेही अडचणी येणार नाही, याची काळजी सरकारांनी घेतली. भारतीय अर्थव्यवस्थेला जर कुणी वाचविले असेल, तर ते कृषी क्षेत्रानेच, हे आता सर्वांना मान्य झाले आहे. जेव्हा देश स्वतंत्र झाला होता, तेव्हा संपूर्ण देशभरात ट्रॅक्टरची संख्या ५ हजार एवढी होती. आज देशात ६० लाख ट्रॅक्टर आहेत, याची आवर्जून नोंद घेतली पाहिजे. ही वाटचाल आपल्याकडील शेतक-यांनी त्यांच्या मेहनतीने साध्य केली आहे.

सांस्कृतिकदृष्ट्या विचार केल्यास भारतात शेतीचा थेट संबंध सामाजिक व्यवस्थेशी आहे. शेतकरी आत्मनिर्भर झाला तर भारतही आत्मनिर्भर होईल. शेतक-याच्या खिशात पैसा आला तर ग्रामीण क्षेत्रातून मागणी वाढेल. मागणी वाढली क उत्पादन वाढेल. उत्पादन वाढविण्यासाठी अधिक श्रमशक्तीची गरज भासेल. म्हणजेच अधिक रोजगारनिर्मिती होईल. ही साखळी लक्षात घेता कोरोनाची दुसरी लाट लवकरात लवकर संपुष्टात येईल आणि त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा एकदा रुळावर येईल अशी अपेक्षा करूया. शेतीच्या बाबतीत निसर्गाने साथ दिली आहे. आता कोरोनाचे सावट दूर करण्यासाठी नागरिकांची साथ असणे गरजेचे आहे. आपल्याला प्रचंड संयम बाळगून पुढे जावे लागणार आहे.

नवनाथ वारे
कृषी अभ्यासक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या