महापुरुष दोन प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारचा महापुरुष हा राष्ट्रावर गुलामगिरीचे संकट ओढवले असता त्यांच्यात स्वाभिमान, स्वातंत्र्याची इच्छा पेटवून जनतेत राष्ट्राभिमान जागृत करून स्वराज्यासाठी लढण्याची प्रेरणा देत असतो, तर दुसºया प्रकारचा महापुरुष समाजातील जुन्या रूढी-चालीरीती, जुनी समाजरचना आणि सामाजिक अन्याय दूर करण्याचे प्रयत्न करून न्याय आणि उदार तत्त्वावर आधारित नवसमाजाची उभारणी करण्याचा प्रयत्न करीत असतो. महात्मा फुले आणि राजर्षि शाहू महाराज दुस-या प्रकारच्या महापुरुषांत येतात. शाहू महाराजांच्या चळवळी या विविध क्षेत्रांतील होत्या. त्या चळवळी समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलेल्या होत्या म्हणून असे म्हटले जाते की, लोक स्वातंत्र्यासाठी लोकस्तरावर चळवळीची पहिली लाट शाहूंनी निर्माण केली.
त्यांचे जीवनकार्य हे सामाजिक महापुरुषांचे होते, तर प्रेरणा सामाजिक होती. नव्या सामाजिक रचनेचा ध्यास आणि मानवी विकास शाहूंच्या कार्याचे केंद्रबिंदू होते. म्हणूनच त्यांनी आपल्या कार्यात सामाजिक सुधारणा आणि सामाजिक शिक्षणावर भर दिला. शाहू महाराजांनी विविध स्तरांतील चळवळी चालविल्या, त्याही अभिनिवेषरहित म्हणून त्यांना उदार मताचा राजा म्हणून संबोधण्यात येते. शिक्षण प्रसार हा शाहूंचा स्थायी भाव. आयुष्याच्या व्यस्ततेतही त्यांनी शिक्षण प्रसाराकडे किंचितही दुर्लक्ष होऊ दिले नाही. राज्यकारभार हाती घेतल्यापासून ते निर्वाणापर्यंत म्हणजे (१८९४ ते १९२२) २८ वर्षे त्यांनी सतत शिक्षण प्रसाराचा पाठपुरावा केला. त्यासाठी त्यांनी अनेक वसतिगृहे उघडली, प्राथमिक शाळा स्थापन केल्या, माध्यमिक शाळा उघडल्या, तसेच इतर शैक्षणिक संस्थांसाठी सढळ हस्ते मदतही केली. औद्योगिक व व्यावसायिक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. शिक्षण प्रसाराचे व्रत घेऊन एकनिष्ठपणे, तन, मन, धनाने कार्य करणारा भारतातील पहिला प्रभावी पुरुष म्हणून पाहिले तर लोकराजा राजर्षि शाहूंशिवाय शोधूनही दुसरे नाव सापडत नाही.
Read More राजर्षी शाहू पुरस्कार पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना जाहीर
विद्यार्थ्यांनी विविध विद्याशाखांचे अध्ययन करावे. परगावी आणि परदेशी जाऊन उच्च शिक्षण घ्यावे अशी शाहूंची तीव्र इच्छा होती. गुणी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व सहाय्य करण्यात त्यांना आनंद होई. त्यासाठी त्यांनी उच्च शिक्षणाच्या सोयी असलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पाठविले होते. विशेष म्हणजे त्याकाळी त्या विद्यार्थ्यांमध्ये एक विद्यार्थिनीही होती, हे सर्व करताना त्यांच्या ठायी कधीही मोठेपणाचा आव दिसला नाही, तर दिसत होता मनाचा मोठेपणा आणि मोठेपणाच्या जोडीला होता वात्सल्याचा वास.
राजर्षि शाहूंनी शिक्षणासाठी आर्थिक मदत केलेल्यात शंकर बाळाजी ढवळे या ब्राह्मण विद्यार्थ्यापासून ते डॉ. भीमराव रामजी आंबेडकर या अस्पृश्य विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांसाठी समभाव होता. शिक्षण प्रसारार्थ आपल्या कारकीर्दीत अनेक योजना आखल्या. हिंदू धर्मविचार प्रदूषणामुळे स्त्रिया, शुद्र शिक्षणापासून वंचित होते. अशा अवस्थेतही समाजात शिक्षणाचा प्रसार करणे म्हणजे कसरतीचे काम, त्यातल्या त्यात ही मंडळी आर्थिक परिस्थितीने पिचलेली यासाठी या मंडळीच्या मुलामुलींना फी माफ केल्याशिवाय ते शिक्षणच घेऊ शकणार नाहीत हे शाहूंनी ओळखले आणि प्रत्येक शाळेतील शेकडा १५ मुलांना फी माफ करण्याचे पहिले पाऊल २० मे १९१९ रोजी अधिकृतपणे उचलले.
यातील मागासवर्गीय शेतकरी आणि कामकरी मुलांना फीमाफीसाठी प्राधान्य देण्यात यावे अशी राजाज्ञाही काढली. अग्रक्रम देऊनही मागासवर्गीयांमध्ये निम्यादेखील फ्रिशिप्स खपत नव्हत्या. त्या फ्रिशिप्स बहुतेक पुढारलेल्या वर्गातील मुलांनाच मिळत म्हणून पुढारलेल्या समाजातील निम्याहून अधिक फ्रिशिप्स देण्यात येऊ नयेत अशी प्रतिबंधात्मक योजना महाराजांनी आखली. ब्राह्मण, सारस्वत, प्रभू आणि पारशी यांना पुढारलेल्या वर्गातील लोक समजावे अशी जाहीर आज्ञा काढली. ज्या विद्यार्थ्यांना फी माफीची गरज आहे, त्यांनी आपल्या घरच्या आर्थिक स्थितीबद्दल कमीत कमी ३ शाळा पंचाचे दाखले हजर केले पाहिजेत अशी अट घातली. ही अट आजही शाळेत इ.बी.सी. सवलतीद्वारे चालू आहे. १८९५ साली शाहूंनी दुर्बल घटकांना सवलती देण्याचा उपक्रम केला. याच आशयाच्या योजना अलीकडे भारत सरकार तयार करीत आहे. म्हणजेच शाहू महाराज काळाच्या १०० वर्षे पुढे होते असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
Read More 1000 मृत्यू अजूनही रेकॉर्डवर घेण्यात आलेले नाही-देवेंद्र फडणवीस
समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत शिक्षणाचा प्रसार करणारी मंडळी शाहूंना हवी होती. त्यांनी शाळेची जोखीम त्या-त्या गावच्या लोकांवर टाकली. त्यांना शाळा समितीवर पंच नेमून प्रत्येक शाळेसाठी एक पंच समिती त्या समितीत ३ ते ९ सभासद यांची नेमणूक शिक्षणाधिकारी यांनी करायची, या शाळा समितीने शाळेवर देखरेख ठेवायची, गावातल्या मागासलेल्या वर्गाच्या लोकांना मुले शाळेत पाठविण्यास प्रवृत्त करणे, शाळेत काही गैर घडले अथवा कमी-जास्त झाले तर ही समिती शिक्षणाधिकाºयांकडे तसा अहवाल पाठवायची, फी माफीच्या अर्जावर, आर्थिक हलाखीच्या दाखल्यावर शिफारस करावयाची, हीच पध्दत आजही तशाच स्वरूपात अस्तित्वात असून सुरूच आहे. परंतु आजची शाळा समिती शिक्षकांच्या बदल्या आणि राजकारणी दृष्टिकोन जोपासून काम करते. याशिवाय महाराजांनी दिल्ली दरबार, पाटील शाळा, सत्यशोधक शाळा, प्राथमिक शिक्षण असा अनेक क्लृप्त्यांद्वारे समाजातील तळागळातील माणसांपर्यंत शिक्षण नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
अनंत अडचणी असतानासुध्दा त्यांनी आपल्या राज्यात मोफत सक्तीच्या शिक्षणाचा उपक्रम राबवून दाखविला. आज लोकशाही शासन प्रणालीत मोफत शिक्षणाचा उपक्रम राबविताना नाकी दम येतो म्हणून शासनाने आज विनाअनुदान तत्त्वावर शाळा, महाविद्यालयांना परवानगी देणे सुरू केले आहे. अर्थात त्याद्वारे समाजाची अतोनात लूट होत आहे. यावरून मनात प्रश्न उद्भवतो की, कुठे राजर्षि शाहूंची मोफत सक्तीची शिक्षण पध्दती आणि कुठे आजच्या लोकशाही यंत्रणेतील सरकारचे मोफत शिक्षण? राजर्षि शाहूंच्या राज्यात देवसंस्थानात जमा होणा-या पैशाचा ताळेबंद ठेवून शिलकी अंदाजपत्रकाची रक्कम शिक्षणावर खर्च करण्यात येत होती. तशाच प्रकाराने आजच्या शासनाला देवसंस्थानाच्या नावाने अवैध पैसा अडकवण्यात येतो हा पैसा शिक्षणाकडे वळविता येणार नाही का?
लोककल्याणाच्या कार्यासाठी बचत करण्याच्या वेडाने स्वत:ची साधी राहणी ठेवून आबाळ करून घेणारा माणूस शाहू महाराजांशिवाय सातशे संस्थानात संशोधन करूनही सापडला नसता. कारण मोफत सक्तीच्या शिक्षणासाठी खर्च कमी पडतो म्हणून राजाराम कॉलेज काही दिवस बंद करून तो खर्च मोफत सक्तीच्या शिक्षणाकडे वळविण्याचा निर्णय घ्यावा तो शाहूंनीच. राजर्षि शाहूंनी राजाराम कॉलेज सुरू करण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले, त्यासाठी त्यांनी अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या. १९२२ च्या मार्चमध्ये सर चिमणलाल सेटलवाड, दस्तुर व सयाजीराव महाराज यांना विनंती केली की, त्यांनी राजाराम कॉलेज कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी मान्यता मिळण्याकरिता प्रयत्न करावेत.
Read More क्रिकेट सम्राट: 42 वर्षांपासून क्रिकेटची बित्तम बातमी देणारे मासिक होणार बंद
एप्रिल १९२२ मध्ये शाहूंच्या प्रयत्नांना यश आले. राजाराम कॉलेजला कायमस्वरूपी मान्यता आणि आॅनर्स कोर्ससाठी परवानगी देण्यात आली. भारतात फुले दाम्पत्याने स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली तर स्त्रीशिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी शाहू महाराज पुढे सरसावले. असे म्हटले जात की, शाहूंनी स्त्रीशिक्षणसाठी राजमार्ग घालून देण्याचे कार्य केले. त्या काळात मुलींना शिक्षण देणे म्हणजे पाप कर्म करण्यास मुभा देणे अशी दृढ समजूत, त्यातच बालविवाहाच्या अनिष्ट प्रथा आणि बहुजन समाजात तर मुलांनाच शिक्षण दिले जात नव्हते, तर मुलींच्या शिक्षणाची गोष्ट दूरच. या अडचणीसोबत कथित थोरामोठ्यांच्या घरात पडदा पध्दत यामुळे स्त्रीशिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी राजर्षिंना खूप त्रास झाला.