32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeविशेषअमृतातेही पैजा जिंके

अमृतातेही पैजा जिंके

विचार, सौंदर्य, शब्दसामर्थ्य, गोडी हे जर भाषेच्या उत्तुंगाचे गुण असतील तर संतवाणीने रंगलेल्या भाषेच्या सामर्थ्याला उत्तुंगाचे मानबिंदू प्राप्त झाले आहेत. हीच उत्तुंगता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देईल यात शंका नाही. आज मराठीमध्ये मालवणी, आगरी, कोकणी, अहिराणी, मराठवाडी, आदिवासी, व-हाडी आदी भाषा आहेत. त्या सगळ्या बोलीभाषेतून आलेल्या आहेत. माझ्या मते, आपण बोलीभाषा अधिक पक्क्या केल्या तर तो मराठी भाषेचा भक्कमपणाचा पाया होऊ शकेल.

एकमत ऑनलाईन

जगामध्ये सध्या ६००० भाषा बोलल्या जातात. त्यात मराठी भाषेचे स्थान १७ व्या क्रमांकावर आहे. जगामध्ये १४.५ कोटी लोक मराठीतून बोलतात. त्यामुळे मराठी भाषा बाजूला पडेल, लुप्त होईल असे समजण्याचे कारण नाही. कारण जोपर्यंत मराठी संस्कृती जिवंत आहे तोपर्यंत ही अबाधित राहणार. अर्थात ती टिकवणे आपल्याच हातात आहे. मराठी ही तिच्या बोलीभाषांमुळे अधिकाधिक समृद्ध झाली आहे. इतर भाषांनाही तिने सामावून घेतले आहे. गुजराती, प्राकृत, संस्कृत, फ्रेंच, पोर्तुगीज, पर्शियन, अरेबिक या सर्वच भाषांमधील शब्द मराठीत आले आहेत. अशा या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी साहित्य परिषदा, महामंडळे, विविध साहित्य संस्था यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी समिती स्थापन झाली. विविध चर्चासत्रे, परिषदा, साहित्य संमेलनातील ठराव हे सर्व अंतिम टप्प्यात आहेत. या प्रयत्नांना यथावकाश यश येऊन मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यास मराठी माणसासाठी त्याहून अन्य कुठलीही अभिमानाची गोष्ट असणार नाही.

मात्र यानिमित्ताने एक गोष्ट मांडावीशी वाटते, ती म्हणजे अभिजात दर्जा मिळण्याविषयी चर्चा करणारी मंडळी मराठीची धुरा आपल्याच खांद्यावर असल्याच्या आवेशात बोलत असली तरीही मराठी टिकवण्याचे श्रेय जाते ते गावगाड्यात राहणा-या मराठी बोलणा-या लोकांना. ही मंडळी मराठी लोकसंस्कृती जपतात, ती टिकवतात. लोकाचार, लोकव्यवहार, श्रद्धा, निष्ठा आणि भावना इतकंच काय ते भांडणंही मराठीत करतात. मराठीच्या सर्व प्रांगणांमध्ये, दालनांमध्ये ती स्वाभाविकपणे वावरत मराठी संस्कृतीची, भाषेची पताका अभिमानाने वागवत, फडकवत वाटचाल करीत असतात. असे असूनही मराठीसाठी आम्ही काही करत आहोत असा यत्किंचित अहंकार त्यांच्याठायी नसतो. आज मराठी भाषेविषयी बोलणा-यांपैकी मराठीशी किती एकनिष्ठ आहेत हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.

कोणतीही भाषा ही शब्दांच्या अंगाने वसते आणि संस्कृतीच्या अंगाने ठसत असते. मराठी भाषेच्या अस्तित्वाविषयी नेहमीच पोटतिडकने बोलले जाते. यामध्ये मराठीची काहीशी उपेक्षा होत आहे असे म्हटले जाते. वास्तविक पाहता नव्या युगाचे आव्हान पेलण्याचे सामर्थ्य मराठीमध्ये आहे. १९९० मध्ये जागतिक मराठी परिषदेचे अधिवेशन झाले होते. त्याचे अध्यक्ष होते कविश्रेष्ठ कुसमाग्रज. त्यांनी अध्यक्षीय भाषणात मांडलेले मुद्दे पाहिल्यानंतर याची उकल अधिक चांगल्या प्रकारे होईल. ते म्हणाले होते, इंग्रज गेले आणि इंग्रजी ठेवून गेले. सर्व वरिष्ठ पातळीवर अधिका-यांच्या मनातही इंग्रजी राहिली आहे. कुसुमाग्रजांनी मराठीविषयीची खंतही व्यक्त केली होती.

‘देहाला बांधलेल्या दृष्य साखळदंडापेक्षा मनाला बांधणारे साखळदंड हे फार भक्कम असतात. नव्या युगाचे आव्हान पेलण्याचे सामर्थ्य मराठीच्या ठायी आहे, आशाही समर्थ आहे. असे असूनही तिच्याविषयी साशंकता असणारी तिची अपत्ये मात्र दुबळी आहेत.’ मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने कुसुमाग्रजांच्या या आत्मचिंतनाचे चिंतन करणे फार महत्त्वाचे ठरेल. याच भाषणात कुसुमाग्रजांनी म्हटले होते की, आमचे कुणाशीही वैर नाही. मावशीच्या मायेने आमचे पालन करणा-या इंग्रजीशी तर मुळीच नाही; फक्त मावशीने आता आईच्या घराचा कब्जा आईच्या ताब्यात द्यावा एवढीच मागणी आहे. त्यामुळे इंग्रजीच्या बहिष्काराचा प्रश्न नाही तर मराठीच्या संरक्षणाचा आणि संवर्धनाचा आहे. इतका सुरेख विचार कुसुमाग्रजांनी दिला आहे. दुसरीकडे राज्य शासनाने सर्वच जीआर मराठीत काढावेत, मराठीत बोलावे, असे आदेश दिलेले आहेत. पण जनमानसातील मराठी भाषेची स्थिती वर्णायची झाल्यास डोक्यावर मुकुट, अंगावर फाटके कपडे अशा अवस्थेत मराठी भाषा मंत्रालयाच्या दारात उभी आहे.

अवैध रेती उपस्यासाठी बिहारी मजूरांचा वापर

मराठी भाषेला समृद्ध आणि विशाल परंपरा आहे. मराठी भाषेच्या अस्मितेचा पहिला धडा फडकवला तो संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी. ‘तीरे संस्कृताची गहने । तोडोनि महाठिया शब्दसोपाने ॥ रचिली धर्मनिधाने । श्रीनिवृत्तीदेव’ असे अभिमानाने सांगत ज्ञानगंगेच्या आणि सारस्वताच्या प्रवाहाचे तीर तोडून त्यांनी शब्दसोपान उभे केले आणि मराठीचे खाट बांधले. संत एकनाथांनी ‘संस्कृत भाषा देवाची तर प्राकृत काय चोरापासूनी झाली काय’ असे ठणकावून विचारत मराठीचा अभिमान जागृत ठेवला. संस्कृत ही काही परकी भाषा नव्हती तरी तिचा पगडा मोडून काढत ज्ञानदेवांना मराठीची शब्दसृष्टी उभी करावी लागली.  भाषा हे समाजव्यवहाराचे सर्वश्रेष्ठ साधन असून ते प्रतीकात्मक आहे. या प्रतीकात्मक तत्त्वाला सोडून जे संकेत करण्यासाठी वापरण्यात येतात ते ध्वनीरूप असतात. ज्या ध्वनीरूप चिन्हांद्वारे माणूस विचार करतो त्या ध्वनीरूप चिन्हांच्या समस्त रूपाला भाषा असे म्हणतात.

वास्तव विश्व आणि व्यक्तीजीवन याला ध्वनीरूप संकेतांनी पुन्हा साकार करणारी भाषा ही एक शक्ती आहे. मानवी जीवन आणि जीवनाचे विशिष्ट रंग आणि प्रकृती यांना व्यक्त स्वरुप देण्याचे काम भाषा करत असते. त्या दृष्टीने भाषा संस्कृतीची वाहक असते. प्रमाणभाषा आणि बोलीभाषा असे भाषेचे दोन प्रकार आहेत. जी लिहितो ती भाषा आणि जी बोलायची ती बोलीभाषा असे स्थूलमानाने समजले जाते. वास्तविक मौखिक साहित्य परंपरा आणि बोलीभाषा यांचे जवळचे नाते आहे. कारण मराठी भाषेच्या समर्थनार्थ किंवा तिच्या लोकाभिमुखतेमध्ये सर्वांत महत्त्वाचा प्रवाह आहे तो साहित्याचा. त्यामध्ये ग्रांथिक आणि मौखिक असे दोन साहित्यप्रवाह आहेत. त्यापैकी ग्रांथिक प्रवाहाला साहित्यिकांनी महत्त्व दिले. पण मौखिक साहित्य परंपरा उपेक्षित राहिली.

भाषासंशोधक गणेश देवी यांनी केलेल्या संशोधनानुसार १९६१ मध्ये भारतात ११०० भाषा बोलल्या जात होत्या. गेल्या ५० वर्षांत त्यातील ३०० बोलीभाषा संपुष्टात आल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात ५६ बोलीभाषा बोलल्या जात होत्या. त्यातील ५३ भाषा आजही अस्तित्वात आहेत. गणेश देवींच्या संशोधनाला पुष्टी देणारे एक सुंदर प्रमाण संतसाहित्यामध्ये आहे. नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांची महती सांगताना एक अभंग उद्घृत केला आहे. ‘ज्ञानराज माझी योग्यांची माउली । जेणें निगमवल्ली प्रगट केली॥ १॥ गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ॥ २॥ अध्यात्मविद्येचें दाविलेसे रूप । चैतन्याचा दीप उजळिला ॥ ३॥ छप्पन्न भाषेचा केलासे गौरव । भवार्णवीं नाव उभारीली ॥ ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी’सारख्या ग्रांथिक प्रबंध रचनेत प्रमाणभाषेबरोबर ५६ बोलीभाषांना स्थान दिले. या सर्व बोलीभाषा मराठीच्या होत्या. सांगण्याचा मुद्दा इतकाच की, बोलीभाषा शिकायला, तिचा पाया पक्का करायला ज्ञानदेवांचे विचार किंवा वाङ्मयकार्य पायाभूत ठरते. आज मराठीमध्ये मालवणी, आगरी, कोकणी, अहिराणी, मराठवाडी, आदिवासी, व-हाडी आदी भाषा आहेत. त्या सगळ्या बोलीभाषेतून आलेल्या आहेत. माझ्या मते, आपण बोलीभाषा अधिक पक्क्या केल्या तर तो मराठी भाषेचा भक्कमपणाचा पाया होऊ शकेल. बोलीभाषेचे संवर्धन करणे हा प्रमाण मराठी भाषेच्या संवर्धनाचा पाया होऊ शकतो.

आज आपण इंग्रजी साहित्याविषयी बोलतो तेव्हा ती व्यवहारी इंग्रजी आहे. वाङ्मयीन इंग्रजी नाही. त्यामुळे आपल्याला अभिव्यक्त होण्यासाठी आपलीच भाषा असावी लागते. मुलांचे शिक्षण जरी इंग्रजी माध्यमातील असले तरी अभिव्यक्ती ही मराठीतीलच असते. मराठी माध्यमातील मुलांचे मराठीतून अभिव्यक्त होणे आणि इंग्रजी माध्यमातील मुलांचे मराठीतून अभिव्यक्त होणे यात फरक आहे. इंग्रजी माध्यमातून मराठी बोलणारे उत्तम वक्ते तयार होऊ शकतील पण इंग्रजीमधून ते सक्षमपणे अभिव्यक्त होतील असे नाही. अभिव्यक्ती दडपणे हे एकप्रकारचे मुकेपण आहे. आपण विनाकारण इतर भाषा लादून त्यांना मुके करणार आहोत का हा खरा प्रश्न आहे.

डॉ. रामचंद्र देखणे,
संत साहित्याचे अभ्यासक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या