21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeविशेषस्त्रीवादाच्या नावाखाली मनमानी

स्त्रीवादाच्या नावाखाली मनमानी

एकमत ऑनलाईन

‘काली’ या माहितीपटाच्या पोस्टरमुळे लीना मणिमेकलाई चर्चेत आहे. तिने स्वत:चे वर्णन डॉक्युमेंट्री फिल्ममेकर तसेच उत्कट स्त्रीवादी म्हणून केले आहे. स्त्रीवाद ही सर्व स्त्रियांना समानता आणि मुक्ती देण्यासाठी एक आवश्यक अशी सामाजिक चळवळ आहे. केवळ काही लोकांच्या निवडीच्या स्वातंत्र्याची नव्हे. पितृसत्ताक व्यवस्थेच्या अंतासाठी अनेक दशकांपूर्वी सुरू झालेली
स्त्रीवादी चळवळ आज उन्मुक्तता आणि स्वच्छंदीपणाच्या दिशेने वाटचाल करत आहे तसेच विशिष्ट व्यक्तींचे स्वातंत्र्य आणि उन्नती हेच स्त्रीवादाचे यश आहे, अशा स्वरूपाची मांडणी होऊ लागली आहे.

आजकाल ‘काली’ या माहितीपटाच्या पोस्टरमुळे लीना मणिमेकलाई चर्चेत आहे. तिने स्वत:चे वर्णन डॉक्युमेन्ट्री फिल्ममेकर तसेच उत्कट स्त्रीवादी म्हणून केले आहे. तिच्या मते, देवी कालीने धूम्रपान करणे हे महिला सशक्तीकरणाचे पर्यायी द्योतक आहे. अशाच स्त्रीवादी प्रतिमा असलेल्या एक नेत्या म्हणजे महुआ मोईत्रा यांनी कालीच्या या पोस्टरला पाठिंबा व्यक्त केला आहे. याआधी आणखी एक कथित स्त्रीवादी महिला क्षमा बिंदू ही चर्चेत आली होती, कारण तिने स्वत:शी लग्न केले. अनेक वृत्तपत्रांनी स्त्रीमुक्ती, स्त्री सशक्तीकरण, पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या तोंडावर चपराक अशा उपमा देऊन क्षमाच्या मुद्यांचा गौरव केला होता. असे होणे साहजिकच आहे, कारण माझे शरीर-माझी पसंती हीच स्त्रीवादाची मोहीम समजणा-यांकडून याहून अधिक अपेक्षाही केली जाऊ शकत नाही.

स्त्रीसशक्तीकरण असे नाव देऊन आपल्या मर्जीने स्त्रीवाद मांडणे ही सध्या खूप मोठी दुर्दैवी गोष्ट बनली आहे. यामुळे स्त्रीवादी चळवळींचे अथक प्रयत्न कलंकित होऊन उपभोगवादी स्त्रीवादाचा उदय झाला आहे. या अंतर्गत पोल डान्सपासून ते न्यूड सेल्फी, सिगारेट आणि दारू पिणे हे महिला सक्षमीकरणाचे द्योतक मानले जात आहेत. सशक्तीकरण हा शब्द आपल्याला आवडेल ते करण्यासाठी एक आवरण म्हणून उदयास आला आहे आणि या सगळ्या झगमगाटाच्या आड सशक्तीकरणाची खरीखुरी गरज असलेल्या महिला जणू नाहीशाच झाल्या आहेत. सशक्तीकरणाच्या या दिखाऊ स्वरूपाचा आवाज इतका बुलंद आहे की, अनेक दशकांपासून वेदना आणि विषमतेचे चटके सोसलेल्या सर्व महिलांचा आवाज दबून गेला आहे.

‘मेरी मर्जी’ म्हणणारा स्त्रीवाद प्रथमदर्शनी नकारात्मक वाटत नाही. पण हा तथाकथित स्त्रीवाद असून, तो स्त्रीमुक्तीचा उल्लेख कधीच करत नाही. हा स्त्रीवाद सामाजिक परिवर्तनाची मागणी करत नाही आणि तो महिला सक्षमीकरणाच्या मोहिमेला अप्रत्यक्षपणे कमकुवत करण्याचेच काम करतो. या खोट्या स्त्रीवादावर कोणी टीका केली तर त्याला स्त्रीविरोधी असे लेबल लावले जाते. ‘शॉपिंग टू नेकेड सेल्फीज हाऊ एम्पॉवर्मेन्ट लास्ट्स’ या लेखात हेडली फ्रीमन लिहितात की, काही दिवसांपूर्वी मला अशा गोष्टी सांगितल्या गेल्या, ज्यातून आपण सशक्त आहोत असा आत्मविश्वास यायला हवा. उदाहरणार्थ नग्न सेल्फी घेणे, मला हवी असलेली स्त्रीवादाची व्याख्या करणे आणि डिझायनर कपडे खरेदी करणे इ. हेडलींच्या मते, या प्रकारच्या सशक्तीकरणाअंतर्गत एखाद्या श्रीमंत, प्रसिद्ध किंवा प्रतिष्ठित महिलेने प्रवाहाविरुद्ध काहीतरी वेगळे, खळबळजनक कृत्य करून दाखविणे म्हणजेच केवळ स्त्री सशक्तीकरण होय.अमेरिकन मॉडेल किम कार्दशियन हिने टॉपलेस सेल्फी ट्विट केला. एवढेच नव्हे, तर कामुकतेमुळे आपण सशक्त होत असल्याचे तसेच जगभरातील मुली आणि महिलांना सशक्तीकरणाच्या दिशने प्रेरित करण्यासाठी आपण हे कृत्य केले असल्याचे ट्विट तिने केले, यावरून याच वास्तवाला पुष्टी मिळते. उदार स्त्रीवादाची तळी उचलणारी किम कार्दशियन हिच्या मते तिच्या या तत्त्वज्ञानाला कोणी विरोध केला, तर त्या व्यक्तीचे वर्णन बॉडी शेमिंगला (शारीरिक संरचनेची खिल्ली उडविणे) प्रोत्साहन देणारी, एक हरलेली पुराणमतवादी व्यक्ती असेच करावे लागेल.

सध्या ‘फ्री द निपल कॅम्पेन’ हेदेखील स्त्रीवादी स्वातंत्र्याचे सशक्त माध्यम मानले जाते. याविषयी युनायटेड नेशन्स गुडविल अ‍ॅम्बेसेडर एम्मा वॉटसन यांना उद्देशून नाओमी शॅफोर खिन्नपणे लिहितात की, ज्या मोहिमेला (फ्री द निपल) आपण महिला सशक्तीकरण मानता, त्यावर पुढील वेळी सद्भावना दूत म्हणून भाषण द्या. ती मोहीम प्रत्यक्षात उपयोगात आणून पाहा आणि आपले म्हणणे किती लोक गंभीरपणे घेतात, याचा अभ्यास करा. वस्तुत: स्त्रीवादाच्या नावाखाली सुरू असलेल्या भलत्याच अवडंबरामुळे दुखावलेला कोणताही संवेदनशील माणूस अशाच कठोर शब्दांचा वापर करू इच्छित असेल. पत्रकार
सारा दितुम यांनी ‘मेरी मर्जी’वाला स्त्रीवाद हा असा खेळ असल्याचे उघड केले आहे, ज्यात समूहातील महिलांचे दु:ख आणि शोषण हा खरा मुद्दाच नाही. मुद्दा आहे केवळ अशा काल्पनिक स्त्रीवादाच्या आदर्शांवर जगण्याचा, ज्यात उंच टाचांच्या सँडल, नग्न सेल्फी आणि आजूबाजूच्या पुरुषांविरुद्ध उभे राहणेच केवळ अभिप्रेत आहे. ‘मेरी मर्जी’वाल्या स्त्रीवादाचा खरा फायदा केवळ विशेषाधिकार लाभलेल्या अत्यंत स्पष्टवक्त्या महिलांच्या छोट्याशा गटालाच होतो. मनाला वाटेल ती माझी पसंती हे प्रत्येकाला मिळालेले स्वातंत्र्य आहे, ही कल्पना निव्वळ ढोंगीपणाची आहे. कारण स्वत:च्या इच्छेनुसार स्त्रीवाद हा स्त्रीवादाच्या वास्तविक विचारसरणीच्या विरुद्ध आहे. सशक्तीकरणाच्या किंवा तिच्या आवडीच्या नावाखाली कनिष्ठ मध्यमवर्गातील कुठलीही मुलगी क्षमा बिंदूप्रमाणे स्वत:शीच लग्नाचे सोंग करू शकते का? उदार स्त्रीवाद हा एक भ्रम बनून समाजाला जाळ्यात पकडत आहे. त्यामुळे आजही महिलांना दुय्यम दर्जा देणारे सर्व मुद्दे चर्चेतून आपोआपच दूर जाऊन पडले आहेत. ‘मेरी मर्जी’वाल्या स्त्रीवादाने ख-या स्त्रीवादाला कमकुवत केले आहे.

-डॉ. ऋतू सारस्वत,
समाजशास्त्राच्या अभ्यासक

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या