26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeविशेषअण्णा भाऊंचे प्रेरणादायी विचार

अण्णा भाऊंचे प्रेरणादायी विचार

एकमत ऑनलाईन

अण्णा भाऊ साठे यांचे प्रेरणादायी विचार जे आजच्या समाजव्यवस्थेवरही प्रहार करतात. आपल्या साहित्यातून उपेक्षितांचे दर्शन घडविताना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी संघर्षाची विद्रोही ठिणगी पेटवली आणि समता जपणा-या समाजाचे स्वप्न दाखवले. २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंब-या लिहिल्या. ‘फकिरा’ ही त्यांची विशेष गाजलेली कादंबरी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये दुष्काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणा-या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. अण्णा भाऊ साठे यांनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशियापर्यंत पोवाड्यांतून पोहोचवले. शिवरायांच्या चरित्राचे पुढे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले. रशियन राष्ट्राध्यक्षांकडून त्यांचा सन्मान झाला होता.

देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी देखील अण्णा भाऊ साठे यांनी ‘यह आजादी झूठी है, देश की जनता भूखी है’, असे म्हणत जनतेचा असंतोष व्यक्त केला होता. अण्णा भाऊ हे देशातील उपेक्षित लोकजीवनाच्या अनुभवाचे साठे ठरले. गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, श्रमिक, दलित, पददलितांच्या व्यथा-वेदना कथा-कादंब-यांमधून प्रकर्षाने उमटाव्यात अशी त्यांची धारणा होती. अण्णा भाऊंचे साहित्य देशाबाहेर अगदी पोलंड, रशियातही लोकप्रिय झाले. जनमानसात प्रसिद्ध पावलेल्या अण्णा भाऊंच्या मते ग्रामीण जीवन टिकाऊ काया आहे, तर शहरी जीवन दिलखुलास आहे.

महात्मा फुले, शाहू महाराज, आगरकर, लोकहितवादी, महर्षि शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजक्रांतीचा ग्रामीण दलित जीवनाचा पाया आहे आणि त्याच पायावर लिहिलेल्या अण्णा भाऊंच्या कथा-कादंब-या ही साहित्यक्षेत्रात समाज संक्रमणाची पहिली किमया आहे. अल्पशिक्षित असले तरी उपजत शाहिराला चिंतनाची जोड आणि वैश्विक कार्याची जोड असेल तर तो अजोड साहित्यिक होऊ शकतो, हे अण्णा भाऊंनी दाखवून दिले. अण्णा भाऊंची लेखणी धारदार होती. ‘पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे’, असं ते म्हणत. त्यांच्या लेखनाचा प्रेरणास्रोत शोषित-उपेक्षितच होता.

जम्मूमधील मंदिरांवर हल्ल्यांचा कट फसला

अण्णा भाऊंच्या साहित्याला समाजात, गावागावांत, शहरात, अभिवादन केले जाते. त्यांचे साहित्य केवळ एका जातीपुरते मर्यादित नव्हते. समाजाप्रति असलेली कणव त्यांच्या साहित्यातून व्यक्त होते. नव्या पिढीने त्यांच्या साहित्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत या साहित्याचा अतिशय मोलाचा उपयोग झालेला आहे. अण्णा भाऊंचे साहित्य जपणे हे शासनाचे तसेच सर्व समाजाचे कर्तव्य आहे. खास करून अण्णा भाऊ ज्या समाजात जन्मले त्या मातंग समाजाने हा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी विशेष दखल घेऊन प्रयत्न केले पाहिजेत.

ऍड. शुभाश्री मंगेश होळीकर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या