22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeविशेषचिंता लोकसंख्येतील असंतुलनाची

चिंता लोकसंख्येतील असंतुलनाची

एकमत ऑनलाईन

जगातील अनेक देश सध्या लोकसंख्याविषयक टाईम बॉम्बच्या (डेमोग्राफिक टाईम बॉम्ब) धास्तीने ग्रस्त असून, या बॉम्बचा स्फोट कधीही होऊ शकतो. या परिस्थितीचा परिणाम जपान, चीनसारख्या देशांमध्ये आतापासूनच पाहायला मिळत आहे. याचे मूळ कारण या देशांमध्ये कामधंदा करण्यास पात्र असणा-या युवकांच्या तुलनेत वयोवृद्ध लोकांची संख्या अधिक आहे. कोणत्याही देशात आयुर्मान वाढणे हे सुचिन्ह मानले जाते; परंतु या देशांमध्ये लोकसंख्या नियंत्रणाची धोरणे ज्या पद्धतीने राबविली जात आहेत किंवा यापूर्वी राबविली गेली होती, त्याचा हा परिणाम आहे. लोकसंख्या नियंत्रण करण्यामुळे युवकांची संख्या कमी होत गेली आणि वयोवृद्धांची संख्या वाढत राहिली.

जगातील सर्व देशांमध्ये जपान हा सर्वांत वयस्कर देश बनला आहे. म्हणजेच जपानमध्ये युवकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांची संख्याच सर्वाधिक आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर २०४० पर्यंत जपानमधील ३५ टक्के लोकसंख्या वयोवृद्धांची असेल. वस्तुत: जपानमध्ये प्रजननदर १.४ च्या आसपास आहे. सामान्यत: एखाद्या देशाची लोकसंख्या आहे त्याच प्रमाणात कायम राखण्यासाठी प्रजननदर २.१ टक्के असावा लागतो. शतायुषी लोकही जपानमध्ये सर्वाधिक संख्येने आहेत. प्रदीर्घ आयुष्य लाभणे ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते की, काम करणा-या हातांवरील ताण वाढत जातो. एकीकडे लहान मुले तर दुसरीकडे वयोवृद्ध लोक हे दोन्ही वयोगट अनुत्पादक वर्गात मोडतात. त्याचा थेट परिणाम कुटुंबावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होतो.

चीनच्या जनगणनेचा ताजा अहवालसुद्धा असाच चिंताजनक आहे. चीनच्या वाढत्या लोकसंख्येमुळे १९७९ मध्ये त्या देशाने ‘एक कुटुंब, एक मूल’ धोरण अवलंबिले. याचा परिणाम म्हणून लोकसंख्या नियंत्रित झाली; परंतु आता चीनसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. एकीकडे वयोवृद्ध लोकांची संख्या वाढत चालली आहे तर दुसरीकडे लग्नासाठी नव-या मुलींची संख्या कमी असल्यामुळे अडचणी उद्भवल्या आहेत. एकीकडे एकट्या चीनमध्ये तीन कोटी अविवाहित युवक आहेत तर दुसरीकडे युवकांमध्ये लग्नाबद्दल अनास्था वाढू लागल्याचे दिसते. नुकत्याच झालेल्या जनगणनेनुसार चीनमध्ये १०० मुलींमागे १११.३ मुले असे लिंग गुणोत्तर आहे. म्हणजेच लैंगिक असंतुलन मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहे. लोकसंख्याविषयक तज्ज्ञ प्रा. ब्योर्न एल्परमॅन यांच्या म्हणण्यानुसार, सध्या जन्माला येत असलेली मुले जेव्हा मोठे होऊन लग्नाच्या वयाची होतील तेव्हा आपल्या वयाची जीवनसाथी शोधणे ही त्यांच्यापुढील मोठी समस्या असेल. याचे सर्वांत मोठे कारण असे की, भारत आणि जगातील इतर अनेक देशांप्रमाणेच चीनमध्येही मुलीपेक्षा मुलाच्या जन्माला अधिक महत्त्व दिले जात आहे. चीनमधील युवकांमध्येही लग्नासारख्या बंधनात अडकण्याची इच्छा दिसत नाही.

ब्राझीलमध्ये मात्र चीनपेक्षा खूपच वेगळी समस्या दिसून येत आहे. तिथे किशोरावस्थेत प्रवेश करताच गर्भधारणा होण्याची समस्या वाढत आहे आणि तेथील सरकारला ‘गर्भावस्था नंतर’ असे घोषवाक्य वापरून किशोरवयीन मुलामुलींसाठी मोहीम राबवावी लागत आहे. अर्थात येणा-या काळात ब्राझीलसुद्धा ‘डेमोग्राफिक बॉम्ब’ची शिकार होणार आहे. इराण आणि इटलीची समस्याही बिकट आहे. या देशांमध्ये लोकसंख्या नियंत्रित करण्यात यश आले आहे आणि जननदर किमान स्तरावर आल्यामुळे येणा-या काळात तेथील लोकसंख्याही आजच्या संख्येपेक्षा कमी असणार आहे. इटलीमध्ये स्थलांतर हीसुद्धा एक महत्त्वाची समस्या आहे. लोकसंख्या ही केवळ भारताचीच समस्या नव्हे. जगातील अधिकांश देशांत असे पाहायला मिळते की, एखाद्या योजनेचे संचालनामुळे भविष्यात होऊ शकणा-या दुष्परिणामांचा अंदाज वेळेवर आला नाही तर ते दुष्परिणाम अधिक गंभीर होतात. भारतातही लोकसंख्या नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना केल्या जात आहेत आणि त्याचा परिणामही दिसून येत आहे. इराण, इटली आणि ब्राझीलमधील स्थिती आपल्यासमोर आहे. एकीकडे चीन युवकांना लग्न करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे तर दुसरीकडे युवकांना तीन मुले जन्मास घालण्यासाठीही प्रेरित करण्यास तिथे सुरुवात झाली आहे.

डेमोग्राफिक टाईम बॉम्बचा धोका ज्या देशांना आहे, त्यांनी आतापासूनच आपल्या धोरणात बदल करायला हवेत. वयोवृद्धांच्या संख्येत झालेली वाढ किंवा लोक दीर्घायुषी होणे हा चांगला संकेत आहे. कारण जीवनस्तरात झालेली सुधारणा, पोषणयुक्त आहार, आरोग्य सुविधांमधील सुधारणा असा याचा अर्थ होतो. हे संकेत चांगलेच मानले जातात; परंतु नवीन पिढीत लग्नाविषयी जी अनुत्सुकता दिसून येते, लोकसंख्या नियंत्रणावर युवक अधिक भर देतात तसेच प्रजननदर कमी आहे, त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती चिंताजनक आहे. विवाह आणि त्यानंतर मुले झाल्यामुळे युवकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होते. असे झाल्यास समाजव्यवस्थाही चांगली राहते. अशा स्थितीत लैंगिक भेदभाव कमी करण्याबरोबरच विवाह आणि कुटुंबसंस्था या बाबतीत युवकांनी जागरूक राहिले पाहिजे.

भविष्यासाठी धोरण आखताना या धोरणाचे परिणाम काय होतील, याचेही आकलन करायला हवे. ही एखाद-दुस-या देशाची समस्या नसून, जगातील अनेक देश या समस्येने ग्रस्त होणार आहेत. त्यामुळे काहीतरी ठोस उपाययोजना कराव्या लागणार असून, समाजासाठी आणि जगासाठीही त्या हितकारक असतील याची काळजी घेतली पाहिजे.

अमोल पवार, कॅलिफोर्निया

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या