25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeविशेषअमित सुभाष फाटक

अमित सुभाष फाटक

एकमत ऑनलाईन

काही काही नाटकांची नावे मजेशीर असतात. त्यातील एक नाटक म्हणजे ‘शेवटी जमलं’. खरं पाहता नेहमीच्या वापरातील हे वाक्य आहे. अनेक प्रयत्नांनंतर जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा शेवटी जमलं, अखेर जमलं असे म्हटले जाते. परंतु अमित फाटक यांच्या बाबतीत या वाक्याचा अनुभव वेगळा आहे. त्याच्या पहिल्या नाटकाचे नावच मुळी ‘शेवटी जमलं’ असे आहे. सध्या अनेक संतांच्या मालिका टीव्हीवर गाजत आहेत. त्यातील एक संत गजानन महाराज. गजानन महाराजांचे भक्तगण सर्वत्र आहेत. ‘शेगावचे संत गजानन महाराज’ मालिकेत महाराजांची भूमिका करणारा हा अभिनेता. अमितचा जन्म मुंबईत चार जूनला झाला. शालेय शिक्षण किंग जॉर्ज शाळेत झाले व महाविद्यालयीन शिक्षण चेतना कॉलेज, बांद्रा येथे झाले. अकरावीत असताना ईटीव्ही सर्चलाईट स्पर्धेत त्याने महाराष्ट्रातून पहिला नंबर पटकाविला होता. संतोष उंडे या मित्राच्या आग्रहामुळे ‘शेवटी जमलं’ नाटकाद्वारे रंगभूमीवर पहिले पाऊल पडले.

या नाटकात एकावेळी चार चार व्यक्तींच्या भूमिका वठवाव्या लागणार होत्या. ‘दे धमाल’ मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यामुळे अनुभवात भर पडली. जनार्दन लवंगारे यांनी त्याला नाटकात काम करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्या पाच नाटकांत अमितने भूमिका केल्या. महेश कोठारे यांच्या ‘मन उधाण वा-याचे’ मालिकेतील कामामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. सध्या ‘पाहिले न मी तुला’या मालिकेत आपणास अमित विनोदी भूमिकेत दिसतो. ‘शेवटी जमलं’ पासून ‘पाहिले न मी तुला’पर्यंतच्या नाट्यक्षेत्रातील प्रवासात अमितने जिंकू या दाही दिशा, राशिरंजन, हर हायनेस अनिता, मराठी माणसा, चल लवकर, बुवा भोळा,भानगडी सोळा, एक डाव प्रेमाचा, सही केली लोचा झाला, रोमियो या नाटकांबरोबर ऊन पाऊस,

या गोजिरवाण्या घरात, आशा अभिलाषा, अधुरी एक कहाणी, अखंड सौभाग्यवती, हसत खेळत, मन उधाण वा-याचे, ओळख, एक मोहोर अबोल, आतला आवाज, आम्ही कारभारणी, विवाह बंधन, मानसीचा चित्रकार तो, प्रीती परी तुजवरी, खुलता कळी खुलेना, गोठ, क्राईम फाईल, छत्रीवाली, एक होती राजकन्या, प्रेम पॉयझन पंगा, देव पावला इ. मालिकांत आपणास अमित दिसतो. अमितने ही पोरगी कोणाची, यंदा कर्तव्य आहे, सुपारी, कसं हो व्हायचं यांचं? या चित्रपटांबरोबर ‘मिसेस तेंडुलकर, ये वादा राहा, कितनी मोहब्बत है, एक दुसरेसे करते है प्यार हम, भाकरवाडी, क्राईम पेट्रोल या हिंदी मालिकेतही त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. हिंदी नाटक‘डोन्ट डिस्टर्ब मी, क्या यही है जिन्दगी’ शिवाय भोजपुरी मालिका ‘भाग ना बचे कोई आणि साची बात सभी जान जाने’ यात अमितने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. ‘डोन्ट डिस्टर्ब मी’ नाटकाची आठवण सांगताना अमित म्हणतो की, आयत्या वेळी या नाटकातील एक अभिनेता काही कारणाने येऊ शकत नव्हता.

त्यावेळी नाटकाच्या प्रयोगाच्या ठिकाणी जात असता अमितला दिग्दर्शकाने गैरहजर अभिनेत्याची भूमिका करावयास सांगितली. प्रवासातच अमितकडून रंगीत तालीम करून घेतली. अशा अनेक प्रसंगांना कलाकारांना तोंड द्यावे लागते. अक्षयकुमार, कुलभूषण खरबंदाबरोबर पगार बुक अ‍ॅॅप कंपनीची जाहिरात केली आहे. तसेच इसुझु डी मॅक्सच्या जाहिरातीत कार चालविताना दिसतो. अभिनयाशिवाय त्याच्या अंगातील एक कला म्हणजे अमितने कराटे ब्लॅक बेल्ट शाळेत असताना मिळविला. त्याच्या वयाच्या मुलात ८५ टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक मिळविला. कलाक्षेत्राशी आई-वडील यांचा काहीही संबंध नव्हता, मात्र नाटक पाहण्याची आवड होती. आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे व पत्नीच्या सहकार्यामुळे कलाक्षेत्रात यश मिळाले असे अमित सांगतो. आई-वडिलांचा आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद यासह अमितचा प्रवास चालला आहे, अधिकाधिक मालिका, चित्रपटांत अभिनय करून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करावे हीच अमितकडून अपेक्षा.

– सुभाष पानसे

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या