22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeविशेषअमित शहांचे ‘मिशन मुंबई’!

अमित शहांचे ‘मिशन मुंबई’!

एकमत ऑनलाईन

केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे चाणक्य अमित शहा यांनी मागच्या आठवड्यात मुंबईचा दौरा करून महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढवला. शिवसेनेवर विश्वासघाताचा आरोप करताना, आगामी निवडणुकीत त्यांना जमीन दाखवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेनेही हे आव्हान स्वीकारताना भाजपाला ‘अस्मान’ दाखवण्याचा विडा उचलला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई शिवसेनामुक्त करण्याचे भाजपाचे स्वप्न पूर्ण होणार की ही भाषा ‘बूमरँग’ होणार? याचा फैसला मुंबईकर करतील. पण ही लढाई अतिशय रंगतदार होणार एवढे मात्र नक्की.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेच्या भूमिकेमुळे भाजपाला महाराष्ट्राची सत्ता गमवावी लागली. कै. वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्रिपद भूषविण्याचा विक्रम करणा-या देवेन्द्र फडणवीस यांच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावला गेला. अजित पवार यांच्या मदतीने सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न फसल्यामुळे गाढव व ब्रह्मचर्य असे दोन्हीही गमवावे लागले. पुन्हा सत्तेवर येण्याची सुतराम शक्यता नसल्याने दोन काँग्रेसला शिवसेनेच्या भूमिकेमुळे अचानक सत्तेची लॉटरी लागली. महाराष्ट्रात हे सगळे महाभारत सुरू असताना आधुनिक चाणक्य म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इकडे ढुंकूनही बघितले नाही. महाराष्ट्रापेक्षा अधिक प्रतिकूल परिस्थिती असूनही हरियाणात पक्षाची सत्ता कायम ठेवणा-या अमित शहा यांची महाराष्ट्राबाबतची ही उदासीनता नजरेत भरणारी होती. यामुळे अमित शहा व फडणवीस यांच्यातील दरीबाबतही बरीच चर्चा झाली. कारण काही का असेना, पण संपूर्ण देश भाजपाच्या मुठीत आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणा-या अमित शहा यांनी महाराष्ट्र ‘ऑप्शन’ला टाकले होते एवढे नक्की. मात्र गेल्या तीन महिन्यांत चित्र बदलले आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यात, घालवण्यात राज्यातील मंडळी अयशस्वी झाल्यानंतर अमित शहा यांनी सगळी सूत्रं आपल्याकडे घेतली. एकनाथ शिंदे यांचे बंड ही फडणवीसांची नव्हे तर अमित शहा यांची कलाकारी असल्याचे सांगितले जाते. सर्व पूर्वतयारी केल्यानंतर त्यांनी फडणवीस यांच्याकडे अंमलबजावणी करण्याचे काम सोपवले व त्यावरही स्वत: लक्ष ठेवून होते, असे म्हणतात. सत्तांतरानंतर अमित शहा महाराष्ट्राबाबत अधिक सक्रिय झाल्याचे दिसते आहे. मागच्या आठवड्यात त्यांनी मुंबईचा दौरा करून महापालिका निवडणुकीचा बिगुल फुंकला. शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडून त्यांना राज्याच्या सत्तेतून बेदखल केल्यानंतर आता मुंबईलाही शिवसेनामुक्त करण्याचा इरादा शहा यांनी व्यक्त केला आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील आम आदमी पार्टीची सत्ता व देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या महापालिकेवरील शिवसेनेचे वर्चस्व भाजपाला सतत डाचते आहे. दोन्ही ठिकाणी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना विकलांग झाली असली तरी अजून संपलेली नाही. मुंबई महापालिकेची सत्ता आहे तोवर ती संपणारही नाही. आणि याचीच जाणीव असल्याने मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपा यावेळी सगळी शक्ती पणाला लावणार हे उघड आहे. या मोहिमेचे सूत्रसंचालनही स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार याचे संकेतही त्यांनी स्वत: परवाच्या मुंबई दौ-यात दिले आहेत.

अमित शहा यांनी आपल्या मुंबई दौ-यात उद्धव
ठाकरे यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी युती करताना स्वत: अमित शहा यांनी स्व. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत शब्द दिला होता व नंतर शब्द फिरवल्याने महाविकास आघाडीचा प्रयोग करावा लागल्याचा दावा उद्धव ठाकरे गेली अडीच वर्षे सातत्याने करत आले आहेत. अमित शहा यांनी याचा इन्कार केला होता. पण परवाच्या मुंबई दौ-यात त्यांनी प्रथमच याबाबत तपशीलवार स्पष्टीकरण केले. उद्धव ठाकरे यांना आपण कधीही मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिले नव्हते. उलट त्यांनी मागणी केली तेव्हाच ठाम नकार दिला होता. उद्धव ठाकरे यांनी पाठीत खंजीर खुपसला. राजकारणात सर्व सहन करा, पण विश्वासघात सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत जिद्दीने मैदानात उतरा व शिवसेनेला त्यांची जागा दाखवा, असे आवाहन अमित शहा यांनी भाजपा पदाधिका-यांच्या बैठकीत बोलताना केले.
एखाद्याला थप्पड मारली तर त्याला त्रास होतो, पण त्याच्या घरासमोर थप्पड मारली तर अधिक त्रास होतो, असे सांगत मुंबईत शिवसेनेला धडा शिकवण्याचा निर्धार शहा यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रावर वर्चस्व मिळवायचे असेल तर मुंबईवर वर्चस्व मिळवावे लागेल आणि मुंबई महापालिका जिंकण्यासाठी आता सर्वांत चांगली संधी असल्याचे सांगत, शहा यांनी ‘मिशन-१५०’ चा नारा दिला. शहा यांची भाषा आगामी निवडणुकीत भाजपा किती आक्रमकपणे रिंगणात उतरणार आहे याची चुणूकच होती. त्याच वेळी शिवसेनेवर विश्वासघाताचा आरोप करताना २०२२ मधील सत्तांतर ही २०१९ मध्ये शिवसेनेने केलेल्या राजकारणाची परिणती असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. शिवसेनेच्या आजच्या स्थितीला भाजपा नव्हे तर ते स्वत:च जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. राजकीय उलथापालथीमुळे घायाळ झालेल्या उद्धव ठाकरे यांना मुंबईकर मराठी मतदारांची सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे व उद्धव ठाकरे यांची सगळी मदार यावर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे राहून भाजपने केलेल्या राजकारणाविरोधात जनमत तयार होऊ नये याची काळजी घेण्यासाठी अमित शहा
यांनी शिवसेनेनेच विश्वासघात केल्याच्या प्रचारावर भर देण्याचा कानमंत्र स्थानिक पदाधिका-यांना दिला आहे. एकूण ही निवडणूक अतिशय रंगतदार होणार याची चुणूक परवा दिसली.

शिवसेनाही सज्ज !
अमित शहा यांनी शिवसेनेला ‘जमीन’ दाखवण्याचा निर्धार मुंबई दौ-यात व्यक्त केला. तर याला प्रत्युत्तर देताना शिवसेनेने त्यांना ‘अस्मान’ दाखवण्याचा इरादा जाहीर केला आहे. पैसा व सत्तेच्या बळावर शिवसेनेची काही माणसे त्यांनी विकत घेतली, पण जनमत कसे विकत घेणार? असा सवाल करताना, भाजपचे मिशन हा मुंबईविरुद्ध मोठा कट असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. आदिलशहा, कुतुबशहा यांच्या यादीत अमित शहा यांना बसवून महापालिका निवडणुकीला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या लढाईचे स्वरूप देण्याचा इरादा शिवसेनेने व्यक्त केला आहे. एकेकाळी तत्कालीन मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांच्या ‘मुंबई केंद्रशासित होऊ देणार नाही’, या विधानाचा फायदा घेत शिवसेनेने मुंबई काबीज केली होती. २०१२ साली पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही ‘महापालिका निवडणुकीनंतर मुंबईत ठाकरे नाव दिसणार नाही’, या त्यांच्या वक्तव्याचा शिवसेनेने जोरात लाभ घेतला. २०१४ साली युती तोडून शतप्रतिशत सत्तेसाठी मैदानात उतरलेल्या भाजपाला अफझल खानाच्या फौजांची उपमा देत शिवसेनेने जोरदार टक्कर दिली. भाजपाचा अश्वमेध १२२ वर रोखून पुन्हा युती करायला भाग पाडले. ही सगळी उदाहरणं पाहिली तर संकटाच्या काळात शिवसेना अधिक ईर्षेने लढून यश मिळवताना दिसली. यावेळची स्थिती व आव्हान अधिक गंभीर असल्याने शिवसेनेला यश मिळणार की नाही ? हे येणारा काळच सांगू शकेल.

याकूबच्या कबरीचा वाद पेटला ! १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांतील गुन्हेगार याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण केल्याचे समोर आल्यानंतर मोठा वाद उफाळला आहे. भाजप आणि विरोधकांमध्ये यावरून आरोपांच्या फैरी सध्या सुरू आहेत. वस्तुत: कब्रस्तानमधील दफनविधी व तेथील कबरी हा वक्फ बोर्डाच्या अखत्यारीतील विषय आहे. त्यावर महापालिका अथवा राज्य सरकारचे कुठलेही थेट नियंत्रण नाही. परंतु मुंबईचा गुन्हेगार असलेल्या याकूबच्या कबरीच्या सुशोभीकरणावरून भाजपाने उद्धव ठाकरे व शिवसेनेला आरोपीच्या पिंज-यात उभे केले. सत्तेसाठी शिवसेनेने केवळ हिंदुत्वच सोडले नाही, तर देशद्रोह्यांचे उदात्तीकरण करायलाही मुभा दिल्याचा आरोप भाजपने चालवला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी केली. तर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पेंग्विन सेनेच्या अध्यक्षांनी ‘कबर बचाव अभियान’ चालू करावे असा टोला लगावला. पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण कोणी केले? त्यासाठी कोणी परवानगी दिली? याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. राजकारणात बेफाम आरोप-प्रत्यारोप नवीन नाहीत

. सध्याचे वातावरण तर त्यासाठी खूपच पोषक असल्याने त्याला कोणत्याही मर्यादा राहिलेल्या नाहीत. पण काही वेळा अतिघाईमुळे तोंडघशी पडावे लागते. भाजपाच्या काही लोकांनी याकूब मेमनचा भाऊ रौफ मेमनचा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासोबतचा फोटो प्रसिद्ध करून शिवसेनेला आणखी कात्रीत पकडायचा प्रयत्न केला. तेव्हा स्वत: किशोरी पेडणेकर व काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी याच रौफ मेमनचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबरोबरचे फोटो प्रसिद्ध करून आरोप करणारांना तोंडघशी पाडले. अमेरिकेने पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक करून ओसामा बिन लादेनला मारले व त्याच्या मृतदेहाचे समुद्रातच अज्ञात ठिकाणी दफन केले. अफझल गुरू व मुंबईवर हल्ला करणा-या कसाबला फाशी दिल्यानंतरही त्यांच्या प्रेताचे सन्मानाने, पण अज्ञात स्थळी दफन करण्यात आले. मग याकूब मेमनचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात का दिला? असा सवाल करत याबद्दल भाजपनेच जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही शिवसेनेने केली आहे. कायदे मंडळाच्या सदस्यांना कायदे, नियम, जेल संहिता याबाबतची माहिती नाही असे तरी कसे म्हणणार? पण आरोप-प्रत्यारोपांची धुळवड सुरू झाल्यानंतर सारासार विचाराची अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे. राजकारणातल्या ‘न्यू नॉर्मल’ मध्ये हे अटळ आहे.

-अभय देशपांडे

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या