24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeविशेषसामाजिक एकतेचा संदेश देणारे प्रेषित

सामाजिक एकतेचा संदेश देणारे प्रेषित

एकमत ऑनलाईन

प्रेषित महुम्मद सल्ल यांनी धार्मिक सहिष्णुता व चारित्र्य या गुणांच्या बळावर इस्लाम धर्मास एक नवी दिशा, नवी ओळख निर्माण करून दिली व जगात एक वेगळी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. प्रेषितांनी एकमेकांप्रति सद्भाव व मैत्रीचा संदेश दिला. सर्व मनुष्यजात एका ईश्वराचे भक्त असल्याचा मुख्य संदेश घेऊन ते या धरतीवर अवतरले. प्रेषित सल्ल. यांची विविधांगी रूपे जगासमोर आली आहेत. मग ते गोरगरिबांचे कैवारी असोत किंवा रणभूमीवरील शूर, पराक्रमी योध्दा असोत. एक कुशल, प्रभावी, प्रामाणिक व्यापारी म्हणूनही त्यांनी उत्तम ख्याती मिळवली होती. समस्त मानवजातीच्या कल्याणातच जीवनाचे ध्येय मानणारे प्रेषित महुम्मद सल्ल यांचे जीवन जगासाठी एक उत्तम आदर्श जीवनपट आहे.

महुम्मद सल्ल यांच्या जन्मापूर्वी अरब प्रांत अनेक कुप्रथांनी ग्रासलेला होता. प्रत्येक समुदायाचा वेगळा धर्म होता. कुणी मूर्तिपूजक होते तर कुणी जिवंत नवजात मुलींना दफन करायचे कारण मुलीचा जन्म सामाजिक अपमानाची बाब समजली जात होती. सगळीकडे अराजकता माजली होती. स्त्रिया, अबाल-वृध्द कोणीही सुरक्षित नव्हते. इस्लामचे संस्थापक हजरत महुम्मद सल्ल. यांचा जन्म इस्लामी हिजरी दिनदर्शिकेनुसार रबीउल अव्वल महिन्याच्या १२ तारखेस ५७१ इसवीमध्ये मक्का येथे झाला. पित्याचे नाव अबदुल्लाह बिन अ. मुतालिब होते तर आईचे नाव बीबी आमना. प्रेषितांच्या जन्मापूर्वीच पित्याचे निधन झाले तर आई बीबी आमना यांचेही प्रेषित सहा वर्षांचे असताना निधन झाले. त्यानंतर ते आजोबा अ. मुत्तालिब यांच्याकडे राहू लागले.

पाच वर्षांनंतर आजोबांचेही निधन झाले. मग प्रेषितांचे काका अबुतालिब यांनी त्यांचे पालनपोषण केले. अबुतालिब त्यावेळी नावाजलेले कुशल व्यापारी होते. काकांच्या कामात मदत करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांची सत्यता व प्रामाणिकता चर्चेचा विषय असायची. कालांतराने त्यांचा विवाह तत्कालीन प्रसिध्द व्यापारी महिला हजरत खदीजा यांच्याशी झाला. खदीजा यांनी स्वखुशीने इस्लामचा स्वीकार करून प्रेषितांशी विवाह करण्याचा रीतसर प्रस्ताव पाठवला, जो पे्रषितांनी स्वीकारला.

सिलेंडरसाठी अतिरिक्त शुल्क देऊ नये

ईशआराधना व ईशसंदेश
सुरुवातीपासूनच महुम्मद सल्ल. यांना ईशनामाची, आराधनेची आवड होती. गोर हिरा नामक टेकडीवरील गुहेत ते अनेक दिवस ईशआराधनेत मग्न असायचे. वयाच्या चाळीशीत याच गोर हिरा नामक गुहेत पवित्र इस्लामी दैवी ग्रंथ कुरआनचे प्राथमिक अवतरण झाले व ईश संदेश प्राप्त झाला की कुप्रथेच्या नावावर भरकटलेल्या समाजास योग्य मार्ग दाखवून मानवतेची स्थापना करा. अर्थात ईश्वराच्या आराधनेचा संदेश लोकांपर्यंत पोचवण्याची मोहीम प्रेषितांवर सोपवण्यात आली. पुरुषांमध्ये सर्वप्रथम अबुबकर रजि. यांनी एकेश्वरवादाचा स्वीकार केला. तर स्त्रियांमध्ये हजरत खदीजा यांनी लहान मुलांमध्ये हजरत अली रजी. व गुलामांमधून सर्वप्रथम हजरत बिलाल यांनी इस्लामचा स्वीकार केला. भविष्यात या चारीही नवमुस्लिमांची मोलाची साथ प्रेषितांना लाभली.

विरोधात्मक काळ
इस्लामचे प्रसारक व प्रचारक म्हणून जगभर नाव होत असतानाच त्यांचे विरोधकही सक्रिय होत होते. उल्लेखनीय बाब म्हणजे प्रेषितांनी कोणावरही बळजबरी इस्लाम लादला नाही अथवा इस्लामची सक्ती केली नाही. आपल्या सगळ्या इस्लामविषयक शंकांचे पे्रषितांकरवी निराकरण झाल्यासच ते स्वखुशीने इस्लामचा स्वीकार करू लागले. पण ज्यांना हे मान्य नव्हते ते प्रेषितांच्या विरोधात कटकारस्थान करू लागले. मुस्लिम व गैर मुस्लिम असे शीतयुध्द सुरू झाले. प्रेषित व त्यांच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घालण्यात आला. अशा परिस्थितीतही प्रेषित सल्ल. यांनी इस्लामच्या प्रचार व प्रसाराचे कार्य, समाजप्रबोधनाची मोहीम सुरूच ठेवली.

या दरम्यान मक्केमधील अतिशय प्रतिष्ठित व धाडसी हजरत अमिर हमजा, हजरत उमर रजि. यांनी इस्लामचा स्वीकार केल्याने विरोधकांच्या गोटात खळबळ माजली. मक्का शहरासोबत आसपासच्या प्रदेशातही इस्लामचा प्रसार होऊ लागला. पुढे वयाच्या ५३ व्या वर्षी ईशआज्ञेने मक्कावासीयांच्या वाढत्या विरोधामुळे प्रेषित सल्ल. यांनी मक्केहून मदिनाकडे प्रस्थान केले. मदिनावासीयांकडून प्रेषित महुम्मद सल्ल. यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या स्थलांतरास इस्लाममध्ये हिजरत असे म्हटले जाते. व याच वर्षापासून इस्लामच्या हिजरी या कालगणनेची सुरुवात झाली.

केंद्रीय बँकांचा सोनेविक्रीचा सपाटा

मक्कावर विजय व प्रेषितांची अंतिम हजयात्रा
काही वर्षांच्या संघर्षानंतर प्रेषितांनी मक्कास्थित विरोधकांवर आपल्या दहा हजार सैनिकांसोबत आक्रमण करून मक्केवर विजय प्राप्त केला. या विजयानंतर मक्केतील लोकांचा गट इस्लामचा स्वीकार करू लागले. दहा हिजरीमध्ये एक लाखाहून अधिक सहका-यांसोबत प्रेषितांनी मक्कामध्ये पवित्र हजयात्रा केली व ती त्यांची अंतिम हजयात्रा ठरली. अंतिम हजयात्रेनंतर पे्रषित मदिनाला परतले व वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांचे देहावसान झाले. त्यांच्यानंतर मुस्लिमांचे प्रतिनिधी म्हणून अबुबकर रजि. यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सामाजिक सुधार व प्रभाव
प्रेषित महुम्मद सल्ल. यांनी केलेली सर्वश्रेष्ठ सामाजिक सुधारणा म्हणजे शिक्षणाचा प्रसार. कुप्रथांमध्ये गुरफटलेल्या समाजाला दिशा दाखवण्याचे काम शिक्षण करणार आहे हे प्रेषितांनी अचूकपणे हेरले होते. प्रेषित म्हणाले, ज्ञान प्राप्त करा, सत्य व असत्य, न्याय-अन्याय, पाप-पुण्य इत्यादीचा फरक फक्त ज्ञानामुळेच कळतो. शिक्षण प्राप्त करणे हे प्रत्येक स्त्री-पुरुषांसाठी अनिवार्य आहे (हदीस). प्रेषितांनी स्त्रीभ्रूणहत्येला विरोध करून स्त्रीजातीचा सन्मान व उध्दार केला. केवळ २३ वर्षांच्या प्रयत्नांत अरब प्रांतामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. अनेक प्रकारच्या सामाजिक कुप्रथांमध्ये गुरफटलेल्या अरब समाजाला व जगाला प्रेषितांनी एक नवीन उज्ज्वल जीवनाची दिशा दाखवली.

पैगंबर जयंती वर्षानुवर्षे साजरी होत आहे. सामुदायिक जुलूस काढण्यापासून ते मेळाव्यापर्यंत सर्व कार्यक्रम हिरीरीने केले जातात. पण यावर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्व जगात हाहाकार माजला आहे. म्हणूनच रमजान ईद, बकरी ईद, मोहरमप्रमाणेच पैगंबर जयंतीही शक्यतो घरातच साजरी करावी. शासकीय नियमांचे उल्लंघन होईल असे कोणतेही कार्य होऊ नये याची दक्षता घ्यावी. इतरांना उपदेश करण्यापूर्वी आपण स्वत: आचरण करणे हा पैगंबराचा विशेष स्वभावगुण होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनांच्या नियमाचे पालन करून सर्वांनी आपले सणवार साजरे करण्याचा संकल्पच पैगंबरांप्रति खरी श्रध्दा ठरेल.

रिजवाना जहागिरदार (आलेमा)
नळदुर्ग, जि. उस्मानाबाद
मोबा.: ९९७०४ ६९२२४

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या