23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeविशेष..अन् बरंच काही

..अन् बरंच काही

एकमत ऑनलाईन

.व्यंकटेश कुलकर्णी या तरुण मित्राचा गझल, गीतिका आणि काव्य असा त्रिवेणी संगम असलेला एक नावीन्यपूर्ण संग्रह माझ्या हातात पडला. व्यंकटेश हा माझ्या स्नेहसंबंधातील असल्याचे पुस्तक वाचल्यानंतर कळाले. तोवर आमचा प्रत्यक्ष परिचय नव्हता. अजूनही दृश्यभेट झालेली नाही. खरे तर फेसबुकवरील त्याच्या अनेक गझल वाचून त्याच्या प्रतिभेची कल्पना येत होतीच. परंतु त्याचा संग्रह वाचताना त्याची प्रचीती आली.

ज्याचे आपल्या आईवर प्रेम असते तो सर्वांवर प्रेम करू शकतो किंवा शकते. अर्थात ते प्रेम अगदी काळजातून असावे लागते. फक्त आपल्या आईवर प्रेम करायचे आणि दुस-याच्या आईला धुत्कारायचे हे मात्र दांभिकपण असते. या संग्रहातील ‘आई’ ही पहिलीच गझल आईची महती सांगते. आई जग सोडून गेली तरी तिची माया लेकरावर असते, याविषयी एक इंग्रजी कथा आहे. कवी म्हणतो
या काळजात माझ्या तू राहतेस आई
मजला अजूनही तू सांभाळतेस आई
ती आपल्याला स्वर्गातून न्याहाळतेय आणि ती आसपास असल्याचा कवीला भास होतो.
मजपासुनी जरी तू गेलीस दूर आता
माझ्यात तू स्वत:ला साकारतेस आई
असा विश्वास कवी व्यक्त करतो.
आई गेल्यानंतर सर्व जगच पोरके होते, असा अनुभव सुपुत्राला येतच असतो. ‘तू नसताना’ ही गझल हे जगाचे पोरकेपण दाखवून हृदयास पाझर फोडते.
एकविसाव्या शतकात जग झपाट्याने बदलत चालले आहे. या बदलाच्या लाटेतून गावदेखील सुटले नाही. हा अनुभव सर्वांनाच त्यांच्या ‘गाव सारा’ या गझलेत येतो. पहिलाच शेर विलक्षण आहे.

गावाकडच्या पायवाटा मिटल्या आणि तेथे डांबरी सडका आल्यातरी चालणे काही सरलेच नाही. आयुष्याची पायवाट अशीच असते ती चालावीच लागते. शेवटचा शेर हृदयद्रावक आहे. ‘अज्ञाताचा प्रवास’ ही गझल त्याच अनुभवाच्या वाटेवरून जाते. आध्यात्मिक अनुभूती देणारी व जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी ही गझल अंतर्मुख करते. विचारप्रवण करते. ‘भेटलोच नाही’ ही गझलदेखील अशीच अंतरातील आत्म्याची म्हणजे ‘मी’ची अद्याप भेट झालीच नसल्याची खंत व्यक्त करते. या गझलेतील एक शेर ‘कित्येक चेहरे मी ऐन्यात पाहिले पण । हृदयात मी कुणाच्या डोकावलोच नाही।’ हा शेर वाचताना इलाही जमादार यांची आठवण होते. आरशाला भेटलेली माणसे गेली कुठे असे ते म्हणतात. या गझलेत ऐना हा हिंदी-उर्दू शब्द व्यंकटेश वापरतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला लढाई करावीच लागते. ही झुंज आपली आपल्यालाच करावी लागते. ती कधी कधी स्वत:शी देखील करावी लागते. जरी संपला नाही माझ्या इच्छांचा हा कधीच डोंगर । तरी अल्पशा आकांक्षांना, पंख नभाचे लावत गेलो।। हा आशावाद त्याच्या ‘लढत राहिलो’ या गझलेतून डोकावतो.

या संग्रहातील ‘काय नेमके मोजू रे’, ‘अज्ञाताचा प्रवास’, ‘व्हायचे तेच होते’, ‘प्रश्न पांगळे’ आदी गझला वाचकांना विचार करायला लावतात. प्रेमाचा संदेश देणारी ‘दोघे आपण’ ही गझल ‘भेटशील तर बोलू तेव्हा। सुखदु:खावर दोघे आपण’ असे म्हणून रुसवेफुगवे दूर करून आपल्यातील अंतर कमी करून अंतराने (हृदयाने) जवळ येऊ असे या शेरातून सांगून जाते.
‘कोण बरे मज’ ही गझल आपल्यालाही जगावयाचे नेमके मर्म सांगते. ‘आज अचानक मला भेटला तुझा दिलासा । पराभवावर मलम उद्याचे लावत गेला’ हा शेर आज पराभव झाला तरी उद्या तुझा विजय होईल, ही आशा जागवणारा आहे.
‘किनारे’ व ‘चंद्र माझ्या काळजाचा’, ‘चांदणे माझे मला’ व ‘आर्त गाऊन जा’ या गझलांतून प्रेमाचे पाझर फुटले आहेत. ‘गंधारमाला’ गझलेत ते म्हणतात, ‘युगांचा दुरावा, युगांचा अबोला । आता बोलण्याच्या अपेक्षा कशाला’ आणि तुझे मौन जेव्हा मनाला भिडते-डसते तेव्हा कुणाच्या सांत्वनाने आपल्याला दिलासा मिळणार नाही, असे परखड वक्तव्य कवी करतो.

‘दवांत अश्रू’, ‘पुन्हा वाटते’ आणि ‘तुझी याद’ या गझलांतून विरह वेदना डोकावते. ‘तुझी आठवण’, ‘रात्र रात्रभर’, ‘पुन्हा वाजली पैंजणे’ आदी गझला प्रौढ वाचकांना त्यांच्या तारुण्यात आणि तरुणाईला त्यांच्या प्रेमदुनियेत रममाण करतात. ‘चाहूल पावलांची’ ही वेदनांची गझल आर्त सूरात मन व्यथित करते. ‘आरास रेशमी’ ‘कोवळी बरसात’ या गझला देखील मनाला भुरळ घालतात. ‘येतात पावसाळे’ ‘ऋतूंचा शृंगार’ आदी गझला देखील विलोभनीय आहेत.
‘माणुसकी’ आणि ‘दुनिया’ या रचनांतून जगाचे दिखाव्याचे स्वरूप दाखवून त्यावर प्रहार करते. कविता, अभंग, लावणी या प्रकारातील कविता आणि मुक्तछंदातील कविता या विविध भावनांचे दर्शन घडवतात.
या संग्रहात ८१ कविता/गझल आहेत. सदानंद डबीर यांची अभ्यासपूर्ण आणि नेमके विश्लेषण करणारी प्रस्तावना आहे.
… अन् बरंच काही
(गझल, कविता आणि मुक्तछंद)
पृष्ठे : ९६, मूल्य : १२० रुपये
प्रकाशक : प्रवीण भाकरे
समीक्षा पब्लिकेशन, रांझणी, पंढरपूर

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या